Friday, 25 November 2016

‘त्या’ दहशतीची आठ वर्षं

सकाळच्या चहाबरोबर बातम्या वाचताना, ऐकताना आणि बघताना तेवढ्यापुरते चुकचुकतो आपण... सोशल मीडियावरच्या पोस्टना धडाधड लाईक, कमेंट आणि शेअर करत आपल्याला सामाजिक भान असल्याचं भासवतो... त्यामुळे रोजच्या धावपळीच्या जगण्यात वर्ष आणि तारखा बदलतात; पण आजूबाजूला आपल्याला अस्वस्थ करणाऱ्या घटना सुरूच असतात... 

तिथे सुरक्षाव्यवस्था नव्हती... गुप्तहेर यंत्रणांनी योग्य माहिती दिली नाही... पोलिसांकडे लढताना पुरेशी शस्त्रसामुग्री नव्हती... हा तर सरकारचा नाकर्तेपणा... पत्रकारांनी बेताल बातम्या दिल्या, त्यामुळे अतिरेकी सावध झाले... आपल्याला फक्त कारणं लागतात, आपल्या चुका इतरांवर ढकलण्यासाठी... अहो, मनाला एकदा विचारा आपण सजग होतो का? आपली काळजी घ्यायला, आपण सक्षम होतो का? 

२६/११  च्या त्या ६० तासांतला थरार मरिन ड्राईव्हच्या समुद्राला विचारा, तो तर क्षणाक्षणाला खवळून उठतो... पण त्याच्या त्या लाटांवर खिदळत आपण फक्त सुट्टीचा आनंद लुटतो. आज त्या किनाऱ्याच्या कडेला तुकाराम ओंबळेंचं समाधीस्थळ आहे. ते बघताना आपण फक्त हळहळतो आणि पुढे जातो निघून. आता कशी आहे सीएसटीची सुरक्षायंत्रणा? गेट वे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेलसमोर पोझ देऊन फोटो काढताना कधी हा विचार केलाय की, तुम्ही स्वमग्न राहिलात तर तुमचाही फोटो येऊ शकतो... न्यूज पेपरच्या हेडलाईनच्या बाजूला "सामान्य माणसांवर बेछूट गोळीबार!' सीएसटीला ट्रेन पकडण्याची कशाला इतकी घाई? एकदा थोडं थांबून तिथल्या पोलिसांची कधी विचारपूस केलीत? 

तो थरार अजून डोळ्यांसमोरून जात नाही म्हणता, मग... त्यासाठी तुम्ही या देशाचे नागरिक म्हणून तुमचं काही कर्तव्य आहे ना!

ते कर्तव्य बजावण्यासाठी आपण पुढे येणार नाही, तोपर्यंत वर्ष आणि तारखा बदलत राहतील. गुन्हेगारी, हिंसाचार, आतंकवाद आपल्या शेजारी येऊन नांदू लागेल... बघा काळजी घ्या... आपणच आपली ढाल व्हा... घाबरून भूमिका न घेता वावरणं सोपं असतं... निसर्गाकडून शिका आपणच आपलं अस्तित्त्व कसं जपायचं ते... 
कुणी आधार देईल, कुणी मदत करेल, अशी अपेक्षांची झूल कशासाठी?











No comments:

Post a Comment

आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...