आनंदाच्या गावा जावे, असं प्रत्येकाला वाटत असतं. प्रत्येकाची धडपड तर त्यासाठीच असते. प्रत्येक जण आनंदाच्याच शोधात असतो. पण आनंद ही अशी गोष्ट आहे की ती शोधून सापडत नाही. तर आनंद मिळवण्याच्या तुमच्या प्रामाणिक प्रवासात तुम्हाला ती थोडी थोडी मिळत जाते. पण त्यावेळी जर प्रवास करून नेमकं कुठे पोहोचायचंय या विचारात राहिलात तर मात्र थोडा थोडा मिळणारा तो आनंदही गमावून बसाल.
म्हणूनच आनंद मिळवण्यासाठी नाही तर आनंदी राहण्यासाठी काय करता येईल ते आपण पाहिलं पाहिजे. आपला आनंद कुठल्या गोष्टीत आहे हे अगदी ठामपणे नाही ठरवता आलं तरी अंदाजे काही गोष्टी ठरवा. आनंदी राहण्यासाठी काय करावं, कुठला असा निश्चित मार्ग आहे का...तर हो निश्चितच आहे.
मला मानसशास्त्र या विषयाची प्रचंड आवड होती. याच विषयात करिअर करायची जबरदस्त इच्छा होती. पण काही कारणामुळे ते नाही जमलं. पण मी त्या इच्छेला मूर्त रुप देण्याचं ठरवलं आणि मानसशास्त्र या विषयावर जे जे मला वाचायला मिळालं ते वाचत गेले. मानसशास्त्र विषयावरील काही पुस्तकांचा स्वयंअध्ययन हा प्रकार अवलंबून अभ्यास केला. आणि मानसशास्त्राची मी एक वेगळी मला समजलेली विचारधारा माझ्या मनात निश्चित केली. त्या विचारधारेने मला आजुबाजुला कितीही नकारात्मक, मला व्यक्ती म्हणून हादरवून टाकणाऱ्या घटना घडत असल्या तरी सकारात्मक विचारांचा माझ्या मनातील मोगरा कधीही कोमेजू दिला नाही. आणि आता तर माझ्या मनातील या सकारात्मक विचारांच्या मोगऱ्याला कुणी झाकायचा प्रयत्न केला तरी त्याचा सुगंध लपणार नाही. म्हणूनच मानसशास्त्राच्या माझ्या अभ्यासातून मला सापडलेला आनंदाचा मार्ग तुमच्यासोबत शेअर करतेय...
आनंदी राहण्यासाठी काय करायचं यासाठी मी ३ मुद्दे निवडले. म्हणजे हेच तीन मुद्दे माझ्यासाठी आनंदाची त्रिसूत्री आहेत. इतरांसाठी ते वेगळेही असू शकतात. ते जर तुम्हाला पटले तर त्याचा अवलंब करा आणि नाही पटले तर ही कोण लागून गेली सांगणारी... असा विचार करून ते धुडकावून न लावता तुम्ही तुमचीही अशा प्रकारे आनंदाची त्रिसूत्री तुमच्या पद्धतीने शोधू शकता.
तर पहिलं सूत्र – सोबतीला हवं एक पुस्तक. आपण डिजीटल युगात आहोत. पण कल्पनाशक्तीला, विचारशक्तीला चालना देण्यासाठी पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही सोशल मीडिया आणि इतर मनोरंजनाच्या साधनांवर काट मारून फक्त पुस्तक आपलंसं करा. इतर मनोरंजनाची तुमच्या विरंगुळ्याची साधनं तुमच्यासोबत राहू द्या. पण पुस्तकालाही तुमच्यासोबत राहू द्या. पुस्तक इतरांच्या आवडीचं किंवा कुणी सांगितलं म्हणून नको तर तुम्हाला आवडलंय म्हणून निवडा. आणि असं पुस्तक निवडा ज्यात विविध पात्रं, वेगवेगळी माणसं असतील. आणि मग ती पुस्तकं वाचताना तसं इमॅजिन करा. वेगळ्या वयोगटातील व्यक्तींशी पुस्तकांविषयी गप्पा मारा, बोला, वृत्तपत्रं वाचून तुमच्या आवडीचं एखादं पुस्तक ठरवा किंवा तुम्हीच ग्रंथालयं, पुस्तकांची दुकानं, विविध साहित्य संमेलनं, दुर्मिळ पुस्तकं जिथे मिळतात अशा ठिकाणी जा आणि एक असं भन्नाट पुस्तक शोधा जे तुमच्या आतापर्यंतच्या आयुष्यातील एखाद्या मनाला वेदना देणाऱ्या घटनेवर उत्तर देऊ शकेल. आणि ते पुस्तक सतत तुमच्यासोबत ठेवा. त्यानंतर तशा आशयाची आणि वेळोवेळी तुमच्या आवडीची पुस्तकं वाचा. पण कुठलं तरी भन्नाट वर सांगितल्याप्रमाणे एक पुस्तक निवडा जे सतत तुमच्यासोबत ठेवा. मी पु.शि.रेगेंचं सावित्री हे पुस्तक निवडलं आणि ते सतत माझ्यासोबत ठेवते. तुम्हीही हेच ठेवा म्हणणार नाही. पण अशा पद्धतीने एक पुस्तक निवडा. हे आनंदाचं पहिलं सूत्र झालं. कसं तर जेव्हा जेव्हा तुम्ही दुःखी व्हाल, नकारात्मक विचार येतील तेव्हा हे पुस्तक हातात घेतलं तरी तुम्हाला आधार वाटेल इतकं त्या पुस्तकाला आपलंसं करा.
आनंदाचं दुसरं सूत्र एखादी नविन भाषा आणि नवी पाककृती शिका –
एखादी नविन भाषा आणि नवी पाककृती शिकण्याच्या या प्रोसेसमध्ये मेंदू ताजातवाना होतो. तो सकारात्मक विचार करू लागतो. अगदी तरतरीत होऊन जातो. त्यामुळे नकारात्मक विचारांचं मळभ निघून जातं. मी स्वतः मालवणी त्यामुळे आधी मराठी, हिंदी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न केला. आता इंग्रजी भाषेत लिहायला आणि बोलायला शिकतेय. त्यासोबत महाराष्ट्रातील प्रादेशिक भाषा, पंजाबी, बंगाली, भोजपुरी, गुजराती, दाक्षिणात्य या भाषाही वेळोवेळी समजून घेत असते. त्यामुळे नेहमी कुतूहल जागृत होतं. आणि एकदा का कुतूहल जागृत झालं की तुम्ही दुःखी होणारच नाही. कधी कधी काही प्रसंगात रडायला येईल, पण त्यावेळेला मोकळे व्हा. अश्रूंना अडवू नका. नविन भाषेसोबतच नवी पाककृती शिकणं आणि करून बघणं यातूनही भरपूर आनंद मिळतो. आणि मेंदूलाही फ्रेश फिल होतं. आपल्या भारतात एवढ्या वेगवेगळ्या खाद्यसंस्कृती आहेत, परदेशी खाद्यसंस्कृती आहेत यातलं थोडं थोडं शिकायचं म्हटलं तरी बघा किती आनंदी राहू शकताय तुम्ही. बाकी कसला विचार करायचा नाही. फक्त आपल्या ऑफिसच्या वेळातून काही वेळ नवीन भाषा, नवी पाककृती शिकण्यासाठी राखून ठेवा. तिसरं सूत्रं आहे नव्या माणसांना भेटा.
त्याआधी आपल्या घरातील सगळ्यांशी वेगवेगळ्या भूमिकेत राहून मैत्री करा. रोज वेगवेगळ्या अनोळखी व्यक्तींशी बोला, त्यांचं म्हणणं ऐका, त्यांना एखादी अडचण असेल, काही मदत हवी असेल तर ती करा. वेगवेगळ्या ठिकाणी भेटलेल्या माणसांना लक्षात ठेवा. त्यांनी तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही त्यांना एखादी छोटीशी घटना किंवा एखादं भन्नाट वाक्य सांगा तुमच्या आवडीचं. पदर खोचून सो कोल्ड समाजसेवा करण्यापेक्षा तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर झालात की समाजासाठी काही वेगळं करू शकता का... याचा विचार करा, आणि ते कृतीत आणा. तुमच्या आसपासच्या माणसांना किंवा तुमच्या वेळोवेळी संपर्कात येणाऱ्या माणसांशी सकारात्मक बोला, या देशाचं काही होऊ शकत नाही, मराठी भाषेचे चांगले दिवस गेले. असं नकारात्मक न बोलता आपल्या आजुबाजुला काय चांगलं घडतंय यावर बोला. मराठी भाषेसाठी मोर्चा, बैठका घेऊ नका, तर आधी मनाशी हे ठरवा की मला मनापासून व्यक्त व्हायचं असेल तर ती कुठली भाषा आहे, ती ठरवून त्यात मनसोक्त व्यक्त व्हा. माझं मराठी भाषेवर प्रेम आहे वगैरे अशी वाक्य फेकत बसण्याची काही गरज नाही. मी तर म्हणते कुणीच मराठीसाठी काहीच करू नका. तुमच्या आवडीच्या भाषेत नीट बोलायला, लिहायला शिका. त्या भाषेत पारंगत व्हा. त्या भाषेत नवं काही निर्माण करा.
आणि भाषाशास्त्राच्या नियमाप्रमाणे ज्या भाषेत जास्तीत जास्त निर्मिती होते, ती भाषा नेहमी टिकतेच. मी सांगितलेल्या तिसऱ्या सूत्राप्रमाणे माणसांना भेटताना कुठल्यातरी एका योग्य भाषेत संवाद साधा. तुम्ही समृद्ध व्हा आणि इतरांनाही समृद्ध करा. कारण आनंद देत असता आनंद घेत जावे हे आपल्याच मराठी भाषेतील कविवर्य विंदानीच सांगितलंय.
ही तीन सूत्रं लक्षात ठेवा...
१. सोबतीला एक भारी पुस्तक
२. नवीन भाषा आणि नवी पाककृती शिकणं
३. माणसांना भेटा, संवाद साधा.
या त्रिसूत्रीचा अवलंब तुम्ही केलात, तर तुमच्या आयुष्यातील आनंद कुणीसुद्धा हिरावून घेणार नाही.
यावर्षीच्या ट्विटरसंमेलनात आनंदाची त्रिसूत्री या विषयावर मी हे ट्विटव्याख्यान दिले होते.
यावर्षीच्या ट्विटरसंमेलनात आनंदाची त्रिसूत्री या विषयावर मी हे ट्विटव्याख्यान दिले होते.