Thursday, 10 January 2019

आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ




आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी.

डोंगराच्या पायथ्याशी हिरव्यागार माळरानावर आमची कौलारू शाळा मंत्रिमंडळ निवडीची घोषणा होताच विलक्षण राजकीय रंगात रंगून जाई.
या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, सांस्कृतिक मंत्री, आरोग्यमंत्री, सफाईमंत्री आणि क्रीडामंत्री अशी मोजकीच मंत्रीपदं असत. पहिली ते सातवीपर्यंतच्या आमच्या शाळेत सात वर्गांची मिळून जवळपास १५० मुलं असायची. त्यातली काही मोजकीच चुणचुणीत मुलं मंत्रीपदासाठी उभी रहायची. मग एक दिवस ठरवून साध्या कागदावर नावं लिहून त्याच्या मतपत्रिका बनवून मतदान व्हायचं.
आणि मग शाळेतले गुरुजी मतमोजणी करून कोणाला कुठलं पद मिळालं ते सांगायचे आणि शाळेच्या मंत्रिमंडळाचा एक तक्ता करून वर्गाला लागून असलेल्या भिंतीवर लावला जायचा. मंत्रीपदं भूषवणाऱ्या मुलांना आपण राज्याचं किंवा देशाचंच मंत्रीपद मिळवल्याचा आनंद होई. त्याचबरोबर त्यांना मंत्रीपदाच्या जबाबदाऱ्या सांगितल्यावर दडपणही यायचं. पण मुलं हुशारीने मंत्रिमंडळ नीट चालवायची. पण गावातल्या शाळेत वर्षभरात इतक्या गोष्टी घडायच्या की मंत्रीपद तेव्हा सांभाळणं ही साधीसुदी गोष्ट नव्हती बरं का. खूप जबाबदाऱ्या अंगावर पडत.
   शाळेचा मुख्यमंत्री आपल्या शाळेच्या प्रगतीच्या दृष्टीकोनातून काय काय करता येईल ते पाही. शालेय शैक्षणिक स्पर्धा, बौद्धिक स्पर्धा, गुरुजींच्या गैरहजेरीत एखादा वर्ग सांभाळणं, शाळेची अभ्यासातील प्रगती कशी आहे, त्याचा विचार करणं शिक्षणमंत्र्याचं काम असायचं. आरोग्यमंत्री आणि सफाईमंत्री यांचं काम खूप अवघड असायचं. शाळेतल्या मुलांचा नीटनेटकेपणा, स्वच्छता, आवारातली साफसफाई, पिण्याचं पाणी आणि हवामान बदलानुसार येणाऱ्या समस्यांचं निराकरण त्यांना करावं लागे. तर क्रीडामंत्र्यांचा थाट काही वेगळाच असे. आपल्याच शाळेत सचिन, धोनी, सानिया आणि आनंद असे क्रीडापटू घडावेत असं त्यांचं स्वप्न असे, बऱ्याचदा ते स्वप्नच राही. पण त्या स्वप्नाला जिल्हापातळीपर्यंत तरी पोहोचवता आल्याचं समाधान आमच्या शाळेतल्या क्रीडामंत्र्यांना होतं. आमच्या शाळेची खेळातली प्रगती जिल्हापातळीच्या पुढे पोहोचू शकली नाही. पण मुलांनी मेहनत घेणं सोडलं नव्हतं. गाव, पंचक्रोशी, तालुका आणि मग जिल्हास्तरीय स्पर्धा रंगायच्या. त्यासाठी काही मुलं विशेष मेहनत करत. शाळेच्या मागे मोठं मोकळं मैदान होतं, त्यावर खो-खो, कब्बडी, लंगडी, दोरी उड्या, लांब उडी, उंच उडी, गोळा फेक, भाला फेक, धावणे आणि दर शनिवारी व्यायाम, आसनं आणि कवायती रंगत. याकडे क्रीडामंत्री जातीने लक्ष देत. त्यावेळचा त्यांचा रुबाब आणि शिस्त ग्रेग चॅपल यांच्यापेक्षा कडक.
पण या सगळ्यात धम्माल असायची ती सांस्कृतिक मंत्र्यांची. वर्षभर छान समारंभ, सांस्कृतिक सोहळे पार पडायचे ते त्यांच्यामुळे. शाळेत तेव्हा स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, हळदीकूंकू समारंभ, सरस्वतीपूजन, वनभोजन आणि सहल हे मुख्य आकर्षणाचे सोहळे असत. या दिवशी सांस्कृतिक मंत्र्यांच्या कल्पकतेची कसोटी लागे. कार्यक्रमाचा आनंद आणि आकर्षण मुलांमध्ये टिकून राहण्यासाठी त्यांची धडपड असे. या सोहळ्यात सगळ्यात मोठा सोहळा म्हणजे सरस्वती पूजनाचा.
   देवीची मूर्ती दीड दिवस शाळेच्या एका वर्गात विराजमान होई. तिची आरास, नैवेद्य, वर्गणी सगळं काम सांस्कृतिक मंत्र्याकडे असे. त्याचबरोबर सकाळी सरस्वती पूजन झाल्यावर संध्याकाळी गायन-नृत्य-नाट्याचा कार्यक्रम करून ती रात्र जागवली जायची. या कार्यक्रमासाठी दोन महिने आधी सांस्कृतिक मंत्र्यांचं काम सुरू होई. शाळेतली गाणारी, नृत्य करणारी, अभिनय करणारी किंवा या सगळ्याची आवड असणाऱ्या मुलांची निवड होई. त्यांनतर स्वागतगीत, ईशस्तवनासाठी कोण गाणार हे ठरे. शाळेतले संगीत शिक्षक तबला आणि पेटी स्वतः वाजवत या मुलांची सगळी तालिम करून घेत. तेव्हा रेकॉर्ड डान्स वगैरे असले प्रकार नव्हते. मुलं स्वतः गाणी गाऊन हातवारे करून अभिनय करत. तो कोकणातल्या शाळेचा सांस्कृतिक कार्य़क्रम असल्यामुळे शेवट मुलांच्या दशावतारी नाटकाने होई. या सोहळ्यासाठी वेशभूषा आणि रंगभूषेची जमवाजमव करणं अवघड व्हायचं. गावातल्या बायका मुलींना साड्या नेसायला मदत करायच्या आणि त्यांची रंगभूषा करण्याचं काम दशावतारासाठी काम करणारे बाळूकाका करायचे. ते सगळ्याच मुला-मुलींचे चेहरे दशावताराच्या पात्रांसारखे रंगवत.
आज पत्रकारिता क्षेत्रात वावरताना माझा ओढा मनोरंजन आणि सांस्कृतिक घडामोडींकडे जास्त वाढला. याचं सारं श्रेय शाळेत मला सलग तिनदा भूषवावं लागलेल्या सांस्कृतिक मंत्रीपदाला जातं.

पूर्वप्रसिद्धी ऐसी अक्षरे रसिके, आकाशवाणी मुंबई, ५ ऑक्टोबर २०१८



निखळ संवादासाठी…


आपल्या घराशिवाय अजून एक दुसरं घर म्हणजे आपलं ऑफीस. घरच्यापेक्षा जास्त वेळ आपण या जागेत वावरत असतो. तसेच कामाच्या निमित्ताने आपण खूप अनोळखी माणसांच्या संपर्कात येतो. अशावेळी खूप गोष्टी मनात चाललेल्या असतात, त्याचा नकळत ताण येत असतो. अलिकडे शहरांमध्ये ताण घेऊन वावरणाऱ्यांची संख्या वाढलीय, असे काही मानसशास्त्रीय अहवाल सांगू लागलेत. त्यामुळे ऑफीसरुपी दुसऱ्या घरात, समाजात वावरायचं कसं? निकोप संवाद कसा साधायचा? याविषयी काही मनमोकळं मांडावसं वाटतंय, ते तुम्हाला सांगते.

अनेकदा आपण हाताने वाजवून इतरांना गाणं कुठलं ते ओळख असा खेळ गमतीने खेळत असतो. पण एकदा काय झालं, एलिजाबेथ न्यूटन नावाची एक मानसशास्त्राची विद्यार्थीनी होती. तिने पीएचडीच्या विद्यार्थ्यांबरोबर एक नवा मनोरंजक मानसशास्त्रीय प्रयोग सादर केला. त्या प्रयोगाला तिने नाव दिलं होतं, टॅपर्स अँड लिसनर्स एक्सपेरीमेंट. तिने पीएचडीच्या विद्यार्थ्यांना यात सहभागी व्हायला सांगितलं. तिने मुलांचे दोन विभाग केले. एक टॅपर्सचा आणि दुसरा लिसनर्सचा. टॅपर्सना प्रसिद्ध आणि पटकन ओळखू येतील अशी २५ गाणी फक्त बोटांचा वापर करून टेबलाच्या सहाय्याने वाजवायची, असं सांगितलं. तर लिसनर्सना ती गाणी कुठली? हे फक्त ओळखायचं होतं.


वरवर पाहता हे सोपं वाटत होतं, पण लिसनर्सना ती गाणी ओळखताच येईनात. एकूण १२० वेळातरी ती गाणी बोटांनी टेबलाच्या सहाय्याने वाजवली गेली, पण ओळखताच आली नाहीत. फक्त तिनच गाणी ओळखता आली.
याचं कारण असं होतं की ऐकणारे ५० टक्केतरी त्यातली गाणी ओळखतील असा अंदाज होता. पण ती ते ओळखू शकले नाहीत. जे बोटाने वाजवून सांगत होते, त्यांना ते गाणं नीट कळलेलं होतं. ते त्यांच्या डोक्यात फीट बसलेलं होतं. त्यांच्या बोटांनीही छान लयीत त्यांनी ते वाजवलं होतं. पण तरीसुद्धा ते ऐकणाऱ्यांनी का बरोबर ओळखलं नाही, याचा सगळ्यांना प्रश्न पडला आणि कुजबूज सुरू झाली. ऐकणाऱ्यांना कळलं नाही की इतकं ओळखायला सोपं गाणं आपण का ओळखलं नाही. कारण त्यांच्या डोक्यात प्रकाशच पडला नव्हता. त्यांनी खूप प्रयत्न केला होता. पण जे वाजतंय ते अर्थहीन आहे, असंच त्यांना वाटत होतं.

हेच उदाहरण घेऊन सांगायचं झालं तर तुम्ही तुमच्या मुलांना, नातेवाईकांना, ऑफीसमधल्या सहकाऱ्यांना, जोडीदाराला अशी एखादी कुठली गोष्ट सांगायचा प्रयत्न केला आहे का?  तर अशी वेळ आपल्या दैनंदिन कामकाजात येतच असते. तुम्ही खूप मनापासून तुमच्या डोक्यातल्या कल्पना इतरांना सांगण्याचा प्रयत्न करत असता. पण तुम्हाला अपेक्षित क्रिया समोरच्या व्यक्तीकडून घडत नाही. त्यामुळे दोन्हीबाजूंनी तणाव वाढत जातो. अशा वेळी समस्या कोणामुळे निर्माण होते आहे, हे ओळखता यायला हवं. तर ही टॅपर्सची समस्या असते. लिसनर्सची नसते. कारण तुम्ही स्वतः टॅपर असता आणि काय करायचं आहे, हे तुमच्या डोक्यात पक्क ठरलेलं असतं. आणि आपण आपली कल्पना किंवा आपल्याला काय म्हणायचं आहे ते समोरच्याला नीट सांगितलंय अशा भ्रमात राहतो. पण ते खरं नसतं. कारण जेवढी तुमच्यात त्या गोष्टीविषयी स्पष्टता आलेली असते, तेवढीच स्पष्टता समोरच्यात आलेली नसते. त्यामुळे ते जेव्हा सांगतात की आम्हाला नीट कळलं नाही, तुम्ही काय सांगताय ते, त्यावेळी न रागावता, न कंटाळता, त्यांना कळलंय असं गृहित न धरता नीट समजून सांगितलं पाहिजे. कारण समाजात वावरताना कधी आपण टॅपर्सच्या भूमिकेत असतो, तर कधी लिसनर्सच्या. आणि या दोन्ही भूमिका उत्तम वठवायलाच हव्यात, नाही का?

पूर्वप्रसिद्धी, ऐसी अक्षरे रसिके (मुंबई आकाशवाणी) ४ ऑक्टोबर २०१८




Sunday, 29 July 2018

पिवळा गुलाब


आमच्या गावाकडच्या परसबागेत जास्वंदीपासून ते गुलाब अबोलीपर्यंत वेगवेगळ्या रंगांची, गंधाची फुलं होती. अजूनही आहेत. त्या बागेकडे पाहिलं की प्रसन्न वाटायचं.
एके दिवशी आईने बाजारातून एक पिवळ्या गुलाबाचं रोपं आणलं. या गुलाबाच्या पाकळ्या वरून पिवळ्या गडद रंगाच्या आणि खालून लालूस रंगाच्या होत्या. काय त्याच्या रंगाचा आणि देखणेपणाचा रुबाब विचारू नका.

त्याआधी आम्ही कधी पिवळा गुलाब पाहिलाच नव्हता. त्यामुळे कुतूहल तितकंच अप्रूप की बागेत लावल्यावर याला पहिलं फूल येईल ते पिवळ्या रंगाचंच असेल ना...
पण हळहळू या गुलाबाच्या रोपाने इतर सर्व फुलझाडात आपली जागा वरचढ केली. त्यामुळे बागेत आल्यावर पहिलं लक्ष त्याच्याकडेच जाऊ लागलं. 

एके दिवशी तर या गुलाबाच्या झाडावर २५ फुलं फुलली होती. तो क्षण अजुनही नजरेसमोर ताजा आहे.
त्यावेळी शाळेत, कुठल्या समारंभात किंवा अगदी घरी असल्या तरी बायकांना फुलं केसात माळण्याचा सोस होता. आजंही आहे, पण कमी झालाय. त्यामुळे आईने सांगितलं, की वाडीतल्या बायका त्या गुलाबाच्या फुलांकडे बघून फुलं मागायच्या आत यातली काही फुलं नीट तोड आणि त्यांना नेऊन दे. तसं केलंही. सगळ्या बायका खूश झाल्या.


त्या दिवसांत शाळेत फुलं माळून जायचाही एक वेगळाच स्वॅग होता. कधी अबोलीचा मोठा गजरा तर कधी मोगऱ्याचा, त्यात सुरंगीचा गजरा भाव खावून जायचा. पण आमच्या घरी सगळ्यांना त्या पिवळ्या गुलाबाचंच कौतुक. एके दिवशी आई म्हणाली, तुमच्या शाळेतल्या बाईंनाही नेऊन दे या पिवळ्याचं गुलाबाचं फूल. तेव्हा शाळेत बाईंना फुलं नेऊन देण्यासाठी मुलींमध्ये चढाओढ असायची. आपण दिलेलं फूल किंवा गजरा बाईंनी माळला की मुलींना भारी वाटायचं. एके दिवशी मी बाईंना पिवळा गुलाब नेऊन दिला. बाईंना ते फूल खूप आवडलं. 

मग अधूनमधून अशी पिवळ्या गुलाबाची फूलं मी त्यांना देऊ लागले. मग पावसाळा जवळ आला तसा बाई मला म्हणाल्या, या गुलाबाची एक छोटी फांदी आणून देशील का... मी आईला विचारलं...आईसुद्धा हो म्हणाली. गावाकडे पावसाळी दिवसात फुलझाडांच्या फांद्या लावण्याचा शिरस्ता अजुनही आहे. आईने मग मला एक छोटी फांदी छाटून दिली आणि बाईंना द्यायला सांगितली. बाई खूश झाल्या. पण त्यानंतर आम्ही मात्र नाखूश झालो. कारण आमचं गुलाबाचं झाड हळूहळू सुकू लागलं. आणि एके दिवशी मरून गेलं. 

बाईंना याची फांदी तोडून दिली म्हणूनच आमचं गुलाबाचं झाड आमच्यापासून दूर गेलं. हेच तेव्हा आमच्या बालमनात पक्क बसलं. त्यानंतर शाळेतही फुलं माळून जाणं कमी होत गेलं. बाईंनाही फूल नेऊन देणं बंद झालं. मुंबईत रहायला आल्यानंतर आमच्या शेजारच्या काकू हळदी कूंकू घालतात तेव्हा पांढरी सोनटक्याची फुलं वाटतात. ती फुलं एकदा कॉलेजमध्ये माळून गेल्याचं आठवतंय. आणि अधून-मधून मोगऱ्याचा गजरा किंवा सोनचाफ्याची फुलं बाजारातून आणते. तेवढाच काय तो फुलांचा सहवास.

आज विचार करते तेव्हा वाटतं, बाईंच्या विचारण्याचा आदर करत नीट नाही म्हणून सांगितलं असतं तर पिवळ्या गुलाबाचं झाड वाचलं असतं का....का त्याचं अस्तित्त्व तेवढ्यापुरतंच होतं... पावसाळ्यात गावाकडे दरवर्षी फुलझाडं लावतो. त्यावेळी पिवळ्या गुलाबाची आठवण पुन्हा ताजी होते. शहरात आल्यावर आता कित्येक रंगाची गुलाबाची फुलं मी पाहिली. पण त्या पिवळ्या गुलाबाच्या झाडाची आठवण कळीसारखी टवटवीतच राहतेय. या घटनेमुळे माझा आवडता रंग पिवळा हे एकदम फायनलच झालं. त्यामुळे कपडे खरेदी करताना किंवा एखाद्या गोष्टीसाठी रंगाची निवड करताना पिवळ्या रंगाला झुकतं माप देते.
कसं असतं ना मानवी मन? आपलं हरवलेलं काहीतरी असं आसपासच्या सगळ्यात शोधत राहणारं?

पूर्वप्रसिद्धी - मुंबई आकाशवाणीवर ऐसी अक्षरे १३,१४,१५ एप्रिल २०१८


पण ओढ ही युगांची...

पहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगांची
जादू अशी घडे ही, या दोन लोचनांची

शाळकरी दिवस संपता संपता महाविद्यालयाच्या गुलाबी वळणावर कविता भेटायची. प्रेमाच्या बेधुंद सरी तनमनाला भिजवून जायच्या. ज्येष्ठकवी मंगेश पाडगावकरांच्या या कवितेला संगीतकार श्रीनिवास खळे यांनी तितकीच भावोत्कट चाल दिली. आणि त्या वयाच्या कित्येक कुमार-कुमारींच्या मनोवस्थेला सुरेल संगीतात लाजत लाजत हळुवार गुणगुणत वाट मिळाली. कवितांनी उमलत्या वयातील प्रेमाला शब्दबद्ध केल्यामुळे त्यावेळच्या तरुणाईच्या भावनांना व्यक्त होणं सोपं झालं. मग अरूण म्हात्रे यांच्या कवितांतून ते गुलाबी मन थोडं जागं झालं....ते दिवस आता कुठे, जेव्हा फुले बोलायची, दूर ती गेली तरीही सावली भेटायची... असं काहीसं पुढे व्हायला लागलं. एकंदरीतच ते दिवस आता कुठे असंच आता दिसू लागलंय. आणि हे सत्य आहे. 
त्यावेळच्या चित्रपटांनी, संगीताने, साहित्याने खरंच जादू केली होती. कित्येकांच्या डायरीत, पुस्तकात आठवणींची मोरपीसं, गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या, प्रेमपत्राचा गुलाबी कागद असायचा. तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल लिहिलेल्या प्रेमभरल्या उपमांच्या ओळी असायच्या. पहिल्या भेटीची हुरहूर असायची, नात्यांची मजा उलगडण्यात असते हे मानणारी ती हळवी पिढी. पहिल्या प्रेमाला जपायची छोट्या छोट्या गोष्टींतून, आठवणींतून. कधी त्याला व्यक्तता मिळायची, कधी नाही मिळायची. म्हणून पहिल्या प्रेमाच्या आठवणींना कोणी कधी पुसून टाकत नव्हतं, तर त्या जपल्या जात होत्या. आजही आपल्या आजी-आजोबांना विचारलंत तरी ते किती चेहऱ्यावर तजेला आणून त्यांच्या स्वप्नातली ती आणि तो विषयी सांगतील. त्यांच्या बोलण्यातही अगदी उत्साह ओसंडून वाहताना दिसेल. मंदिरात जाण्याचा बहाणा, ग्रंथालयात पुस्तकं चाळण्याचा बहाणा असं बरंच काही. ज्यांना त्यांचं पहिलं प्रेम भेटे (मिळे) त्यांचं ठिक आहे, पण ज्यांना ते फक्त स्वप्नातच मिळे त्यांच्यासाठी समाजाने कांदे-पोह्यांचा साग्रसंगीत कार्यक्रम आखून दिला होताच. आता तो चित्रपटात किंवा मालिकेत घर जुन्या विचारांचं आहे हो! हे दाखवण्यासाठी १५ ते २० मिनिटं कांदे-पोह्यांचं दृश्य दाखवलं जातं. पण खरंच वरून ती मुला-मुलींना भेटण्याची समाजमान्य चौकट असली तरी त्यात धोके होतेच. मुलीला कमीपणा मिळायचा. मुलाचं नाक नेहमी वर अशा सोहळ्यात. तिने चहा, कांदे-पोहे स्वतः बनवून पाहुण्यांसाठी घेऊन यायचं नी मग प्रश्नांच्या फैरी सुरू व्हायच्या. मुलीचं नाव नीट माहित असलं तरी पहिला प्रश्न असायचा काय गं पूर्ण नाव सांग तुझं....इथपासून ते स्वयंपाक येतो का, गाता येतं का, शिवणकाम येतं का...चालून दाखव... सुईत दोरा ओवून दाखव इथवर त्या प्रश्नांच्या फैरी पोहोचायच्या मुलीला नकोसं व्हायचं...


या कांदेपोह्यांच्या कार्यक्रमांचंही रुपडं समाजातील स्तरानुसार बदलत गेलं. ते अगदी अलिकडे आलिशान हॉटेल, रेस्टॉरेंटमध्ये भेटणं, कॅफेमध्ये भेटणं असं सुरू झालं. मुलाकडच्या, मुलीकडच्या सगळ्यांनी एकमेकांना अशाप्रकारे भेटताना वरून म्हणायचं भेटताना की हे साधं भेटणं आहे हो, यात औपचारिकता कशासाठी? पण पुढे जाऊन या पद्धतीलाही कांदे-पोह्याचंच रुप आलं. पण तेही आधुनिक म्हणून मुला-मुलींना मान्य झालं. पण आता मुलं-मुली दोघेही खूप शिकतात. त्यांचे करिअर, नोकरी आणि व्यवसाय विषयक अनेक प्रश्न असतात. आपल्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा आता स्वप्नाळू राहिल्या नाहीत. त्या व्यावहारिक झाल्या आहेत. घरं सांभाळायचं म्हटल्यावर कित्येक मुली धसका घेतात, इथे रोज ऑफिस गाठायची घाई आणि सासरच्या घरात इतकी माणसं सगळं भयंकर वाटू लागतं तिला... शिक्षणाच्या जोरावर पुढे आलेल्या मुली आधुनिक विचार कर्त्या झाल्या तरी मुलं मात्र अजून पारंपरिक आणि आधुनिकतेच्या हिंदोळ्यावर अधांतरी झोके घेतायत.
पूर्वी घरातल्या वडीलधाऱ्यांना इतकंच कशाला आजुबाजुला राहणाऱ्या मंडळींना, नातेवाईकांना मुला-मुलींच्या अपेक्षा माहित असायच्या. त्यामुळे ओळखीतून अनेक लग्नगाठी जुळायच्या. मुला-मुलींविषयी त्यांच्या घरची मोठी माणसं खात्रीने काही गोष्टी सांगायची. त्यामुळे परस्परांना निवड करणं सोपं व्हायचं, विश्वास वाटायचा. पण आता नात्यात आणि पिढ्यांमध्ये बदलत्या काळानुसार अंतर वाढतंय त्यामुळे माझा लाडका मुलगा किंवा मुलगी असली तरी तिच्या आवडीनिवडीविषयी काही ठामपणे घरच्यांना ते सांगता येत नाही. तरुणाई शिक्षणाच्या स्पर्धेत अडकली, मग शिक्षण घेतल्यावर योग्य नोकरी किंवा व्यवसायात टिकून राहण्यासाठी जीवाचं रान करू लागली. त्या नादात त्यांचा आपुलकीच्या नात्यांशी बंध कमजोर होऊ लागला. तो नात्यातल्या ओलावा, ती माया, तो आपलेपणा राहिला नाही. त्यामुळे मनमोकळं बोलायचं, पण ते बोलायचं तरी कोणाशी अशी कित्येकांची अवस्था होते.
आजच्या पिढीलाही आपल्या व्यग्र दिनक्रमातून पावसात भिजावसं वाटतं, तिची किंवा त्याची सोबत असावी असं वाटतं, जशी कवितांमध्ये वर्णन केलेली असते ना अगदी तशी. पण वेळ नसतो. बाहेर मस्त पाऊस पडत असतो आणि ज्या डोळ्यांनी स्वप्नं पहायला हवीत ते डोळे संगणक, लॅपटॉप, आय पॅड अशा कुठल्यातरी स्क्रिनवर खिळलेले असतात, कॉफीचा मग ही वाफाळत थंड होऊन जातो, त्याचंही भान राहत नाही. मग चिडचिड...ताण...कटकट... कधीतरीच निवांत चार क्षण आजच्या पिढीला अनुभवायला मिळतात तेव्हाही घरच्यांपेक्षा ऑफिसमधल्या सहकाऱ्यांसोबत फिरायला प्राधान्य दिलं जातं. कारण घरापेक्षा ऑफिसमध्येच जास्त वेळ जातो ना... तर महत्त्वाचा आहे वेळ...
आजच्या तरुण पिढीलाही डोळे मिटून घेता, दिसतेस तू समोरफुलवून पंख स्वप्नी, अन् नाचतात मोर, झाली फुले सुगंधी, माझ्या ही भावनांची...  पाडगावकरांच्या या ओळींतली भावना अनुभवायची आहेच. पण ती त्यांच्या त्यांच्या पद्धतीने. त्यासाठी त्यांचा जोडीदार शोधण्यासाठी घरच्यांनीही मागे लागायची आवश्यकता आहेच. पण ते आधुनिक झाले तशी जोडीदार शोधण्याची पद्धतही आधुनिक व्हायला हवी, असायला हवी. म्हणजे जिथे शिक्षण, नोकरी-व्यवसाय, त्यांची पॅशन, आवड-निवड, स्पर्धेतही टिकून राहून सकारात्मकतेने पुढे जाऊ, एकमेकांना समजून घेऊ, एकमेकांचे आधार न होता सोबती होऊ म्हणणारा जोडीदार सापडेल अशी काहीतरी व्यवस्था हवी. जसं की लग्न जमवणारी संकेतस्थळं आणि त्यांची apps. लग्नाळू तरुण-तरुणींसाठी अगदी योग्य. त्यांना हवं तसंच. आजच्या पिढीसाठी वेळ खूप महत्त्वाचा आहे. तो वेळ १०-१२ वेळा कांदे-पोह्यांच्या कार्यक्रमात घालवायचा नाहीय. कित्येक मुला-मुलींना नुसतं भेटून त्यांना होकार-नकाराच्या झुल्यावर झुलवायचं नाहीय. म्हणून थेट आणि स्पष्ट विचार करणाऱ्या आजच्या पिढीसाठी एबीपी वेडींगसारखं संकेतस्थळ हवंय. जिथे अनेक शक्यतांना पडताळून पाहता येईल, तेही विश्वासार्ह पद्धतीने.
पण हे कांदे-पोह्यांचे कार्यक्रम मागे पडून लग्नसंस्थेत ही आधुनिकता का आली? त्याच्या मागेही काही कारणं आहेत. लग्न करण्याचा पारंपरिक आता हेतू बदललाय. आधी लग्न हा एक विवाह संस्कार होता. एका कुटुंबाचं दुसऱ्या कुटुंबाशी जोडलं जाणं होतं. आता नात्यातली शारिरिक आणि भावनिक गरज याला महत्त्व आलंय. त्यामुळे लग्नाचं वय बदलत आहे. लग्न करण्याच्या पारंपरिक पद्धतींमध्ये बदल आवश्यक आहे. लग्न विधींनाही आता तेवढं महत्त्व उरलेलं नाही. पण तरीही लग्न संस्था ही समाजाचा आजही महत्त्वाचा पाया आहे. पण मनासारखा जोडीदार मिळायला भाग्य लागतं, लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात वगैरे अशा विधानांचा आजच्या पिढीवर प्रभाव नाही. आहे हे, असं आहे ते स्वीकारून पुढे जाण्यावर भर देणारी ही पिढी आहे. मनासारखा जोडीदार मिळावा म्हणजे काय, त्यात कोणकोणत्या गोष्टी यायला हव्यात हे आजची पिढी स्वतः ठरवते आहे. घर, नोकरी-व्यवसाय, कामाची पद्धत, पत, स्वभाव, कुटुंबाविषयी जाणून घेणं, मुला-मुलींचा मित्रपरीवार कसा आहे, दोघांपैकी एकाला कुठल्या गोष्टीचा त्याग करावा लागला तर कुणी नमतं घ्यायचं? या सगळ्याचा सारासार विचार करून आजची पिढी जोडीदाराची निवड करू लागली आहे.
त्यामुळे तीला तो भेटणार आणि त्याला ती भेटणार पण वेगळ्या पद्धतीने. असं म्हणूया हवंतर. पण ओढ ही युगांची हे मात्र सत्य आहे ते असंच चिरंतन राहणार आहे. कारण नाती बदलली, काही कारणांमुळे नात्यात दुरावा आला तरी नाती जपायला हवीत, तुटता कामा नयेत याची काळजीही आजच्या पिढीला आहे. फक्त कधी कधी त्यांचा गोंधळ उडतो, तेव्हा मोठ्यांनी त्यांना समजून घ्यायला हवं. कारण प्रत्येकाला वाटत असतं अख्या जगाने नाकारलं तरी कुणीतरी आपल्याला पूर्णपणे स्वीकारायला हवं, आपल्यावर पूर्णपणे विश्वास ठेवायला हवा, जिवापाड प्रेम करायला हवं, आपल्याला त्याने सुख-दुखात पूर्णपणे पाठिंबा द्यायला हवा. तेव्हाच आपण आपल्याला आयुष्यात जे काही मिळवायचं आहे, जे ध्येय गाठायचं आहे ते गाठू शकतो. अशी व्यक्ती म्हणजे मुलामुलींसाठी पहिल्यांदा त्यांचे आई-वडील असतात. मग ती जागा जोडीदाराने घ्यायला हवी अशी गोड अव्यक्त भावना असते. म्हणूनच पण ओढ ही युगांची या चार शब्दांचं महत्त्व आजची पिढीही जाणून आहे.
पूर्वप्रसिद्धी लोकसत्ता मुंबई वृत्तांत २१ जुलै २०१८

ग्रंथालयातली दिवाळी


काय... दिवाळी...दिवाळी तर कधीच संपलीय आणि यावर्षीच्या दिवाळीला अजून अवकाश आहे. तर असं तुम्हाला वाटणं साहजिक आहे. पण मी ते बोलतेय ग्रंथालयातल्या दिवाळी विषयी. कारण ग्रंथालयात काम करणं हा माझ्यासाठी एक भन्नाट अनुभव होता. मुझको जहाँ मिल गया, असंच वाटतं नेहमी. कारण आमच्या ग्रंथालयात हे दोन शब्द दिवसभरात दोनदा तरी तोंडी येतातच.
गेल्याच आठवड्यात ग्रंथालयात गेले तेव्हा दिवाळी अंकांचं कमी दरात वाटप सुरू होतं. आणि मग ते सगळे जुने दिवस आठवले. 

दिवाळी सुरू व्हायच्या आधी महिनाभर ग्रंथालयाची दिवाळी सुरू व्हायची. बाजारात वेगवेगळ्या विषयांना वाहिलेले, मुखपृष्ठांनी आकर्षित करणारे दिवाळी अंक दाखल व्हायचे. त्याआधी ललित मासिकातून त्यांच्या ट्रेलरसारख्या जाहिराती वाचलेल्या असायच्या. त्यामुळे खूप उत्सुकता असायची की यावर्षी कुठले नविन विषय, लेखक वाचायला मिळणार.
आम्ही ग्रंथालयाच्या सभासद संख्येला, त्यांच्या आवडीला नजरेसमोर ठेऊन दिवाळी अंक खरेदी करायचो. दिवाळी अंक घेऊन ग्रंथालयात आल्यापासून आमची दिवाळी सुरू व्हायची. त्यांना कव्हर घालणं, त्यांची पानं मोजणं, दोऱ्याने शिवणं, त्यांच्यावर नंबर घालणं, शिक्का मारणं हे सगळे ग्रंथालयीन सोपस्कार कशासाठी तर तो अंक वाचकाकडे जाऊन सुखरुप ग्रंथालयात परत यावा यासाठी. दिवाळीच्या पहिल्या दिवशीच्या आधीचा दिवस ग्रंथालयात दिवाळी अंक देण्याचा दिवस म्हणून उजाडायचा. सक्काळीच दादरच्या फुलमार्केटमध्ये जाऊन सजावटीसाठी घासाघीस करून फुलं आणायचो.

सगळ्या दिवाळी अंकांना त्यांच्यासाठी खास सजवलेल्या टेबलावर छान मांडून ठेवायचो. ग्रंथालयात त्याच दिवशी रांगोळी काढायचो. त्यावेळी टेबलावर, काही रॅकवर नटून-थटून दिवाळी अंकांच्या रुपात बसलेलं ते अक्षर साहित्य बघून खूप आनंद व्हायचा. पण दिवाळी अंकाचं वाटप सुरू झाल्यावर तर अजूनच मजा यायची. वाचकांची आपला आवडता दिवाळी अंक पहिल्याच दिवशी घेण्यासाठी झुंबड उडायची. काही वाचक सांगायचे, अगं आमच्यासाठी हा दिवाळी अंक ठेव, तो दिवाळी अंक ठेव. मग आम्ही ग्रंथालयातले सगळे एकमेकांकडे बघून डोळे मिचकावायचो. कारण आमच्यासाठी सगळे वाचक समानच होते. कोणी लाडका नाही- कोणी दोडका नाही. काही वाचक तर दिवाळीचा फराळ, मिठाई वगैरे देऊन आम्हाला मस्का मारायचे. त्यावेळी आम्ही खूप श्रीमंत असल्याचं फिलींग यायचं.

याहीवर्षी ग्रंथालयात गेले होते, यावेळी ग्रंथालयातील वाचक म्हणून गेले होते. तर दरवर्षीप्रमाणे दाराशी रांगोळी दिसली, फुलांच्या माळांनी सजवलेलं टेबल दिसलं. टेबलावर काहीच म्हणजे अगदी ५-६ चं दिवाळी अंक दिसले. आणि मनातून अतिशय आनंद झाला. चेहऱ्यावरही हसू उमटलं. माझ्याबरोबरची मैत्रीण मला म्हणाली, अगं टेबलावर ५-६ च दिवाळी अंक आहेत. आणि तू हसतेस काय... पण मी तिला कसं सांगू शकणार होते की दिवाळी अंकाचा किंवा रोज वाचायला जाणाऱ्या पुस्तकांचा रॅक रिकामा दिसला की किती आनंद होतो ते... नाहीतर अलिकडे पुस्तकांना रॅकवरच धूळ खात पडावं लागतंय अशा बातम्या आपण वाचतो, ऐकतो.

ग्रंथालयातल्या बाई वाचकांच्या आवडीनिवडीविषयी सांगत होत्या. खरंतर तिथे गेल्या गेल्या दिवाळी अंकांचे फोटो काढण्याच्या विचारात होते. पण टेबल बरचसं रिकामी दिसल्यावर खात्री पटली. वाचक दुरावला नाहीय. दिवाळी अंकांची आमची परंपरा आपण आजही अभिमानाने मिरतोय. ग्रंथालयातली ही अक्षर साहित्याची दिवाळी दरवर्षी ४ महिने सुरू असते. मग पुढच्या दोन महिन्यात ते दिवाळी अंक वाचकांकडून गोळा केले जातात. अशा पद्धतीने सगळे दिवाळी अंक परत आले की हे दिवाळी अंक त्या त्या दिवाळी अंकाच्या किंमतीप्रमाणे पाव टक्क्याने विकायला काढले जातात. ज्यांना दिवाळी अंक खास संग्रही ठेवायचे असतात त्यांच्यासाठी अशी खरेदी म्हणजे पर्वणीच असते. माझ्याही हाती दरवर्षीच्या नियमाप्रमाणे असेच विकत घेतलेले काही दिवाळी अंक होते. आणि वाचनसंस्कृती टिकून असल्याचा मनात न मावणारा आनंद.

पूर्वप्रसिद्धी - मुंबई आकाशवाणीवरील ऐसी अक्षरे १३,१४,१५ एप्रिल २०१८



Thursday, 19 April 2018

अबोल प्रेमाचा प्राजक्त


प्राजक्ताचं बहरणं, पाहिलं नाही कधी, गोष्ट तशी साधी-सुदी... होय, अगदी छोटीशीच गोष्ट आहे ऑक्टोबर या सिनेमाची. पण थोडं लक्ष दिलं तर खूप मोठं काहीतरी सांगू पाहणारी. तसं तर मोठ्या मोठ्या गोष्टींच्या मागे धावणारे आपण छोट्या छोट्या गोष्टी नजरेला दिसत असल्या तरी त्यांच्याकडे लक्ष देत नाही किंवा आपलं लक्ष जात नाही. कसली असते ही घाई, जरा थांबा क्षणभर...
प्राजक्ताचं लाजणं, भुईवर गळून पडल्यावरही पावसाचे थेंब पडल्यावर खुदकन हसणं, क्षणाचं आयुष्य असलं तरी भरभरून सुगंध उधळणं... खूप काही सांगू पाहतंय इवलसं ते प्राजक्ताचं फूल. या फुलांचा प्रवास फुलण्यापर्यंत ते सुगंध उधळीत जमिनीवर मूकपणे गळून पडण्यापर्यंतचा...त्याच्याबद्दलच्या काही आख्यायिकांचा, गाण्यांचा, साहित्य-संस्कृतीतील संदर्भाचा ऑक्टोबर सिनेमाचे दिग्दर्शक शूजित सरकार आणि लेखिका जुही चतुर्वेदी यांनी अगदी समरसून अभ्यास केलाय. हे सिनेमाभर जाणवत राहतं. कारण प्राजक्ताचं रुपक वापरून या सिनेमाची पटकथा अप्रतिम बांधली गेलीय.  




आपण आपल्या माझं माझं जगण्याच्या नादात इतके दंग होऊन जातो की क्षणाक्षणातून मिळणाऱ्या अगणित प्राजक्त फुलांसारख्या आनंदाला मुकत असतो. प्राजक्त फुलांचं आयुष्य किती क्षणिक, आपलं त्यांच्याकडे लक्ष जाईपर्यंत ते फूल जमिनीवर गळून पडलेलं असतं.
काही ठिकाणी याला दुःखाचं फूल असं म्हणतात, ते एका आख्यायिकेमुळे. पण खरंतर हे प्राजक्ताचं फूल आपल्याला खूप काही सांगू पाहतं. आयुष्यातील बऱ्या वाईट घटना प्रसंगांना सामोरं जाताना कसलाही हिशेब मांडू नये आणि उद्या काय होणार याचा विचार न करता ही प्राजक्त फुलं आजचा आनंद, सुख आपल्याला कसं वाटायचं ते शिकवतात. तसंच आपणही आनंद, सुख अगदी मनापासून इतरांना द्यावं.
ऑक्टोबर सिनेमाही आपल्याला हेच सांगतो. ही कथा आहे डॅन म्हणजेच दानिश वालिया आणि शिवुलीची. बंगाली भाषेत प्राजक्ताला शिवुली म्हणतात. प्राजक्ताचा रंग बघा... पांढऱ्या पाकळ्या आणि देठ केशरी (भगवा) रंगाचा तसे हे दोघे... ती शांत, संयत, प्राजक्ताची फुलं अलगद वेचून त्याचा सुवास घेणारी, मी कशी वेगळी आहे हे जाणवून देण्याचा कसलाही आटापिटा नाही. तो मात्र देठासारखा. केशरी रंगासारखा... बंडखोर, काहीतरी वेगळं करण्याची जिद्द असलेला, नियमांना तोडणारा, बंधनं झुगारून देणारा, स्टार्टअप स्वरुपात स्वतःच्या रेस्टॉरेंटचं स्वप्न पाहणारा, त्याचं हे वेगळेपण सिनेमात छान विनोद निर्मितीही करतं. तसंच त्याचं अधूमधून प्रश्न विचारणं आपल्यातल्या माणूसपणाला भानावर आणतं...
दोघेही हॉटेल मॅनेजमेंट शिकल्यावर दिल्लीतील एका पंचतारांकित नावाजलेल्या हॉटेलमध्ये ट्रेनीचं काम करत असतात.
हे दोघेही प्राजक्ताच्या फुलांचं प्रतिनिधीत्व करतायत...

पण मुद्दा हा आहे की प्राजक्ताच्या फुलांकडे जसं लक्ष जात नाही. तसं या दोघांचंही भिन्न स्वभावाचं वागणं कुणाच्याही लक्षात येत नाही, अगदी त्यांनाही नाही. जोपर्यंत त्यांचं आयुष्य कमालीचं बदलून टाकणारी ती गंभीर घटना घडत नाही. ती घटना घडल्यानंतर मात्र प्रेक्षक म्हणून आपलंही आणि सिनेमातील इतर व्यक्तिरेखांचंही त्यांच्याकडे लक्ष जातं. हॉटेलमधल्या पार्टीत ती घटना घडण्याआधी शिवुली आपल्यासोबतच्या मित्र-मैत्रिणींना प्रश्न विचारते, व्हेअर इज डॅन...आणि त्यानंतर मनाला सुन्न करणारी ती घटना. प्राजक्ताच्या फुलांबद्दल एक आख्यायिका अशी सांगितली जाते की एका राजकुमारीनं सुर्याशी लग्न करण्याचा हट्ट धरला होता. आणि तिच्या वडलांनी, तिने विनंती केल्यावर सूर्यही तिच्याशी लग्न करायला होकार देतो. ती राजकन्या नववधूच्या वेशात तयार होऊन सूर्याची वाट बघत असते, पण सूर्य येत नाही. त्यावेळी ती, कुठे आहेस तू? हा प्रश्न मनोमन विचारत असते, जसं शिवुली विचारते, व्हेअर इज डॅन... सूर्य न आल्यामुळे चिडून ती राजकन्या लग्नमंडपातल्या होमकुंडातील अग्नीत जीव देते. त्यामुळे असं म्हटलं जातं प्राजक्ताची फुलं सूर्यावरील रागाने रात्री फुलतात आणि सूर्योदय व्हायच्या आत ती जमिनिवर गळून पडतात. बंगाली साहित्यात रविंद्रनाथांची शिवुली फूल नावाची एक कविताही आहे. तर हे प्राजक्ताचं फूल मूक आक्रोश करत जमिनीवर पडतं तशीच शिवुलीच्या बाबतीत घडणारी ती घटना.
त्यानंतर सिनेमातील व्यक्तिरेखांचं वेगवेगळ्या पद्धतीने वागणं, एकाच परीस्थितीत माणूस किती वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होतो, वागतो हे सिनेमा पाहताना लक्षात येतं. डॅनने शिवुलीसाठी दिवस - रात्र एक करणं, शिवुलीच्या आईने शिवुली, आपली दोन लहान मुलं, तिचा दीर, आपल्यातलं शिक्षकीपण हे सगळं सांभाळत वागणं, शिवुलीच्या मित्रांचं वागणं असं सगळया व्यक्तिरेखांचे विविध पैलू शिवुलीच्या बाबतीत घडलेल्या त्या एका गंभीर घटनेने प्रेक्षक म्हणून लक्षात घेता घेता त्या कथेत आपण रंगून जातो. कथनाची ही शैली फार विलक्षण आहे. यात डॅन आणि शिवुलीचं त्या घटनेनंतरचं वागणं, त्यांचं नातं कसं आहे, ते कसं यापुढे उलगडणार यात आपण सिनेमा पाहताना गुंतून जातो. दिग्दर्शन आणि लेखनाचा इथेच विजय होतो.

सिनेमा पूर्ण पाहिल्यावर आपल्याला यावर कशी प्रतिक्रिया व्यक्त करावी ते कळत नाही. हेच या सिनेमाचं यश आहे. कुठला विषय मांडायचाय असा आरडाओरडा नाही, संवादाचा मारा नाही, काहीतरी संदेश देण्याचा केविलवाणा प्रयत्न नाही. सिनेमाचा शेवट झाल्यावर वाटत राहतं काहीतरी मिसिंग आहे, आणि हे जे मिसिंग आहे तेच तर आपल्याला शोधत शोधत परीपूर्ण व्हायचंय.
मित्र-मैत्रिणीतलं नातं, प्रेम असो किंवा आपुलकीचं कुठलंही नातं असो.... हे प्रेम असं का...काय आहे हे नातं... कुठलं नातं आहे हे आणि हे असं का आहे... असे हजारो प्रश्न जसे डॅनला तो शिवुलीसाठी काही करू पाहतो तेव्हा विचारले जातात, तसे प्रश्न विचारण्यापेक्षा तो क्षण काय सांगतोय तसं वागलं तरच त्या क्षणाला महत्त्व आहे. आणि अशा क्षणाक्षणात भरभरून जगण्यानेच तर नाती समृद्ध होतात, अधिक घट्ट होतात. एकमेकांना माणूस म्हणून आपण समजून घेऊ लागतो. डॅनने प्राजक्ताची फुलं शिवुलीजवळ ठेवणं, आपला फोटो तिच्या बेडजवळ दिसेल असा लावणं, तिच्या आयब्रोज करण्यासाठी ब्युटीशियनला आणणं, तिच्या घरच्यांना धीर देणं अशा बऱ्याच बारीक सारीक गोष्टी यात कुठेही हिरोगिरी येऊ न देता दिग्दर्शकाने सुंदर मांडल्या आहेत.

पाहिलं तर प्राजक्ताचं ते इवलंसं फूल. पण त्या फुलाने डॅन आणि शिवुलीच्या अबोल नात्यामध्ये जिवंतपणा आणला. असा जिवंतपणा अलिकडे नात्यांमध्ये फार अभावानेच आढळतो. तर अशांसाठी हा सिनेमा प्राजक्ताचा सडा बनून आलाय. अबोल प्रेमाचे असे काही क्षण एखादी कलाकृती आपल्याला शिकवणीचे रुप धारण न करताही देते तेव्हा अशा कलाकृतीविषयी बोलण्यासारखं, लिहिण्यासारखं खूप काही असतं.
मुळात प्रेमासाठी किंवा एखादी भावना व्यक्त करण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो खरंतर, फक्त आपलं मन त्या क्षणी तिथे असलं पाहिजे. क्षणाक्षणाला रंग बदलणाऱ्या, भूमिका बदलणाऱ्या या माणसांच्या जगात प्राजक्त फुलांसारख्या माणसांचं असणं अधोरेखित करणाऱ्या शूजित सरकार, जुही चतुर्वेदी, वरुण धवन, बनिता संधू यांचं मानपासून कौतुक. सिनेमॅटोग्राफर अविक मुखोपाध्यायचंही विशेष कौतुक.
प्राजक्ताचं फूल जेव्हा गळून पडतं, तो आक्रोश आपण समजू शकत नाही, पण एखादं नातं तुटतं, कायमचं पारखं होतं तेव्हा मात्र मनाचा आकांत, आक्रोश, असंख्य, असह्य वेदना होतात. पण हा सिनेमा पाहताना तो ज्या प्रकारे चित्रित झालाय त्यात कुठेही बटबटीतपणा नाही, भावनांचा कल्लोळ नाही. एकेक फ्रेम कौशल्याने अगदी प्राजक्त फुलांसारखी हळुवार उलगडत गेलीय.
हा सिनेमा डॅन आणि शिवुलीच्या अबोल नात्याचा आहे, तेवढाच तो शिवुली आणि तिच्या आईचा (गितांजली राव) आहे. आई-मुलीचं एक वेगळंच परीमाण लाभलेलं नातं या सिनेमात आहे. प्राजक्ताची उपमा इथे आईसाठी पण आहे. कारण आईचं आपल्या कुटुंबासाठीचं असलेलं समर्पण. बंगाली संस्कृतीत नववधूची सासरी रहायला आल्यावर पहिल्या दिवशी प्राजक्ताच्या फुलांनी ओटी भरण्याची एक रीत आहे. त्यामुळेच की काय तिथल्या स्त्रियांमध्ये आपसूकच हे प्राजक्तगुण येत असावेत. हा संदर्भ शिवुलीच्या आईमध्ये दिग्दर्शकाने थेट नाही पण खुबीने दाखवलाय. शिवुलीची आई विद्या अय्यर ही आयआयटीत प्रोफेसर आहे. ती विद्यार्थ्यांना तन्मयतेने शिकवते, आपल्या दोन लहान मुलांना हॉस्पीटलच्या आवारातही शांत जागा शोधते, तिचं त्यांच्या अभ्यासाकडेही लक्ष आहे. आपल्या दीरालाही ती समजावतेय, त्याचा शिवुलीवरील उपचार बंद करण्याचा विरोध मोडून काढतेय, शिवुलीची खूप काळजी वाटतेय, पैशांची जुळवाजुळव करतेय. नवरा नसल्यामुळे घराची जबाबदारी तिच्यावर आहे इतक्या सगळ्या गोष्टी ती करतेय...पण कुठेही दुःखानं कोसळणं नाही, ओक्साबोक्शी रडणं नाही... आईपणाची एक निराळीच संयमी व्याख्या म्हणून या व्यक्तिरेखेकडे पाहता येईल. परिस्थितीला शरण जात नाही, झुकत नाही, कंटाळत नाही... ती त्याचा सामना करते. तुम्ही आई असाल तर हा सिनेअनुभव तुम्हाला उभारी देईन, नसाल तर मार्गदर्शक बनेल. आईपण हे सुखावणारं, तितकंच भावनेनं ओथंबलेलं प्राजक्त फुलासारखंच तर आहे...

प्राजक्त फूल हे सगळ्या फुलात वेगळं आहे, क्षणिक आयुष्य असलं तरी स्वतःचं वेगळेपण त्यानं अबाधित ठेवलंय. तसा हा सिनेमा आहे. प्राजक्त फुलांकडे समर्पित वृत्ती आहे. कारण समर्पणात निरपेक्ष त्यागाची भावना असते. प्रेमाने दुसऱ्याला आपलंसं करण्याची इच्छा असते. कलाकृतीही अशीच असते. नाहीतर कोण कुठला तो डॅन आणि ती शिवुली त्यांच्यातील अबोल प्रेमाचा प्राजक्त फुलला तरी असता का... प्राजक्ताच्या फुलासारखी शिवुली जाता जाता डॅनचं आयुष्य बदलून जाते. त्याला जगण्याचं नवं भान देते. सिनेमात शेवटच्या प्रसंगात घर सोडताना प्राजक्ताच्या झाडाची काळजी करणाऱ्या आईला डॅन म्हणतो, मी घेऊन जातो ते झाड... त्याचं ते झाड घेऊन जाणं म्हणजे त्याला त्याच्या शिवुलीच्या अबोल नात्यातुनही क्षणभर का होईना मिळालेला आनंद, भावनांची समज... तो जणुकाही त्याच्याकडचं सुखंच वाटायला निघालाय...
खरंच, गावाकडच्या अंगणातल्या, कौलारू शाळेच्या आवारातल्या किंवा अगदी एखाद्या बागेत लावलेल्या प्राजक्ताची पखरण यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये नक्की अनुभवा. पण त्याआधी ऑक्टोबर हा सिनेमा पाहून मनात साठवायला हवा.  

Friday, 16 March 2018

स्मार्ट वे ऑफ वुमनहुड


काल रात्री मी ११:५१ ट्रेन पकडली बेलापूर सीबीडीहून... ऑफीसमधून स्टेशनपर्यंतच्या प्रवासात काहीशी भीती वाटत होती... अपराधी सुद्धा वाटत होतं. मग दुसऱ्याच क्षणी विचार आला का असं वाटतंय...मी काही ऑफीसमध्ये टाईमपास नव्हते करत, ज्यामुळे उशीर झाला म्हणून अपराधी वाटावं. वुमन्स डे स्पेशल फिचर करायचं होतं. डेडलाईन्स होत्या. आणि भीती याची वाटत होती, की काही अनुचित प्रकार घडला तर...मग नेहमी करते तसं केलं, वर आभाळाकडे पाहिलं चंद्राला सांगितलं माझ्यासोबत रहा, जेव्हा तो नसतो तेव्हा आभाळालाच सांगते की माझ्यावर लक्ष ठेव जरा...तर असा सकारात्मक विचार करून ट्रेनमध्ये चढले. सगळी भीती झटकून दिली. अपराधी वाटणंही मग कमी झालं.

खरंतर काय झालंय ना हल्ली आपण खूप टोकाचे विचार करत राहतो आणि आलेल्या क्षणांची मजा घालवतो. म्हणूनच आजच्या महिला दिनी तुम्हाला एक वेगळा दृष्टीकोन माझ्या रोजच्या जगण्यातून, अनुभवातून देता आला तर तो देण्याचा प्रयत्न या लेखातून करतेय.
ताडदेव ते बेलापूरच्या प्रवासात रोज जाता येताना तीन तास माझं निरिक्षण सुरू असतं. ग्रंथालयात होते तेव्हा रोज कित्येक अनोळखी व्यक्तींशी संवाद साधायचे. आता पत्रकारिता क्षेत्रात असल्यामुळेही अनोळखी माणसं भेटतात. या प्रवासात विविध वयोगटातल्या स्त्रियांच्या संपर्कात मी आले. यातून मला काही गोष्टी कळल्यात. काही मुद्दे लक्षात आले. स्त्रियांच्या समस्या काय आहेत हे कळायला लागलं...

त्यात दोन गट असे प्रकर्षाने दिसले ते असे की एक गट पुरुषांचा कमालीचा रागराग करणारा. तर दुसरा गट पुरुषांना घाबरून किंवा असं म्हणूया की ते सांगतील तसं वागणारा आणि स्वतःच स्वतःला बंधनात अडकवून घेणारा...
मैत्रिणींनो, तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की यातला मध्यम मार्ग शोधा. आता ती समज, ती जागरुकता आलेली आहे की आपली स्पर्धा इतर कोणाशी नसून आपली आपल्याशीच आहे. आणि कित्येकींना हे माहितही आहे. पण त्या दिशेने पावलं अजून वळली नाहीयेत म्हणावी तेवढी. आपण पाहतो त्या मालिका, वाचलेली पुस्तके, सिनेमे इतर मनोरंजनाची साधनं यातून स्त्रियांना तेवढं प्रगल्भ दाखवलं जात नाही. अशी एक ओरड असते. आणि दुसरीकडे आधुनिक स्त्री म्हणजे रात्र रात्र घराबाहेर असणारी, ड्रींक करणारी, पार्टीजना जाणारी, मॉडर्न कपडे घालणारी असं दाखवलं जातं तेही पटत नाही. कारण सगळ्याच आधुनिक विचारांच्या स्त्रिया असं काही करत नाहीत. पण ललित साहित्यात, मालिकांमध्ये, सिनेमात जी स्त्री पात्रं दाखवतात. त्यांना त्या पात्राला उठून दिसण्यासाठी ते तसं दोन टोकाचं दाखवलं जातं. म्हणून आपण ते तसं बघून त्यांचं अनुकरण करू नये. किंवा त्याला नावं ठेवू नये. व्यक्तिरेखांना उठावदार करण्यासाठी वस्तुस्थिती आहे त्यापेक्षा ७५ टक्के अधिक वरचढ दाखवावी लागते. तेव्हाच ती त्या त्या रसिकांच्या आकलनानुसार त्यांना कळते. हा एक लेखनाचा नियम आहे. तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य स्त्रियांनी यात स्वतःला अडकून घेऊ नये. माणसाचं मन नेहमी बदलांना घाबरतं. इथेच आपलं चुकतं.
तर माझा सांगायचा मुद्दा हा आहे की...
स्मार्ट वे ऑफ वुमनहुड काय असला पाहिजे...

तर त्यासाठी आपल्याला हे करायला हवं...
१.पुरुषांचा रागराग करणं, त्यांच्याशी स्पर्धा करणं म्हणजे स्त्रीवाद नव्हे. तुम्ही स्वतःलाच रोज एक आव्हान द्या. आणि ते पूर्ण करण्यासाठी झटा.

२.आधुनिक विचारांच्या नादात कुटुंबाला अंतर देऊ नका. माणसं जोडा. दुसऱ्यांना इम्प्रेस करण्याच्या नादात स्वतःवर सगळ्या जबाबदाऱ्यांचं ओझं घेऊ नका. आपल्या घरातील माणसांशी नीट बोलून घरातील सर्व कामांची जबाबदारी वाटून घ्या. स्मार्ट वुमन म्हणजे प्रत्येक गोष्ट तिला आलीच पाहिजे  (परफेक्ट असली पाहिजे.) असं नव्हे. कधी कधी तुमच्याकडूनही चुका होणं स्वाभाविक आहे. स्वयंपाक शिकणं ही गोष्ट मनापासून करा तिला बायकांनीच का करायचा स्वयंपाक असं डोक्यात घेऊ नका. घरातील लहान मुली-मुलांना तुम्ही समान वागणूक द्या. कधी वेळ काढून ज्येष्ठ व्यक्तींशी बोला. घरातील सासूबाईंना व्हिलन न समजता त्यांच्यासोबत योग्य तो संवाद साधत त्यांना आपलंसं करण्याची क्षमता अंगी आणा.

३.स्वावलंबन हे स्वतःपासून इतरांना दाखवून द्या. कारण काळाची गरज ही आहे कुणी कुणावर अवलंबून नव्हे तर सोबत असणं महत्त्वाचं आहे.

४.कपडे, आपलं दिसणं या गोष्टी आपल्या व्यक्तीमत्त्वाला खुलवण्यासाठी आणि आपल्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आहेत, यावर लक्ष द्यावं. आपण नीट कॅरी करू शकू अशी वेशभुषा आपण केली पाहिजे. रोज १५ मिनिटं तरी व्यायामासाठी दिली पाहिजेत. निरोगी, तंदुरुस्त राहण्यासाठी प्रयत्न करा. डायटिंगचं खुळ डोक्यातून काढून टाका.

५.तुम्हाला ज्या गोष्टींची भीती वाटते. त्या गोष्टी लिहून काढा. त्यावर मात करण्यासाठी कुठल्या क्षमता अंगी बाणवल्या पाहिजेत त्याचा विचार करा. वेळ पडल्यास मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्या. तुम्हाला कुणाकडून, कुणामुळे त्रास होत असेल, तर मोकळेपणाने बोला. तुमच्याकडे माध्यमं आहेत. पोलिसयंत्रणा आहे. पत्रकार मंडळी आहेत. तुम्ही बोलल्याशिवाय ही गोष्ट घडणार नाही.

६.तुम्ही शिक्षित आहात, तुमचं करिअर, नोकरी, व्यवसाय करत असाल तरीही एखादी वेगळी कला जोपासा. किंवा शिका. कारण पैश्याने माणूस जगतो. पण कला माणसाला जगण्यातला आनंद मिळवून देते. जिथे अजूनही मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवलं जातंय. असा परीसर तुम्हीच शोधून काढा आणि त्यांनाही शिक्षणाचा हक्क तुम्ही मिळवून देण्याचा व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न करा.

७.आठवडाभरातून स्वतःसाठी काही वेळ काढा. यावेळी इतर कुठलाही विचार मनात आणू नका. यू हॅव टू बी युवरसेल्फ. स्वातंत्र्य हवं म्हणजे नेमकं काय हे आधी नीट समजून घ्या. तुम्हाला व्यक्ती म्हणून जगताना, समाजात वावरताना जी बंधनं येतात, अडथळे येतात. त्यामुळे तुमच्या प्रगतीला खीळ बसत असेल, घुसमट होत असेल तर त्या विरोधात तुम्ही तुमचा आवाज उठवला पाहिजे. यासाठी अखिल पुरुषजातीचा राग राग करु नये. एकीला एक अनुभव आला म्हणून दुसरीनेही राग राग करणं चुकीचं आहे. स्वातंत्र्य म्हणजे पुरुष ज्या ज्या गोष्टी करतात ते आपल्याला करायला मिळाल्या पाहिजेत. हा समज चुकीचा आहे. आपणच आपल्याला प्रत्येक दिवशी नवं काही शिकण्याची सवय लावा.

८.आपण जिथे राहतो तो परीसर, आपलं ऑफीस किंवा आपला नेहमी संपर्क येतो अशी ठिकाणं...यामध्ये काही चांगलं काही घडावं असं तुम्हाला वाटतंय तर त्याची सुरुवात तुम्ही स्वतःपासून करा. आपला सन्मान आपणच आधी करायला शिका. तुम्ही आधी एक स्त्री म्हणून स्त्रिला सन्मान द्या.

९.स्वतःचा आनंद कशात आहे, हे शोधा. आपल्या स्वतःला व्यक्त करण्यासाठी एक माध्यम निवडा म्हणजे ते लेखन, चित्रकला, नृत्य असं काहीही असू शकतं. तुम्हाला वाटतं ना मालिका, सिनेमात आपल्यासारखी स्त्री अजून का नाही दाखवत तर स्वतः आधी काळाप्रमाणे बदल स्वीकारा. मग त्याचंही प्रतिबिंब तुम्हाला मनोरंजनात नक्की दिसेल. पण त्याआधी मनमोकळं जगा. आणि असं जगताना तुम्हाला काही अडचणी येत असतील तर त्यावर मात करण्यासाठी स्वतः मार्ग शोधा. यासाठी आपल्या पुरुष सहकाऱ्यांची, आपल्या जोडीदाराची, ज्येष्ठांची मदत घेण्यात कमीपणा मानू नका. कारण प्रत्येकाकडे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन असतंच असं नाही. स्त्रियांमध्ये प्रचंड क्षमता आहे...या क्षमतांचा विकास करण्याचा संकल्प आजच्या दिवशी करुया. पुरुष हे तुमचे शत्रू नाहीयेत. खरंतर आपले शत्रू आपणच असतो. जेव्हा आपण स्वतःला पूर्णपणे समजू, ओळखू तेव्हाच आपण सक्षम होऊन इतरांना, समाजाला नवी दिशा दाखवू शकू...त्यामुळे सगळ्या मैत्रिणींना एकच सांगणं, स्वतःला ओळखा, खोटं वागू नका...खरं खरं सांगा आणि खरं खरं जगा... आणि मनापासून जे करावंसं वाटतंय ते करण्याचा निर्धार करा... महिलादिनाच्या खूप खूप शुभेच्छा...

आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...