Sunday, 29 July 2018

पिवळा गुलाब


आमच्या गावाकडच्या परसबागेत जास्वंदीपासून ते गुलाब अबोलीपर्यंत वेगवेगळ्या रंगांची, गंधाची फुलं होती. अजूनही आहेत. त्या बागेकडे पाहिलं की प्रसन्न वाटायचं.
एके दिवशी आईने बाजारातून एक पिवळ्या गुलाबाचं रोपं आणलं. या गुलाबाच्या पाकळ्या वरून पिवळ्या गडद रंगाच्या आणि खालून लालूस रंगाच्या होत्या. काय त्याच्या रंगाचा आणि देखणेपणाचा रुबाब विचारू नका.

त्याआधी आम्ही कधी पिवळा गुलाब पाहिलाच नव्हता. त्यामुळे कुतूहल तितकंच अप्रूप की बागेत लावल्यावर याला पहिलं फूल येईल ते पिवळ्या रंगाचंच असेल ना...
पण हळहळू या गुलाबाच्या रोपाने इतर सर्व फुलझाडात आपली जागा वरचढ केली. त्यामुळे बागेत आल्यावर पहिलं लक्ष त्याच्याकडेच जाऊ लागलं. 

एके दिवशी तर या गुलाबाच्या झाडावर २५ फुलं फुलली होती. तो क्षण अजुनही नजरेसमोर ताजा आहे.
त्यावेळी शाळेत, कुठल्या समारंभात किंवा अगदी घरी असल्या तरी बायकांना फुलं केसात माळण्याचा सोस होता. आजंही आहे, पण कमी झालाय. त्यामुळे आईने सांगितलं, की वाडीतल्या बायका त्या गुलाबाच्या फुलांकडे बघून फुलं मागायच्या आत यातली काही फुलं नीट तोड आणि त्यांना नेऊन दे. तसं केलंही. सगळ्या बायका खूश झाल्या.


त्या दिवसांत शाळेत फुलं माळून जायचाही एक वेगळाच स्वॅग होता. कधी अबोलीचा मोठा गजरा तर कधी मोगऱ्याचा, त्यात सुरंगीचा गजरा भाव खावून जायचा. पण आमच्या घरी सगळ्यांना त्या पिवळ्या गुलाबाचंच कौतुक. एके दिवशी आई म्हणाली, तुमच्या शाळेतल्या बाईंनाही नेऊन दे या पिवळ्याचं गुलाबाचं फूल. तेव्हा शाळेत बाईंना फुलं नेऊन देण्यासाठी मुलींमध्ये चढाओढ असायची. आपण दिलेलं फूल किंवा गजरा बाईंनी माळला की मुलींना भारी वाटायचं. एके दिवशी मी बाईंना पिवळा गुलाब नेऊन दिला. बाईंना ते फूल खूप आवडलं. 

मग अधूनमधून अशी पिवळ्या गुलाबाची फूलं मी त्यांना देऊ लागले. मग पावसाळा जवळ आला तसा बाई मला म्हणाल्या, या गुलाबाची एक छोटी फांदी आणून देशील का... मी आईला विचारलं...आईसुद्धा हो म्हणाली. गावाकडे पावसाळी दिवसात फुलझाडांच्या फांद्या लावण्याचा शिरस्ता अजुनही आहे. आईने मग मला एक छोटी फांदी छाटून दिली आणि बाईंना द्यायला सांगितली. बाई खूश झाल्या. पण त्यानंतर आम्ही मात्र नाखूश झालो. कारण आमचं गुलाबाचं झाड हळूहळू सुकू लागलं. आणि एके दिवशी मरून गेलं. 

बाईंना याची फांदी तोडून दिली म्हणूनच आमचं गुलाबाचं झाड आमच्यापासून दूर गेलं. हेच तेव्हा आमच्या बालमनात पक्क बसलं. त्यानंतर शाळेतही फुलं माळून जाणं कमी होत गेलं. बाईंनाही फूल नेऊन देणं बंद झालं. मुंबईत रहायला आल्यानंतर आमच्या शेजारच्या काकू हळदी कूंकू घालतात तेव्हा पांढरी सोनटक्याची फुलं वाटतात. ती फुलं एकदा कॉलेजमध्ये माळून गेल्याचं आठवतंय. आणि अधून-मधून मोगऱ्याचा गजरा किंवा सोनचाफ्याची फुलं बाजारातून आणते. तेवढाच काय तो फुलांचा सहवास.

आज विचार करते तेव्हा वाटतं, बाईंच्या विचारण्याचा आदर करत नीट नाही म्हणून सांगितलं असतं तर पिवळ्या गुलाबाचं झाड वाचलं असतं का....का त्याचं अस्तित्त्व तेवढ्यापुरतंच होतं... पावसाळ्यात गावाकडे दरवर्षी फुलझाडं लावतो. त्यावेळी पिवळ्या गुलाबाची आठवण पुन्हा ताजी होते. शहरात आल्यावर आता कित्येक रंगाची गुलाबाची फुलं मी पाहिली. पण त्या पिवळ्या गुलाबाच्या झाडाची आठवण कळीसारखी टवटवीतच राहतेय. या घटनेमुळे माझा आवडता रंग पिवळा हे एकदम फायनलच झालं. त्यामुळे कपडे खरेदी करताना किंवा एखाद्या गोष्टीसाठी रंगाची निवड करताना पिवळ्या रंगाला झुकतं माप देते.
कसं असतं ना मानवी मन? आपलं हरवलेलं काहीतरी असं आसपासच्या सगळ्यात शोधत राहणारं?

पूर्वप्रसिद्धी - मुंबई आकाशवाणीवर ऐसी अक्षरे १३,१४,१५ एप्रिल २०१८


No comments:

Post a Comment

आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...