चाळीतल्या ऐनापुरे मामांचं
नुकतच निधन झालं होतं. नेहमी गडबड गोंगाट असणाऱ्या चाळीत शांतता पसरली होती. पण ती
काही दिवसांचीच पाहुणी असणार होती... पुन्हा झालं गेलं विसरून चाळीचं वातावरण
पुन्हा निवळणार होतं. पण बरेच दिवस लोटले, ऐनापुरे मामांना जाऊन... धार्मिक विधीही
पार पडले होते. तरी चाळीतलं वातावरण काही पूर्वपदार येईना. मामांचा चाळीवर,
चाळीतल्या माणसांवर खूप जीव होता. आणि चाळीतल्या मोठ्या माणसांपासून ते
लहानग्यांपर्यंत सर्वांना मामांचा लळा होता.
एके दिवशी दुपारच्या
जेवणानंतर चाळीतली काही मंडळी चाळीसमोरच्या छोटेखानी आवारात बसली होती. त्यातल्या
एकाने विषय काढला, "खूप दिवस झाले मामांना जाऊन. त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे.
ती काही केल्या भरून निघत नाही." इतक्यात दुसरा एकजण म्हणाला, "आपण ऐनापुरे मामांची समाधी बांधूया." त्याच्या अशा बोलण्याने चाळीसमोरच्या आवारातील
अस्ताव्यस्त घोळका गंभीर झाला. त्या घोळक्यातील एक-दोन टाळकी थोडंसं हसलीही होती. 'समाधी' हा शब्द ऐकून. मग बरंच
विचारमंथन झालं. पण समाधी बांधण्याच्या निर्णयाप्रत कुणीही येईना. आठवडाभर यावर
उलट-सुलट चर्चा सुरू होती. आणि या चर्चेने पार खालची पातळी गाठली होती. ऐनापुरे
मामांच्या स्मृती राहिल्या बाजुलाच. हे असंच होत आहे हल्ली. समाधी किंवा
स्मारक बांधण्यामागचा उदात्त हेतू आपण विसरत चाललो आहोत. आणि समाधी, स्मारक यावर
विचार (?) करण्यात नाहक शक्ती खर्च करतो आहोत.
खरे पाहता याची काही एक
आवश्यकता नाही. कारण हे सारे रिकामटेकडेपणाचे उद्योग आहेत. हे सद्यस्थितीच्या
स्मारकांच्या चाललेल्या वादांवरून वाटतं. असं म्हणतात की माणूस रिकामपणाचा वेळ कसा घालवतो. यावर त्याची संस्कृती
अवलंबून असते. या मताचा विचार केला तर असं दिसून येईल की आता समाजात पुतळा,
स्मारकांची संस्कृती मूळ धरू पाहत आहे.
मानववंशशास्त्रज्ञ,
समाजशास्त्रज्ञ आणि प्रसिद्ध लेखिका इरावती कर्वे यांनी त्यांच्या परिपूर्ती या
लेखसंग्रहातील बीज-क्षेत्र या लेखात एक विधान केलं होतं की "समाजात नैसर्गिक घटनांपेक्षा सामाजिक संकेतांनाच जास्त
प्राधान्य असते. इतकेच नाही तर नैसर्गिक घटनांचा उपयोग सामाजिक संकेताना बळकटी
आणण्यासाठी होतो. "
आजचे पुतळ्यांचे राजकारण
पाहता हे विधान आजच्या परिस्थितीला चपखलपणे लागू होते. सामान्य व्यक्ती असो वा
एखादी महान व्यक्ती असो. मृत पावल्यानंतर तिचा अंत्यविधी होईपर्यंत घडणारी
प्रत्येक घटना नैसर्गिक असते. पण एकदा का अंत्यविधी पार पडला की नंतर अस्थी
विसर्जन, श्राद्धविधी ते अगदी पुतळा किंवा स्मारक होण्याची जी प्रक्रिया सुरू होते
ती सामाजिक संकेतांमुळेच. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय? तर त्याचं उत्तर असं आहे की मृत व्यक्तीच्या अस्थी विसर्जन
कुठे करतो तर व्यक्तीच्या घरचे लोक गरीब असतील तर जवळपासच्या समुद्रात आणि श्रीमंत
असतील तर नाशिक, काशी अशी अस्थिविसर्जनाच्या ठिकाणांची यादी वाढत जाते. मग
श्राद्धविधी तोसुद्धा ऐपतीप्रमाणे होत असतो. आणि नंतर पुतळा किंवा स्मारकाचा
विचार.
मला वाटतं, पुतळा आणि
स्मारकाचा विचार हा पूर्णपणे भावनिक पातळीवर होत असतो. कारण भारतीय मनोविचारांचा
पक्षी भावनेचे पंख लावून उडत असतो. अलिकडचे राजकारण पाहता भावनिक आवाहनांना जोर
आल्याचं दिसतं आहे. पुतळे आणि स्मारकाबद्दल आपण कसे भावूक होतो याचं उदाहरण
द्यायचं झालं तर 'अजिंठा' हा नितीन देसाई यांचा चित्रपट. या चित्रपटातील शेवटच्या
दृश्यात मेजर रॉबर्ट गीलला हे कळतं की पारो आता या जगात नाही. ती आपल्याला कायमची
सोडून गेली आहे. त्याला खूप दुःख होतं. दुःखाच्या आवेगाने तो कोसळतो. नंतर तो
समाधीसमोर नतमस्तक होताना चित्रपटात दाखवले आहे. हे दृश्य इतकं परिणामकारक आहे की
पाहताना वाटतं, रॉबर्ट गीलचा सारा दुःखावेग, भावनांचा कल्लोळ त्या समाधीत बंदिस्त
झाला आहे आणि गिलसाहेब मनातून थोडे शांत झालेले दिसतात.
गजमल माळी यांच्या 'कल्पद्रुमाची डहाळी' या नाटकाच्या मनोगतात
लिहिल्याप्रमाणे मेजर रॉबर्ट गील यांनी ज्या टेकडीवर बंगला बांधला होता. त्याच आवारात
पारोची समाधी आहे. आणि गिलसाहेबांची समाधी चर्चयार्ड भुसावळ येथे आहे. पारो आणि
गिलचं उत्कट प्रेम आणि निष्ठा येणाऱ्या पिढीला कळावी
म्हणून या दोन्हीही समाधींचं अनन्यसाधारण महत्त्व आहे.
भारतात अशा अनेक पुरातन
समाधी, स्मारके आहेत ज्यांना आपल्या भावनिक दृष्टिकोनातून अधिक महत्त्व आहे. एखादी
व्यक्ती किंवा महनीय व्यक्ती यांच्या जाण्याने आपल्या आयुष्यात जी कमतरता निर्माण
होत असते. ती भरून काढण्यासाठी आपण काही मार्ग शोधत असतो. समाधीचा विचार त्यापैकीच
एक.
प्रसिद्ध मानसशास्त्र
तज्ज्ञ जॉन ग्रे यांनी त्यांच्या मार्स-व्हीनस मालिकेतील 'मार्स अँड व्हीनस
स्टार्टींग ओव्हर' या पुस्तकात आपल्या आयुष्यातून निघून गेलेल्या व्यक्तींच्या
स्मृतीसाठी, आपले भावनिक समाधान व्हावं, यासाठी काही उपाय सांगितले आहेत. ते
असे... स्मृतीमध्ये एखादं झाड किंवा विशेष रोपटं तुमच्या प्रिय व्यक्तीच्या आठवणीत
लावा. आणि त्याचं संगोपन करा. तुमच्या बागेचा एक कोपरा तिच्या/त्याच्या नावे अर्पण करा.
तुमच्या प्रिय व्यक्तीची कशावर श्रद्धा होती ते आठवा. तेथे काही तिच्या नावे देणगी
द्या आणि शक्य झाले तर, जर ते सार्वजनिक ठिकाण असेल तर एखादे छोटेसे स्मृतिचिन्ह तिचं
नाव कोरून बसवा. हे सारे उपाय विधायक आहेत. कारण त्या व्यक्तीबद्दलची आस्था त्यात
आहे.
एखादी महान व्यक्ती मृत
पावली तर तिचे अंत्यविधी केले त्याच जागी त्याची समाधी अथवा स्मारक व्हावं का? एखाद्या जागेला त्या व्यक्तीचे नाव द्यावे का? सार्वजनिक
ठिकाणी तिचं स्मारक बांधावं का? अशा प्रश्नांना धार्मिक आधार नसून भावनिक
अधिष्ठानच अधिक असल्याचं दिसतं. हिंदू धर्माच्या संकल्पनेत श्राद्ध विधीला भव्य,
दिव्य असं स्थान आहे. मृत व्यक्तीसाठी ह्यात व्यक्तींनी केलेल्या क्रिया म्हणजे
श्राद्ध असा समज सर्वत्र रूढ झालेला आहे. परंतु 'शास्त्र असे सांगते' या पुस्तकात नमूद
केल्याप्रमाणे, "प्राचीन सुरींनी श्राद्धकर्माची अमर्याद व्याप्ती लक्षात
घेऊनच संपूर्ण मानवी जीवन श्रद्धामय करण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला दिसून येतो.
त्यास अनुसरून व्यक्तीचे निधन झाल्यावरच नव्हे तर ती व्यक्ती ह्यात असतानाच
तिच्याशी मायेने व प्रेमाने एकरूप होऊन तिच्या उन्नतीसाठी व उत्क्रांतीसाठी
आपल्याकडून होतील तितके प्रयत्न करणे हेदेखील एक प्रकारचे श्राद्धच होय.
श्राद्धाची ही उत्तुंग व उदात्त संकल्पना ह्रदयाशी भिडल्यावर हातून होणारी
प्रत्येक क्रिया म्हणजे श्राद्ध ठरते."
माझ्या या अल्पवाचनावरून
मला वाटतं की आपली श्राद्धाची संकल्पना इतकी भव्य, दिव्य आहे तर स्मारक, समाधीची
गरज का भासते? तर यामागे दडलेला असतो,
सामाजिक संकेत आणि दिखाऊगिरी. कारण परदेशी लोकांप्रमाणे आपला स्मारकांकडे
पाहण्याचा कलात्मक दृष्टिकोन नसतोच आणि मृत व्यक्तीच्या चांगल्या विचारांना
आत्मसात करण्याचा मोठेपणा आपण दाखवत नाही. हिंदू धर्मात अस्थी निषिद्ध असल्याने
आपण अस्थी विसर्जन करतो. आणि दहन झाले ती जागा अपवित्र होऊ नये म्हणून प्राचीन
काळापासून काळजी घेतल्याचं दिसून येतं. म्हणून त्या ठिकाणी मठ, मंदिर, समाधी उभी
राहते. किंवा दहन झाले त्या जागेवरील पाषाण (दगड) आणून घराजवळील आवारात समाधी
बांधली जाते. पण आता या प्रक्रियेला दिखाऊ स्वरूप आल्याने वादंग निर्माण होतात.
मृत पावलेली महान व्यक्ती
सदैव स्मरणात रहावी, तिचं स्मारक व्हावं ही भावना रास्त आहे. पण याचा अतिरेक वाईट.
ती महान व्यक्ती आपल्या विचारांनी आणि आपल्या असण्याने समाजाला अमूल्य असा वैचारिक
ठेवा देऊन जाते. तो ठेवा आपण आचरणातून जतन करून ठेवायला हवा. प्रसिद्ध मानसशास्त्र
तज्ज्ञ जॉन ग्रे यांनीच म्हटल्याप्रमाणे मृत व्यक्तीला आठवताना त्या व्यक्तीने
केलेल्या चांगल्या गोष्टी आठवा. तसेच दैनंदिन आयुष्यात त्यांचे नेहमी स्मरण करा.
त्यासाठी त्यांचे पुतळे, स्मारक उभारण्याची काहीच आवश्यकता नाही. शहरांची
लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे जागेची समस्या भेडसावत आहे. पुतळे
आणि स्मारके उभारण्याच्या जागी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील अशी घरं उपलब्ध
करून दिली तर ही खरी विधायक गोष्ट ठरेल.
स्वतःच्या
महत्त्वकांक्षेसाठी आणि टेंभा मिरवण्यासाठी ज्यांनी स्मारकांचे मुद्दे उपस्थित
करून सध्या जो काही बाजार मांडलाय, त्याकडे सर्वसामान्य माणसाने दुर्लक्ष केलेलंच
बरं. उगाच त्या मुद्द्याशी आपल्या भावना जोडून स्वतः तोंडघशी का पडायचं? जोपर्यंत महात्म्यांच्या
विचाराचं अमृत आपण आपल्या आचरणातून शरीराच्या नसानसातून भिनवत नाही. तोपर्यंत
स्मारकांचा हा अट्टाहास न केलेला बरा!!!!अरबी समुद्रात शिव स्मारक बांधण्याचा वाद सुरूच आहे. |