Saturday, 17 September 2016

घावन्यांची गोष्ट

दोन इले पावने, चार केले घावने असं गुणगुणत मालवणी गृहिणी पटकन घावने करायला चुलीजवळ बसते. पण घावन्यांच्या या पाककृतीची गोष्ट खूप मजेशीर आहे.
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका आटपाट नगरात एका राजाचं राज्य होतं. राजाला कला, संस्कृतीची खूप आवड होती. त्याचबरोबर हा राजा एक उत्तम खवय्या होता. वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणं, त्याला खूप आवडायचं. राजाच्या राजमहालात रोजचा स्वयंपाक आणि त्याचबरोबर रोज नानाविध पक्वान्नं बनवण्यासाठी १०-१२ आचारी (बल्लवाचार्य) होते. एके दिवशी राजाच्या मनात आलं आणि त्याने सर्व बल्लवाचार्यांना बोलावलं. त्यांना सांगितलं की तुम्ही केलेला स्वयंपाक मी रोज चवीनं खातो. पण आज मला एक वेगळाच खाद्यपदार्थ हवा आहे, जो पटकन बनणारा असेल, साधा, सोपा असेल, पटकन पोट भरणारा असेल, अगदी कमी सामुग्री आणि आपल्या राज्यात उपलब्ध असलेल्या धान्यातूनच बनेल, तो खाद्यपदार्थ दिसायलाही नावीन्यपूर्ण असेल...
राजाच्या बोलण्याने सगळे पाककुशल आचारी विचारात पडले, त्यांना काही असा पदार्थ सापडेना... त्यांनी राजासमोर हार मानली. मग राजाने राज्यात प्रधानाकरवी दवंडी पिटवली. जो कोणी असा नावीण्यपूर्ण पदार्थ राजासमोर सादर करेल. त्याला योग्य तो इनाम दिला जाईल...
राज्यातील सगळी मंडळी कामाला लागली. सगळ्यांनी आपापल्यापरीने खाद्यपदार्थ बनवले आणि दिवसभरात एकेक करून राजासमोर सादर केले, पण राजाला काही पसंत पडेनात. अखेर संध्याकाळ होता होता एक आजीबाई हातात एक ताट घेऊन आल्या. राजासमोर त्या ताटावरचं झाकणं उघडलं आणि त्यांचा पदार्थ दाखवला...तो पदार्थ होता घावने...
राजा ते ताटभर घावने पाहून चकीत झाला. त्याने पदार्थाची चव पाहिली. त्याला ती आवडली. घावन्याचा गोल आकार आणि खास करून घावन्यावर असलेले सारख्या आकाराचे ठिपके लक्ष वेधून घेत होते. राजा म्हणाला, मला हा खाद्यपदार्थ आवडला. पण आजीबाई मला एक सांगा, या घावन्यावर तुम्ही ठिपके कसे पाडलेत... यावर आजीबाई हसून म्हणाल्या. घावन्यामध्ये पीठ, मीठ आणि पाणी मिसळलेलं असतं. हे मिश्रण बीडं नावाच्या जाड बुडाच्या तव्यावर पसरलं जातं. हे मिश्रण पसरण्याआधी बिडाच्या तव्यावर तेल सोडून त्यानंतर केळीच्या पानाच्या देठाने किंवा कांद्याच्या चकतीने ते तेल त्या बिडाच्या तव्यावर नीट पसरवायचं. मग त्यावर हे मिश्रण घालायचं की आपोआप त्या पिठाला अशी ठिपक्याची जाळी पडते. ती दिसतानाही छान दिसते...
आजीबाईंचं हे स्पष्टीकरण ऐकून राजा थक्क झाला. त्याने आजीबाईंना हजार सुवर्णमुद्रा दिल्या. आणि त्यांचा सन्मान केला.
अशी एक घावन्यांची जन्मकथा मला आईने आणि आजीने सांगितली होती. तर मंडळी या गोष्टीवरून लक्षात आलंच असेल हे घावने म्हणजे किती सुंदर, सोपी पाककृती आहे ते! हे घावने करताना ते सुरय भाताचे केले जातात.
मालवणी मुलखात खास करून वालय आणि बेळा या प्रकारचा पारंपरिक भात पिकतो. भात पिकाच्या इतर सुधारित आणि संकरित जातीही आहेत. त्याचे उकडे तांदूळ आणि सुरय तांदूळ केले जातात. उकडे तांदूळ म्हणजे भात (भाताचे गोटे) उकडून ते सुकवलं जातं त्यानंतर ते गिरणीतून सडून आणलं जातं, त्याला उकडे तांदूळ म्हणतात.
तर सुरय तांदूळ म्हणजे भात (भाताचे गोटे) न उकडता तसेच गिरणीतून सडून आणले जाते.
याच सुरय तांदळाच्या पिठाचे घावने केले जातात. आपण शहरी भागात राहत असू तर आपण रोजच्या जेवणातील भात करण्यासाठी जे तांदूळ वापरतो, ते वापरले तरी चालेल.

हे सुरय तांदूळ साफ करून करून स्वच्छ धुवून रोवळीत निथळत ठेवले जातात. त्यानंतर रोवळीतून काढून ते एका स्वच्छ कपड्यावर पसरून घातले जातात. हे पसरवलेले तांदूळ नीट सुकले की त्याची जात्यावर पिठी दळली जाते. त्यानंतर हे पिठ चाळणीने चाळून मग ते पिठ घावने करायला घेतलं जातं. मालवणी मुलखात तवशाचे घावने, सातकप्याचे घावने आणि साधे घावने असे तीन प्रकारे घावने केले जातात. अधिक माहितीसाठी आणि मालवणी पाककृतींसाठी खालील परबांचो पावनेर या फेसबुक पेज ची लिंक बघा.

https://www.facebook.com/malvanicuisine/


सुरय तांदळाच्या पिठाचे घावने, फोटो-हर्षदा परब

फणसाच्या भाजीविषयीची एक आठवण

भूतकाळात घडून गेलेल्या चांगल्या आणि आनंद देणाऱ्या गोष्टी नेहमी आठवाव्यात. त्यामुळे पुन्हा एकदा तो क्षण आपल्यासमोर जिवंत होतो आणि आपल्याला पुनःप्रत्ययाचा आनंद देतो. बालपणात घडलेले असे कित्येक घटना-प्रसंग दिवसभरातील कामाच्या व्यापात आपल्याला आठवले की आपल्या चेहऱ्यावर हसू फुटतं. भूतकाळातील अशाच सुंदर आठवणींपैकी ही एक आठवण...
गणोबा गणोबा, कुठे गेला होतास?
कोकणात
कोकणातून काय आणलंस?
फणस...
नीटसं, काही आठवत नाही, पण अशा काहीशा शब्दातला संवाद बालपणी कानावर पडला होता. सांगायचा मुद्दा हा, कोकण म्हटलं की फणस या फळाची रेलचेल. यासाठी वेगळे पुरावे द्यायला लागत नाहीत.
आमच्या गावच्या घरी बरीच वर्ष आमचं हक्काचं असं फणसाचं झाड नव्हतं. त्यामुळे खूप वाईट वाटायचं. मग आम्ही ६-७ वर्षांचे असताना आईने फणसाची ७-८ झाडं लावली. त्यातली ६ झाडं आता खूप मोठी झालीत. आणि मोठाले फणसही झाडांवर दिसू लागले. ज्या दिवशी पहिला फणस आम्ही भावंडांनी झाडावर पाहिला, तेव्हा प्रचंड खूश झालो होतो...
पण त्याआधी आमच्याकडे फणसाचं झाड नव्हतं तेव्हा आम्ही माळेच्या फणसाचे फणस भाजीसाठी किंवा पुसभाजी करण्यासाठी घेऊन यायचो. आणि पिकलेले कापे-बरके फणस आम्हाला शेजाराच्या घरांतील काका-काकू आणून द्यायचे.
पण त्याआधी माळेचो फणस म्हणजे काय? ते सांगते.
आमच्या परबवाडीत गोसावी आडनावाची काही घरं आहेत. त्यांच्यामध्ये एक अशी रीत आहे की त्यांच्या समाजातील कोणी व्यक्ती मृत झाल्यास आपल्या परसातलं एक झाड दान करायचं. म्हणजे त्या झाडाला फुलांची माळ घालायची. या रीतीप्रमाणे आमच्या वाडीत त्यांनी फणसाचं झाड दान केलं होतं. त्या झाडाला माळ घातली होती. असं आमच्या शेजारची आजी सांगायची. ती खूप वयस्कर होती, पण आम्ही तिला वहिनीम्हणून हाक मारायचो. ती आम्हाला वाडीतल्या खूप जुन्या झालेल्या, विस्मरणात गेलेल्या गोष्टी सांगायची. त्यातलीच ही एक...
म्हणजे रीतीनुसार माळेच्या फणसाचे फणस कोणीही काढून नेऊ शकत असे. पण आम्हाला आता माळेच्या फणसाची वाट बघावी लागत नाही. आमच्या परबवाडीत भरपूर फणसाची झाडं आहेत.
फणस हे फळ मला खूप गंमतीशीर वाटतं. वरून काटे, आतून गोड...त्याची भाजी करा किंवा असेच पिकल्यावर खा... आणि गऱ्यातील आठीळा भाजून खा, उकडून खा, त्याची भाजी करा किंवा सांबाऱ्यात घाला.
आमच्या गावी फणसाची भाजी करायचो तो दिवस म्हणजे एक मोठा सोहळा असायचा. आम्ही चार-पाच घरांची मुलं, बायका सगळे एकत्र जमायचो. भाजीचे फणस मधुकाका फोडून द्यायचे. मग आम्ही सगळे तो फणस साफ करायला सुरुवात करायचो. मोठ्या बायकांच्या फणस साफ करता करता इकडच्या तिकडच्या गजाली सुरू व्हायच्या, आम्हाला वाटायचं त्यांचं लक्ष नाहीय...आम्ही हळूच साफ करता करता कच्चे गरे अधून-मधून तोंडात टाकायचो. भाजी करेपर्यंत धीर धरवतो तरी कुठे...
मग मोठ्या काकू दम भरायच्या, कच्चे गरे खाऊ नका, पोटात दुखेल...पटपट साफ करा...मगे ताटलेत भाजी आणि पेज घेवन हवी तेवढी भाजी खावा, आमी काय बोलाचव नाय... गजाली मारत असल्या तरी मोठ्या बायकांचं लक्ष असायचंच आमच्यावर!
मग आम्ही शांतपणे फणस साफ करायचो...
फणस साफ करून झाल्यावर कुणाच्या तरी एकाच्याच घरच्या चुलीवर ती भाजी मोठ्या अल्युमिनिअमच्या टोपात शिजवली जाई. भाजी तयार झाल्यावर काकू सगळ्या मुलांना हाका मारायच्या. वाडगाभर उकड्या तांदळाची पेज आणि बशीभर भाजी घेऊन फणसाच्या झाडाखाली असलेल्या आमच्या खळ्यात(अंगणात) बसायचो.
तेव्हा आम्ही एक गंमत करायचो. पेज पिण्यासाठी चमचा न घेता, फणसाच्या झाडाची पानं घेऊन त्याची हाताने खोलपी करायचो. त्या खोलपीने पेज प्यायची. खूप मजा वाटायची. त्या फणसाच्या भाजीची चव अजुनही जिभेवर रेंगाळते...

मार्च-एप्रिल महिन्यामध्ये आमच्या इथल्या शहरातल्या मार्केटमध्ये एक फणसवाला येतो. त्याच्याकडे छोटे कुयरी फणस, पिकलेले फणस आणि भाजीचे कच्चे फणसही असतात. त्याच्याकडून फणस खरेदी करताना त्याच्याशी किंमतीमध्ये घासाघीस करताना गावाकडे खळ्यात भाजीसाठी आणलेले सात-आठ फणस ओळीने ठेवलेले आठवतात. मग कळत नाही का हसायलाच येतं. त्या फणसवाल्याशी इतर भाजीवाल्यांसारखी मैत्री केलीय. त्यामुळे त्याच्याकडे कच्चे फणस असले की तो अगदी हाक मारून बोलावतो. कच्चा फणस खरेदी केल्यावर हातावर दोन पिकलेले कापे गरे ठेवतो. म्हणतो, तुझ्याएवढीच मला एक मुलगी आहे, ती बिहारमधल्या एका गावात राहते. त्याच्या चेहऱ्यावर माझ्याकडे बघून मुलीच्या आठवणीचं एक समाधान आणि माझ्या चेहऱ्यावरही एक समाधान... फणसाची भाजी करताना गावाकडच्या फणसाची भाजी करतानाच्या आठवणींचं...

मालवणी मसाला घालून केलेली फणसाची भाजी

भाजीसाठी साफ केलेला फणस

भाजीसाठी काढलेले फणस
https://www.facebook.com/malvanicuisine/
मालवणी पाककृतींसाठी परबांचो पावनेर या फेसबुक पेज ची वरील लिंक ओपन करा.

 

Thursday, 15 September 2016

नदीकिनाऱ्यालगतची मालवणी खाद्यसंस्कृती

कोकण म्हटलं की समुद्रकिनारा आणि कोकणातील खाद्यसंस्कृती म्हटलं की भात, मासे आणि नारळ या पलिकडे आपण सहसा जात नाही. भूगोलात एक प्रश्न विचारला जायचा, समुद्रकिनाऱ्यावरील लोकांचे अन्न कोणते...तेव्हा गुरुजींनी शाळेत सांगून ठेवलं होतं की या उत्तराला डोळे झाकून भात आणि मासे असंच उत्तर लिहायचं. कोकण म्हणजे समुद्रकिनारा आणि जेवणात भात, मासे त्याचबरोबर अलिकडे सर्वांच्याच तोंडी असलेली रेसिपी म्हणजे कोंबडी वडे. पण समुद्रकिनारा नसला तरी नदी, ओढ्याच्या (व्हाळ) काठावर वसलेली गावांची खाद्यसंस्कृती किती समृध्द आहे. तेही आपण जाणून घेतलं पाहिजे. 

मला आठवतंय आमच्या कॉलेजमध्ये वेंगुर्ल्याच्या मॅडम होत्या, त्या नेहमी आम्हाला चिडवायच्या, तुम्हाला नदीकडच्या लोकांना काय कळणार ताज्या माशांचं महत्त्व आणि त्याच्या पाककृती. त्यावेळी त्यांना उत्तर द्यायला यायचं नाही. कारण त्यांच्या वयाचा मान राखून बोलता यायचं नाही. आम्ही माशांच्या पाककृतींमध्ये लसूण वापरतो. यालाही त्या हसायच्या. आमची नदीकडची खाद्यसंस्कृती किती बेस्ट आहे, हे पटवून देता यायचं नाही. पण आता तसं राहिलेलं नाही. म्हणूनच समुद्राकडच्या मंडळींनी नदीकडच्या लोकांना चिडवू नये. दोन्हीकडच्या खाद्यसंस्कृती समृध्द आहेत. कारण दोघांचीही खाद्यसंस्कृती जगभर मालवणी खाद्यसंस्कृती याच नावाने ओळखली जाते.

समुद्रकिनाऱ्यालगतच्या गावात ताजे मासे सहज मिळतात. त्यामुळे त्यांच्या माशांच्या पाककृतीमध्ये कांद्याचा वापर आढळतो. नदीकडच्या मंडळींकडे समुद्राचे मासे त्यांच्या गावच्या बाजारात येतात. तेव्हा ते त्यांना मिळतात. ते घरी आणेपर्यंत उशीर होतोच. त्यामुळे हे मासे शिजवताना त्यात लसूण वापरला जातो. कांदा नाही वापरत. त्याचबरोबर नदीकडची मंडळी सुके मासे घरी आणून त्याची साठवणूक करतात. जोडीला नदीचे मळये मासे, शिंपल्या, कोके, खेकडे जेवणात असतातच.
नदीकडच्या काही गावांमध्ये जेवणात मटण वारंवार केलं जातं. काही ठिकाणी पाहुणे आले की त्यांना पावनेर (मेजवानी) म्हणून मटणाचं जेवण केलं जातं. 

नदीकडच्यांच्या ताटात महिन्यातून दोनदा ते तिनदा मासे दिसतात. कोंबडी, बकरा, ससा, जिवाद, साळींदर, डुकर, भेकरं यांचं मटण असतं. मटणाचा रस्सा करतील आणि सुकं मटणही करतील. कोकणातील काही गावांमध्ये गावपारध होते. तेव्हा डुकर मारला जातो. त्याचं गाव जेवण असतं. (इथे या प्राण्याचा उल्लेख करून कुठल्याही समाजाला दुखावण्याच्या हेतू नाही.)
म्हणूनच नदीकडच्या लोकांची समुद्राचे आणि नदीचे मासे, सुके मासे, आणि मटण त्याचबरोबर शाकाहारी जेवण अशी मिश्र आणि समृद्ध अशी खाद्यसंस्कृती आहे. सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार या वारी मालवणी मंडळींच्या जेवणात शाकाहारी पदार्थ असतात. खासकरून गोडी डाळ आणि तिकटी डाळ तर असतेच असते. तसेच मालवणी मंडळी आमटी किंवा सार मसाल्याचं केलं असलं तर भाजीत हिरवी मिरची घालतात. भाजी मसाल्याची केली तर आमटी आणि सार हिरव्या मिरचीचं करतील. हे कसं तर ते आपण वेगवेगळ्या पाककृतींच्या माध्यमातून परबांचो पावनेर या पेजवर पुढे बघणारच आहोत.


आमचं गाव मालवण तालुक्यात असलं तरी मालवण, कुडाळ आणि कणककवली या तीन तालुक्यांच्या मध्यभागी आहे. त्यामुळे नदीकडच्या समृध्द खाद्यसंस्कृतीविषयी जिव्हाळा आहे. आमच्या गावात दिवसभरातून एकदा सकाळी एक एसटी मालवणला जाते. तेवढाच काय तो आमचा मालवण तालुक्याशी संबंध. पण तरीही समुद्रकिनाऱ्याचं आकर्षण काही सुटलेलं नाही. ते वाढतच जाणार आहे. असं असलं तरी नदीच्या काठावर बसून नदीकाठाची संस्कृती अनुभवणं यातही वेगळी गंमत आहेत. नदी जशी प्रत्येक काठावर वेगवेगळ्या रुपात येऊन तिथली लोकसंस्कृती समृध्द करते. तशीच नदीकाठावरील लोकांच्या खाद्यसंस्कृतीची रुपं आहेत. तिही प्रत्येकाने अनुभवायलाच हवी. त्यांचा आस्वाद घेतलाच पाहिजे, हा आस्वाद फाईव्ह स्टार हॉटेल, रेस्टॉरेन्ट मधल्या सवयींचा चष्मा उतरवून निखळ, मनसोक्त घ्यायला हवा.

ओवळिये गावची जीवनवाहिनी असलेली तिसगा नदी, फोटो योगेश परब
https://www.facebook.com/malvanicuisine/

परबांचो पावनेर या पेज ची लिंक

आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...