Wednesday, 9 December 2015

एका ‘मनस्विनी’ चा Selfie माझ्या नजरेतून

अत्यंत सोशिक, कष्टाळू, मृदू, मनमिळाऊ, चेहेऱ्यावर नेहमी स्मितहास्य, सर्वांना सांभाळून घेणारी, एखाद्या वेळी मनाला न पटलेली गोष्ट होत असल्यास दुर्गेचं रुप धारण करणारी, शिस्तप्रिय, प्रेमळ, देवावर श्रध्दा असलेली, परंपरा आणि संस्कृतीला जपणारी...आपल्या कुटुंबासाठी झटणारी अशी ही मनस्विनी...

एका अवखळ मुलीचं रुपातंर परिपूर्ण वात्सल्याने ओतप्रोत अशा माऊलीत झालं. त्यानंतर तिचा आता सद्सद्विवेकबुध्दीशी सुरू असलेला झगडा...सारंच विलक्षण आणि थक्क करणारं आहे. मनस्विनीच्या या व्यक्तिमत्त्वाची परिपूर्ती जाणून घेण्यासाठी तिच्या बालपणापासूनच सुरुवात करायला हवी... नाही का?
व्यक्तिचं घडणं, वाढणं आणि काळाच्या प्रत्येक टप्प्यावर समृध्द होत जाणं... याची बिजं बालपणात दडलेली असतात.

गिता मनोहर धुरी मनस्विनीचं माहेरचं पूर्ण नाव. कृष्णाने अजूर्नाला गिता सांगितली आणि कर्माचं महत्त्व पटवून दिलं. अगदी तसंच गिताच्या लहानपणापासून तिच्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सतत काम करत राहण्याची शिकवण तिला तिच्या आईकडून मिळाली. तिची आईसुध्दा कर्म करत रहा या विचारांची. एका जागी बसणं, त्या माऊलीच्या गावीही नव्हतं.
आपल्या आईकडून गिताला संस्काराचं बाळकडू मिळालं. बाकी कुणीही आदर्श नव्हते तिच्यासमोर...
आई-बाबा आणि ती मिळून चार भावंडं, असं तिचं मातीच्या घरात राहणारं गरीब कुटुंब. कोकणातील निसर्गसमृध्दीने नटलेल्या गावात कौलं आणि गवताच्या पेंढ्यांनी शाकारलेल्या टुमदार मातीच्या घरात राहणारी ही मुलगी... घराच्या चार भिंती, समोरचं मोठं अंगण आणि घराला लागूनच नजरेत मावणारी शेती या ठिकाणी हुंदडत, आला दिवस हसून साजरा करत गिताचं बालपण सरलं. फार लहान वयातच ती आपल्या कुटुंबासाठी कर्ती स्त्री झाली. घरच्या गरिबीमुळे नातेवाईक फारसे फिरकायचे नाहीत.
सकाळी लवकर उठायचं, घरचं आवरायचं, शाळेत जायचं... शाळेतून घरी आल्यावर शेतातल्या कामांना जायचं, रात्रीचा एक तास तिला अभ्यासाला मिळायचा... आणि दिवसभर कष्ट केलेल्या गिताला शांत झोप यायची.

एके दिवशी गावात धरण बांधलं जाणार असल्याची बातमी पसरली. तेव्हा गिता ७ वर्षांची होती. गावात धरण बांधण्याची सरकारी योजना मंजूर झाली आणि लागलीच या प्रकल्पाचं काम सुरू झालं. गावातल्या खूप लोकांना रोजगार मिळाला. गिताही आपली शाळा सांभाळून धरण बांधण्याच्या कामाला जाऊ लागली. तिला अभ्यासाला वेळ मिळत नव्हता. पण तिची बुध्दी अतिशय तल्लख होती. वर्गात शिकवलेलं तिच्या नीट लक्षात रहात असे. म्हणून काम सांभाळून शाळेला जाण्याची तिची धडपड सत्कारणी लागत होती.
बाई मी धरण,
धरण बांधिते गं...
माझं मरण,
मरण कांडते गं...

बहिणाबाईंना स्वतःच्या अनुभवाचा काव्यातून झालेला हा साक्षात्कार गिता प्रत्यक्षात जगत होती. तिच्या आजूबाजूच्या वास्तवाने तिचं बालपण होरपळत होतं. पण तिने मानाच्या एका कोपऱ्यात आपल्याला बालपणाला प्राजक्त फुलासारखं जपलं होतं.
म्हणून तर कामाचा कितीही डोंगर उपसला तरी गिताचा चेहरा हसतमुख असायचा...
मिल बंद पडल्यानंतर पुन्हा आपल्या गावी आलेला दारूडा बाप, नरिमन पॉईंट सारख्या ठिकाणी चांगल्या नोकरीवर असलेल्या तिच्या मोठया भावालाही त्याची नोकरी गमवावी लागली. आणि त्यानेही बाटली जवळ केली.
घराची पूर्ण जबाबदारी गिताच्या आईने आपल्या डोक्यावर घेतली आणि गिताला त्यासाठी तिच्या आईचा भक्कम आधार व्हावं लागलं. कारण तिची आई नवऱ्याच्या आणि मुलाच्या प्रतापामुळे पिचलेलीच होती. फक्त तिच्याकडे असलेल्या जिद्दीच्या बळावर तिने संसार सावरायचा विडा उचलला होता. गिता आपल्या माऊलीचं दुःखं जाणून होती. म्हणून आईच्या नेहमी सोबती असायची. आईचं सारं काही ऐकायची.

शाळेचं नववीचं वर्ष होतं. तिला खूप मन लावून शिकायची इच्छा होती. पण कामाचा रगाडा, मानसिक कोंडमारा यामुळे आपल्या पुढील शिक्षणाचं कसं होणार असं भलंमोठं प्रश्नचिन्ह गितासमोर होतं. तरीही तिने जिद्दीने नववीची परीक्षा दिली. निकालाच्या दिवशी तिच्या जिवाची घालमेल होत होती. परीक्षेत चांगले गुण नाही मिळाले, तर हेच शाळेचं शेवटचं वर्ष ठरेल... पण निकाल हाती येताच गिता आनंदून गेली. तिला खूप चांगले गुण मिळाले होते. आणि ती वर्गात ५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. तिला इतका आनंद झाला होता की साऱ्या गावाला ओरडून सांगावं... ती खुशीत धावतच घरी गेली. आपला आनंद घरातल्यांसोबत व्दिगुणित करण्यासाठी... पण इकडे घरात तिच्यासाठी एक मोठा अनपेक्षित धक्का तिची वाट पाहत होता. एका चुलत काकीने तिच्यासाठी दूरच्या गावचं स्थळ आणलं होतं. गिताचा सारा उत्साह क्षणार्धात मावळला.

बापाला मुलीच्या भविष्याशी काहीही देणं घेणं नव्हतं. पण आई काय म्हणते, याकडे गिताचे डोळे लागले होते... तिला आईकडून आशा होती, पण ती माऊली तरी काय करणार होती. तिच्या आईनेही गिताच्या लग्नाला होकार कळवून टाकला.
तिच्या आईने तिचं लग्न ठरवताना हा विचार केला की जर तिचं लग्न झालं तर ती तिच्या घरी सुखात राहील. इथे घरी राहून तरी काय करणार... तिच्या पुढील शिक्षणासाठी सुध्दा तिची आई काही करू शकत नव्हती. गिताला सगळ्या कामांचा उरक होता. घरातली सगळी कामं करताना गिताचा हात भार लागत होता... हे तिच्या आईला ठाऊक होतं.

गिताचं लग्न झालं...
हसण्या खिदळण्याच्या, हौसे-मौजेच्या आनंदाने बहरण्याच्या वयात पुन्हा ती चार भिंतीच्या आत कोंडली गेली. फक्त यावेळेस ठिकाण बदललं होतं. पण यातना त्याच होत्या... गिताने आपल्या भळभळत्या जखमेवर स्वतःहुन फुंकर घातली. आणि नव्या अग्निदिव्याला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाली...
कणखर बनली. धाडसी बनली.
लग्न लागलं तेव्हा नवऱ्याला नोकरी नव्हती. त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं होतं. त्याने त्यानंतर खूप ठिकाणी प्रयत्न करूनही त्याला कुठे नोकरी मिळत नव्हती. म्हणून सासूने असा विचार केला की आपल्या मोठया मुलाला आणि सुनेला गावीच ठेवलं तर गावचं घर बंद राहणार नाही. घराची सगळी जबाबदारी गिता सांभाळेल. कारण ती गावातच लहानाची मोठी झालेली आहे. गिताला एव्हाना सारं काही समजलं होतं, आपल्याला कुठल्या खडतर मार्गावरून जावं लागणार याची तिला कल्पना आली. तिने एके दिवशी विचारपूर्वक नवऱ्याला सांगितलं की, मी इथे गावी राहून शेती करेन. तुम्ही मुंबईला जाऊन नोकरी करा. तुमचा जन्म मुंबईतला, तुम्हाला शेतीच्या कामांची गती नाही, त्यापेक्षा तुम्ही मुंबईला जाऊन प्रयत्न करून नोकरी मिळवली तर आपल्या मुलांचं भविष्य सुकर होईल. नवऱ्याने गिताचं ऐकलं.

नवरा मुंबईला गेला, त्याला नोकरी मिळाली पण हा आनंद गिता फार काळ अनुभवू शकली नाही. कारण गिता गावी रहायची आणि नवरा मुंबईला. गिताने गावात आपल्या कष्टाने नवं विश्व उभं केलं, पण शहरात गेलेवा नवरा मात्र दारू पिऊ लागला... ज्या गिताने लहानपणी आपल्या वडलांना आणि भावाला दारू पिताना पाहिलं. नंतर त्या दोघांवर ओढवलेला मृत्यू पाहिला होता. त्यामुळे नवऱ्याच्या काळजीने ती दिवसेंदिवस चिंतेत राहू लागली. नवरा अधूनमधून गावी येई...

आपल्या दोन मुलांना घेऊन गिता एकटी गावच्या घरात राहत होती. शेतीची सारी कामे करत होती. प्रत्येक गोष्टीत कष्ट उपसण्याची तिची तयारी होती. आपलं प्राक्तन गितानं मोठ्या मनानं स्वीकारलं. कारण आपल्या वाट्याला आलेल्या आयुष्यात तिच बदल घडवून आणू शकेल, असा विश्वास गिताला होता. याच विश्वासानं घरच नाही तर अख्खं गावं आपलंसं केलं. तिने स्वतःचा संसार सावरला.
सोबत कित्येकींना जगण्याचं बळ दिलं. गावगुंडाशी खंबीरपणे लढली. तिच्या विवेकबुद्धीने ती त्यांनाही पुरून उरली. काही क्षण कोमेजली, अडखळली
काही क्षण निमूट बसली, शांत राहिलीकाही क्षण तिने असंबद्ध टाहो फोडला
तरीही पुन्हा स्वतःला आणि संसाराला सावरलं. तिच्या चेहेऱ्यावरील कधीही न मावळणारं हास्य, हीच तिच्या विरोधकांची हार... अशी ही कणखर स्त्री. मला विविध रूपात भेटणारी... मनस्विनी ही माझ्या प्रेरणेचा अखंड स्त्रोत आहे.
सध्या लोक तिला मानसिक रुग्ण म्हणतात, पण मला वाटतं ती मानसिक रुग्ण नाहीय. कारण विवेकाने वागणाऱ्या प्रत्येकाला हल्ली वेडा म्हणण्याची फॅशन झालीय...
क्रमशः


(मनस्विनीच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध टप्पे विस्तृतपणे पुढील लेखात येतील लवकरच)



No comments:

Post a Comment

आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...