अवनी त्या दिवशी आपल्या गावाला कायमचा निरोप देऊन आपल्या आईवडलांसोबत मुंबईला
निघाली होती. कणकवली रेल्वे स्टेशनवर येणारी मांडवी एक्सप्रेस पाहताना तिला ती
स्वप्ननगरीत नेणारी परीराणीच वाटली... स्टेशनवर गाडी थांबली... अवनी तिच्या
आईबाबांबरोबर गाडीमधे आपल्या सिटवर बसायला गेली...तर त्यांच्या सिटवर आधीच चार-पाच
तरुण मुलांचा दंगा चालला होता...
ही तिघंजण तिथे जाताच ती गोव्याकडून रिलॅस मूडमध्ये अख्खा गाडीचा डबा डोक्यावर घेणारी
मुलं उठली आणि आपापल्या जागेवर बसली... सुहास तुला आधीच सांगितलं होतं... कणकवलीत
गाडी पॅक होणार. आपापल्या जागेवर बसा, शिवम म्हणाला... त्याचा आवाज इतका गोड होता
की क्षणभर अवनीला तो मुलगा कोण? याची उत्सुकता लागली...
तिने त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं देखील...पण हा कुणाचा आवाज... इतक्या
मुलांच्यात त्याचा आवाज कसा ओळखणार होती ती...
गाडीत खूपच गर्दी होती, अवनीच्या सिटवर बसून दंगा करणारी ती
मुलं मागच्या बर्थवर बसायला गेली. तिथे बसल्यावरही त्या तरुणांचा कल्ला पुन्हा
सुरु झाला... तरी त्यातही शिवम कोऱ्या कागदांवर स्केच काढण्यात मग्न होता...
तितक्यात वाऱ्याची मस्त झुळूक आली...
शिवम उठला आणि दरवाजात उभं राहण्यासाठी गेला... जाताना त्याने एका सिटवर
पाहिलं...
एक मुलगी पूर्णपणे सीटवर न झोपता संकोचाने पाय जवळ घेऊन सीटला टेकूनच झोपी गेली
होती. अंगावरून तिने शाल लपेटून घेतली होती... तिचा निरागस गोड चेहरा त्या अंधुकशा
प्रकाशातही उठून दिसत होता... शिवम तिच्याकडे पाहतच राहिला...
तितक्यात गाडीने वेग घेतल्यामुळे जोराचा धक्का बसल्याने अवनी जागी झाली, तिने
पाहिलं तर तिच्याकडे एक मुलगा पाहतोय...
ती लगेच सावरून बसली... तिच्या हालचालीमुळे शिवमही दचकला आणि दरवाजाकडे निघून
गेला...
गाडीमध्ये अधूनमधून शिवम आणि अवनीची नजरानजर होत होती.... अवनीला संकोचल्या
सारखं झालं होतं... कोण हा तरुण.... असं का पाहतोय माझ्या कडे...
तिला रागच आला होता...पण उठून त्याला जाब विचारावा इतकी धीट, ती नव्हती.
दादरला गाडी थांबली... अवनी आपल्या आई बाबांबरोबर उतरली... शिवमला सिएसटीला
उतरायचं होतं म्हणून तो रिलॅक्स झाला होता, त्यातच थोडीशी त्याने डुलकी काढली. मग
सुहासने उठवल्यावर उतरायच्या आधी अवनी बसली होती त्या सिटजवळ शिवम गेला... पण तिथं
कुणीच नव्हतं... ती उतरून गेली असावी... शिवम वळणार तोच त्याला तिथे सिटवर काहीतरी चमकताना दिसलं. त्याने पाहिलं तर ती तिची एक पैंजण होती. त्याने ती पैंजण उचलली आणि आपल्या खिशात ठेऊन दिली... त्याच्या
आणि तिच्या ओझरत्या पहिल्या भेटीची ती निशाणी होती...
मुंबईसारख्या एवढ्या मोठया महानगरात कुठे शोधणार तिला... शिवम विचारात पडला...
त्या दिवसापासून शिवम तिला शोधतोय... शिवमकडे असलेल्या कलेच्या माध्यमातून ती
त्याच्या कॅनव्हासवर हुबेहुब उतरली आहे. पण ती खरीखुरी प्रत्यक्षात त्याच्या
आयुष्यात अजून यायची आहे...
to be continued...
to be continued...