Tuesday, 27 May 2014

लिवन्यासाटी काय बी…

  लई दिसापासून लिहाया – वाचाया येळ भेटला न्हाई. मनात कसंनुसं व्हतंय. आनी जिव लई खाली-वर व्हतोया. पन म्या आजपासून ठरिवलंय. कितीबी कामं आसली तरी लिहाया - वाचाया येळ काढाया पायजे. लिवनंवाचनं लई आवडीनं करते म्या

पर येळ घावला न्हाई की लई चिडचिड व्हते बगा. पन ते काही न्हाई आता ठरलं म्हंजी ठरलं! आता काय बी झालं तरी लिवनं सोडनार नाय
  
लिहाया लागलं म्हंजी कसं लई झ्याक वाटतं. मन अगदी मोकळं मोकळं होऊन जातंय
त्या दिशी आशीच कागूद पेन घेऊन लिहाया बसले व्हते. आनी लिवता लिवता कसा येळ गेला काई कळलंय न्हाई बगातेवढ्यात आई तिथं आली म्हनली लेककाचं आनी चित्रकाराचं मन लई नाजूक आनी हळवं आसतं जप त्याला. 

काय वाटलं त्या येळला काय सांगू तुमास्नी. डोळे लय भरून आले. आनी तोंडातून येक शबूद बी फुटना

आई म्हनली, बोलाया नीट जमत नाय ही तुझी पांगळी बाजू हाये पर जे बोलावसं वाटतंय ते लिवून काडलंस तर तेच जिवाचा आधार बनल…­ 

आई समदं बोलून गेली पन माझ्या मनात ईच्यारांचा लई कल्लोळ माजला. तिचं ते बोलनं काळजात येकदम कोरलं गेलं. त्या दिसापासून लिवनं माझ्यासाटी जगनं हाय. आनी येक येक शबुद मोगऱ्याची कळी हाय.





आपली ओळख

   आपली शिक्षणपद्धती याविषयी बोलायचे झाल्यास शाळेचे दिवस आठवू लागतात. पण जसजसे आपण मोठे होतो, थोडे थोडे समजायला लागते. खरेतर तेव्हापासून आपल्याला शिक्षणाला सुरुवात होते. पण प्रगतीपुस्तकावरील गुणांवरून आपल्याला हुशार आणि ढ ठरवणा-या संस्कृतीत आपण रुळतो आणि स्वतःला ओळखण्याची संधी गमावून बसतो. असे का होते? नेहमी पास की नापास या चक्रात आपण का अडकतो? आपण आपल्यातील कौशल्यांची पारख करायला टाळाटाळ का करतो? स्वतःवर विश्वास नसतो म्हणून? याचे उत्तर आपण शोधलेच पाहिजे




बालपणाच्या अवखळपणातून सावरत आपण प्रत्येकजण आपली वेगळी ओळख शोधत असतो. एकदा आपली स्वतःची अशी वेगळी ओळख सापडली, की आपण ती ओळख सतत आव्हान देणा-या या जगात टिकवायला हवी. जगण्यासाठी धडपडताना आणि आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहताना आशेचा किरण घेऊन आलेली ही आपली ओळख प्रत्येकाने जपायलाच हवी.
   आपली ओळख म्हणजे नेमके काय? तर आपण आपल्यासाठी निर्माण केलेली वाट. या वाटेवरून चालताना आपण एकटे असतो पण मग हळूहळू समविचारी माणसे भेटतात आणि आपला प्रवास सुखकर होतो

हाती घेतलेले प्रत्येक कार्य श्रद्धा, निष्ठा आणि आवडीने केले तर या संपूर्ण जगाला आपली ओळख पटेल आणि मग वेगळे काही करावे लागणार नाही. आपली ओळख कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे निसर्ग. निसर्ग कुठल्याही गोष्टीसाठी दिखाऊपणा करत नाही. आपले अस्तित्त्व अबाधित ठेऊन आपले कार्य करित राहतो. तो कधीही भेदभाव करत नाही

अशीच आपलीही स्वतंत्र ओळख असावी, कसलाही बाऊ न करता इतरांना प्रेरणा देणारी आणि आपल्याला नवा अनुभव देत समृद्ध करणारी   

Monday, 26 May 2014

भुईचाफा हे नाव का दिलं?

एकदा अचानक परसबागेत जमिनीतून वर येऊन आभाळाकडे पाहून हसणारी भुईचाफ्याची फुलं लहानपणी बघितली. तो क्षण विसरूच शकत नाही. ती अत्यंत सुवासिक अशी फिक्कट जांभळ्या आणि पांढऱ्या रंगाची फुलं बघितल्यावर मला खूप आनंद झाला होता.
भुईचाफ्याच्या फुलांचं असं जमिनीतून अचानक एके दिवशी उमलणं हा माझ्यासाठी निसर्गाचा चमत्कारच होता.
निसर्गाची ही किमया, हे त्याने निर्माण केलेलं अद्भुत विश्व निर्मितीच्या वाटेवरील प्रत्येकाला भारावून टाकतं, वेड लावतं...
निसर्गासारखी किमया आणि भुईचाफ्यासारखी रंगसुगंधाची उधळण याचा अप्रतिम मेळ मला माझ्या लेखनातून साधता येईल, तो दिवस माझ्यासाठी सोन्याचा, अमृताचा असेल...
तोवर निसर्गाच्या प्रत्येक रुपाने मोहित होऊन, भुईचाफ्याचा दरवळ मनात साठवून लिहित राहणार आहे.
भुईचाफा या ब्लॉगमधून विविधरंगी लेखन वाचकांना वाचायला मिळणार आहे.
व्यक्तिचित्रण, ललितलेखन, समीक्षापर लेख, प्रासंगिक विषयावर लिहिलेले लेख, सामाजिक आशय मांडणारे लेख, कला, साहित्य, मानसशास्त्र, टेलिव्हिजन, मालवणी खाद्यसंस्कृती या माझ्या आवडत्या क्षेत्रातील काही निवडक विषय घेऊन त्यावर लिहिलेले लेख आणि लघुकथा यांचा समावेश या ब्लॉगमध्ये असेल.
.... तुम्हाला भुईचाफ्याचं फूल आवडतं, तसंच माझं लेखनही आवडावं यासाठी सतत प्रसयत्नशील राहीन...

धन्यवाद !!!








आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...