अखेर
सुबोध गावात आला त्याचे लग्न ठरले. मुंबईहून आणि शेजारच्या गावातून सुबोधची
पाहुणेमंडळी आली. लग्न गावडेवाडीतच होणार होतं. पण सावंतवाडीहून येणाऱ्या
वधुपक्षाच्या वऱ्हाडाला एका रात्रीसाठी कोणाच्या घरी उतरवायचं हा प्रश्न होता.
गावाकडे ही एक पद्धत आहे.
ती
पद्धत अशी की वधुपक्ष लांबच्या गावचा असल्यास त्याला गावात लग्नाच्या आदल्या दिवशी
बोलवायचे. आणि वराचे घर ज्या वाडीत आहे, त्या वाडीतच वराचे घर आणि चार घरे सोडून
पाचव्या घरात वास्तव्य करायचे. म्हणजे लग्नाच्या आदल्या दिवशीची रात्र
घालवण्यासाठी आणि लग्न लागेपर्यंत तिथे रहायचे. तर गंमत अशी की वराचे घर व चार घरे
सोडून वैशाली काकूचे घर पाचवे होते. वाडीतल्यांना वाटले वैशाली काकू परवानगी देईल
की नाही. पण वैशाली काकूने परवानगी दिली आणि काकूचे घर लग्नासाठी सजवायला वाडीतली
मंडळी आली. काकूंच्या खळ्यात मांडव घातला गेला. खळे शेणाने सारवण्यात आले.
वाडीतल्या लोकांना काही वेळ खात्रीच पटत नव्हती की काकूने परवानगी दिली आहे. मग न
राहवून तावडे काकूंनी त्यांना विचारले, 'काय गो वैशाली सुबल्याच्या पावन्यांका
ऱ्हवाक जागा कशी दिलस'
तशी
काकू म्हणाली, 'ह्या
बगा झाला गेला इसरान जावया आपन. सुबल्याक माफ केलय मिया. चला जावा तयारी करूक
लागा. होकलकारांचो टरक यैतच इतक्यात.'
मांडवाची,
वैशाली काकूच्या घराची सगळी सजावट करून झाली. संध्याकाळी सहाच्या सुमारास
वधुपक्षाडील मंडळी चौक्यातील गावडेवाडीत येऊन दाखल झाली. गावडेवाडकरांनी त्यांचे
स्वागत केले. वैशाली काकूच्या घरातील एक खोली त्यांना त्यांचे सामानसुमान ठेवायला
दिली. वाडीतल्या सगळ्यांना नवरी पाहण्याची घाई झाली होती. ती दिसायला सुंदर होती.
साटम काकू म्हणाल्या, 'होकाल दिसाक बरी आसा...तर तिचे वाक्य तोडत तावडे आजी बोलली, 'बरी आसा पन वायच चकणी आसा.'
कातरवेळ
झाली, दिवेलागण सुरू झाली. वैशाली काकूचे घर चहूबाजूच्या उजेडाने न्हाऊन गेले.
थोड्या वेळाने नवरीला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू झाला. हळदीच्या कार्यक्रमात होवये
(गाणी) म्हणणाऱ्या आंगणे काकूही आल्या. नवरी मुलगी पाटावर बसली, तिच्या बाजूच्या
पाटावर धेडी (पाठराखीण) बसली. पहिला विधी हळद कांडण्याचा होता. मुसळाने हळद
कांडण्यात आली. त्या मुसळाच्या वरच्या टोकावर नवरीच्या बहिणीने तळी (आरतीचे ताट)
धरली. मग हळदीच्या गाण्याला सुरुवात झाली. वाडीतले श्रोते गाणी ऐकू लागले.
ताश्या ढोलाची काठी, मदी काय हळदीची वाटी
नवरीला हळद चढवीती, नवरी तुझी ग आई
हळद
चढवून झाल्यावर दुसरं गाणं सुरू झालं.
नागचाफा, सोनचाफा
मदी काय हळदीचा लेपा
नवरीला हळद चढविली...
हळदीचा
कार्यक्रम होवयांमुळे (गाण्यांमुळे) रंगात आला. रात्र झाली. लग्नसोहळ्याच्या
लगबगीने थकलेले सर्वजण झोपी गेले. नवरी मुलीला व तिच्या काही खास पाहुण्यांना
वैशाली काकूने घरात झोपायला सांगितले. पुरुषमंडळी घरासमोरच्या खळ्यात झोपली होती.
जरा कुठे सर्वांना झोप लागत होती, तितक्यात खळ्यात ओरड ऐकू आली. वैशाली काकूंच्या
घरातले सर्वजण जागे झाले, पाहतात तर काय, खळ्यात वाघमुंगळ्यांनी पुरुषमंडळी झोपली
होती, त्या जागेला वेढा घातला होता. काही मुंग्या झोपलेल्या मंडळींना चावल्या
होत्या. वैशाली काकू त्यांना म्हणाली, 'आज तिनसानाच खळा शेनान सारवलला होता, म्हनून
ते मुंगळे इले असतील, तुमी वरच्या पडयेत येवन निजा.' काकूने
सांगितल्यावर सर्व पुरुषमंडळी वरच्या पडवीत जाऊन झोपली. लग्नाचा दिवस उजाडला.
रात्री वधुपक्षाकडील मंडळींना वाघमुंगळ्या चावल्या ही बातमी गावडेवाडीत सगळ्यांना
समजली होती. खळे (अंगण) ओले असल्यामुळे मुंग्या आल्या होत्या. पण वैशाली काकूची
सासू काही वेगळेच कारण सांगत होती. तिचे म्हणणे असे होते की, 'गावकारांच्या घरात कोन दारू पिवन इला काय, त्येंका असोच तरास होता. घरात
भष्टकार झालो.'
वाडीतल्यांच्या
हे लक्षात आले होते की वधुपक्षाकडील पुरुषमंडळी आली तेव्हा फुल टाईट होती. नवरीचा
बापही झिंगत होता. बाकी सुबोधने आपल्याला शोभेल अशीच सासुरवाडी निवडली होती.
लग्नाच्या
तयारीला सुरुवात झाली. सर्वांची धांदल उडाली. लग्न वैशाली काकूच्याच घरी लागणार
होते. मुहूर्त जवळ आला. नवरा मांडवात आला. सनई-चौघडा वाजला. मंगलाष्टके सुरू झाली.
भटजींनी अंर्तपाट धरला. नवरी आली. दोघांनीही एकमेकांच्या गळ्यात हार घातले.
होमाभोवती सात फेऱ्या झाल्या. जेवणाच्या पंगती उठल्या. पाहुण्यांनी नवरा-नवरीला
आहेर दिला. सर्व मान-पान झाले.
थोड्याच
वेळात वैशाली काकूच्या घराकडून सुबोधच्या घरापर्यंत वरात निघणार होती. इतक्यात
नवरीचा बाप चक्कर येऊन पडला. वरात खोळंबली. सगळेजण नवरीच्या बापाविषयी चिंता करू
लागले. पण नवरीची आई मात्र आपल्या सौभाग्याकडे पाहून काय समजायचे ते ती समजली. आणि
वरातीतल्या मंडळींना उद्देशून म्हणाली, 'ह्या बगा उगाच काळजी करूचा काय कारण नाय. तेंका
कालपासून दारू पिवक गावली नाय म्हनून ते अश्ये करतत. हेंच्यामुळे तुमी नको थांबू.
तेंका हयसरच पडान ऱ्हवांदे. मिया येतय वराती वांगडा.' मग
वरात निघाली. नवरदेवाच्या घरी पोहोचली.
सनई-चौघडा वाजे सप्त सुरात
सुबोधरावांचे नाव घेते, सासरच्या घरात
असा
खणखणीत उखाणा घेऊन सुबोधच्या बायकोने उंबरठ्यावरचे माप ओलांडले. अशा प्रकारे
सुबोधचे लग्न थाटामाटात पार पडले. पण थोड्याच दिवसात सुबोध भयंकर दारू पितो, हे
त्याच्या बायकोला समजले. लग्नाची बोलणी करताना सुबोधने खोटे सांगितले होते की
त्याचे कणकवलीला भाजीपाल्याचे मोठे दुकान आहे. पण प्रत्यक्षात तसे काहीच नव्हते.
सुबोधने आपल्याला फसवले हे तिच्या लक्षात आले. ती तडक माहेरी सावंतवाडीला निघून
गेली. गावडेवाडीत सगळ्यांना सुबोधचा संसार मोडल्याचे वाईट वाटत होते. बायकोच्या घर
सोडून जाण्यामुळे सुबोधला अतिव दुःख झाले. इतके दिवस सुरू असलेल्या त्याच्या
मस्तवाल आयुष्यात बायकोच्या जाण्यामुळे जोराचा झटका बसल्यासारखे झाले. तो भानावर
आला. त्या झटक्यामुळे त्याने दारू कायमची सोडली. आणि वाडीतल्या लोकांना तो
गयावया
करून सांगू लागला...''मिया दारूडो आसलय तरी, माज्या बायकोवर माजा लय प्रेम आसा. तिका माज्या
संसारात परत हाडूसाठी मिया कायव करूक तयार आसय. माका मदत करा. मिया आता कदीच दारू
पिवचय नाय. माका तुमका वाटात ती शिक्षा करा. पन तिका घेवन येवक माजी मदत करा.''
वाडीतल्या
लोकांना सुबोधची दया आली. मग वैशाली काकूनेच पुढाकार घेऊन ती सुबोधबरोबर
सावंतवाडीला गेली. सुबोधच्या बायकोची समजूत काढून तिला गावडेवाडीत घेऊनच आली.
वाडीतल्या
लोकांमुळे, खास करून वैशाली काकूंमुळे आणि सुबोधच्या बायकोच्या समजशक्तीमुळे
सुबोधचा संसार मोडता मोडता सावरला...
No comments:
Post a Comment