आपापल्या व्यापात आपण सगळेच गुंतून गेलेलो असतो. इतके की आपले सण-उत्सवही विसरून जातो. पण अशा काही गोष्टी अवचित सामोऱ्या येतात आणि आत-आत दडपून टाकलेल्या गोष्टी बाहेर येण्यासाठी धडका देतात. दिवाळी असतेच आपल्या मनात. वाव मिळाला की बाहेर येते क्षणात...असेच काही क्षण जागवणारा प्रसंग...
हर्षदच्या हातात एक छान रेशमी गिफ्ट पॅक केलेला बॉक्स होता. तो पुढे पुढे येत होता... अंजली किचनमध्ये बिझी होती. त्याने तिच्या डोळ्यावर हात धरला... हॅप्पी पाडवा... अंजलीने तिच्या स्टाईलमध्ये मागे वळून पाहिलं. स्माईल केलं... ओके, नाईस शॉट! ग्रेट! दिग्दर्शकाने सूचना दिली. नेहा भानावर आली. तिला राहुलची खूप आठवण आली. फोन करू का, असा विचार डोकावून गेला. आज महाएपिसोड शूट होत होता. त्याआधी प्रोमो शूटिंग होतं. सेटवर येण्यासाठी नेहा सकाळीच घरातून निघाली. मढला पोहोचली तेव्हा सेटवर दिवाळी पाडवा सेलिब्रेशनचा सेट रेडी होता. तेव्हाही तिला सेटकडे बघून वाटलं, इथे राहुल असता तर... गेले दोन आठवडे एकमेकांना हाय-बाय करण्याएवढेच घरात होतो. दिवाळी सुरू व्हायला आठवडा राहिलाय. सिरियलचा टीआरपी वाढण्यासाठी खास प्रोमो शूट आणि दिवाळी सेलिब्रेशनचा ट्रॅक आणला होता. रायटरने इतके छान डायलॉग लिहिले होते की, ॲक्टर्स ते बोलत असताना नेहाला राहुल आठवत होता. काही खास सेलिब्रेशन सीन आणि प्रोमो शूटला नेहाला ईपी म्हणून सेटवर जावं लागे. तसंच आठवडाभरातून ठराविक वेळी ती सेटवर चक्कर टाकत असे. चॅनेल ऑफिसला प्रॉडक्शन हाऊसबरोबर वेगवेगळ्या सिरियल टॉपिकवर ब्रेन स्टॉर्मिंग चाललं होतं. त्यामुळे नेहा खूपच बिझी होती. दिवाळीआधीच सेटवर दिवाळी, घरात दिवाळीची लगबग सुरू होती. पण सासूबाईंनी तिला पूर्ण मोकळीक दिली होती. तिच्या कामाचा ताण त्यामुळे हलका झाला होता. पण घरी आपण वेळ देऊ शकत नाही, ही खंत होतीच. ठरलेल्या वेळेत शूट पूर्ण झालं. दिवाळी सेलिब्रेशनचे सगळे सीन शूट झाले. नेहाला उसंत मिळाली. पाडव्याचा दिवस होता. तिने ठरवलं की काहीही झालं तरी आज आपण हा पूर्ण दिवस राहुलसोबत घालावायचा. ती लगेचच सुट्टी टाकावी या हिशेबाने चॅनेल हेडकडे विचारणा करायला गेली तर ते म्हणाले, नाही, आत्ताच एक सीन तातडीने शूट करायचा आहे. तू पटकन सेटवर जा...
नेहा हिरमुसली. पण तिला माहीत होतं. वर्क कम फर्स्ट. राहुलने आणि तिने आपापल्या क्षेत्रातील कामाला नेहमीच प्राधान्य दिलं होतं. पुढच्या आठवड्यात राहुलला कॉन्फरन्ससाठी अमेरिकेला जायचं होतं. त्याआधी एक दिवस दोघांना एकत्र काही वेळ घालवायचा होता. खूप काही बोलायचं होतं. बरेच दिवसापासूनच्या निखळ गप्पा-गोष्टी करायच्या राहून गेल्या होत्या. नेहा सेटवर जाण्यासाठी निघाली... पण तिचं मन मात्र त्यात नव्हतं. ती सेटवर पोहोचली. सेट सजलेला दिसला... पण सेटवर कुणीच दिसत नव्हतं... गेले कुठे सगळे... ती सेटच्या मध्यभागी गेली आणि तिला मागून राहुलचा आवाज आला... हॅप्पी पाडवा...
नेहाचा चेहरा खुलला. राहुलला पाहिल्यावर पाठोपाठ नेहाचे सासू-सासरेही आले. त्या दोघांनाही या उभयतांची घुसमट कळत होती, जाणवत होती. सासूबाईंनी विचारलं, ‘काय नेहा, कसं वाटलं सरप्राईज... पाडवा म्हणजे दोघांनीही आपल्यासाठी वेळ काढणं. गिफ्ट काय कधीही खरेदी करू शकतो. तुम्ही दोघांनीही आज दिवसभर एकत्र राहून हा सण सेलिब्रेट करायचा आहे.’ सासूबाईंचं बोलणं पुरं होताच, सेटवरचा क्रू आला. मेकअप आर्टिस्ट सुशीलाताईंनी तर नेहाला हाताला धरून रूममध्ये नेलं. तिला सिरियलमधल्या लीड हिरॉईनसारखं नटवलं. मग काय सेटवरच नेहा आणि राहुलचा पाडवा थाटात साजरा झाला. दोघांनाही खूप बोलायचं होतं. पण समोरासमोर आल्यावर शब्दांची भाषा आनंदाश्रूंनीच सांगितली. आपल्या मनात जे आत असतं ते असं बाहेर येतंच. पण त्यासाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. नेहा आणि राहुलने आपल्या करियरला प्राधान्य दिल्यामुळे खूप गोष्टींचा त्याग केला होता. मित्रांनो, हा पाडवा आपल्या प्रियजनांसोबत साजरा करा. आनंद म्हणजे देणं आहे; घेणं नव्हे. जरी आपण निराशेच्या अंधारात असलो, तरी मनातली तेजारती आपणच जपायची असते...
(पूर्वप्रसिद्धी सकाळ मुंबई आवृत्ती)
No comments:
Post a Comment