Thursday, 19 February 2015

मोरपिशी आठवण

काही आठवणी मोरपीसासारख्या असतात. आपलं एखादं आवडतं पुस्तक खूप दिवसांनी वाचायला घ्यावं आणि त्यात नेमकं मोरपीस ठेवलेलं सापडावं. ते मोरपीस हातात धरून चेहऱ्यावरून फिरवावं. नेमक्या याच वेळी असंख्य आठवणी दाटून येतात आणि त्या आठवणी मोरपिसासारख्या होऊन जातात.
अशीच ही तुझ्याबद्दलची एक मोरपिशी आठवण... सहाव्या-सातव्या इयात्तेत असल्यापासूनच लिहिणं या गोष्टीशी मन एकरूप व्हायला लागलं होतं. तेव्हापासून लिहिणाऱ्या, निर्मितीशीलतेच्या कळा सोसणाऱ्या प्रत्येकाविषयी आदर वाटत आलाय. हा आदर आजतागायत टिकून आहे. त्यामुळेच लिहिणं, नवनिर्मिती करणं हे क्रियापट न वाटता विशेषण झालं आहे.
त्या दिवशी तू ग्रंथालयात आलास आणि मला ''सिग्मंड फ्रॉईड नावाचं विश्वास पाटील यांचं पुस्तक आहे का?'' असं विचारलंस. मी हो म्हणतच आत गेले आणि ते पुस्तक घेऊन आले. ते पुस्तक तुझ्या हाती देताना मी तुला अतीव आदरानं वितारलं होतं... तुम्ही लेखक आहात का?
तू हो म्हणालास आणि तुझ्या ओळख नावाच्या मालिकेविषयी सांगितलंस. त्याच दिवसापासून तुझ्या लेखनाविषयी माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. ती उत्सुकता अजूनही टिकून आहे. एका नाट्यमहोत्सवात तुझं नाटक मी पाहिलं. त्यानंतर एका काव्यसंमेलनात तुझ्या कविता ऐकल्या.  
तू ज्या मालिकांसाठी लेखन केलंस त्या मालिकाही मी पाहिल्या. तू तुझ्या प्रगल्भ लेखणीतून आजवर जे वास्तव मांडत आला आहेस, त्याला तोड नाही. तुझं नाट्यलेखन, मालिका-चित्रपटांचं पटकथा-संवादलेखन आणि काव्यलेखन वाचलं तेव्हा हाच प्रश्न मनाला सतावत होता कशी आणि कितीक वादळं पेलली असतील तुझ्या कोवळ्या मनानं. त्यामुळेच खंबीर विचारांशी तुझी जन्मगाठ बांधली गेलीय. तुझ्या लेखनातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे तुझा प्रॅक्टिकल आशावाद. हे ज्या दिवशी मला जाणवलं त्याच दिवशी तुला पु.शि.रेगेंचं सावित्री हे पुस्तक वाचायला द्यायला हवं, हे मनाशी ठरवलं होतं. आणि ते तुला दिलंही. आणि माझ्या अपेक्षेप्रमाणे तुलाही ते आवडलं.
मानसशास्त्रात गरुडाची गोष्ट सांगितली जाते. याच गोष्टीचाच आधार घेऊन मी असं म्हणेन की तू तुझ्या लेखनाच्या प्रांतात आता गरुड आहेस. स्वतःला असा खुराड्यात बंदिस्त करून घेऊ नकोस. नव्या वाटा तुझ्यासमोर खुल्या आहेत. त्यांचं स्वागत कर. तुझ्या लेखनकलेवर माझं खूप प्रेम आहे. तू असाच लिहित राहावास... यासाठी माझ्या तुला खूप खूप शुभेच्छा. तू तुझ्या लेखनात येणाऱ्या अडथळ्यांना पाहून हार मानू नकोस. तुझ्या मनात फुलणाऱ्या साऱ्या स्वप्नांना मूर्त रूप दे आणि यशस्वी हो.

तुझ्या लिखाणातून उमटणाऱ्या प्रत्येक शब्दात
ते सामर्थ्य निमार्ण होऊ दे,
जेणेकरून समाजातल्या विविध स्तरावर
त्याची चर्चा आणि पडसाद उमटतील
लिहित रहा...थांबू नकोस!

अशा शब्दांत तू मला लेखनासाठी प्रेरणा दिलीस. एकाच प्रांतात वावरणारी दोन माणसं सहसा एकमेकांचं कौतुक करत नाहीत. पण तू मात्र याला अपवाद ठरलास. तुझ्या अवतीभवती सतत मित्रमैत्रिणींचा घोळका असतो. तरी मला असं वाटतं की कविमनाचा तू मात्र त्या गर्दीतही एकटा असतोस. म्हणून तुला सांगावसं वाटतं की -

संयम आणि धैर्य राख
उफाळून येणाऱ्या ऊर्जेला
संस्काराने सृजनरूप दे
मनाला खूप एकाकी वाटेल तेव्हा
शब्दांच्या राज्यात जा...

तुझ्याशी ग्रंथालयात ओळख झाल्यानंतर त्या दिवसापासून आतापर्यंत मी जे लेखन केलं ते तू मला दिलेल्या प्रेरणेमुळेच केलं. त्याचं सारं श्रेय तुला आहे. मी गमावलेला सकारात्मक आशावाद लेखनाच्या माध्यमातून तुझ्यामुळेच मला पुन्हा नव्याने गवसला. आता तुझ्या आठवणींचं मोरपीस हीच माझ्या लेखनाची प्रेरणा...


पूर्व प्रसिद्धी १६ डिसेंबर २०१४, कार्यक्रम - ऐसी अक्षरे रसिके, आकाशवाणी मुंबई

Saturday, 7 February 2015

विटी दांडूः एका खेळात सामावलेली छोट्यांची मोठी गोष्ट

आजच्या स्क्रिन जनरेशनसाठी त्यातही खास करून बालदोस्तांसाठी एखादी गोष्ट सांगायची आणि ती गोष्ट त्यांना बोअर न करता सांगायची म्हणजे महाकठीण काम. पण ही कामगिरी पार पाडण्यात विटी दांडू या चित्रपटाचा दिग्दर्शक (गणेश कदम) यशस्वी झाला आहे. त्यामुळे 
हा चित्रपट केवळ लहानांसाठी न राहता आजोबा-वडील-मुलगा अशा तीन पिढ्यांना सामावून घेत एका रेशमी माळेत गुंफला गेला आहे. टीव्ही, स्मार्ट फोन, टॅब, आय पॅड अशा सतत कुठल्या ना कुठल्या तरी स्क्रिनसमोर चार भिंतीच्या आत बसून अख्खं जग कवेत घेऊ पाहणाऱ्या या बच्चेकंपनीला काही सांगायचं म्हटलं तरी कुठल्या शब्दात आणि कसा संवाद साधावा हे आजच्या पिढीसमोर मोठ्ठं प्रश्नचिन्ह आहे. या चित्रपटातही आजच्या पिढीतील आजोबांना हा प्रश्न पडतो...आणि या प्रश्नाचा त्यांनी घेतलेला शोध म्हणजेच विटी दांडू हा अप्रतिम चित्रपट. निसर्गाच्या शांत, नितांत नयनरम्य वातावरणात घडणारी धगधगत्या क्रांतिकारी बाण्याची ही गोष्ट पाहताना भान हरपून जाते.

चित्रपट कला ही टीमवर्क आहे. टीममधील प्रत्येकाचे काम चोख झाले की तो चित्रपट सर्वोत्तम ठरतो. याचीच प्रचिती विटीदांडू चित्रपट पाहताना आली. एक उत्कृष्ट दर्जेदार कथा (विकास कदम), त्या कथेला तोडीस तोड असणारी सक्षम पटकथा आणि प्रभावी संवाद (अभिराम भडकमकर) हे या चित्रपटाचे बलस्थान आहे. चित्रपटातील आशयाला साजेशी गाणी आणि प्रवाही संगीत चित्रपटातील कथेला पूरक ठरले आहे. याला संकलकाच्या (जयंत जठार) उत्तम कामगिरीची जोड मिळाली आहे.
दिलीप प्रभावळकर, रविंद्र मंकणी, शुभंकर अत्रे, निशांत भावसार, यतिन कार्येकर यांच्या उत्कृष्ट अभिनयाने नटलेला हा चित्रपट. त्याचबरोबर क्रांतीकारकांच्या भूमिका निभावणारे कलाकारही आपल्या अभिनयकौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकतात. 

एका पिढीची तिच्या पुढील पिढीला वाचवण्याची धडपड त्यासोबत आजोबा-नातू या नात्यातला गोडवा वाढवत नेणाऱ्या एका क्रांतीकारी गोष्टीची पटकथाकाराने सहज-सुरेख गुंफण केली आहे. त्यामुळे चित्रपट कुठेही उपदेशपर तत्त्वज्ञान सांगणारा न होता विटी दांडू या खेळातून भव्य-दिव्य परंतु आपल्याला पचेल-रुचेल असा सुंदर विचार देऊन जातो.
शेवटच्या दृश्यापर्यंत प्रेक्षकांची उत्कंठा वाढवत नेणारी, नसानसांत देशप्रेम भिनलेल्या क्रांतिकारकांची ही गोष्ट आणि पटकथेतील वेगवान दृश्यमालिकेमुळे चित्रपट अत्यंत प्रभावीपणे साकार झाला आहे. या चित्रपटातील दाजी (गोविंदाचे आजोबा) या पात्राचा नावेतील सीन अतिशय अप्रतिम चित्रित झाला आहे. पात्राच्या मनातील खळबळ, तिचे अधांतरी हिंदकळणारे विचार याला देखणं दृश्यरुप दिग्दर्शकाने दिलं आहे. आजच्या पिढीचे आजोबा-नातू आणि ब्रिटीशकालातील आजोबा-नातू यांच्या नात्यातील दुवा सांधताना कुठेही विस्कळितपणा जाणवत नाही. स्वतःच स्वतःचं स्वातंत्र्य गमावून बसणारी आजची पिढी आणि आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणारी त्या काळातील पिढी यांना गोष्टीत एकत्र आणताना चित्रपटात करण्यात आलेली विटी दांडू या खेळाची योजना अतिशय स्तुत्य आहे. त्यामुळे चित्रपट मनोरंजक आणि सरस ठरतो.

कोकणातील समृद्ध निसर्ग या चित्रपटाच्या देखणेपणात अधिक भर घालतो. निसर्गाच्या सान्निध्यात घडणारी, सळसळत्या रक्ताच्या क्रांतीकारी बाण्याची ही गोष्ट मनाला मोहवून टाकते.  हा चित्रपट पाहताना आपणही त्या विटी दांडूच्या खेळात नकळत सामील होतो आणि त्या खेळातील आनंद लुटता-लुटता त्या गोष्टीत पूर्ण रमून जातो. खरंच आपल्या सभोवताली असणारा निसर्ग आणि आपल्या भारत देशाला लाभलेला ऐतिहासिक वारसा अनमोल आहे. तो प्रत्येक पिढीने जतन करायला हवा आणि आपल्या पुढील पिढीपर्यंत तो समर्थपणे पोहोचवायला हवा. आणि तो हसत-खेळत पोहोचवायला हवा. विटी दांडू हा चित्रपट आपल्याला स्वातंत्र्य हवं या तीन शब्दांभोवती फिरणारा आहे. याच तीन शब्दात या चित्रपटाच्या कथेतील गंमत दडलेली आहे. हेच तीन शब्द चित्रपटाच्या कथेला उच्च शिखरावर नेऊन ठेवतात.


आपल्याला स्वातंत्र्य हवं...आपल्याला मनसोक्त खेळण्याचं स्वातंत्र्य हवं. आपल्याला विचारांचं स्वातंत्र्य हवं. निसर्गाशी मैत्री करण्याचं स्वातंत्र्य हवं. आपल्याला गुलामगिरीतून मुक्त होण्याचं स्वातंत्र्य हवं, स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचं स्वातंत्र्य हवं. आपल्या देशाचा वैभवशाली इतिहास जाणून घेण्याचं स्वातंत्र्य हवं. मनमोकळा संवाद साधण्याचं स्वातंत्र्य हवं.. यातील उल्लेख केलेले हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तू लहान - मी मोठा हा भेदभाव आपण विसरू शकलो तरच आयुष्यातील प्रत्येक क्षण हा खेळासारखा असेल. कधी हार, कधी जित हा निसर्ग नियम तर चालूच राहील. पण खेळण्यातील गोडी, धांगडधिंगा, मौज, गंमत कधीही हरवू द्यायची नाही. मग तो खेळ विटी दांडूचा असेल किंवा अन्य कोणताही... खेळातील प्रत्येक क्षण आनंदाने अनुभवायचा हे तर आपल्याच हाती आहे. चला, तर मग! हा चित्रपटरुपी विटी दांडूचा खेळ पाहत छोट्यांच्या मोठ्या गोष्टीत मनापासून सामील होऊ या आणि पाहू या हा खेळ कसा रंगतोय ते...विटी दांडू हा प्रत्येकाने आर्वजून पहावा असा चित्रपट आहे.  

आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...