Thursday, 28 April 2016

फॉग

सागर खरंतर त्या दिवशी थोडासा टेन्शनमध्ये होता. चाळीतल्या माणसांच्या टोमण्यांनी नाही तर त्याला नवी एक हटके कव्हर स्टोरी करण्याची संधी साप्ताहिक ह्युमन बींगच्या संपादकांनी दिली होती. त्यामुळे तो त्या कव्हर स्टोरीला जाण्याआधी फार लक्षपूर्वक आपले प्रश्न विचारायचे मुद्दे छोट्या डायरीत टिपून घेत होता. नंतर त्याने आपला जिवाभावाचा जोडीदार असलेला कॅमेरा बॅगेत ठेवला. कव्हर स्टोरी करताना फोटोही तितकेच महत्वाचे आहेत, असं संपादकांनी सांगितलं होतं. तू लिहिलेलं मॅटर कमी पडलं तर लावता येतील. तसंही लोकांना हल्ली बातम्या वाचायच्या नसतात, फक्त पहायच्या असतात. तेव्हा काहीही करून फोटो हे हवेतच.असं संपादकांचं म्हणणं. 

गेल्याच आठवड्यात तो एका स्मशानभूमीत कव्हर स्टोरीसाठी गेला असताना तर संपादकांनी चक्क सांगितलं... प्रत्यक्ष प्रेत जळतानाचे फोटो हवेत... त्यातला एक फोटो निवडून साप्ताहिकाच्या कव्हरपेज वर लावला जाईल. तसे त्याने फोटो काढलेही... पण संपादकांनी, प्रकाशकांनी ते फोटो पाहिले तेव्हा त्यांनाच दरदरून घाम फुटला आणि फोटो कव्हरपेजवर नाही छापला ती गोष्ट वेगळी...
तर असा हा धडाडीचा पत्रकार शोध पत्रकारितेतील उगवता तारा सागर... आता नव्या कव्हर स्टोरीसाठी सज्ज झाला होता. जाण्यासाठी कपडे घालत असताना त्याच्या खोलीत वाऱ्याची झुळूक आली, आणि त्या झुळकीबरोबर परफ्युमचा अतिशय सुवासिक असा सुगंध आला.
व्वा छान सुगंध आहे, तो नकळत बोलून गेला. त्याच्या बाजुच्या खोलीत साटम आडनावाचं एक जोडपं रहात होतं. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे सेंट, परफ्युम्स लावण्याचा भारी नाद होता. अगदी परदेशातून त्याची खरेदी केली जात असे.
तेही जोडपं त्याचवेळी बाहेर पडलं. सागरने विचारलं नेहमी प्रमाणे, काय वहिनी आज कुठला परफ्युम?”
तर तिच्या मिस्टरांनी उत्तर दिलं. आजकल तो भाई फॉग चल रहा है
जाऊ दे, तुला काय कळणार त्यातलं, तुम्ही बसा कागदावर खर्डेघाशी करत...
मी सांगत होतो, तो कॉर्पोरेट कंपनीतला जॉब स्वीकारला असतास तर असं गल्लीगल्लीत डायरी पेन आणि गळ्यात कॅमेरा लटकवून फिरण्याची पाळी नसती....
हे साटम आडनावाचं जोडपं सागरला त्याच्या जॉबवरून हिणवण्याची एकही संधी सोडत नसे. आजही त्यांनी त्याच्या जॉबविषयी बोलण्याकडे मोर्चा वळवल्यावर त्यांच्या बोलण्याला लगाम घालत सागरने त्यांना मध्येच थांबवलं. त्याचं काय आहे... मिस्टर साटम, तुम्हाला सांगितलं असतं सगळं... पण माझं पत्रकारितेचं वेड तुम्हाला नाही कळणार, असो... मला उशीर होतोय... तुम्हालाही होत असेल ना...चला निघूया ...आपापल्या वाटेने...
त्यानंतर सागर कामाठीपुराच्या ४थ्या गल्लीत शिरला. तिथल्या काही बायकांची तो मुलाखत घेणार होता. सागरने काही मुद्दे, काही प्रश्न विचारायचे मनाशी ठरवले होते, ते त्याने त्यांना विचारले.
सगळ्यांच्या मुलाखती खूपच रंगल्या. मधे-मधे सागर नोट्स, काही टिपणं डायरीत लिहित होता. काही गोष्टी रेकॉर्डही केल्या. दुपार होत आली. त्याने मुलाखती घेणं थांबवलं. त्याला कव्हर स्टोरीसाठी हवी होती ती पुरेशी माहिती मिळाली होती. त्याचा लिखाणाचा दृष्टिकोन स्पष्ट होत होता.
रेड लाईट एरियातील बायकांविषयी त्याला सहानुभूती नव्हती, आता कितीतरी सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत, यांना या दलदलीतून बाहेर काढायला पण या बायका काही त्यांना साथ देत नाहीत. पण याच भागातली श्वेता मात्र तशी नव्हती, तिने शिक्षण घेऊन आपली वेगळी वाट शोधली. तिचीच गोष्ट सागर आपल्या कव्हर स्टोरीतून मांडणार होता, त्यासाठी पूरक इतर काही बायकांच्याही त्याने मुलाखती घेतल्या होत्या.
मग कॅमेरा घेऊन काही फोटोग्राफ्स त्याने काढले. त्या रेड लाईट एरियात थोडं फिरून पाहणी केली. आणि तो जायला निघाला होता. तितक्यात एका बंद दुकानाच्या शटरमागून जोरजोरात थपडा मारल्याचा आवाज आला.
सागरची नजर त्या आवाजाच्या दिशेने गेली. त्याच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. मला वाचवा, मला वाचवा असा हळू दबका आवाजही येऊ लागला. त्याने शटर उघडून बघण्याचा प्रयत्न केला. पण त्याला ते उघडेना, आसपास कुणीच नव्हतं. त्या एखाद्या मोठ्या खोक्याप्रमाणे दिसणाऱ्या बंद खोलीला कुठून खिडकी किंवा आत जायला काही जागा मिळते का, पाहण्यासाठी तो डाव्या बाजूने वळला, थोडं पुढे गेल्यावर एक खिडकी दिसली. त्यावर त्याने जोरात हाताने गुद्दे मारले, त्याबरोबर ती खिडकी उघडली. आणि काय आश्चर्य सकाळी त्याने त्याच्या खोलीत उभं राहून जो परफ्युमचा सुगंध फिल केला होता, तसाच परफ्युमचा सुगंध आतून येत होता. तो थबकला. आत काळोख होता. त्याने हाक दिली, कोण आहे आत? त्याबरोबर साटम वहिनींनी आतून आवाज दिला. अहो, मला सोडवा, मला जबरदस्ती इथे पकडून आणलं आहे त्या नराधमांनी...सागरने साटम वहिनींचा आवाज ओळखला पण त्याचा विश्वास बसत नव्हता. मागच्या बाजूस एक उभा पत्रा दरवाजासारखा लावलेला होता. सागरने तिथे जाऊन जोरात हिसडे दिले आणि तो दरवाजा उघडला, आत घाबरलेल्या साटम वहिनींनी सागरच्या पायावरच लोळण घातली, मला इथून सोडवा, माझी मदत करा. सागरने त्यांना धीर दिला, म्हणाला, वहिनी मी सागर, तुम्हाला काहीही होणार नाही, काळजी करू नका, चला कोणी यायच्या आत निघू आपण...

सागर साटम वहिनींना घरी घेऊन आला. मिस्टर साटम सागरला सारखं सारखं थँक्यू म्हणत होते. स्वतःच्या चुकीबद्दल क्षमा मागत होते. सागर अधिक काही बोलला नाही, फक्त जाता जाता एवढंच म्हणाला, मिस्टर साटम कुठलंही प्रोफेशन बरं-वाईट नसतं. आज माझ्या पत्रकारितेच्याच प्रोफेशनमुळे वहिनींना वाचवू शकलो. पण तुम्हाला त्याची कदर नाही, आप के यहाँ तो फॉग चल रहा है...या धुक्यामुळे आंधळे होऊ नका, समोरच्या माणसाला पैशात न तोलता त्याचे गुण बघा...


Saturday, 23 April 2016

Words and Visuals Happily Married

तो आरशासमोर उभा राहिला, त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता. त्याने केसांतून हात फिरवला... विचार करू लागला...
“लेखनातून स्वतःला व्यक्त करताना आतापर्यंत कितीतरी शब्द लिहायचे राहून गेले, कितीतरी गोष्टी लिहायच्या राहून गेल्या... कितीतरी शब्द वर्ड फाईलमध्ये टाईप करताना मीच घाबरलो होतो. कसलीशी भीती जाणवत रहायची, काही चुकणार तर नाही ना माझं? पण यापुढे असं नाही करणार... लेखक असो, चित्रकार असो किंवा कॅमेरामन असो. प्रत्येक कलावंत हा कलेच्या बाबतीत शेवटपर्यंत अतृप्तच असतो... आणि ही अप्तृप्ताच त्याला अधिकाधिक सुंदर एकापेक्षा एक सरस अशी कलाकृती जन्माला घालण्यासाठी प्रेरित करत असते... मी लेखक आहे. मी अनुभवलेलं, माझ्या आसपास घडणारं आणि माझ्या कल्पनेतील चित्रसृष्टी माझ्या गोष्टीत उतरते. मी लेखनातून नवं जग निर्माण करू शकतो.” त्याच्या चेहऱ्यावर गोड हसू येतं. तितक्यात त्याला आईची हाक ऐकू येते आणि त्याची तंद्री भंग पावते. तो पुन्हा हसतो आणि घरातून निघून जातो...
…आता तो आणि ती हँगिंग गार्डन या त्यांच्या लहानपणापासूनच्या आवडत्या ठिकाणी बसले आहेत. याच जागी त्यांची मैत्री शब्दांच्या पलिकडे जाऊन त्यात प्रेमाचा अँगल दिसू लागला होता. विश्वासानं एकमेकांना खूप गोष्टी सांगितल्या होत्या. त्यांचं प्रेम तिथेच फुललं होतं.
तो तिला कसलेही आढेवेढे न घेता म्हणाला, “I love you!!! Will you marry me?
ती म्हणाली, का?
तर तो म्हणाला, “मी लेखक आहे.”
“बरं मग?” तिने प्रश्नार्थक नजरेनं पाहत म्हटलं.
मग तो तिचा हात हातात घेऊन खट्याळपणे म्हणाला, “माझ्याशी लग्न केलंस तर मी एकटाच तुझ्यावर प्रेम करणार नाही तर हजारो शब्द, हजारो पानं जी मी आजवर लिहिली आहेत, ती सगळी तुझ्यावरच प्रेम करतील...[त्याने स्पष्ट केलं...”]
तिनेही खट्याळपणाने त्याच्या या स्पष्टीकरणाला नापंसती दर्शवली आणि म्हणाली, “प्रत्येक लेखक असंच म्हणतो, त्यात काय वेगळं?”
मग तो गंभीर होत म्हणाला, “आपण फक्त बिछान्यापुरते एकमेकांचे जोडीदार नसणार तर आपलं सहजीवन दोघांनीही समसमान पातळीवर राहून फुलवायचं आहे. Married Life मध्ये येणारे बरे-वाईट घटना-प्रसंग आपण एखाद्या फिल्मसारखे जगुया. ज्याचा शेवट नेहमी गोड आणि आपल्याला माणूस म्हणून समृध्द करणारा असेल...
मग ती म्हणाली, “आणि मी हे आपलं समृध्द सहजीवन माझ्या कॅमेऱ्यात कैद करून ठेवेन. आपल्या Married Life ची कॅमेरामन मीच असणार म्हटल्यावर... Angle, Expressions, Light, Composition, Settings, Lens हे सगळं कसं नीट जुळून यायला हवं ना...!!!”
तिचं हे वाक्य ऐकताच त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, Words आणि Visuals एकमेकांच्या प्रेमात असतात, नेहमीच सोबत राहतात तसेच आपणही...तिने त्याच्या छातीवर आपलं डोकं ठेवलं...दोघांच्याही डोळ्यात त्यांच्या सहजीवनाचं स्वप्न आकार घेत होतं...
त्या दिवसापासून दोघांचंही WhatsApp Status आहे… “Words and Visuals Happily Married” 


आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...