Monday, 31 October 2016

दिवा तुमच्या मनातला...

फ्रेंड्‌स, हल्ली आपण इतके बिझी असतो की आपल्याला मॅसेज फॉरवर्ड करायलाही वेळ मिळत नाही. सोशल मीडियावर थोडंसं मित्रांशी हाय, हॅलो करतो तेवढंच; पण त्या पलीकडे काहीच करता येत नाही. घरच्यांशी किंवा जवळच्या मित्रांशी ग्रुपवरच मॅसेज, कमेंट करत बोलणं होतं. कॉलेज आणि क्‍लासचा अभ्यास, नव्यानं जॉईन केलेल्या ऑफिसमधल्या जबाबदाऱ्या, टेन्शन यामुळे मित्रांना आणि घरच्यांनाही वेळ देता येत नाही. पण नाराज व्हायचं नाही, उत्सव येतोय... मनात निराशेचा अंधार नका दाटू देऊ...दिवा तुमच्या मनात आहेच, तो प्रकाशमान ठेवा...

घरच्यांसाठी वेळ देणं 
घरच्यांसाठी वेळ देणं ही गोष्ट ए एस एपी झालेली आहे. आपल्या आई-वडिलांसाठी, नातेवाइकांसाठी आठवड्यातून काही वेळ राखून ठेवा. घरच्यांसोबत फिरायला जा किंवा एखादं फॅमिली फंक्‍शन अटेंड करा. वाटल्यास नातेवाईकांना फोन करून तुमच्याच घरी कट्‌टा टाकण्यासाठी बोलवा.

गावाला भेट द्या
शहरातल्या गडबडीत आपण गावाकडच्या आठवणींचं मोरपीस जपत असतो. कधी जायला मिळेल, याचे प्लान्सही बनवत असतो; पण जाणं काही होत नाही. गावाकडचे मोबाईलमध्ये असलेले पिक्‍स बघून हळहळत असतो. एखादा गावचा मित्र गावाकडचे हॅपनिंग्ज सांगून तुमचा इगरनेस वाढवत असतो, तर जास्त विचार करीत बसू नका. पटकन बॅग पॅक करा आणि आपल्या गावी एक दिवस का होईना भेट देऊन या.

मित्रांबरोबर ट्रॅव्हलिंग 
महिन्याभरातून एकदा सगळ्या मित्रांनी एकमेकांना ग्रुपवर मॅसेज करून एखादं हटके डेस्टिनेशन शोधा आणि सर्वांनी मिळून मनसोक्त भटका.

स्वप्नांचा पाठलाग करा
नेहमीच्या शेड्युलमध्ये बिझी असलात तरी स्वप्नं पाहणं सोडू नका. स्वप्नं आपल्याला रोज एखादा गोल सेट करण्यासाठी एनर्जी देत असतात. त्यामुळे स्वप्नं तर पाहायला हवीच आणि पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवत ते पूर्ण होण्यासाठी प्रयत्नही केले पाहिजेत.  

नवीन काहीतरी शिका  
रोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. हे फारसं कठीण नाही. रोज स्वतःच मी ही गोष्ट करणार असं ठरवा उदाहरणार्थ रांगोळी काढणं, पेटिंग करणं, लिहिणं, गार्डनिंग अशी कुठलीही एखादी गोष्ट करायची असं ठरवा आणि जस्ट गो फॉर इट.

स्वतःलाच चॅलेंज करा 
आपणच आपल्याला रोज चॅलेंज करीत रहायचं. असं एखादं काम किंवा असा एखादा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता येत नसेल, तर त्याला आव्हान म्हणून स्वीकारा. त्यात यशस्वी होण्यासाठी स्वतःला झोकून द्या.

काळजी करणं सोडून द्या 
छोट्या छोट्या गोष्टींची काळजी करणं सोडून द्या. कारण काळजी करीत बसलो की, आपला कामावरचा सर्व फोकस निघून जातो. एखादा विषय किंवा घटना तुम्हाला सतावत असेल, तर घरातील मोठ्यांशी चर्चा करून तो सोडवा. आतल्या आत ठेवून कुढत बसू नका. काही प्रश्‍न थेट बोलण्यानं नक्कीच सुटतील.

सोशल व्हा 
लोकांमध्ये मिसळा, एखादा विषय घेऊन त्यावर चर्चा करा. सोशल मीडियावर आपण सामाजिक गोष्टी आणि घडामोडींवर व्यक्त होतच असतो; पण एखादा ग्रुप जमवून चर्चा करणं किंवा इतरांची मतं जाणून घेणं हे सगळ्यात बेस्ट नाही का

मनमोकळं हसा
मनमोकळं हसायलाही हल्ली आपल्याला कारणं शोधावी लागतात. नाही तर मॅड आहे का रे हा? असं उगाच कुणी बोलायला नको; पण लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. एखादी विनोदी सीरियल बघा, मूव्ही बघा किंवा तुमच्या आवडीच्या काही हॉबिजमध्ये मन गुंतवा. मग बघा तुमच्या चेहऱ्यावर किती छान स्माईल येईल.

प्रेमात पडा
आणि हो... ही शेवटची पण महत्त्वाची गोष्ट. प्रेमात पडा, खरंच हे वयच आहे तुमचं प्रेमात पडायचं. तुमच्या वयाच्या अनोळखी मुला-मुलींशी छान मैत्री करा. एकमेकांचे विचार छान जुळले, असं वाटत असेल तर पुढची पायरी गाठायला काहीच हरकत नाही; पण रिलेशनशिप्स नेहमी एकमेकांना स्पेस द्या. आपले ऑफिसमधले कलीग्ज, कॉलेजमधले मित्र-मैत्रिणी आणि आपले नातेवाईक यांना प्रेमानं, मैत्रीच्या नात्यानं आपलंसं करा. 

(पूर्वप्रसिध्दी- सकाळ मुंबई आवृत्ती)




Saturday, 1 October 2016

तोंड उघडण्याआधी, मनाचं दार उघडा...(Smell It, Feel It & Have It)

एका CCD मध्ये दोन मित्र कॉफी पित होते. त्यातला एक दुसऱ्याला म्हणाला, काय यार आज काहीतरी वेगळं ट्राय करु या म्हटलं, तर तू नेहमीप्रमाणे ही काळी कॉफी मागवलीस. अरे ए, काळी कॉफी काय? हिला Espresso म्हणतात. या कॉफीचा मग असा उचलायचा, तिचा स्मेल घ्यायचा, फिल करायचं आणि मग ही कॉफी प्यायची असते. जाऊ दे, तुला नाही कळणार!” “पुढच्या वेळेस आपल्या नेहमीच्या कट्ट्यावर जाऊ या कटींग प्यायला.”
मित्रांनो, या संवादामधून हे सांगायचं आहे की कुणाला CCD मध्ये ब्रँडेड कॉफी पिताना फिल येतो, तर कुणाला कट्ट्यावरचा चहा पिताना फिल येतो. म्हणजेच एखादा पदार्थ (पाककृती) हा मनानं खाल्ला आणि प्यायला जातो. त्यानंतर त्याचा तोंड उघडून आस्वाद घ्यायचा असतो.
तोंड उघडण्याआधी मनाचं दार उघडा! हे वाक्य खाद्यसंस्कृतीच्या दृष्टिने फार महत्त्वाचं आहे. कारण मनाचं दार उघडणं. ही खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यातली पहिली पायरी आहे. ही पायरी आपण अलिकडे मिस करतोय. आईने आपल्या मुलांसाठी केलेला स्वयंपाक, बाबांनी आपल्या मुलांसाठी केलेला ब्रेकफास्ट, नव्या नवरीने आपल्या सासरी आल्यावर केलेला पहिला स्वयंपाक, नवऱ्याने बायकोसाठी आणि बायकोने नवऱ्यासाठी प्रेमाने केलेला स्वयंपाक, मित्रांनी एकत्र जमून कल्ला करत बनवलेली एखादी ऑफ बीट रेसिपी किंवा यू ट्यूब वर बघून स्वतःच स्वतःसाठी बनवलेली एखादी नवी रेसिपी, यातली गंमत, प्रेम आणि तो पदार्थ बनवताना होणारा आनंद आपण फिल करायला, हल्ली विसरतोय. त्यानंतर त्या पदार्थाला चांगली दाद मिळाली. आपलं कौतुक झालं. की अजून चार चाँद लागतात. पण आपल्याकडे आता एवढा वेळ कुठेय? ते फिल करायला. ९ ची ट्रेन पकडायची आहे, आज ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन आहे, लिखाणाचं खूप काम आहे, R&D करायचायं...ही सगळी कामं करता करता अक्षरशः आपण खाणं तोंडात कोंबतो आणि कामाला पळत सुटतो किंवा तो पदार्थ हातात घेऊन खात खातच आपण चालू लागतो. शुटींगला जाणारी मंडळी गाडीतच नाश्ता करतात. तर कुणाच्या कामाच्या रात्रीच्या शिफ्ट असल्या की आपलं आहारशास्त्रच बिघडून जातं.
जागतिक पातळीवरील आहारतज्ज्ञ थिंक ग्लोबल अँड इट लोकल असा सल्ला देत असताना आपल्या प्रत्येकावर ही जबाबदारी आहे की आपल्या पारंपरिक पाककृतींचा वारसा आपण जपला पाहिजे आणि तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे. मग हे आपल्या हातून कधी घडणार?
म्हणूनच मित्रांनो, आठवड्यातून एकदा आपल्या घरातील आजी-आजोबांसोबत खाद्यपदार्थांविषयी गप्पा मारा किंवा आई-बाबांसोबत बसून एखाद्या पाककृतीवर चर्चा करा. किंवा गावाकडे राहणाऱ्या आपल्या ओळखीतील कुणालातरी फोन करा आणि त्यांच्याकडून त्यांच्या बालपणी बनवल्या जाणाऱ्या पदार्थांविषयी त्यांना बोलतं करा.
या संवादातून तुमच्या माहितीच्या कोशात ५-६ नव्या रेसिपींची भर पडेल. कधी कधी सुट्टीच्या दिवशी, सणांच्या दिवशी कुटुंबातील सगळ्यांनी एकत्र मिळून स्वयंपाक करा. त्यातून एकमेकांच्या किचन टिप्स तुम्हाला कळतील. आपल्या कुटुंबासोबत बनवलेल्या पाककृतींची आणि आपल्याला नव्याने कळलेल्या पाककृतींची तुमच्या डायरीत नोंद करा किंवा त्या रेसिपीचे फोटो काढून ठेवा. महिन्यातून ३-४ अशा पाककृतींची नोंद तुम्ही ठेवलीत तर तुमच्याकडे वर्षभरात तिसेक पाककृतींचा खजिना तयार होईल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठेही गेलात किंवा घरी नेहमीचं जेवण जेवत असाल तर पदार्थ चांगला झाल्याबद्दल त्या व्यक्तिचं कौतुक करा. पदार्थ बनवण्यात एखादी उणीव राहिली असेल तर प्रेमळ शब्दात त्या व्यक्तिला समजून सांगा. एखाद्याने आपल्यासाठी स्वयंपाक केलाय किंवा नवी रेसिपी बनवलीय तर त्या गोष्टीला आधी फिल करा. मग त्यावर यथेच्छ ताव मारा. आणि एक लक्षात घ्या की कुठलीही रेसिपी कठीण किंवा सोपी आणि बरी किंवा वाईट नसते. रेसिपी ही रेसिपी असते ती बिघडली तर आपलं शरीराचं काय करेल, हे आपल्याला चांगलच ठाऊक आहे. त्यामुळे तुला एवढी साधी रेसिपी बनवता येत नाही किंवा कशी बनवायची माहित नाही असं म्हणून कुणाचं मन दुखवू नका. म्हणूनच आम्ही म्हणतोय की तोंड उघडण्याआधी मनाचं दार उघडा.
नवरात्रौत्सव सुरू झालाय. सर्वांच्या घरी त्याचीच लगबग सुरू असेल. आणि नऊ दिवसात कुठले पदार्थ करायचे? याचा विचार गृहिणी करत असतील. त्यांची मदत करा. त्यानंतर दिवाळी येईल. आपल्या मालवणी मुलखाचं फार कौतुक वाटतं. आपल्याला गणपतीला गावी जायचं तिकीट मिळालं की गोल्ड मेडल मिळाल्याचा आनंद होतो. हा आनंद असाच टिकवून ठेवा. वेगवेगळ्या पारंपरिक सणांच्या माध्यमातून सणासुदीचा आनंद मालवणी मुलखात वर्षभर साजरा होतो. यापुढेही ही परंपरा अशीच टिकून रहावी.
आता संपूर्ण भारतभराविषयी सांगायचं तर मित्रांनो, वर्षाच्या १२ महिने आपण वेगवेगळे सण, समारंभ साजरे करत असतो. त्यात आपण मनाने किती असतो? हा भाग वेगळा. पण सणांचं हे सेलिब्रेशन बघताना कधी कधी वाटतं, सगळा दिखावा आहे. आतून कोणी खुशच नाहीय. काही ना काही आपण मिस करतोय. ते नेमकं काय मिस करतोय? हे आपापल्या पातळीवर प्रत्येकाने त्याचा शोध घ्या. लाऊडस्पीकरच्या आवाजात आपल्या मनाचा आवाज हरवू देऊ नका.
या सोशल मीडियामुळे आपण प्रत्येकाला छोट्या मोठ्या सणांच्या शुभेच्छा देणं, हे काम आहे, असं समजून ते फॉरमॅलिटी म्हणून करतो. या ब्लॉगच्या आणि परबांचो पावनेर या पेज च्या माध्यमातून सणांच्या अशा प्रकारे कोरड्या शुभेच्छा देण्यापेक्षा काहीतरी नवा विचार द्यावा आणि हार्ट टू हार्ट संवाद साधावा यासाठी हा लेखन प्रपंच. आपलं हे पेज पाककृतींविषयी आहे, सण कसे साजरे करावेत? हे सांगण्यासाठी नाही. तरीपण एक वेगळा दृष्टिकोन द्यायला काय हरकत आहे, नाही का?  सो, आजपासून एखादा पदार्थ खायला सुरुवात करण्याआधी त्याला फिल करा. मग खा. एखादी नवी रेसिपी शिकलात किंवा तिच्याविषयी माहिती मिळाली तर त्याची नोंद तुमच्या डायरीत करा...फोटोसुध्दा काढा... आणि तोंड उघडण्याआधी मनाचं दार उघडा हे वाक्य नक्की लक्षात ठेवा...Smell It, Feel It & Have It!!!!!


(मालवणी खाद्यसंस्कृतीविषयी अधिक जाणून घेण्यासाठी परबांचो पावनेर या फेसबुक पेज ला भेट द्या.)

आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...