Wednesday, 3 January 2018

भावस्पर्शी इंदिराबाई

ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांचा ४ जानेवारी हा जन्मदिन. त्यांची कविता आपल्या अंगभूत वैशिष्ट्यांमुळे नेहमीच वेगळी ठरली. त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या कवितांविषयी हे थोडं काही...




लाजरी ही माझी प्रीत
लाजाळूच्या रोपाहुन;
नको पाहू वाट तिची
तूच घेई ओळखून...


कॉलेजच्या एकदम भारी गुलाबी वळणावर इंदिरा संतांची कविता भेटली. या कवितेने कित्येकांच्या अव्यक्त भावनांना मोकळी वाट करून दिली. त्याही बेळगावला शिक्षिका, प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. त्यामुळे त्यांच्या कविता वाचताना त्यामागे असलेली प्रेमळ, जिज्ञासू आणि प्रेरणादायी गुरुवाणी जाणवत जाते. मनाला वेगवेगळ्या मूडमध्ये भिडणारी त्यांची कविता भावस्पर्शीपणे भेटत जाते.
एकदा ग्रंथालयात काव्यसंग्रहांच्या विभागात इंदिराबाईंचा "गर्भरेशीम' हा काव्यसंग्रह हाती लागला. या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीचा आणि अनंत काणेकर स्मृती पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर त्यांच्या "शेला' आणि "घुंगुरवाळा' या काव्यसंग्रहांना प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले. "गर्भरेशीम' वाचतेय असं आमच्या मराठीच्या बाईंना सांगितलं, तेव्हा त्या भरभरून इंदिराबाईंविषयी सांगू लागल्या. मग हळूहळू इंदिराबाईंच्या कविता जशा भावल्या तसं त्यांचं व्यक्तिमत्त्वही भावलं. त्यांच्या कवितेशी तर गट्‌टीच जमली...

कळ्या माझ्या आनंदाच्या
साठवील्या माझ्याकडे,
फुलवाया तुझ्यापुढे...
किती लांब वाटे काळ,
आई कधी भेटशील?
जीव झाला उतावीळ...


अशा इंदिराबाईंच्या काही कवितांनी आईच्या मायेची ऊब दिली; तर कधी समजुतीचा, आपुलकीचा धीर दिला. इंदिराबाईंची कविता जेवढी लाडाने, मायेने बाळाला न्हाऊ माखू घालते, तशीच ती काही वेळा कठोरही होते. सौंदर्याचं भरजरी लेणं त्यांच्या कवितेनं अविरत ल्यायलं, पण इंदिराबाई कधी शब्दांशी भांडतात, रुसतातसुद्धा!

कधी कुठे ना भेटणार,
कधी कुठे ना बोलणार,
कधी कधी ना अक्षरात
मन माझे ओवणार  


असं त्यामुळे त्या लिहून जातात, पण ते तात्पुरतं. मग पुन्हा त्यांची शब्दांशी गट्‌टी होते. आजवर कित्येक कवींनी पावसाच्या रोमॅंटिक, प्रेमात न्हाऊन निघालेल्या काव्याची उधळण मराठी मनावर केली; पण इंदिराबाईंसारखी एखादीच कवयित्री जी पावसाला बजावून सांगते, त्यालाही त्यांच्या शिक्षकी पेशाची किनार आहे.
त्या पावसाला म्हणतात...

नको नको रे पावसा
असा अवेळी धिंगाणा
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली; 



इंदिराबाई एक तरल, हळूवार तितक्‍याच ठामपणे विषयाला हात घालणाऱ्या कवयित्री आणि कथालेखिका होत्या.  इंदिराबाईंनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला सुरुवात केली. पती ना. मा. संत यांच्यासोबत त्यांचा एकत्रित 'सहवास' नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून स्त्रीची विविधं रुपं त्यांनी आपल्या कवितांमधून मांडली. त्यांची कविता नेहमीच समीक्षक, तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली. रमेश तेंडुलकर यांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता "मृण्मयी' नावाने संपादित करून प्रसिद्ध केल्या. तसेच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने डॉ. प्रभाकर घोडके यांनी त्यांच्यावरील 'इंदिरा संत यांचे काव्यसौंदर्य' हे पुस्तक प्रसिद्ध केलंय. त्यात ते म्हणतात, "मराठी काव्यलेखनाच्या परिघामध्ये काव्यलेखनाचं स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री म्हणून इंदिरा संतांचे नाव सुपरिचित आहे. त्यांच्या काव्यलेखनाला प्रेम, विरह, निसर्ग, सामाजिकता, वात्सल्य अशा भावभावनांची जोड मिळालीय. लहानपणापासून निसर्गाशी दृढ नातं सांगणाऱ्या इंदिराबाईंवर पाश्‍चात्त्य सौंदर्यवादी लेखक शेले, बायरन यांचा प्रभाव होता.'
हे सगळं त्यांची कविता समजून घेण्यासाठी किंवा अभ्यास म्हणून लक्षात ठेवता येईल, पण एखाद्या कवितेतील किंवा गाण्यातील शब्द आपल्याला आपल्या त्या त्या वेळच्या मूडनुसार भिडतात. तेव्हा सौंदर्यवादी समीक्षा वगैरे या सगळ्या गोष्टी बाजूला राहतात आणि त्या राहाव्यात. कारण कुठलंही काव्य नियमात बंदिस्त करून त्याचा आस्वाद घ्यायचा नसतो. त्याचा मुक्तपणे आनंद घ्यायचा असतो. इंदिराबाईंची कविता ही अशीच मुक्तपणे उंच उडणाऱ्या स्वच्छंद पक्ष्यासारखी आहे.

'इंदिरा संत यांच्या समग्र कविता' (पॉप्युलर प्रकाशन) या अलीकडील पुस्तकाला अरुणा ढेरे यांची प्रस्तावना आहे. यात सहवास, शेला, मेंदी, मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या, गर्भरेशीम, चित्कळा, वंशकुसुम, निराकार या काव्यसंग्रहातील त्यांच्या निवडक कवितांचा समावेश आहे. त्यांच्याविषयी लिहिताना प्रस्तावनेत अरुणा ढेरे यांनी 'जीवनाविषयीच्या ओल्या उमाळ्याची कविता' असं म्हटलंय.
"शेला' हा पहिला काव्यसंग्रह म्हणजे इंदिराबाईंच्या कवितेची स्वतंत्र खूण. त्यातल्या अप्रतिम सुंदर काव्यरचनांनी इंदिराबाईंना ओळख मिळवून दिली. 'इतकं सोपं, पण गहिरं काव्य मराठीत कोणीही लिहिलं नाही', असं "शेला'तल्या कवितांबद्दल अनेक वर्षांनी श्रीनिवास कुलकर्णींनी लिहिलं होतं.
इंदिराबाईंनी वयाच्या 17 व्या वर्षापासून लेखनाला सुरुवात केली. त्यांची बाळ उतरे अंगणी, उंच उंच माझा झोका, दारा बांधता तोरण, पुस्तकातली खूण कराया दिले एकदा पीस (या कवितेमुळेच पुस्तकात मोरपीस ठेवणं भारी वाटू लागलं.) अशा काही कविता गाण्यांच्या स्वरूपात ध्वनिमुद्रित झालेल्या आपण सर्वांनी ऐकल्या आहेतच. इंदिराबाईचं काव्य समजून घेण्यासाठी फार कष्ट पडत नाहीत. त्यांचे कथासंग्रह "कदली', "चैतू' आणि "श्‍यामली', ललितलेख संग्रह "मृद्‌गंध' आणि "फुलवेल' हे लेखनही तितकंच तरल आणि भावविभोर. इंदिराबाईंच्या कवितांइतकंच त्यांचं ललितगद्यही वाचकप्रिय ठरलं.

"अक्‍कांच्या आठवणी' हा इंदिराबाईंच्या नातसून आसावरी संत यांनी लिहिलेला लेख वाचनात आला. त्यात त्यांनी इंदिराबाईंच्या आठवणी जागवल्या होत्या, त्या अशा की...

'घरी आलेल्या पाहुण्यांसाठी, लहानथोरांसाठी अगदी आगळ्यावेगळ्या भेटवस्तू आक्कांकडे नेमक्‍या असत. पैसे, साडी, पुस्तकं, नाहीतर सत्कारात मिळालेली शाल त्या दिवशी भेटणाऱ्या व्यक्तीला त्या अतिशय प्रेमानं देत असत. फुलं घरातील बायकांच्या केसात मायेनं माळत असत. अगदी जिव्हाळ्याची एखादी पाहुणी येणार असेल तर लगेच बाजारातून उंची साडी आणायला कोणाला तरी पाठवलं जाई. इतर वेळेला साध्या पोस्टाच्या तिकिटांचा किंवा कार्डांचा हिशोब ठेवणाऱ्या आक्का भेटी मात्र कितीही किमतीच्या देत असत. आवडत्या लोकांना अथवा संस्थांना कधी बजेटचं बंधन नसे. भेट किंवा देणगी दिली तर परत त्याचा साधा उल्लेखही त्यांच्या बोलण्यात नसायचा. कुठलाही कृत्रिमपणा त्या देण्यात नव्हता. कोणी भेटायला आलं तर लगेच स्वतःचं लिखाण बाजूला ठेवून त्याचं स्वागत करत असत. आक्कांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्या कोणाशीही संवाद साधू शकत होत्या. साहित्यिक, लेखक, कवी, प्रकाशक, पत्रकार यांच्यापासून ते इतर सर्वसामान्य माणसांशी गप्पा मारायला त्यांच्याकडे रंजक विषय असत. कुटुंबीयांवर आणि घरातील सर्व घडामोडींवर त्यांचं लक्ष असे. रोज घडणाऱ्या सांसारिक गोष्टींमध्ये अगदी शेवटपर्यंत त्यांना रस होता...' 

त्यामुळेच विशुद्ध भावकाव्य लिहिणारी कवयित्री अशी इंदिरा संतांची ओळख निर्माण झाली. इंदिराबाईंनी निसर्गावर मनापासून प्रेम केलं आणि हे प्रेम त्यांच्या कवितांमध्ये उतरलं...
रंगरंगुल्या, सानसानुल्या,
गवतफुला रे गवतफुला;
असा कसा रे सांग लागला,
सांग तुझा रे तुझा लळा. 

 
अशा कितीतरी कविता आपल्याला निसर्गाकडे पाहण्याची निखळ दृष्टी देतात. "शेला' काव्यसंग्रहानंतर 'मेंदी', "मृगजळ', "रंगबावरी', "चित्कळा', "बाहुल्या', "वंशकुसुम', "गर्भरेशमी', "निराकार' असे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. या काव्यसंग्रहांमध्ये प्रवाही नदीसारखं चैतन्य वाटणाऱ्या कवितांमधून इंदिराबाईंनी चकित करणारं लेखनसामर्थ्य दाखवलं. या कवितांमध्ये दिसलेलं सौंदर्य, एकाकीपण, अपुरेपण यापूर्वी इतक्‍या तरलतेनं क्वचितच कोणी मांडलं होतं. त्यांच्या कवितांमधून नेमक्‍या शब्दांत व्यक्त होणारं भावनांचं प्रकटीकरण वाचकांसाठी नवं होतं. अतिशय अस्वस्थ करणारी आर्तता इंदिराबाईंच्या कवितांचा स्थायीभाव होती, आणि ही आर्तता व्यक्त करण्यासाठी वापरलेल्या अनोख्या निसर्गप्रतिमांमुळे त्यांच्या अंतरीचा भाव वाचकांपर्यंत सहज पोहोचला.

इंदिराबाईंनी निसर्गाची अनेकविध रूपं रेखाटली. हा निसर्ग अनेकदा एकट्या, स्वतंत्र, उरात कायम दु:ख बाळगून असलेल्या स्त्रीची प्रतिमा बनूनही आला; पण इंदिराबाईंप्रमाणेच त्यांच्या लेखांमधली, कवितांमधली स्त्री ताठ कण्याची होती. आपलं स्वत्व राखणारी होती. "खरं स्त्रीत्व हे इंदिराबाईंच्या कवितांमध्ये सापडतं', असं दुर्गाबाई भागवतांनी "कालनिर्णय'च्या एका दिवाळी अंकातल्या लेखात लिहिलं होतं.
एकूणच इंदिराबाईंच्या कविता वाचताना जाणवलं ते त्यांचं ऋजु व्यक्तिमत्त्व आणि त्यामुळेच त्यांची कविता भावस्पर्शी होऊन मनात राहिली अगदी कायमची... 

पूर्वप्रसिद्धी सकाळ मुंबई आवृत्ती ४ जानेवारी २०१८

No comments:

Post a Comment

आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...