Tuesday, 8 July 2014

समतोल

स्वाभिमानी, खराखुरा प्रत्येक कलावंत आपल्या कलेतून बंड करत असतो. मग तो लेखक असो, चित्रकार असो किंवा आणखीन कोणी. हे बंड कधी स्वतःशी असतं… तर कधी प्रस्थापित व्यवस्थेशी असतं. यात त्याला आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण करायचे नसते, कारण तो आपल्या निर्मितीशीलतेशी प्रामाणिक असतो. परंतु दुर्दैव असे की त्याचे हे बंड… कोणाला कळते… कोणाला कळत नाहीत्याचबरोबर कळले तरी कळण्याचे सोंग घेतलेला एक गटही त्यात असतो.

कलेसाठी कला आणि जीवनासाठी कला हे दोन प्रवाह आपल्याला साहित्याच्या, कलेच्या आणि कलावंताच्या बाबतीत दिसतात. हे दोन चिरंतन मतप्रवाह आहेतकलेसाठी कला या विचारासाठी कमालीचे समर्पण लागते. म्हणजेच कलेसाठी स्वतःला झोकून देणे. त्यासाठी कलावंताने पैसै, प्रसिद्धीची हाव धरता आपला आत्माविष्कार करत राहणे, हे अपेक्षित असते. पण अशाने नंतर निराशा पदरी येण्याचा संभव असतो.


जीवनासाठी कला या विचारात लेखकाची, कलावंताची स्वतःची अशी ठाम भूमिका असावी लागते. आपली भारतीय संस्कृती या विचाराची समर्थक आहे. या विचारात कलवंताला मान, सन्मान, पैसा, प्रसिद्धी सारं काही मिळेल. येथे कलावंताची सामाजिक बांधिलकी हा मुद्दा येतो. आपण समाजाचेच एक भाग आहोत. या भावनेने त्याचे सृजन फुलू लागते.

त्यामुळे कलावाद की जीवनवादॽ कलावंत की समाजॽ या प्रश्नातील समतोल साधणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी विवेकाची आवश्यकता आहे. दोन्ही बाजू घेऊन वाद घातल्याने किंवा दोन्हीपैकी एक अशी टोकाची भूमिका घेऊन चर्चा करत राहिल्यास त्यातून काहीही साध्य होणार नाही. मात्र यामुळे आपण उच्च कोटीच्या साहित्याला, कलेला पारखे होऊ हे नक्की. म्हणूनच आपल्या भारतीय समाजाला आतापर्यंत साधता आलेला समतोल साधण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

त्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा. तेव्हाच आपल्या समाजातील अनेक तळागाळातील कलावंतांना त्यांच्या योग्यतेचे स्थान मिळू शकेल. त्यांच्या कलेला सर्वांसमोर येण्यासाठी वाव मिळेल. समाजातील बदल जसा सर्वसामान्य माणसाला जाणवतो, तसाच तो सर्जनशील कलावंतास जाणवतो. तरीही सर्वसामान्य माणसाचे व्यक्त होणे वेगळे असते आणि कलावंताचे व्यक्त होणे वेगळे असते. असे असले तरी दोघांनीही हे लक्षात ठेवले पाहिजे की एकमेकांना समजून घेऊन, एकमेकांचा आदर करत समर्थ आणि सक्षम समाज घडवण्याची जबाबदारी त्यांच्यावरच आहे

शेवटी कलावंत आणि सर्वसामान्य माणसाला हेच वाटत असते की जगणे सहज, सुंदर सोपे व्हावे. मग त्यासाठी एकमेकांची मुस्कटदाबी कशासाठीदोघेही समाजाचा अविभाज्य घटक आहात…परस्परांनी तडजोडीचे किंवा तंटे-बखेड्याचे धोरण अवलंबले तर नुकसान पुन्हा समाजाचेच आहे. त्यापेक्षा दोघांनीही सामंज्यस्याची, एकमेकांना समजून घेण्याची भूमिका पार पाडली, तरच आपली सांस्कृतिक पडझड थांबेल. यासाठी निसर्गाकडे असलेला समतोल हा गुणधर्म अंगीकारण्याची आज नितांत आवश्यकता आहे.

Tuesday, 1 July 2014

निसर्ग - प्रेरणेचा अखंड स्त्रोत

कवितेचे नाव- झाडांनीच मला

कोणी मला इतक्यांदा उपटून असे तिथून
इथे, इथून तिथे लावले असते
किंवा दरवेळी फुटलेली कोवळी लालसपालवी
ढोरांनी अशी कुरतडून टाकली असती
किंवा जमिनीतून धमन्यांच्या आत शिरून
अळ्यांनी मला असे पोखरून टाकले असते
तर मी आत्महत्त्या केली असती,

झाडे कुठल्या जीवनप्रेरणेने चिवटपणे जगतात!    
दरवेळी सारे बळ पणाला लावून
लाल थेंबाएवढे पान फुटते.
कसलेही खुरटे आयुष्य नशिबी आले तरी
फुलण्याच्या ऋतूत
केविलवाणी का होईना कळी देठावर
झाडांनीच मला जगणे शिकवले
जमीनदोस्त केले तरी उभे होणे शिकवले.  


                                  - प्रभा गणोरकर

त्या दिवशी आम्ही सर्वजण मराठी साहित्याच्या व्याख्यानाला बसलो होतो. कविता शिकवली जाणार होती… त्यामुळे प्रत्येकाच्याच मनामध्ये उत्साह होता. आम्ही मराठी साहित्य हा विषय घेतलेली मोजकीच मुले… आम्हा सर्वांचाच मराठी साहित्य हा जिव्हाळ्याचा आणि आपुलकीचा विषय. आपटेबाई वर्गात यायच्या आधी कविता वाचून ठेवावी या उद्देशाने वरील कविता वाचण्यासाठी पुस्तक उघडले.
प्रभा गणोरकरांची ही कविता वाच्यार्थ लक्षात घेता फक्त निसर्गकाव्य वाटावं आणि कवितेच्या शेवटच्या ओळीपर्यंत पोहोचावे तो आपल्या जगण्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारी ही कविता…

आपटेबाईंनी ती कविता अतिशय प्रभावीपणे शिकवली. आणि आम्ही सर्वजण पुन्हा साहित्याच्या सागरात न्हाऊन निघालो.




खरंच झाडांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. त्या दिवशी घरी गेल्यानंतर पुन्हा ती कविता वाचली आणि माझ्या मनातील सकारात्मक विचारांचा प्रवाह पुन्हा एकदा खुला झाला. लहानपणापासून माणसांपेक्षा निसर्गच जवळचा वाटत आला आहे. त्याला कारणेही बरीच आहेत. तसं सारं काही उलगडून सांगता येणार नाही…तरीही हे मात्र खरे की माणसांपेक्षा निसर्गानेच मला आनंदाचे क्षण दिले.
झाडे आणि विशेषतः निसर्ग सतत आपल्या भोवताली असतो. परंतु आपण त्याच्याकडे नेहमी दुर्लक्षच करतो. वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यावर निसर्ग तोच असतो पण त्याची विविध रूपं आपल्याला पहायला मिळतात. निसर्गाची ही रूपं पाहताना भान हरपून जाते. सकारात्मक बदल आणि सतत नावीण्याचा ध्यास ही गोष्ट शिकावी तर ती निसर्गाकडूनच.

ऋतुंमुळे होणा-या निसर्ग बदलाने आपण कधी सुखावतो तर कधी उदास होतो. पण निसर्गातील या बदलाचा खुल्या मनाने स्वागत करणारा निसर्गप्रेमी तसा दुर्मिळच. खरेतर निसर्गाची ही विविधता आपल्यासाठीच आहे. निसर्ग आपल्याला भरभरून सुख देत असतो. पण आपलाच दृष्टिकोन निसर्गाला समजण्यात कमी पडतो आणि आपण निसर्गाने दिलेल्या या आनंदाला मुकतो.

लेखक म.ना. अदवंत यांचा निसर्ग आणि आम्ही हा अतिशय सुंदर काव्यात्म असा ललितलेख वाचनात आला. त्यानंतर निसर्गाकडे पाहण्याची माझी दृष्टी बदलली. या लेखामध्ये लेखकाने निसर्गातील सुर्योदयाचे, पावसाळ्यातील दिवसाचे, चांदण्या रात्रीतील चालण्याचे असे कितीतरी प्रसंग भावूकतेने आणि अलवारपणे वर्णन केले आहे.

वरील कवितेत कवयित्रीने सांगितल्याप्रमाणे झाडांकडून आयुष्य कसे जगावे यासाठी प्रेरणा मिळते…  एकूणच सर्वव्यापी निसर्गाकडून आपल्याला नेहमी आनंदाचा, प्रेरणेचा खळाळत वाहणारा झरा लाभला आहे. फक्त त्यात चिंब भिजण्यासाठी आपल्या निखळ मनाची तयारी ठेवायला हवी.



सर्जनशीलतेच्या वाटा धुंडाळणा-या प्रत्येकाला आजवर निसर्ग खुणावत आला आहे. त्याचबरोबर सर्जनशीलतेच्या वाटेवरून चालणा-या प्रत्येकाला निसर्गाची अनावर ओढ असते. 

निसर्गातील ख-याखु-या भावनांचा पुरस्कार करताना, निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेताना नकळत त्याचा आविष्कार सर्जनशील व्यक्तीकडून होतो. त्यामुळे त्याचे अवघे जीवन सौंदर्याने व्यापून जाते. अशी व्यक्ती स्वतःच्या अस्तित्त्वाने इतरांच्या आयुष्यात सुखाचे चार क्षण देऊन जाते. 

आजकाल क्रिएटिव्ह थिंकिंग हा शब्द कॉर्पोरेट वर्ल्डच्या प्रभावामुळे सतत कानावर पडत असतो. हा शब्द आता प्रत्येकाला परिचयाचा झाला आहे. पण ती विचारसरणी अंगी बाणवायला थोडा वेळ लागेल. कारण प्रवाहाविरूद्ध जाण्यासाठी, चाकोरीबाहेरचा विचार करण्यासाठी आपणच आपल्याभोवती आखलेली चौकट आणि मर्यादांची साखळी तोडावी लागते. यासाठी लागणारं धैर्य आणि सामर्थ्य आपल्या आतून यायला हवे. त्यासाठी आपल्याला अखंड प्रेरणेचा स्त्रोत असलेल्या निसर्गाकडून खूप काही शिकावे लागेल.

निसर्ग आपल्याला जीवनप्रेरणा आणि जीवनमूल्ये देताना आपल्यावर नवचैतन्याची उधळण करत आहे. 
चला प्रयत्न करू या…
त्यातले काही अक्षय आपल्या ओंजळीत साठवण्याचा…आणि प्रत्यक्षात आचरणात आणण्याचा…   

आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...