Thursday, 10 January 2019

आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ




आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी.

डोंगराच्या पायथ्याशी हिरव्यागार माळरानावर आमची कौलारू शाळा मंत्रिमंडळ निवडीची घोषणा होताच विलक्षण राजकीय रंगात रंगून जाई.
या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, सांस्कृतिक मंत्री, आरोग्यमंत्री, सफाईमंत्री आणि क्रीडामंत्री अशी मोजकीच मंत्रीपदं असत. पहिली ते सातवीपर्यंतच्या आमच्या शाळेत सात वर्गांची मिळून जवळपास १५० मुलं असायची. त्यातली काही मोजकीच चुणचुणीत मुलं मंत्रीपदासाठी उभी रहायची. मग एक दिवस ठरवून साध्या कागदावर नावं लिहून त्याच्या मतपत्रिका बनवून मतदान व्हायचं.
आणि मग शाळेतले गुरुजी मतमोजणी करून कोणाला कुठलं पद मिळालं ते सांगायचे आणि शाळेच्या मंत्रिमंडळाचा एक तक्ता करून वर्गाला लागून असलेल्या भिंतीवर लावला जायचा. मंत्रीपदं भूषवणाऱ्या मुलांना आपण राज्याचं किंवा देशाचंच मंत्रीपद मिळवल्याचा आनंद होई. त्याचबरोबर त्यांना मंत्रीपदाच्या जबाबदाऱ्या सांगितल्यावर दडपणही यायचं. पण मुलं हुशारीने मंत्रिमंडळ नीट चालवायची. पण गावातल्या शाळेत वर्षभरात इतक्या गोष्टी घडायच्या की मंत्रीपद तेव्हा सांभाळणं ही साधीसुदी गोष्ट नव्हती बरं का. खूप जबाबदाऱ्या अंगावर पडत.
   शाळेचा मुख्यमंत्री आपल्या शाळेच्या प्रगतीच्या दृष्टीकोनातून काय काय करता येईल ते पाही. शालेय शैक्षणिक स्पर्धा, बौद्धिक स्पर्धा, गुरुजींच्या गैरहजेरीत एखादा वर्ग सांभाळणं, शाळेची अभ्यासातील प्रगती कशी आहे, त्याचा विचार करणं शिक्षणमंत्र्याचं काम असायचं. आरोग्यमंत्री आणि सफाईमंत्री यांचं काम खूप अवघड असायचं. शाळेतल्या मुलांचा नीटनेटकेपणा, स्वच्छता, आवारातली साफसफाई, पिण्याचं पाणी आणि हवामान बदलानुसार येणाऱ्या समस्यांचं निराकरण त्यांना करावं लागे. तर क्रीडामंत्र्यांचा थाट काही वेगळाच असे. आपल्याच शाळेत सचिन, धोनी, सानिया आणि आनंद असे क्रीडापटू घडावेत असं त्यांचं स्वप्न असे, बऱ्याचदा ते स्वप्नच राही. पण त्या स्वप्नाला जिल्हापातळीपर्यंत तरी पोहोचवता आल्याचं समाधान आमच्या शाळेतल्या क्रीडामंत्र्यांना होतं. आमच्या शाळेची खेळातली प्रगती जिल्हापातळीच्या पुढे पोहोचू शकली नाही. पण मुलांनी मेहनत घेणं सोडलं नव्हतं. गाव, पंचक्रोशी, तालुका आणि मग जिल्हास्तरीय स्पर्धा रंगायच्या. त्यासाठी काही मुलं विशेष मेहनत करत. शाळेच्या मागे मोठं मोकळं मैदान होतं, त्यावर खो-खो, कब्बडी, लंगडी, दोरी उड्या, लांब उडी, उंच उडी, गोळा फेक, भाला फेक, धावणे आणि दर शनिवारी व्यायाम, आसनं आणि कवायती रंगत. याकडे क्रीडामंत्री जातीने लक्ष देत. त्यावेळचा त्यांचा रुबाब आणि शिस्त ग्रेग चॅपल यांच्यापेक्षा कडक.
पण या सगळ्यात धम्माल असायची ती सांस्कृतिक मंत्र्यांची. वर्षभर छान समारंभ, सांस्कृतिक सोहळे पार पडायचे ते त्यांच्यामुळे. शाळेत तेव्हा स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, हळदीकूंकू समारंभ, सरस्वतीपूजन, वनभोजन आणि सहल हे मुख्य आकर्षणाचे सोहळे असत. या दिवशी सांस्कृतिक मंत्र्यांच्या कल्पकतेची कसोटी लागे. कार्यक्रमाचा आनंद आणि आकर्षण मुलांमध्ये टिकून राहण्यासाठी त्यांची धडपड असे. या सोहळ्यात सगळ्यात मोठा सोहळा म्हणजे सरस्वती पूजनाचा.
   देवीची मूर्ती दीड दिवस शाळेच्या एका वर्गात विराजमान होई. तिची आरास, नैवेद्य, वर्गणी सगळं काम सांस्कृतिक मंत्र्याकडे असे. त्याचबरोबर सकाळी सरस्वती पूजन झाल्यावर संध्याकाळी गायन-नृत्य-नाट्याचा कार्यक्रम करून ती रात्र जागवली जायची. या कार्यक्रमासाठी दोन महिने आधी सांस्कृतिक मंत्र्यांचं काम सुरू होई. शाळेतली गाणारी, नृत्य करणारी, अभिनय करणारी किंवा या सगळ्याची आवड असणाऱ्या मुलांची निवड होई. त्यांनतर स्वागतगीत, ईशस्तवनासाठी कोण गाणार हे ठरे. शाळेतले संगीत शिक्षक तबला आणि पेटी स्वतः वाजवत या मुलांची सगळी तालिम करून घेत. तेव्हा रेकॉर्ड डान्स वगैरे असले प्रकार नव्हते. मुलं स्वतः गाणी गाऊन हातवारे करून अभिनय करत. तो कोकणातल्या शाळेचा सांस्कृतिक कार्य़क्रम असल्यामुळे शेवट मुलांच्या दशावतारी नाटकाने होई. या सोहळ्यासाठी वेशभूषा आणि रंगभूषेची जमवाजमव करणं अवघड व्हायचं. गावातल्या बायका मुलींना साड्या नेसायला मदत करायच्या आणि त्यांची रंगभूषा करण्याचं काम दशावतारासाठी काम करणारे बाळूकाका करायचे. ते सगळ्याच मुला-मुलींचे चेहरे दशावताराच्या पात्रांसारखे रंगवत.
आज पत्रकारिता क्षेत्रात वावरताना माझा ओढा मनोरंजन आणि सांस्कृतिक घडामोडींकडे जास्त वाढला. याचं सारं श्रेय शाळेत मला सलग तिनदा भूषवावं लागलेल्या सांस्कृतिक मंत्रीपदाला जातं.

पूर्वप्रसिद्धी ऐसी अक्षरे रसिके, आकाशवाणी मुंबई, ५ ऑक्टोबर २०१८



No comments:

Post a Comment

आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...