Thursday, 9 October 2014

सुबल्याचा लगीन (भाग एक)

कौलारू घरे दाटीवाटीने वसलेल्या चौके गावातल्या गावडेवाडीत सुबोध गावडेचे छोटेसे, टुमदार घर होते. तिथे सुबोध आपल्या आई आणि भाऊ सुधाकर समवेत राहत होता. त्याचा मोठा भाऊ व त्याचे कुटुंब मुंबईत राहत होते. सुबोध आणि त्याचा धाकटा भाऊ सुधाकर हे कायमस्वरूपी गावीच रहात होते. दोघेही चौके आणि आजूबाजूच्या गावात छोटे-मोठे काम करून आपली उपजीविका करत. या दोघांना दारूचे भयंकर व्यसन होते. मध्यंतरीच्या काळात सुधाकर विरण गावात एका हॉटेलात कामाला लागला. गावातल्या लोकांना वाटले आता तरी सुधारेल, दारू सोडेल...पण काही बदल नाही. पगार झाल्यावर दारू ढोसून हा चौक्यात हजर!

पण काहीही म्हणा, दारू प्यायल्यावर त्याचा स्वभाव प्रेमळ आणि देवाणघेवाण करणारा होई. येताना गावडेवाडीतल्या बच्चेकंपनीसाठी आणि म्हाताऱ्या मंडळींना कधी बिस्किटचे पुडे, लाडू, शेव तर कधी फरसाण घेऊन येत असे. शेतावर गेलेले आई-बाप थकून-भागून घरी याचचे आणि मुलांच्या हातात खाऊचे पुडे, फरसाण बघून विचारणा करीत...'काय रे पोरग्यांनो सुधगो इलो की काय?'
सुधाकरची दारू पिण्याची सवय सुटली नाही तरी त्याचे ठिक चालले असताना, इकडे सुबोधची परिस्थिती जरा बिकटच होती. तो चौके गावात मासे, भाजीपाला, फळे विकण्याचा धंदा करत होता. सक्काळीच दारूचं टॉनिक पिऊन डोक्यावर मोठी टोपली घेऊन धडपडत, तोल सावरत कसाबसा गावात फिरे. कधी त्याच्या टोपलीत फळे तर कधी भाजीपाला आणि बुधवार, रविवारचे मासे असत. हे विकून थोडेफार पैसे मिळाले की पुन्हा संध्याकाळी दारू पिऊन तो गावडेवाडीतल्या घरी यायचा. शेजारच्या लोकांना शिवीगाळ करायचा, म्हाताऱ्या आईला त्रास द्यायचा...हे त्याचे वागणे नेहमीच चालायचे. 

एके दिवशी गावचे लोक त्याच्या या वागण्याला खूप कंटाळले...'आपण सुबल्याक कायतरी समज देवया'...या उद्देशाने त्यांनी आपला निर्णय गावडेवाडीचे प्रमुख रमाकांत काका यांना सांगितला. त्यानुसार वाडीतल्या लोकांची सभा भरली. तेव्हा सर्वांनी...'सुबल्याक समज देवा, तुमचा तो आयकात'... असे रमाकांत काकांना सांगितले. पण रमाकांत काकांनी मात्र वेगळाच निर्णय घेतला. त्यांनी सभेत उपस्थित असलेल्या महिला वर्गाला सांगितले...'आजपासून गावडेवाडीत कोणीही दारू पिऊन धिंगानो घालूक लागलो तर त्येका चपलाचो मार देवा'...सभा संपली. त्यानंतर चार – पाच दिवस झाले आणि वाडीतल्या बायकांच्या तावडीत सुबलो गावलो. बायकांनी रमाकांत काकांनी सांगितलेली सूचना लगेच अंमलात आणली. सुबोधला बायकांच्या हातून चपलाचा चांगला चोप मार मिळाला. बायकांच्या या चोप मार देण्याच्या कार्यक्रमाला वैशाली काकूंनी प्रमुख पुढाकार घेतला. त्याला कारणही तसंच होतं.

त्या दिवशी संध्याकाळी सुबोध दारू पिऊन पानंदीतून शिवीगाळ करत चालला होता. पानंद तर वैशाली काकूंच्या घराला लागूनच होती. त्यामुळे सुबोधचा आवाज वैशाली काकूने पहिल्यांदा ऐकला आणि चप्पल घेऊनच बाहेर येत शेजारच्या घरातल्या चार बायकांनाही हाक मारली. अशा प्रकारे ही दारूड्याला चपलाने मारण्याची वाडीतल्या बायकांची मोहीम यशस्वीरित्या पार पडली. आणि याचा परिणामही लगेच दिसून आला. सुबोधचा दोन-तीन दिवस अजिबात आवाज येत नव्हता. साटम काकांनी वाडीतल्या सर्वांना सुबोधने दारू सोडल्याची बातमी दिली. मग नंतर थोड्याच दिवसात सुबोध गाव सोडून निघून गेला. सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला की, 'ह्यो सुबलो गेलो तरी खय?'
रमाकांत काकांनी वाडीतल्या सर्वांना एकत्रित बोलावून सांगितले...'तो सुबलो खय गेलो, त्येका जावदेत, त्याच्या म्हाताऱ्या आवशीची काळजी घेवा. त्या सुधग्याचो पन खय पत्तो नाय'

त्यानंतर थोड्याच दिवसात सुबोधचा मोठा भाऊ आला आणि आईला घेऊन मुंबईला गेला. सुबोधला चौके गाव सोडून दोन वर्षे झाली होती की अचानक एक बातमी गावडेवाडीत पसरली. सुबोध सावंतवाडीला कामाला आहे आणि आता तिथल्याच एका मुलीशी तो लग्न करणार आहे. ती मुलगी नर्सरीत कामाला आहे. वाडीतल्या लोकांना आश्चर्याचा पुन्हा एकदा धक्का बसला. सर्वांना हेच वाटत होते की, 'ह्या सुबल्यात काय बगल्यान त्या सावंतवाडीच्या चेडवानं.'






No comments:

Post a Comment

आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...