आपल्या घराशिवाय अजून एक दुसरं घर म्हणजे आपलं ऑफीस. घरच्यापेक्षा जास्त वेळ
आपण या जागेत वावरत असतो. तसेच कामाच्या निमित्ताने आपण खूप अनोळखी माणसांच्या
संपर्कात येतो. अशावेळी खूप गोष्टी मनात चाललेल्या असतात, त्याचा नकळत ताण येत असतो.
अलिकडे शहरांमध्ये ताण घेऊन वावरणाऱ्यांची संख्या वाढलीय, असे काही मानसशास्त्रीय अहवाल
सांगू लागलेत. त्यामुळे ऑफीसरुपी दुसऱ्या घरात, समाजात वावरायचं कसं? निकोप संवाद कसा साधायचा? याविषयी काही मनमोकळं
मांडावसं वाटतंय, ते तुम्हाला सांगते.
अनेकदा आपण हाताने वाजवून इतरांना गाणं कुठलं ते ओळख… असा खेळ गमतीने खेळत असतो. पण एकदा काय झालं, एलिजाबेथ
न्यूटन नावाची एक मानसशास्त्राची विद्यार्थीनी होती. तिने पीएचडीच्या
विद्यार्थ्यांबरोबर एक नवा मनोरंजक मानसशास्त्रीय प्रयोग सादर केला. त्या
प्रयोगाला तिने नाव दिलं होतं, टॅपर्स अँड लिसनर्स एक्सपेरीमेंट. तिने पीएचडीच्या
विद्यार्थ्यांना यात सहभागी व्हायला सांगितलं. तिने मुलांचे दोन विभाग केले. एक
टॅपर्सचा आणि दुसरा लिसनर्सचा. टॅपर्सना प्रसिद्ध आणि पटकन ओळखू येतील अशी २५ गाणी
फक्त बोटांचा वापर करून टेबलाच्या सहाय्याने वाजवायची, असं सांगितलं. तर लिसनर्सना
ती गाणी कुठली? हे फक्त ओळखायचं होतं.
वरवर पाहता हे सोपं वाटत होतं, पण लिसनर्सना ती गाणी ओळखताच येईनात. एकूण १२०
वेळातरी ती गाणी बोटांनी टेबलाच्या सहाय्याने वाजवली गेली, पण ओळखताच आली नाहीत.
फक्त तिनच गाणी ओळखता आली.
याचं कारण असं होतं की ऐकणारे ५० टक्केतरी त्यातली गाणी ओळखतील असा अंदाज
होता. पण ती ते ओळखू शकले नाहीत. जे बोटाने वाजवून सांगत होते, त्यांना ते गाणं
नीट कळलेलं होतं. ते त्यांच्या डोक्यात फीट बसलेलं होतं. त्यांच्या बोटांनीही छान
लयीत त्यांनी ते वाजवलं होतं. पण तरीसुद्धा ते ऐकणाऱ्यांनी का बरोबर ओळखलं नाही,
याचा सगळ्यांना प्रश्न पडला आणि कुजबूज सुरू झाली. ऐकणाऱ्यांना कळलं नाही की इतकं
ओळखायला सोपं गाणं आपण का ओळखलं नाही. कारण त्यांच्या डोक्यात प्रकाशच पडला
नव्हता. त्यांनी खूप प्रयत्न केला होता. पण जे वाजतंय ते अर्थहीन आहे, असंच त्यांना
वाटत होतं.
हेच उदाहरण घेऊन सांगायचं झालं तर तुम्ही तुमच्या मुलांना, नातेवाईकांना,
ऑफीसमधल्या सहकाऱ्यांना, जोडीदाराला अशी एखादी कुठली गोष्ट सांगायचा प्रयत्न केला
आहे का? तर अशी वेळ आपल्या दैनंदिन
कामकाजात येतच असते. तुम्ही खूप मनापासून तुमच्या डोक्यातल्या कल्पना इतरांना
सांगण्याचा प्रयत्न करत असता. पण तुम्हाला अपेक्षित क्रिया समोरच्या व्यक्तीकडून
घडत नाही. त्यामुळे दोन्हीबाजूंनी तणाव वाढत जातो. अशा वेळी समस्या कोणामुळे
निर्माण होते आहे, हे ओळखता यायला हवं. तर ही टॅपर्सची समस्या असते. लिसनर्सची
नसते. कारण तुम्ही स्वतः टॅपर असता आणि काय करायचं आहे, हे तुमच्या डोक्यात पक्क
ठरलेलं असतं. आणि आपण आपली कल्पना किंवा आपल्याला काय म्हणायचं आहे ते समोरच्याला नीट सांगितलंय अशा भ्रमात
राहतो. पण ते खरं नसतं. कारण जेवढी तुमच्यात त्या गोष्टीविषयी स्पष्टता आलेली असते, तेवढीच स्पष्टता समोरच्यात
आलेली नसते. त्यामुळे ते जेव्हा सांगतात की आम्हाला नीट कळलं नाही, तुम्ही काय
सांगताय ते, त्यावेळी न रागावता, न कंटाळता, त्यांना कळलंय असं गृहित न धरता नीट
समजून सांगितलं पाहिजे. कारण समाजात वावरताना कधी आपण टॅपर्सच्या भूमिकेत असतो, तर कधी
लिसनर्सच्या. आणि या दोन्ही भूमिका उत्तम वठवायलाच हव्यात, नाही का?
पूर्वप्रसिद्धी, ऐसी अक्षरे रसिके (मुंबई आकाशवाणी) ४ ऑक्टोबर २०१८
पूर्वप्रसिद्धी, ऐसी अक्षरे रसिके (मुंबई आकाशवाणी) ४ ऑक्टोबर २०१८
No comments:
Post a Comment