पुस्तकं
आणि लायब्रेरी हे माझ्या अतिशय जिव्हाळ्याचे विषय. मग त्याच स्वप्नात खोल खोल बुडून गेले. समोर प्रशस्त बाग असलेली एक मनमोहक वास्तू मला दिसली. तिथल्या बागेकडे पाहतच पायऱ्या चढून मी आत गेले, पाहते तर काय! त्या वास्तूत पुस्तकच पुस्तकं होती. तिथलं वातावरण इतकं गुलाबी होतं की जणु काही प्रेमाची जादुई नगरीच इथे वसविल्याचा भास होत होता. तिथेच ती रूबी आजी भेटली. तिथली पुस्तकं, ते वातावरण पाहून मी तर भारावून गेले, फक्त नाचायची बाकी राहिले होते. पण तिथे पुस्तकं आणि रूबी आजीशिवाय कुणीच दिसत नव्हतं. मी त्यांना म्हटलं, अहो काय आहे हे, अतिशय अप्रतिम! म्हणण्याखेरीज काही शब्दच सुचत नाहीयेत. ती म्हणाली, क्षणभर बस इथे. मी तुला सारं काही विस्ताराने सांगते. मी रूबी… तू मला रूबी आजी असं म्हणू शकतेस. ही लायब्रेरी माझी आहे. आणि हे गुलाबी वातावरण सगळं अशासाठी कारण या लायब्रेरीत सगळी पुस्तके लव्हस्टोरजची आहेत. अरे वा, किती छान! मला तर फारच गंमत वाटू लागली. फक्त लव्हस्टोरीजची पुस्तकं! मग आता इथून माझा पाय निघणे कठीण… पुढे काही तिचं बोलणं न ऐकता लहान मुलासारखी बागडत बागडत मी ती पुस्तकं पाहू लागले. एकेक पुस्तक हातात घेऊन बघता बघता भारी मौज वाटू लागली. काही क्षण ते गुलाबी पुस्तकमय वातावरण श्वासात भरून घेतलं. मग तिचं बोलणं ऐकण्यासाठी तिच्यासमोर जाऊन बसले. विचारलं तिला काय गं, काय हे इतकी सारी लव्हस्टोरीजची पुस्तकं… अशाच पुस्तकांचा संग्रह करण्यामागे काही खास कारण… असं विचारल्याबरोबर तिने गालातल्या गाल्यात स्मित केलं. मग आपलं मन मोकळं करण्यासाठी आपली एखादी जिवाभावाची सखीच आली आहे, असे समजून ती माझ्यासमोर आपलं मन मोकळं करू लागली…
एके दिवशी मी लायब्रेरीत पुस्तक आणायला गेले होते. तिथे माझ्या आधी एक मुलगा नव्या पुस्तकांच्या स्डँडजवळ उभा राहून पुस्तकं न्याहाळत होता. माझं लक्ष सहज त्याच्याकडे गेलं. मग त्या मुलाने लायब्रेरीत काम करणाऱ्या मुलीकडे एरिक सेगलचं लव्हस्टोरी नावाचं पुस्तक मागितलं. त्या मुलीने त्याला ते पुस्तक आणून दिले. तेव्हा मला काय झाले कुणास ठाऊक, मी नकळतपणे त्याला विचारलं, तू लेखक आहेस का? तर तो म्हणाला, हो! त्या पुस्तकाचा आणि तो लेखक असण्याचा काहीच संबंध नव्हता तरीही… झालं! एवढंच निमित्त झालं, त्याच्या बोलण्याचं. तोपर्यंत माझं चंचल मन त्याला माझ्या आयुष्याचा जोडीदार ठरवून मोकळं झालं होतं. मला पुढे आणखीन काय बोलावं ते कळेना. बस तो एकच जादुई क्षण… त्यानंतर आमची पुन्हा कधी भेट झालीच नाही. माझ्या मनाने तर पुरती मी त्याचीच होऊन गेले होते. तो एक प्रसिद्ध लेखक होता. वृत्तपत्रातून, चॅनल्समधून त्याच्या लेखनाविषयी मी कौतुक ऐकत होते. नाटक, मालिका, चित्रपट त्याच्या लेखनाची घोडदौड सुरुच होती. पुन्हा त्याच्यासमोर जाण्याची माझी कधी हिंमतच झाली नाही. त्याच्यावर मी केलेलं जीवापाड प्रेम मनातच राहू दिलं सोनचाफ्याच्या फुलासारखं… त्याच्या सुगंधाने मी माझं आयुष्य दरवळत ठेवलं. प्रेमातील असफलतेमुळे मी निराश झाले नाही. कारण प्रेम हे कसंही असलं तरी ते प्रेम आहे. माझ्या मनात माझ्या प्रिय व्यक्तीविषयी प्रचंड आदर आहे. त्याला निराशेच्या काळ्या डोहात बुडू द्यायचं नाही… हे मी मनाशी पक्क ठरवलं होतं. मग मी लव्हस्टोरीजची पुस्तकं वाचू लागले आणि त्यातच रमू लागले. त्यानंतर एके दिवशी ठरवलं. आपण या लव्हस्टोरीजच्या पुस्तकांचा संग्रह केला तर… मी खूप दूरवर वेगवेगळ्या दुकानात जाऊन ही लव्हस्टोरीजची पुस्तकं गोळा करू लागले. त्यातूनच ही छोटेखानी वास्तू उभारली. आणि नवविवाहिता जशी आपल्या नव्या संसाराला सजवत असते, त्याप्रमाणे मी या वास्तूला सजवू लागले. सुरुवातीला इथल्या आसपासच्या मुलांना ही लायब्रेरी बघण्यासाठी बोलावून आणावे लागे. आता मात्र ही मुलं आनंदाने इथे येतात. तासन् तास इथली पुस्तकं न्याहाळतात. वाचत बसतात. इथल्या प्रियकर, प्रेयसींसाठी हे त्यांच्या हक्काचं ठिकाण झालंय. यातच मला आनंद वाटतोय. मी माझं सारं दुःख यांच्या फुलणाऱ्या प्रेमाकडे पाहून विसरून गेले. त्यातूनच पुढे जाऊन मी इथंच काऊन्सेलिंग सेंटर सुरू करायचं ठरवलं. मानसशास्त्राचा माझा अभ्यास होताच, त्यामुळे काही अडचणी आल्या नाहीत. माझ्यासारखे काही अव्यक्त राहिलेले, काही प्रेमाच्या वाटेवर अडखळलेले, काही फसलेले, काही फसवले गेलेले, काही असफल प्रेमामुळे निराशेच्या गर्तेत खोल गेलेले अशांना मानसिक आणि भावनिक आधार देण्यासाठी त्यांना सावरण्यासाठी, नवी उभारी देण्यासाठी मी आता सज्ज झाले आहे. मला आता कुणीही माझ्यासमोर दुःखी, कष्टी झालेलं आवडत नाही. माझी लायब्रेरी सर्वांसाठी खुली आहे. ज्यांना आपल्या आयुष्यात प्रेमाचा झरा सापडला त्यांनीही इथं यावं आणि ज्यांच्या आयुष्यात प्रेमाची उणीव आहे, त्यांनीही इथं यावं. मला हे जग प्रेमाने भारून टाकायचं आहे. आता इथे प्रेमाचीच गाणी ऐकायला मिळतील. निराशेच्या सुरांना इथे अजिबात स्थान नाही.
खरंच!
रूबी आजीचा प्रेमाचा विचार किती व्यापक आहे. नाहीतर आपण! सदैव आपल्या सुखाचाच विचार करत राहतो. रूबी आजी अगदी सावित्री या पुस्तकातील सावित्रीसारखीच मला वाटली… आनंदभाविनी. सावित्रीसारखी तिनेही आपल्या प्रियकराला मोराची भूमिका दिली. तो तिच्या आयुष्यात आला तरी ती खूश होणार आणि नाही आला तरी ती खूशच राहणार आहे. मला वाटतं, आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीही कमी अधिक प्रमाणात रूबी आजीसारख्याच असतात. आपल्या कुटुंबातील प्रेमाचा झरा टिकवून ठेवण्यासाठी जीवाचं रान करतात. त्यांनाही वाटत असतं, आपल्या नातवंडांच्या अंगणात प्रेमाचा, आनंदाचा मोर यावा आणि त्यांचं आयुष्य बहरून जावं…
पूर्व प्रसिद्धी, ज्येष्ठपर्व त्रैमासिक दीपावली
विशेषांक, २०१४
No comments:
Post a Comment