Sunday, 11 January 2015

सावित्री – एक पत्रानुभव

आविष्कार आयोजित २८ व्या अरविंद देशपांडे स्मृती महोत्सवाचा विषय साहित्यातून रंगमंचाकडे हा होता. त्यामुळे साहित्यकृतींवर आधारित नाट्यरूपांतरे या महोत्सवात पहायला मिळाली. त्यातीलच एक नाट्यरूपांतर म्हणजे सावित्री – एक पत्रानुभव.
पु. शि. रेगेंची सावित्री ही कादंबरी पत्रात्मक असून सावित्री या पात्राने आपल्या प्रियकराला एप्रिल १९३९ ते जून १९४७ पर्यंत अनुक्रमे तिरुपेठ कूर्ग, सायाभा मारू आणि पुन्हा तिरुपेठ कूर्ग येथून लिहिलेली ३९ पत्रे आहेत. पत्रलेखनाचा संख्यात्मकदृष्ट्या काल आठ वर्षे दोन महिन्यांचा नोंदविलेला आहे. प्रत्यक्षात पत्रलेखनामध्ये दुसऱ्या महायुद्धाने निर्माण केलेल्या अस्थिर आणि भयावह परिस्थितीमुळे साधारणपणे ४ वर्षांचा खंड पडला असल्याचे सावित्रीने नमूद केले आहे. (पत्र क्र. ३३ पृ.९४) सावित्री आणि तिचा प्रियकर परस्परांना किमान सहा वर्षे ओळखत असून चार – साडेचार वर्षांच्या कालावधीत सावित्रीने प्रियकराला एकूण ३९ पत्रं लिहिलेली आहेत. तिच्या प्रियकराने कधी तिच्या पत्राला उत्तर म्हणून तर कधी स्वतंत्रपणे तिला पत्रे पाठवलेली आहेत. असे सावित्रीच्या पत्रांतील मजकुरावरून लक्षात येते.
आपल्या मनातील भावना कधी सहजभावाने तर कधी अतिशय तीव्रपणेही व्यक्त करत सावित्री आपल्या प्रियकराला पत्र लिहिताना दिसते. ही ३९ पत्रे म्हणजे सावित्री या पात्राचा एक वैशिष्ट्यपूर्ण, प्रगल्भ असा जीवनप्रवास आहे.

या नाट्यमहोत्सवात मी सावित्री या पु. शि. रेगे लिखित कादंबरीचा नाट्यानुभव घेतला.  सावित्री या कादंबरीचं नाट्यरूपांतर म्हणजेच सावित्री – एक पत्रानुभव. एक सूचक, बाकी वाचक, पुणे यांची निर्मिती असलेल्या या नाट्यानुभवाचे नाट्यरूपातंर रामचंद्र खाटमोडे यांनी केले आहे.
काही साहित्यकृती काळाची बंधने ओलांडून अजरामर होतात. कुठल्याही काळातील वाचकांशी नातं जोडणाऱ्याला साहित्यकृतीला अभिजात साहित्यकृती म्हटलं जातं. त्या साहित्यकृतीत प्रत्येक वेळी नवा अर्थ सापडावा असे बीज सामावलेले असते. अशा दुर्मिळ अभिजात साहित्यकृतींपैकीच एक पु. शि. रेगेंची सावित्री ही कादंबरी. पत्रात्मक कादंबरीचा हा अनोखा प्रयोग आणि सावित्रीसारखी प्रगल्भ व्यक्तिरेखा आजही वाचकांना तिचा शोध घ्यायला प्रवृत्त करते. सावित्रीची व्यक्तिरेखा अतिशय वेगळी आणि साहित्यकृतींमधील आजवरच्या सर्व स्त्री व्यक्तिरेखांपेक्षा वरचढ ठरते. कारण ही ठोकळेबाज व्यक्तिरेखा नाही. म्हणूनच एका स्त्रिचा जीवनप्रवास उलगडताना तिच्या व्यक्तिरेखेतील समृद्धपणा आपल्याला भावतो. सावित्रीचे विचार कालसुसंगत वाटतात. तिचं वागणं सर्वसामान्य मुलीसारखं असूनही वैशिष्ट्यपूर्ण ठरतं. कारण सावित्री या व्यक्तिरेखेची मांडणी लेखकाने अतिशय कुशलतेने केली आहे.

सावित्री लहानपणापासून आईशिवाय वाढलेली आहे. तिचे वडील (आप्पा) हेच तिचे लालनपालन आणि संगोपन करतात. तिचे आप्पा सृजनशील, कल्पक आणि ज्ञानी व्यक्ती आहेत. त्यांच्या जीवनाचा सावित्री आणि ते लेखन करत असलेल्या  (Experience And Growth ) हे पुस्तक हेच आधार आहेत.
सावित्री या कादंबरीचे नाट्यरूपांतर करताना रामचंद्र खाटमोडे यांनी सावित्री या व्यक्तिरेखेला केंद्रस्थानी ठेवून केले आहे. त्यामुळे सावित्रीच्या दृष्टीकोनातून प्रेक्षक नाटक पाहू लागतो. रंगमंचावर घडणारं सारं नाट्य आणि सावित्री या मध्यवर्ती पात्राचा विचार प्रेक्षक पहिल्या दृश्यापासूनच करू लागतो. साहित्यकृतीचं माध्यमांतर करताना सर्वप्रथम हेतू स्पष्ट करावा लागतो. सावित्री – एक पत्रानुभव या नाट्यरूपांतरात रूपांतरकाराने सावित्री आणि तिच्या पत्रात्मक संवादाला नाट्यरूपाने उलगडत जाणे, हा हेतू नाट्यातील प्रथम दृश्यापासूनच स्पष्ट केला आहे.

आजची पिढी या वेगवान संपर्कयुगात विविध सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून क्षणार्धात संपर्क साधू शकते. ही संवादाची माध्यमं फक्त वाढली. पण संवाद मात्र खुंटला आहे. माणसामाणसांतील दुरावा वाढत चालला आहे. हे प्रथम दृश्यरूपात दाखवून सावित्री या कादंबरीतील विषयाला आजच्या पिढीशी रूपांतरकाराने जोडले आहे. कादंबरीच्या कथाविषयाचं आजच्या पिढीशी जोडलं जाणं, अतिशय परिणामकारक झालं आहे. याचं श्रेय ही अभिजात साहित्यकृती निर्माण करणाऱ्या पु.शि.रेगे यांना आहे तसेच अनिल जोगळेकर आणि रामचंद्र खाटमोडे यांना आहे. सावित्री या पत्रानुभवाचे दिग्दर्शन प्रविण तरडे यांनी केले आहे. त्यांच्या दिग्दर्शनातील सावित्रीच्या व्यक्तिरेखेशी प्रेक्षक समरस होऊन जातो. सावित्रीची भूमिका स्नेहल तरडे यांनी साकारली आहे.
सावित्री एक सुसंस्कृत, समंजस, संवेदनशील व चिंतनशील वृत्तीची बुद्धिमान मुलगी आहे.  तिचे आप्पा तिला आनंदभाविनी म्हणतात. तर तिचा प्रियकर तिला मनमोकळी म्हणतो. अशा संपन्न व्यक्तिमत्त्वाच्या सावित्रीला स्नेहल तरडे यांनी अतिशय उत्तमरित्या साकार केले आहे. सावित्रीच्या प्रियकराची भूमिका अभिषेक देशमुख यांनी केली आहे. सावित्रीचा प्रियकर नुकताच पदवीधर झालेला असतो. तो बुद्धिमान असून त्याने निबंधात पहिले बक्षिस मिळवलेले असते. पुढे तो एक कलाविषयक प्रबंध लिहित असतो. प्रियकराच्या वागण्यातील सहजता आणि बोलण्यातील ऋजुता यांचा मेळ अभिषेक देशमुख या कलाकाराने उत्तम साधला आहे. नम्रतेने तो संवादांचं सादरीकरण करतो. त्यामुळे सावित्रीप्रमाणेच तिच्या प्रियकराचे प्रेक्षकांशी सूर जुळतात. रंगभूषा आणि वेशभूषा यामुळे नाटकातील पात्रं उठावदार झाली आहेत. खासकरून एजवर्थ, ल्योरे, सावित्री, तिचा प्रियकर यांची वेशभूषा कथानकाला साजेशी झाली आहे. नाटकाला त्यामुळे सुंदर दृश्यात्मता लाभली आहे.
एजवर्थ हे आप्पांचे स्नेही होते. ते जन्माने ब्रिटीश असून तिरुपेठ कुर्ग ही त्यांची कर्मभूमी आहे. आपल्याला पुढच्या जन्मी कुर्गी स्त्री म्हणून जन्म लाभावा, अशी त्यांची मनोकामना ते सावित्रीजवळ बोलून दाखवतात.

सावित्री – एक पत्रानुभव या नाटकाच्या सुरुवातीला परस्पर संवादाला पारख्या झालेल्या आजच्या पिढीला आजी संवादाचं महत्त्व समजावू पाहत आहे. त्याचबरोबर सावित्रीची पत्रातून फुललेली प्रेमकथा त्यांना सांगू पाहत आहे. त्यासाठी ती त्यांना सावित्रीची गोष्ट सांगते. अशी नाट्यरूपांतराची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे सावित्री या कादंबरीचा विषय कालसुसंगत झाला आहे. मोराला नृत्यातून साकारणारी मुलगी सहजसुंदरतेने रंगमंचावर वावरली आहे. आजीची भूमिका प्रतिभा दाते यांनी केली आहे. संवादातून नात्यांना जोडू पाहणारी आजी, तिची तळमळ त्यांनी नेटकेपणाने अभिनीत केली आहे.
जपानमधील आनंदमिशन तर्फे होणाऱ्या वार्षिक व्याख्यानमालेत Experience And Growth  या विषयावर व्याख्यान द्यायला आप्पांना निमंत्रण दिले जाते. त्यामुळे आप्पा आणि सावित्री जपानला जातात. नेमक्या त्याच वेळी दुसरे महायुद्ध सुरू होते. अशा युद्धजन्य परिस्थितीतही सावित्री आपला पत्ररूपी संवाद सुरूच ठेवते. त्या दोघांची प्रेमभावना युद्धजन्य परिस्थितीलाही व्यापून उरते.
सावित्रीला नातेसंबंधातील गहिरेपणा मान्य अहे. पण त्या संबंधांमध्ये गुंता होऊ नये असे तिला वाटते. तिचा प्रियकर जेव्हा तिच्यावर अप्रत्यक्षपणे फादर फिक्सेशनचा आरोप करतो, तेव्हा ती रागावून म्हणते, "तुम्हाला प्रेम हवं आहे. आणि मला नको आहे का? … तुम्ही मला उचलून, ओढून न्यायला हवं होतं."
नाटकामध्ये सॅंड आर्टचा वापर असलेलं दृश्य अतिशय अप्रतिम साकारलं आहे. हे दृश्य पाहताना प्रेक्षक सुखावतो. सावित्री या कादंबरीतील ३९ पत्रांचं दृश्यरूपात सादरीकरण कसं होऊ शकतं, याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सावित्री – एक पत्रानुभव.
सावित्रीने पत्र वाचताना तिच्या प्रियकराने दृश्यरूपात तिथे रंगमंचावर असणं, ही क्लृप्ती हे नाट्यरूपांतराचं यश आहे. हीच या नाटकाची महत्त्वाची बाजू आहे.

मोराच्या गोष्टीमधून पुढे उलगडत जाणाऱ्या सावित्री या व्यक्तिरेखेचा पुन्हा खेळघराच्या निमित्तानं होणाऱ्या मोराच्या नृत्यापर्यंतचा जीवनप्रवास प्रेक्षकांना सुखावतो.  सुरुवातीला येणाऱ्या मयुर कथेचा संबंध सावित्रीच्या प्रेमकथेशी आहे. आरंभीची मुयर कथा आणि शेवटी होणारा मोराच्या नाचाचा प्रयोग या दोहोंमध्ये ही प्रेमकथा तोललेली आहे.

सावित्री आप्पा आणि एजवर्थ यांच्याकडून ज्ञानाचा संस्कार घेते. राजम्माकडून कलेचा, मानवी नातेसंबंधाचा वारसा घेते, गुरूपादस्वामी, नामुरा यांच्याकडून अप्रत्यक्षपणे मैत्रीची संस्कार घेते. प्रो. जोशी तिला बहुभाषिकतेचा संस्कार देतात, तर ल्योरे तिला कला, संस्कृती आणि मानवी संबंध यांच्याकडे पाहण्याची नवी दृष्टी देते.  जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रगल्भ होऊ पाहणारी सावित्री स्त्रीत्व, मातृत्व या संकल्पनांकडे वेगळ्या दृष्टीने पाहते. ब्रिटीश वंशाच्या एजवर्थ यांची वारस होणे ती सहजभावाने स्वीकारते. त्याच सहजभावाने मनापासून ती हिंदूस्थानी वंशाचे (बंगाली) अग्निमित्र सेन व जपानी वंशाची मिसेस सेन यांच्या कुर्गी मुलीचा (बीना) स्वतःची मुलगी म्हणून स्वीकार करते.
सावित्री या साऱ्या संस्कारांनी समृद्ध असली तरी तिला प्रियकराचा सहवास हवा आहे. ऋजुतेने संवाद साधण्याची कला ती तिच्या फार भेटी न झालेल्या प्रियकराकडून शिकली आहे. एकूणच सावित्रीचा वैशिष्ट्यपूर्ण जीवनप्रवास हा तिच्या सान्निध्यातील व सभोवतालच्या नातलगांनी संस्कारित झालेला आहे. आणि या संस्कारातून तिची कला, ज्ञान, प्रेम, बुद्धी या सर्व दिशांनी समृदध वाटचाल घडलेली आहे.

"मोर हवा तर आपणच मोर व्हायचं, जे जे हवं ते ते आपणच व्हायचं." हे सावित्रीच्या जीवनानुभवाचं सूत्र आहे. प्रेम करताना आपणच आपल्याला समृद्ध करत रहायचं असतं. तेव्हाच परस्परांना प्रेमात बांधताना आपण अधिक होऊ, असे सावित्रीला वाटते. नाटकाच्या शेवटच्या दृश्यात एजवर्थ यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या खेळघरात मोराच्या नृत्याचा प्रयोग होणार असतो. यामध्ये लेखन आणि गाणी सावित्रीची असतात. बीना ही लच्छीची भूमिका करणार आहे. ल्योरे म्हातारीची भूमिका करणार आहे.  आणि या मोराच्या नृत्यप्रयोगात सावित्रीच्या प्रियकराच्या वाट्याला मोराची भूमिका आली आहे. १५ ऑगस्ट १९४७ अशी प्रयोगाची तारीख सावित्री प्रियकराला पत्रातून कळवते. ही तारीखही अतिशय सूचक आहे. यातून लेखकाला प्रेमातील स्वातंत्र्याची भावना अधोरेखित करायची आहे.  प्रियकरासोबत  काही क्षणांच्या सहवासात प्रेमाने भारलेले उत्कट क्षण सावित्रीने अनुभवले आहेत. सारे आपलेसे करण्यासाठी साऱ्या विश्वाशी एकरूप व्हायला पाहिजे. आणि दुसऱ्याशी एकरूप व्हायचे तर स्वतःला विसरले पाहिजे, हा अनुभव सावित्रीच्या मनात रूजला आहे.   

पु. शि. रेगेंची सावित्री ही कादंबरी ही माझी अतिशय लाडकी कादंबरी आहे. सावित्री ही माझी सखीच आहे. माझ्या या सखीला सावित्री – एक पत्रानुभव या नाट्यरूपांतरात पाहताना अतिशय आनंद झाला. 

सावित्री - एक पत्रानुभव या नाटकातील एका प्रसंगात सावित्रीच्या भूमिकेत स्नेहल तरडे.
 

No comments:

Post a Comment

आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...