मॉल्स आणि सुपर मार्केटच्या या जमान्यात जगभरातील अन्नधान्य, खाद्यपदार्थ, फळं-भाजीपाला आपल्याला सहज मिळू शकतो. पण आपण ज्या मातीत वाढलो, त्याच मातीत पिकणारं अन्न आपल्यासाठी अधिक पोषक नाही का ठरणार? त्याची चवही काही औरच असते खरं तर. पण आपण जे आपलं आहे, ते विसरून जे परकं आहे, ते आपलं मानू पाहतोय का? आपल्या मातीतल्या गोष्टी ‘लो स्टॅण्डर्ड’ वाटतायत का आपल्याला? तसं असेल तर आपल्या मातीशी पुन्हा नव्याने नाळ जोडायला हवीय...
अगं थांब, मस्त सॅंडविच करते आपल्यासाठी’, असं म्हणत नेहाने आम्हा दोघींसाठी सॅंडविच करायला घेतलं, ब्रोकोली, लेट्युस, बेबी कॉर्न, मेयोनीज असं एकेक नाव घेत तिचं सॅंडविच करणं सुरू होतं. वर म्हणते, जेवणही हल्ली ऑलिव्ह ऑईलमध्येच करते गं मी. हेल्दी असतं ना, यू नो...’
गेल्याच आठवड्यात आमच्या सोसायटीत ‘कुकिंग कॉम्पिटीशन’ झाली. (हो कॉम्पिटीशनच... पाककला स्पर्धा नाही काही!) ओट्स स्पेशल रेसिपीज करायच्या होत्या. का तर म्हणे, ते खूप फायबर रिच असतात म्हणे. मग आपली नाचणी काय असते? तिथे नाचणीचा विषय निघाल्यावर सगळे गप्प. पण ‘नाचणी? सो डाऊनमार्केट’ असं त्यांच्या चेहऱ्यावर लिहिलेलं सहजच वाचता येत होतं. कारण ‘डाएट कॉन्शिअस’ आणि ‘हेल्दी’ खाण्याची आवड असणारे हल्ली ‘ऑरगॅनिक व्हेजिटेबल्स’च मागवतात.
पण खरंच त्याची गरज आहे? आठवते का ती गावाकडच्या शेवग्याची शेंगांची केळीच्या सालीच्या दोराने बांधलेली जुडी. झाडावर लटकलेली हिरवीकंच कैरी, वेलाला लगडलेली काकडी, काजूच्या झाडाचा मोहोर, झुडुपात पानाआड दडलेली करवंदं असं बरंच काही. ते सगळं असतं आपल्या मातीतलं... आपल्याला बेतीव पोषणमूल्य न देता खास मिट्टी की खुशबू का एहसास देणारं.... अशा आठवणी निघाल्या नि मनाचा एक कोपरा कोकणात गावाकडे झटक्यात रवाना झालाय. आंबे, काजू, फणस, करवंदं सगळंच असं चित्र नजरेसमोर उभं राहिलंय. कोकणातल्या घरांना कधीच बाजारातील भाज्या आणि कडधान्यांची गरज पडली नाही. सारं काही निसर्गाने ताटात वाढूनच दिलंय. तेही अगदी हेल्दी हेल्दी आणि टेस्टी टेस्टी.
खरं तर इथेही ते मिळू शकतं. फक्त नजर आणि नजरिया बदलण्याची गरज आहे. पण बदल होतोय हं, नाही कशाला म्हणायचं. आधी उकडे तांदूळ शिजवताना खूप गॅस वाया जातो, असं म्हणणारी सूनबाई आता ब्राऊन राईसचं महागडं प्रकरण कशाला, म्हणून उकडे तांदूळ गावाहूनच मागवून घेते, हेही नसे थोडके. आता लोकल फूडची ग्लोबल किंमत हळूहळू का होईना; सगळ्यांनाच पटू लागलीय.
कोकणी मेव्याच्या दिवसात तसं बाजारातून जेवणासाठी काही खास आणावं लागत नाही. (फक्त माशांसाठी जाणं सोडल्यास!) आंबा, काजू, फणस, करवंदं, जांभळं, बोरं हे सगळं आहारात हवंच आणि योग्य त्या दिवसात. कोकणात उन्हाळ्याच्या चार-पाच महिन्यांत हा मेवा अगदी मनसोक्त अनुभवता येतो. यातला काही कोकणी मेवा पावसाळ्यासाठी निगुतीने साठवण करून ठेवला जातो.
हा सगळा कोकणी मेवा अगदी सुपर फूडच्या यादीत पहिला नंबर मिळवणारा. पण आणखी एक नाव हवं ते रातांब्याचं. आधी हिरवं आणि पिकल्यानंतर लाल-गुलाबीसर दिसणारं हे फळ कोकणचा डॉक्टरच आहे जणू. मासेखाऊ मंडळींसाठी कोकमं लागतातच. पण ती तयार करताना खूप कसरत करावी लागते. कोकमं तयार झाल्यावर आगळ बाजूला ठेवला जातो किंवा खास कोकम सरबतासाठी वेगळी साठवणूक केली जाते. कोकम सरबत आणि सोलकढी आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, हे वेगळं सांगायला नको. अतिशय गुणकारी. पण रातांब्याच्या बियाही तेवढ्याच उपयोगी बरं का. त्या बिया सुकवून त्यांची सालं काढून हल्ली त्याचं मशीनमध्ये (आधी पारंपरिक पद्धतीने व्हायचं) तेल काढून मुटयाल करतात. हा प्रकार खूप कौशल्याचा आहे. हे मुटयाल म्हणजे कोकणात चीज, बटर आणि काही प्रमाणात खाण्याच्या तेलासाठी पर्याय ठरू शकतं. याचे खूप उपयोग आहेत, पायांना भेगा पडल्या, ओठांना मऊ मुलायम करण्यापासून ते अगदी भाजी-आमटीच्या फोडणीसाठी या मुटयालचा वापर करू शकतो. गावाकडे गेलात तर आजीच्या गप्पांना बसा... ती सांगेल, गरमागरम तांदळाच्या किंवा नाचणीच्या भाकरीवर हे मुटयाल लावून कसं खायचं ते?
कोकणात परसबागेची जागा फारच सुंदर. अगदी सुपर मार्केटपेक्षा लय भारी. शेवगा, कढीपत्ता, लिंबू, पपनस, अळू, विलायती आवळा, नारळ, केळी, चिकू, पेरू असं सारं काही त्यातच. चुन चुनके लेंगें असं म्हटलंत तरी खूप विविधता सापडेल. थंडीच्या दिवसात खूप ठिकाणी पालेभाज्यांच्या बिया पेरल्या जातात; तर मिरची, वांगी, टोमॅटो यांची छोटी रोपं (आवान) लावली जातात. त्यामुळे या दिवसात परसात भाज्याच भाज्या असतात. (काही जणं या काळातही भातशेती करतात. त्याला वायंगाण म्हणतात. अर्थात त्यासाठी पाण्याचे समर्थ स्रोत लागतात.) पालेभाज्यांमध्ये लाल माठ, मोहरी, मुळा, अलकुल, चवळी या प्रमुख भाज्या. त्यांच्या पाककृतींचे प्रकारही भन्नाट. भाकरीच्या तुकड्यावर पालेभाजी चमचाभर घेऊन खाण्यातली मजा काही औरच. ज्यांना हिरव्यागार पालेभाज्या, पांढरं शुभ्र ओलं खोबरं घालूनही आवडत नसेल त्यांच्यासाठी मिक्स किंवा एखादी पालेभाजी आणि त्यात चणे किंवा चण्याची डाळ घालून तेही खोबऱ्याच्या वाटणासहित रस्साभाजी केली जाते. हेही एक भन्नाट प्रकरण. थंडीच्या दिवसातील भाज्यांच्या जोडीला रानमेवाही असतो. करवंदाची चटणी किंवा लोणचं, कुड्याच्या शेंगा, कणग्या, चिनं असं सगळं. त्यामुळे मोजूनमापून खाणं हा प्रकार बाजूला पडतो. पण आहार मात्र पुरेपूर पोषणमूल्यांनी परिपूर्ण होतो.
पण अजून खरी मजा तर पावसाळ्यात असते. कोकणी मेवा पावसाळ्याच्या दिवसासाठी साठवलेला असतोच आणि त्यात पावसाळी भाज्यांची भर पडते. तोही एक उत्सवच असतो. अळू, हळदीच्या मुंडल्या राखून ठेवल्या जातात. काकडी, दोडकं, पडवळ, कारलं, भोपळा, भेंडे अशा सगळ्या पावसाळी भाज्या कुठल्या घ्यायच्या याचं लिस्टिंग वर्षभर केलेलं असतं. त्यासाठी बियाही साठवल्या जातात. काकडी, भोपळ्याच्या बिया एखाद्या जुन्या कोकणी घरात गेलात तर गिलाव्याच्या भिंतीवर मारलेल्या दिसतील. पहिल्या नजरेत तुम्हाला वाटेल की ती नक्षी वगैरे आहे का... पण तसं नसतं. ‘ते बिये हत गो चेडवा...! हेही तिथली आजी हसून सांगेल. पहिल्या पावसाची एक सर पडून गेली की पावसातल्या मेजवानीसाठी परसबागेत काय काय कुठल्या ठिकाणी लावायचं याची जागा ठरवली जाते. मातीचं अळं केलं जातं. बिया घातल्या जातात. रोपं वर आली नि वेल फुटु लागले की त्याला मांडव घातला जातो. मग तीन महिने भाज्या कुठल्या करायच्या हा विचारच नाही करायचा. फक्त परसात जायचं काकडी, पडवळ, दोडकं, कारलं, भोपळा सगळे मांडवावर लटकत असतात. ते काढतानाच तुमच्या डोक्यात रेसिपी पिंगा घालू लागते.
तरं असं हे आपल्या मातीतलं फूड. तुम्ही अतिशय फूडी असाल तरी तुम्हाला खूश करेल आणि डाएट कॉन्शिअस असाल तरीही तुम्हाला खूश करेल. अरे हो. कुळीथ या कडधान्याला विसरायचं नाही. कोकणात पिठी हा प्रकार सांगण्यापेक्षा अनुभवण्याचा. अगदी जेवणात शॉर्टकट मारायचा असेल तेव्हा आणि इतर भाज्या ताटात नसतील तेव्हा पिठीच जवळची वाटते. हे करिना कपूरने अलीकडे डाएटमध्ये कुळीथाची पिठी आणि भाकरी खायला सुरुवात केलीय म्हणून नाही सांगत; तर कुळीथ खरंच एक दुर्लक्षित असलेलं सुपर फूड आहे. तशी आठवड्यातून एकदा तरी कोकणी मंडळीच्या ताटात पिठी किंवा कुळथाचा झुणका असतोच. पण ते हेल्दीसुद्धा आहे. हे विसरू नका. आयुर्वेदात त्याला अतिशय महत्त्वाचं मानलं गेलंय. पिठी आवडत नसेल तर कुळीथाला मोड काढून केलेलं सांबारही प्रकृतीस उत्तमच. हो, तरी त्याच्या बाजूला सुक्या माशाचा तुकडा हवाच नाही का...
खरं तर आमच्या गावाकडे कित्येक आजी अशा होत्या, ज्यांच्याकडे स्वतःची कूकबुक्स होती. लिहिलेली नाही, डोक्यात फिट्ट आणि मनात जतन केलेली. गावात आमच्या घराच्या शेजारी एक आजी होती, तिला सगळे घरणआजी म्हणायचे. घरण म्हणजे गृहिणी, अन्नपूर्णा या अर्थाने. खरंच तिच्याकडे १२ महिने परसातल्या सुपर फूड्सना वापरून कसा परिपूर्ण स्वयंपाक करायचं हे कौशल्य होतं. तसं ते आजही कोकणातल्या थोड्या प्रमाणात का होईना; काही गृहिणींकडे आणि पुरुष शेफकडे आहे. हे भारी वाटतं. कोकणात सार्वजनिक समारंभात पुरुष स्वयंपाक करतात. याची आठवण सांगायची तर कोकणात गवळदेव नावाचा एक प्रकार असतो. रानातल्या निसर्गाला नैवेद्य दाखवण्याचा छोटेखानी सोहळा. याचा स्वयंपाक पुरुष करतात. त्या जेवणाची चव अजूनही जिभेवर आहे. तसंच आमच्या शाळेत वनभोजन वर्षातून एकदा व्हायचं तेव्हाही स्वयंपाक आमचे शाळेतले गुरुजीच करत. तेही खूप छान वाटायचं. एकूणच सांगायचा मुद्दा हा की, निसर्गाने भरभरून आपल्याला दिलंय. कोकणात तर १२ महिने अगदी विविध सुपर फूडची अगदी रेलचेल असते. आईने स्वयंपाक करूदे किंवा बाबांनी किंवा दुधाच्या साईसारख्या आजीने; त्याला मायेचा, आपुलकीचा सुगंध सुटल्याखेरीज राहणार नाही. आणि ते आपल्या मातीतलं असणार, त्यामुळे खाने का मजा भी दुगना हो जाएगा... खरं की नाही....
तेव्हा ओट्स, ब्रोकोली... व्हा बाजूला. शेवगा, भोपळा आणि जिभेला वळवळ करायला लावणारी चिंच, आवळा येऊ द्या...!
(सकाळ मुंबई आवृत्तीच्या 47 व्या वर्धापनदिनानिमित्त लाईफस्टाईल या विशेष पुरवणीसाठी मी लिहिलेला लेख...27 Jan 2018)

No comments:
Post a Comment