Thursday, 15 September 2016

नदीकिनाऱ्यालगतची मालवणी खाद्यसंस्कृती

कोकण म्हटलं की समुद्रकिनारा आणि कोकणातील खाद्यसंस्कृती म्हटलं की भात, मासे आणि नारळ या पलिकडे आपण सहसा जात नाही. भूगोलात एक प्रश्न विचारला जायचा, समुद्रकिनाऱ्यावरील लोकांचे अन्न कोणते...तेव्हा गुरुजींनी शाळेत सांगून ठेवलं होतं की या उत्तराला डोळे झाकून भात आणि मासे असंच उत्तर लिहायचं. कोकण म्हणजे समुद्रकिनारा आणि जेवणात भात, मासे त्याचबरोबर अलिकडे सर्वांच्याच तोंडी असलेली रेसिपी म्हणजे कोंबडी वडे. पण समुद्रकिनारा नसला तरी नदी, ओढ्याच्या (व्हाळ) काठावर वसलेली गावांची खाद्यसंस्कृती किती समृध्द आहे. तेही आपण जाणून घेतलं पाहिजे. 

मला आठवतंय आमच्या कॉलेजमध्ये वेंगुर्ल्याच्या मॅडम होत्या, त्या नेहमी आम्हाला चिडवायच्या, तुम्हाला नदीकडच्या लोकांना काय कळणार ताज्या माशांचं महत्त्व आणि त्याच्या पाककृती. त्यावेळी त्यांना उत्तर द्यायला यायचं नाही. कारण त्यांच्या वयाचा मान राखून बोलता यायचं नाही. आम्ही माशांच्या पाककृतींमध्ये लसूण वापरतो. यालाही त्या हसायच्या. आमची नदीकडची खाद्यसंस्कृती किती बेस्ट आहे, हे पटवून देता यायचं नाही. पण आता तसं राहिलेलं नाही. म्हणूनच समुद्राकडच्या मंडळींनी नदीकडच्या लोकांना चिडवू नये. दोन्हीकडच्या खाद्यसंस्कृती समृध्द आहेत. कारण दोघांचीही खाद्यसंस्कृती जगभर मालवणी खाद्यसंस्कृती याच नावाने ओळखली जाते.

समुद्रकिनाऱ्यालगतच्या गावात ताजे मासे सहज मिळतात. त्यामुळे त्यांच्या माशांच्या पाककृतीमध्ये कांद्याचा वापर आढळतो. नदीकडच्या मंडळींकडे समुद्राचे मासे त्यांच्या गावच्या बाजारात येतात. तेव्हा ते त्यांना मिळतात. ते घरी आणेपर्यंत उशीर होतोच. त्यामुळे हे मासे शिजवताना त्यात लसूण वापरला जातो. कांदा नाही वापरत. त्याचबरोबर नदीकडची मंडळी सुके मासे घरी आणून त्याची साठवणूक करतात. जोडीला नदीचे मळये मासे, शिंपल्या, कोके, खेकडे जेवणात असतातच.
नदीकडच्या काही गावांमध्ये जेवणात मटण वारंवार केलं जातं. काही ठिकाणी पाहुणे आले की त्यांना पावनेर (मेजवानी) म्हणून मटणाचं जेवण केलं जातं. 

नदीकडच्यांच्या ताटात महिन्यातून दोनदा ते तिनदा मासे दिसतात. कोंबडी, बकरा, ससा, जिवाद, साळींदर, डुकर, भेकरं यांचं मटण असतं. मटणाचा रस्सा करतील आणि सुकं मटणही करतील. कोकणातील काही गावांमध्ये गावपारध होते. तेव्हा डुकर मारला जातो. त्याचं गाव जेवण असतं. (इथे या प्राण्याचा उल्लेख करून कुठल्याही समाजाला दुखावण्याच्या हेतू नाही.)
म्हणूनच नदीकडच्या लोकांची समुद्राचे आणि नदीचे मासे, सुके मासे, आणि मटण त्याचबरोबर शाकाहारी जेवण अशी मिश्र आणि समृद्ध अशी खाद्यसंस्कृती आहे. सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार या वारी मालवणी मंडळींच्या जेवणात शाकाहारी पदार्थ असतात. खासकरून गोडी डाळ आणि तिकटी डाळ तर असतेच असते. तसेच मालवणी मंडळी आमटी किंवा सार मसाल्याचं केलं असलं तर भाजीत हिरवी मिरची घालतात. भाजी मसाल्याची केली तर आमटी आणि सार हिरव्या मिरचीचं करतील. हे कसं तर ते आपण वेगवेगळ्या पाककृतींच्या माध्यमातून परबांचो पावनेर या पेजवर पुढे बघणारच आहोत.


आमचं गाव मालवण तालुक्यात असलं तरी मालवण, कुडाळ आणि कणककवली या तीन तालुक्यांच्या मध्यभागी आहे. त्यामुळे नदीकडच्या समृध्द खाद्यसंस्कृतीविषयी जिव्हाळा आहे. आमच्या गावात दिवसभरातून एकदा सकाळी एक एसटी मालवणला जाते. तेवढाच काय तो आमचा मालवण तालुक्याशी संबंध. पण तरीही समुद्रकिनाऱ्याचं आकर्षण काही सुटलेलं नाही. ते वाढतच जाणार आहे. असं असलं तरी नदीच्या काठावर बसून नदीकाठाची संस्कृती अनुभवणं यातही वेगळी गंमत आहेत. नदी जशी प्रत्येक काठावर वेगवेगळ्या रुपात येऊन तिथली लोकसंस्कृती समृध्द करते. तशीच नदीकाठावरील लोकांच्या खाद्यसंस्कृतीची रुपं आहेत. तिही प्रत्येकाने अनुभवायलाच हवी. त्यांचा आस्वाद घेतलाच पाहिजे, हा आस्वाद फाईव्ह स्टार हॉटेल, रेस्टॉरेन्ट मधल्या सवयींचा चष्मा उतरवून निखळ, मनसोक्त घ्यायला हवा.

ओवळिये गावची जीवनवाहिनी असलेली तिसगा नदी, फोटो योगेश परब
https://www.facebook.com/malvanicuisine/

परबांचो पावनेर या पेज ची लिंक

No comments:

Post a Comment

आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...