ओळखीच्या माणसांचा
भोवती माझ्या पसारा
पण मला वाटतो हा
देखाव्याचा खेळ सारा
एकटेपण सोसून झाले
भावनेला शब्द गवसले
पण बोलताना मनासारखे
आसवांचे मेघ झाले
माझे रितेपण शोधते
सोबतीस एक साथी
स्वप्नांच्या गावातही
तो अजून अनोळखी
अनोळखी या वाटेवरती
चालते पुन्हा पुन्हा
प्रश्न सारे कोंडले
उत्तराला आसुसले…
एका 'ती'ची ही आर्त साद. ती आयुष्याला खूप कंटाळली
होती. ऑफिसमध्ये सारं काही ठिक होतं. पण तिच्या खाजगी आयुष्यात दिवसेंदिवस
प्रचंड उलथापालथ होत होती. ऑफिसमधून घरी आल्यानंतरचा प्रत्येक क्षण तिची परीक्षाच
घेत असे. तिचं लग्नाचं वय झालं होतं. तरी तिचं लग्न जमत नव्हतं. निर्बुद्ध समाज
तिला नाही नाही ती लेबलं लावून मोकळा झाला होता. "वय वर्ष २८ आहे माझं. मी काही
म्हातारी नाही झाले. काय कमी आहे माझ्यात? " ती स्वतःलाच प्रश्न विचारून
समजावण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती.
अलिकडे तिला कुठेच बाहेर जाऊ नये असं वाटे. सगळ्यांच्या नजरा आपल्यावरच आहेत,
असं तिला वाटे. पण इथे मुंबईत रहायला आल्यापासून तिने
एक गोष्ट मात्र कधीच चुकवली नाही ती म्हणजे महालक्ष्मीच्या मंदिरात जाणं. ती काही
धार्मिक व्रतवैकल्यात गुरफटलेली मुलगी नव्हती. काळाच्या बरोबर चालणारी होती. पण
तिला देवीच्या मंदिरांमध्ये जायला आवडे. त्यातूनही महालक्ष्मीच्या मंदिरात जायला
विशेष आवडे. मंदिर तिच्या घरापासून जवळच होतं. ती सहज तिथे चालत जाऊ शकत असे.
जवळपास २५ मिनिटं लागायची. तिला जेव्हा केव्हा मनापासून मंदिरात जावंसं वाटे
तेव्हा ती आवर्जून जाई. पण मंदिरात जाण्याचे दोन खास दिवस तिचे ठरलेले होते.
तिच्या वाढदिवसाच्या दिवशी आणि ३१ डिसेंबरला ती न चुकता मंदिरात जायची. तिला
मंदिरात गेल्यावर खूप प्रसन्न वाटायचं. आपल्या मनातल्या साऱ्या इच्छा, आकांक्षा ती
घडाघडा देवीसमोर बोलून मोकळी व्हायची. आपल्या अश्रूंना न आवरता डोळ्यातून वाहू
द्यायची. सकाळच्या वेळी पायी चालत मंदिरात जाणं, तिला खूप आवडायचं. "सकाळचीच वेळ मंदिरात
येण्यासाठी उत्तम! " असं तिने ठरवूनच टाकलं होतं.
एके दिवशी घरी लग्नाच्या बाबतीत घडलेल्या प्रकाराने ती खूप दुखावली गेली होती.
तिने अख्खी रात्र रडून घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती महालक्ष्मीच्या मंदिरात
गेली. "इतकी मानहानी
सोसत आपण का बरं जगायचं?" याचा जाब विचारायला ती देवीसमोर हात जोडून उभी राहिली. "आता जोवर माझं लग्न होत
नाही. तोपर्यंत तुझ्या मंदिरात पाऊल टाकणार नाही. मी एकटी नसेन, माझा जोडीदारही
माझ्यासोबत असेल. तेव्हाच तुझ्या मंदिराची पायरी चढेन. आता माझ्या लग्नाची काळजी
मी नाही, तू करायचीस." देवीशी भांडून, तिला आव्हान देतच ती मंदिरातून बाहेर पडली.
दोन वर्षं उलटून गेली. तिचं लग्न झालं नाही. ती खूप चिडचिडी झाली होती. पण स्वतःलाच
दोष देणं तिने बंद केलं होतं. तिला आता काहीही झालं तरी ताठ मानेनं जगाचयं होतं.
समाजाचं बोलणं फारसं मनाला लावून घ्यायचं नाही, असं तिने ठरवलं होतं. ती कामात स्वतःला
गुंतून घेऊ लागली. मग एके दिवशी खूप मनापासून मंदिरात जावंसं वाटलं. पण तिला
आठवलं, आपण त्या दिवशी मंदिरात काय बोलून आलो होतो ते. "पण जाऊ दे ना काय हरकत
आहे. मी मंदिरात एकटी गेले तर. मी देवीला नवस बोलले नव्हते. माझ्या मनातली एक वेडी
भावना देवीसमोर बोलून बिनधास्त झाले होते. तो फक्त एक संवाद होता, माझ्या मनातील
भावनांवर त्या दिवशी नियंत्रण ठेवू शकले नव्हते. एवढंच ते... त्यात काय एवढं
कठोरपणे पाळायचं. मी आज जाणारच एकटी देवीच्या मंदिरात, बघू काय होतं ते.
संध्याकाळी सोसायटीत थर्टी फर्स्टच्या पार्टीची तयारी सुरू होईल. मी नेहमी जाते
तशी सकाळीच मंदिरात जाऊन येते." असं स्वतःशीच बोलून ती निघाली. मनात खूप विचार येत होते. खरंच अशी काही जादू
घडली असती दोन वर्षात आणि मी माझ्या जोडीदारासोबतच मंदिरात आले असते तर... तिला या
विचाराचं हसू आलं.
ये सब बातें फिल्मों में ठिक हैं, रियल लाईफ में ऐसा कुछ नही होता… तिने आपल्या मनाला
समजावलं. मंदिराचा कळस दिसू लागला. पुढच्या ५ मिनिटात ती मंदिराच्या प्रवेश
दारापाशी पोहोचली. तिच्या मनात खळबळ माजली होती. चेहरा घामाघुम झाला होता. पायऱ्या
चढताना तिला जाणवत होतं की ती एकटी नाहीय. कुणीतरी तिच्या सोबत चालतंय. पण तिने
मागे वळून पाहिलं नाही. तिने ओटीचं ताट घेतलं.. झुळझुळती पिवळी ओढणी डोक्यावरून
घेतली. पुजाऱ्याकडे ओटीचं ताट दिलं. तिने डोळे मिटले. "देवी मला माफ कर. माझी
चूक झाली. मी त्या दिवशी काहीतरी वेड्यासारखं बरळून गेले. वाटलं होतं लवकरच माझी
ती इच्छा पूर्ण होईल. आणि धावत तुझ्या दर्शनाला माझ्या जोडीदारासोबत येईन. पण असं
झालं नाही. शेवटी ती मंदिरात न येण्याची स्वतःहून मलाच घातलेली अट मी मोडून काढली." पुढे ती बोलणार होती
तितक्यात तिचा तोल गेला. ती खाली कोसळणार तोच तिला मागून कुणीतरी सावरलं. ती
त्याच्या आधाराने उभी राहिली. पुजाऱ्याने ताट दिलं, घेण्यासाठी त्या दोघांनीही हात
पुढे केला. पुजाऱ्याने दोघांना आशिर्वाद दिला. पुजाऱ्याच्या शब्दांनी ती भानावर
आली. तिने आपल्या बाजूला वळून पाहिलं. एक तरुण मुलगा तिच्याकडेच पाहत उभा होता.
त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी गवसल्याचं समाधान झळकत होतं. ती चालू लागली. तोही
तिच्या मागोमाग चालू लागला. तिला जाणवलं कुणीतरी आपल्यामागे येत आहे. ती मागे
वळली. तिने त्या मुलाचे आभार मानले आणि पुन्हा चालू लागली. तेवढ्यात तो म्हणाला,
मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आपण थोडं इथं बसूयात का? तिलाही थकवा जाणवत होता. एवढ्याश्या चालण्याने ती कधी थकत नाही. पण कितीही
संकटं आली तरी मी खंबीर आहे, असा मुखवटा जो गेली दोन वर्षं तिने चढवला होता. आज
देवीसमोर हात जोडल्यावर तो मुखवटा गळून पडला होता. त्यामुळेच तिचा तोल गेला होता.
ती दोघंही बसली. तो बोलू लागला. "तुम्ही मला ओळखत नाही. पण मी तुम्हाला ओळखतो. दोन वर्षांपूर्वी सकाळच्या वेळी
मी मंदिरात आलो होतो. त्या दिवशी मी पहिल्यांदा तुम्हाला मंदिरात पाहिलं. आणि मी तुम्हाला
पाहताक्षणी तुमच्या प्रेमात पडलो. मला त्याच दिवशी तुमच्याशी बोलायचं होतं. तुम्ही
मंदिरातून जाऊ लागलात तेव्हा मीही तुमच्या मागोमाग निघालो. पण आपल्या दोघांमध्ये
खूप अंतर होतं. मी तुम्हाला हाकही मारू शकत नव्हतो. तितक्यात सिग्नल संपलं. नी गाड्या
सुरू झाल्या. तुम्ही सिग्नलच्या पलिकडे निघून गेलात. पण तुमच्यामागे धावताना माझं
सिग्नलकडे लक्षच नव्हतं. एका गाडीने मला धडक दिली. माझ्या दोन्ही पायांना खूप
लागलं. गेली दोन वर्षं मी व्हिलचेअरवर होतो. पण गेली दोन वर्षं मी कशी काढली माझं
मलाच ठाऊक. तुमचं नाव माहीत नाही. तुम्ही कुठं राहता हे माहीत नाही. मग कसा शोध
घेणार होतो मी तुमचा. तुमचा चेहरा नजरेसमोरून हटत नव्हता. गेल्याच आठवड्यापासून
कसल्याही आधाराशिवाय चालण्याचा प्रयत्न करतोय. आज सकाळी उठलो तेव्हा पायांमध्ये
ताकद जाणवली आणि दोन पायांवर धड उभा राहू शकलो. उभा राहिलो तेव्हा पुन्हा नजरेसमोर
तुमचा चेहरा आला नी मंदिरात यायचं ठरवलं. तुम्हाला भेटल्यावर आता कळतंय की माझ्या
मनाने का ध्यास घेतला होता मंदिरात येण्याचा. माझ्या प्रेमाचा स्वीकार करा. मी
तुमच्याशिवाय राहू शकत नाही.
आतापर्यंत ती स्वप्नातच आपल्याला जोडीदाराला विनवणी करत होती. "किती
छळतं हे एकाकीपण
एकदाच… बस एकदाच तरी तू, खराखुरा ये ना…" आणि आज तो तिच्या आयुष्यात खराखुरा आला
होता.
दोघांच्याही डोळ्यात पाणी होतं. नजरेतूनच दोघांनी परस्परांचा स्वीकार केला.
देवीसमोर पुन्हा एकदा दोघांनी मनोभावे हात जोडले. ती दोन मने आज एक होऊन तृप्त झाली
होती. मंदिरातून घरी जाताना ती आता एकटी नव्हती. तिच्यासोबत तिच्या जिवाभावाचा
जोडीदार होता.
No comments:
Post a Comment