Saturday, 31 January 2015

गावचो धयकालो

कोकणातील एक प्रमुख लोककला म्हणून ओळखला जाणाऱ्या दशावताराला किमान पाचशे वर्षांची परंपरा आहे. कोकणात नमन, खेळे, लळीत, रोंभाट, पिंगुळीची चित्रकथी असे अनेक लोककला प्रकार आहेत. पण अध्यात्मिक, धार्मिक आणि समाजप्रबोधनात्मक लोककला म्हणून दशावतार यांच्याहून अधिक लोकप्रिय ठरला. असा हा कोकणातील सर्वांचा आवडता दशावतार आम्हाला गावच्या धयकाल्यात बघायला मिळायचा. मार्गशीर्ष शुक्ल पक्ष त्रयोदशीला आमच्या ओवळिये गावात जत्रा (धयकालो) भरायची. जत्रेच्या एक-दोन आठवडे आधीपासूनच आमचे गाव पाहुण्या मंडळींनी गजबजून जायचे.

आम्ही मुले जत्रेला जाण्याचे बेत आखू लागायचो. घरातून किंवा घरात आलेल्या पाहुण्यांकडून खाऊसाठी वगैरे पैसे मिळत. आम्ही ते जत्रेतील खरेदीकरता राखून ठेवायचो. जत्रेचा दिवस उजाडेपर्यंत गाव जत्रेसाठी सज्ज व्हायचे. आमच्या गावातील रामेश्वराच्या मंदिराला तोरणे, फुलांच्या माळा लावून सजवले जायचे. आजूबाजूच्या गावाहून वेगवेगळे सामान घेऊन माणसे येत आणि मंदिराजवळील आवारात आपापली दुकाने थाटत. खाऊची, खेळण्यांची, भेटवस्तूंची, फुलांची, जीवनावश्यक अनेक वस्तूंची, टिकल्या-बांगड्यांची अशी कितीतरी प्रकारची दुकाने सहा-सात तासात उभी व्हायची. शहरी लोकांच्या भाषेत सांगायचे तर ही सगळी हरतऱ्हेच्या चीज-वस्तूंनी सजलेली दुकाने म्हणजे गावाकडच्या लोकांसाठी शॉपिंग मॉलच असायचा.

आम्ही मुले जत्रेच्या आदल्या दिवशी आमच्या खळ्यात जमायचो. जत्रेत काय काय खरेदी करायची ते ठरवण्यासाठी. मी आणि आमच्या शेजारच्या घरातील सर्व मुलांना दिन्यादादाच्या आईबरोबरच जत्रेला जायला आवडायचे. आम्ही तिला जाऊन आदल्या दिवशीच सांगायचो, यावर्षीही आम्ही सगळे तुझ्याबरोबरच येणार, तेव्हा ती आमच्याकडे पाहत म्हणायची..."येवा रे पोरांनु. मी खय नाय म्हटलय तुमका"...दरवर्षी दिन्यादादाची आई वाडीतल्या आम्हा दहा-बारा मुलांना घेऊन जत्रेला जायची. आणि सांभाळून घरी आणायची. जत्रेचा दिवशी उजाडल्यापासूनच आमची धांदल उडायची. रामेश्वराच्या मंदिरात मूर्तिची पूजा-अर्चा सुरू व्हायची. मंदिरातून भक्तीगीतांचे मंजूळ सूर ऐकू यायचे. दिवसभराचे कामकाज आटपून संध्याकाळी लोक देव-दर्शनासाठी बाहेर पडत. त्यानंतर रात्री दशावतारी नाटक बघायला गर्दी करत.

आमचे रात्री जेवणासाठी बिलकुल मन नसायचे. आम्ही कपडे घालून तयारी करू लागायचो. बाहेर गारठून टाकणारी थंडी असायची. त्यामुळे साधेच कपडे घालून त्यावर स्वेटर घालावे लागे. स्वेटर अंगात चढवून एखाद्या गुबगुबीत सशासारखे दिसायचो. उंबरठ्यावर बसून दिन्यादादाच्या आईची वाट पाहताना
 जत्रेत काय काय पहायला मिळेल याविषयी प्रचंड उत्सुकता मनात असायची. दिन्यादादाची आई आली की सर्वांना विचारायची, "बसाक गोनपाटा घेतलास काय रे"...मग आम्ही एका सूरात "हो" म्हणायचो. मग तिच्यामागून चालायला आम्ही सुरुवात करायचो. आकाशातील चंद्रही आमच्या सोबतीला असायचा. चांदण्या रात्रीतून मंदिराकडे जाताना खूप छान वाटायचं. घराकडून मंदिरात पोहोचेपर्यंत दिन्यादादाची आई आम्हाला तिच्या बालपणी पाहिलेल्या दशावतारी नाटकांबद्दल सांगायची... केशव गोरे भटजींनी कुडाळ तालुक्यातील वालावल गावातील देवळात पहिल्यांदा दशावतार सादर केला. आजही दशावतार सादर करणाऱ्यांमध्ये वालावलकरांचा पहिला क्रमांक लागतो. वालावलकरांबरोबरच पार्सेकर, कळिंगण, नाईक-मोचेमाडकर या दशावतारी कंपन्या प्रसिद्ध आहेत. सुगीच्या दिवसात म्हणजेच तुळशीच्या लग्नापासून ते पाऊस पडेपर्यंत दशावताराचे खेळ सादर केले जातात. आमच्या सिंधुदूर्ग जिल्ह्यात तर प्रत्येक गावागावात दशावतारी नाटकात काम करणारे कलावंत आहेत...

मंदिरात पोहोचेपर्यंत दिन्यादादाची आई आमच्यासमोर दशावताराचा पूर्ण इतिहास उभा करायची. जत्रेच्या रात्री मंदिर आणि आजूबाजूचा परिसर माणसांनी भरून जायचा. मंदिरात जाऊन आल्यावर आम्ही खरेदासाठी जत्रेतील सगळी दुकानं पालथी घालायचो. जत्रेची आठवण म्हणून माहेरवाशिणी हिरवा चूडा भरायच्या आणि शेवतींच्या फुलांची वेणी घ्यायच्या. आम्ही एखादे खेळणे घेण्यात गुंग असायचो. छोट्या मुलांच्या हातात शिटी आणि फुगा हमखास दिसायचा. आमच्यात कुणाचा फुगा जास्त दिवस टिकतो, अशी स्पर्धाच सुरू व्हायची. शिट्या वाजवून लहान मुलं आवाजात आणखी भर घालायची. थंडीने कुडकुडत गरमागरम चहा सोबत भजी खाण्यात भारी मजा वाटायची. खरेदी झाल्यानंतर दशावतारी नाटक पहायला सगळेजण बसायचो. 

दशावतारी नाटक रात्री बारा वाजता सुरू व्हायचे ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहापर्यंत संपायचे. पूर्वरंग आणि उत्तररंग अशा दोन भागात दशावतार सादर केला जायचा. सूत्रधार हा मुख्य असायचा. त्याच्यानुसारच दशावतार उत्तरोत्तर रंगत जायचा. दशावतारातूल पूर्वरंग म्हणजे गणेशाला आवाहन आणि सरस्वती वंदना असायची. दशावतारी नाटकात थोडासा हलका-फुलका विनोदाची पेरणी करणारा संकासूर यायचा. तो सर्वांना हसवायचा. त्याचा मार्मिक विनोद कधी कधी बालबुद्धीला समजत नसे. तरीही त्याच्या देहबोलीने, अंगविक्षेपांनी चेहऱ्यावर हसू फुटायचे. हा दशावताराचा पूर्वरंग असायचा.

संकासुर
आणि नंतर दशावतार सादर करण्यासाठी निवडलेली मूळ पौराणिक कथा सुरू व्हायची. त्यात ब्रम्हा, विष्णू, शंकर, नारदमुनी आणि संकासुर सारखी पात्रं असायची. त्यातच एखादं-दुसरं नकारात्मक पात्र असायचं. प्रत्येक जण नाटकी ढंगात संवादफेक करायचे. त्याला मृदुंग, तबला, ऑर्गन, झांज या वाद्यांची साथ असायची. दशावताराचा शेवट हा लढाईनेच व्हायचा. त्यानंतर लढाईत जिंकलेल्या पात्रांच्या संवादातून काहीतरी शिकवण जरूर मिळायची.

दशावतारी नाटकातील एक दृश्य

सकाळी सहा-साडे सहाच्या सुमारास दशावतारी नाटक संपले की घरी निघताना प्रसाद म्हणून मालवणी खाजा खरेदी करायचो. मंदिरातून घरी निघताना दशावतारी नाटकाच्या दुनियेतून बाहेर पडूच नये असं वाटायचं. गावात एका दिवसासाठी भरलेली ही जत्रा गावातील थोरा-मोठ्यांना, माहेरवाशिनींना, चाकरमान्यांना अशा सर्वांनाच एकत्र सामावून घेणारा एक सांस्कृतिक मेळावाच होता...या धयकाल्याच्या नुसत्या आठणीनेही सारं गाव एकत्र नांदत असल्याचं चित्रं नजरेसमोर उभं राहतं...
पूर्व प्रसिद्धी – ऐसी अक्षरे रसिके, आकाशवाणी मुंबई


No comments:

Post a Comment

आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...