मनाचा विकास, विचारांचा
नवेपणा असावा, भावनेचा
उत्कर्ष दर्शवणारी कृती घडावी, आत
सळसळणा-या
असंख्य विचारांना व्यक्तता मिळावी, क्षणोक्षणी
येणा-या
गोड अनुभवांचं उदात्त व ह्रदयंगम
विश्व तेजस्वी कलाकृतीत प्रतिबिंबित व्हावं, अशी अभिलाषा बाळगणा-या
प्रतिभावंत लेखकांच्या प्रेमाची गोष्ट ‘त्यांचं आणि आमचं सेम नसतं’ या कथासंग्रहात शब्दबध्द झाली आहे.
साहित्यिकांच्या
साहित्यकृतींकडे, त्यांच्या खाजगी आयुष्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न या कथासंग्रहात आहे. त्यांच्या
व्यक्तिगत आयुष्यातील कोणत्या घटना त्यांच्या सृजनासाठी प्रेरणा ठरल्या… एकंदरीतच
त्या घटनांनी त्या साहित्यिकांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर आणि दृष्टिकोनावर कोणता प्रभाव टाकलेला आहे हे शोधण्याचा प्रयास या कथासंग्रहात आहे.
“विलक्षण
प्रतिभावंतांच्या रहस्यमय व्यक्तिमत्त्वाची झलक वाचकांसमोर पेश करण्याचा प्रयत्न केला आहे.’’ अशी मनोगतात
मूळ लेखिका पुष्पा भारती यांनी आपली भूमिका मांडली आहे. चंद्रकांत
भोंजाळ यांनी हा कथासंग्रहाचा मराठीत अनुवाद केला आहे. प्रेम
या भावनेच्या स्पर्शानेच अनेकांचं आयुष्य बदलतं आणि काहींचं आयुष्य उद्ध्वस्तही होतं, असं
आपण पाहिलंय. या
उक्तीचा प्रत्यय देणारा ‘त्यांचं आणि आपलं सेम नसतं’ हा प्रेमकथांचा संग्रह आहे.
‘कायाकल्प’ या कथेतून रेनर मारिआ रिल्के आणि बेनवेनुटा यांची पत्रांतून उलगडणारी भावस्पर्शी प्रेमकहाणी वाचताना आपल्याला थक्क व्हायला होते. कवी
रेनर मारिआ रिल्के यांच्या सहवासाने समृद्ध झालेली बेनवेनुटा या कथेत आपल्याला भेटते. कवी
रिल्के “माझ्या प्रत्येक संघर्षात आणि विजयात मला साथ देणारी माझी प्रियदर्शनी’’ असा बेनवेनुटाविषयी आदर व्यक्त करतात. कवी
रिल्केंच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृताम्याच्या नावाने बेनवेनुटा त्यांना पत्र लिहिते. “माझं
व्यक्तिमत्त्व घडवण्यात तुमचा फार मोठा वाटा आहे. मी
शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी या शब्दाचं उच्चारण करत राहीन तो शब्द आहे… धन्यवाद” अशा
भावस्पर्शी वाक्याने या तरल प्रेमकथेचा शेवट होतो.
मर्मभेदी
लेखन करणारे अँतन चेकॉव्ह आणि
लीडिया यांची प्रेमकहाणी ‘मंत्रमुग्ध’ या शिर्षकाप्रमाणेच वाचकाला मंत्रमुग्ध करते. “जिवंत
प्रतिभाच विचारांना जन्म देऊ शकते. जे
काही अनुभवाल त्यावर पूर्ण इमानदारीने लिहा” असा
सृजनाची वाट चालणा-या
प्रत्येकाला आपलासा वाटावा असा प्रेमळ सल्ला देणारे चेकॉव्ह आणि चेकॉव्ह सोबतच्या अनंत आठवणींचे भांडार स्वतःमध्ये सामावून घेऊन जगणारी लीडिया यांची प्रेमकथा अनोखीच म्हणायला हवी.
डेव्हिड
कॉपरफिल्ड ही प्रसिद्ध कादंबरी लिहिणारा चार्ल्स डिकन्स ती आत्मकथा आहे हे जाणून होता. या
कादंबरीच्या रूपात त्याने आपल्या प्रेयसीला अनमोल अशी भेट दिली होती. आणि
त्याची प्रेयसी डोरा हिने ती भेट ओळखली होती. चार्ल्स
डिकन्स आणि डोरा यांचं प्रेम एका प्रसिद्ध कादंबरीची सृजनप्रेरणा ठरलं. ही
कथा वाचताना आपल्याही ‘स्वप्नाची समाप्ती’ होऊ नये, असे
वाटते.
जगप्रसिद्ध
लेखक एच. जी. वेल्स याने पन्नास पुस्तकं लिहिली. आठशे
पानांची आत्मकथा लिहिली. पण
त्याच्या आयुष्याचं सार एका अडोतीस पानांच्या ‘माईंड अँड द एंड
ऑन इट्स टॅथर’ या पुस्तकात सामावलेलं आहे. त्याची
प्रेयसी कॅथी हिचा कॅन्सरने मृत्यू होतो. आणि
कॅथीच्या भेटीपूर्वी तो जसा एकटा असतो तसाच तिच्या मृत्यनंतर एकटा, एकाकी
होऊन जातो. अशी
प्रेमकहाणी आहे एच. जी. वेल्स आणि कॅथीची… हजारों
प्रतिबिंब एक सत्य!
आर्थर मिलरच्या लेखक व्यक्तिमत्त्वावर जिवापाड प्रेम करणारी सौंदर्यसाम्राज्ञी मर्लिन मनरो आणि विश्वविख्यात नाटककार आर्थर यांची प्रेमकहाणी दंतकथा बनून तुमच्या आमच्या मनात कायमची जिवंत राहिलेली आहे. कारण
दंतकथेला विस्मृतीचा शाप नसतो. असे
लेखकाने या कथेविषयी म्हटले आहे. “माझ्यासाठी
प्रेमाचा अर्थ आहे विश्वास, भरवसा. लहान मूल ज्या विश्वासाने एखाद्याच्या मांडीवर झोपतं. त्याप्रमाणे आपण सर्वस्व सोपवून ज्याच्यावर विश्वास ठेवू शकू अशा माणसावर मी प्रेम करू शकते” असा सुंदर विचार देणारी ही प्रेमाची गोष्ट आहे.
दस्तोवस्की
आणि मारिया यांची ‘अपराजेय’ प्रेमकथा आहे. आधुनिक
जगातील ताणतणावांचे खोलात जाऊन विश्लेषण करणारा लेखक दस्तोवस्की. विलक्षण प्रतिभेचा धनी असलेला हा साहित्यिक आपल्या व्यक्तिगत जीवनात कसा होता, हे जाणून घेणासाठी अपराजेय ही कथा महत्त्वपूर्ण ठरते.
अशा या प्रेमाला शब्दात मांडू पाहणा-या
प्रेमपत्रांसारख्या लिहिलेल्या जगप्रसिद्ध कलावंतांच्या विलक्षण प्रेमकथा वाचताना प्रेमाची प्रेरणादायी अभिव्यक्ती अधोरेखित होते. म्हणूनच असं म्हणावसं वाटतं की त्यांचं आणि आपलं सेम नसतं…
No comments:
Post a Comment