मला
लव्हस्टोरीज वाचायला खूप आवडतं. चित्रपट आणि मालिकांमध्येही वेगवेगळ्या
लव्हस्टोरीज बघायला आवडतं. या लवस्टोरीजमधून खूप काही शिकायला मिळतं. आयुष्य समरसून जगण्यासाठीची प्रेरणा प्रेमातूनच मिळते. हे प्रेम अथांग सागरासारखं आहे. प्रेम या सर्वांगसुंदर भावनेला शब्दांतून मांडताना नेहमी काही ना राहूनच जातं. मग हुरहुर लागून राहते. मला असं नाही, असं म्हणायचं होतं… अशी अवस्था होते तेव्हा समजून जावं की ही भावना आपल्याला शब्दात मांडताच येत नाहीय. मग काय करावं… मग बोलूच नये, आपल्याला
ज्या व्यक्तीसमोर शब्दातून व्यक्त व्हायचं आहे… तिच्या समोर उभं रहावं आणि नजरेतून (डोळ्यांच्या भाषेतून) सारं काही सांगावं. समोरची व्यक्ती आपल्या भावना नक्की समजून
घेईल. पण कित्येकांना आपल्या भावना व्यक्तच करता येत नाहीत. मग आपल्या प्रिय व्यक्तीची वाट पाहत बसण्याशिवाय आणि त्यालाच न सांगता कळलं तर उत्तम, अशी वेडी आशा
बाळगण्यात त्यांचं अख्खं आयुष्य निघून जातं. आणि आपल्या प्रिय व्यक्तीच्या प्रेमाला
आपण पारखे होतो.
मग कळतच नाही… आपल्या प्रिय व्यक्तीच्या सहवासाशिवाय आयुष्य कसं जगावं... निराशा येते, संपूर्ण जगच आपल्या विरोधात उभं ठाकलंय असं वाटू लागतं. पुढे मग काहीच करू
नये, त्या प्रिय व्यक्तीच्या आठवणी काढत झुरत रहावं लागतं. बऱ्याच लव्हस्टोरीजमध्ये अशी सिच्युएशन दिसून येते.
पण
मला वाटतं प्रेम ही आनंदी, सुखदायी भावना आहे. तिचा आदर केलाच पाहिजे. व्यक्त
होता आले नाही म्हणून उभं आयुष्य तोंड पाडून बसण्याला काहीच अर्थ उरत नाही.
अर्थहीन आयुष्याचं ओझं वाहण्यापेक्षा आपल्याकडील प्रेमाने इतरांच्या आयुष्यात प्रेमाचे चार
क्षण निमार्ण करा. आपल्याला आपलं प्रेम मिळालं नाही तर इतरांना त्यांच्या प्रियजनांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचा मदतीचा हात द्या.
आपल्याला
आपल्या प्रिय व्यक्तीचा सहवास लाभला नाही, तरी इतरांना त्यांच्या प्रिय व्यक्तीचा सहवास लाभावा यासाठी त्यांना भेटण्यासाठी पुष्पवाटीकेसारखं एखादं सुंदर ठिकाण निर्माण करा. म्हणजे थोडक्यात मला असं म्हणायचं आहे की तुम्ही रूबी आजीसारखं प्रेममयी व्हा. प्रेमाची
नितळ, निरागस, निर्मळ व्याख्या सर्वांपर्यंत पोहोचवा. मला तर तिचं नाव आठवलं तरी हिरव्या पानाआड टपोरा मोगरा फुलल्याचा भास होतोय.
त्या
दिवशी पु.शि.रेगेंचं सावित्री हे पुस्तक वाचता वाचता मी हरवून गेले. माझं मलाच समजलं नाही. ते स्वप्न की सत्य! पण रूबी आजीची गोष्ट तुम्हाला सांगितल्याशिवाय राहवत
नाहीय. तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जाता जात नाही. पांढरे, भुरभुरीत केस, चेहऱ्यावर
स्मित, बोलके डोळे, पायघोळ गुलाबी रंगाचा ड्रेस… मला आवडतं त्याप्रमाणे लव्हस्टोरीजच्या
पुस्तकांविषयी भरभरून बोलणारी. त्या दिवशी स्वप्नात मी तिची सुंदर आणि अनोख्या विचाराला वाहिलेली लायब्रेरी पाहिली.
No comments:
Post a Comment