काल रात्री मी ११:५१
ट्रेन पकडली बेलापूर सीबीडीहून... ऑफीसमधून स्टेशनपर्यंतच्या प्रवासात काहीशी भीती
वाटत होती... अपराधी सुद्धा वाटत होतं. मग दुसऱ्याच क्षणी विचार आला का असं
वाटतंय...मी काही ऑफीसमध्ये टाईमपास नव्हते करत, ज्यामुळे उशीर झाला म्हणून अपराधी
वाटावं. वुमन्स डे स्पेशल फिचर करायचं होतं. डेडलाईन्स होत्या. आणि भीती याची वाटत
होती, की काही अनुचित प्रकार घडला तर...मग नेहमी करते तसं केलं, वर आभाळाकडे
पाहिलं चंद्राला सांगितलं माझ्यासोबत रहा, जेव्हा तो नसतो तेव्हा आभाळालाच सांगते
की माझ्यावर लक्ष ठेव जरा...तर असा सकारात्मक विचार करून ट्रेनमध्ये चढले. सगळी
भीती झटकून दिली. अपराधी वाटणंही मग कमी झालं.
खरंतर काय झालंय ना हल्ली आपण खूप टोकाचे विचार करत
राहतो आणि आलेल्या क्षणांची मजा घालवतो. म्हणूनच आजच्या महिला दिनी तुम्हाला एक
वेगळा दृष्टीकोन माझ्या रोजच्या जगण्यातून, अनुभवातून देता आला तर तो देण्याचा
प्रयत्न या लेखातून करतेय.
ताडदेव ते बेलापूरच्या प्रवासात रोज जाता येताना तीन
तास माझं निरिक्षण सुरू असतं. ग्रंथालयात होते तेव्हा रोज कित्येक अनोळखी
व्यक्तींशी संवाद साधायचे. आता पत्रकारिता क्षेत्रात असल्यामुळेही अनोळखी माणसं
भेटतात. या प्रवासात विविध वयोगटातल्या स्त्रियांच्या संपर्कात मी आले. यातून मला
काही गोष्टी कळल्यात. काही मुद्दे लक्षात आले. स्त्रियांच्या समस्या काय आहेत हे
कळायला लागलं...
त्यात दोन गट असे प्रकर्षाने दिसले ते असे की एक गट
पुरुषांचा कमालीचा रागराग करणारा. तर दुसरा गट पुरुषांना घाबरून किंवा असं म्हणूया
की ते सांगतील तसं वागणारा आणि स्वतःच स्वतःला बंधनात अडकवून घेणारा...
मैत्रिणींनो, तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की यातला
मध्यम मार्ग शोधा. आता ती समज, ती जागरुकता आलेली आहे की आपली स्पर्धा इतर कोणाशी
नसून आपली आपल्याशीच आहे. आणि कित्येकींना हे माहितही आहे. पण त्या दिशेने पावलं
अजून वळली नाहीयेत म्हणावी तेवढी. आपण पाहतो त्या मालिका, वाचलेली पुस्तके, सिनेमे
इतर मनोरंजनाची साधनं यातून स्त्रियांना तेवढं प्रगल्भ दाखवलं जात नाही. अशी एक
ओरड असते. आणि दुसरीकडे आधुनिक स्त्री म्हणजे रात्र रात्र घराबाहेर असणारी, ड्रींक
करणारी, पार्टीजना जाणारी, मॉडर्न कपडे घालणारी असं दाखवलं जातं तेही पटत नाही.
कारण सगळ्याच आधुनिक विचारांच्या स्त्रिया असं काही करत नाहीत. पण ललित साहित्यात,
मालिकांमध्ये, सिनेमात जी स्त्री पात्रं दाखवतात. त्यांना त्या पात्राला उठून
दिसण्यासाठी ते तसं दोन टोकाचं दाखवलं जातं. म्हणून आपण ते तसं बघून त्यांचं
अनुकरण करू नये. किंवा त्याला नावं ठेवू नये. व्यक्तिरेखांना उठावदार करण्यासाठी
वस्तुस्थिती आहे त्यापेक्षा ७५ टक्के अधिक वरचढ दाखवावी लागते. तेव्हाच ती त्या
त्या रसिकांच्या आकलनानुसार त्यांना कळते. हा एक लेखनाचा नियम आहे. तुमच्या
आमच्यासारख्या सर्वसामान्य स्त्रियांनी यात स्वतःला अडकून घेऊ नये. माणसाचं मन
नेहमी बदलांना घाबरतं. इथेच आपलं चुकतं.
तर माझा सांगायचा मुद्दा हा आहे की...
स्मार्ट वे ऑफ वुमनहुड काय असला पाहिजे...
तर त्यासाठी आपल्याला हे करायला हवं...
१.पुरुषांचा रागराग करणं, त्यांच्याशी स्पर्धा करणं
म्हणजे स्त्रीवाद नव्हे. तुम्ही स्वतःलाच रोज एक आव्हान द्या. आणि ते पूर्ण
करण्यासाठी झटा.
२.आधुनिक विचारांच्या नादात कुटुंबाला अंतर देऊ नका.
माणसं जोडा. दुसऱ्यांना इम्प्रेस करण्याच्या नादात स्वतःवर सगळ्या जबाबदाऱ्यांचं
ओझं घेऊ नका. आपल्या घरातील माणसांशी नीट बोलून घरातील सर्व कामांची जबाबदारी
वाटून घ्या. स्मार्ट वुमन म्हणजे प्रत्येक गोष्ट तिला आलीच पाहिजे (परफेक्ट असली पाहिजे.) असं नव्हे. कधी कधी
तुमच्याकडूनही चुका होणं स्वाभाविक आहे. स्वयंपाक शिकणं ही गोष्ट मनापासून करा
तिला बायकांनीच का करायचा स्वयंपाक असं डोक्यात घेऊ नका. घरातील लहान मुली-मुलांना
तुम्ही समान वागणूक द्या. कधी वेळ काढून ज्येष्ठ व्यक्तींशी बोला. घरातील
सासूबाईंना व्हिलन न समजता त्यांच्यासोबत योग्य तो संवाद साधत त्यांना आपलंसं
करण्याची क्षमता अंगी आणा.
३.स्वावलंबन हे स्वतःपासून इतरांना दाखवून द्या. कारण
काळाची गरज ही आहे कुणी कुणावर अवलंबून नव्हे तर सोबत असणं महत्त्वाचं आहे.
४.कपडे, आपलं दिसणं या गोष्टी आपल्या
व्यक्तीमत्त्वाला खुलवण्यासाठी आणि आपल्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आहेत, यावर
लक्ष द्यावं. आपण नीट कॅरी करू शकू अशी वेशभुषा आपण केली पाहिजे. रोज १५ मिनिटं तरी
व्यायामासाठी दिली पाहिजेत. निरोगी, तंदुरुस्त राहण्यासाठी प्रयत्न करा. डायटिंगचं
खुळ डोक्यातून काढून टाका.
५.तुम्हाला ज्या गोष्टींची भीती वाटते. त्या गोष्टी
लिहून काढा. त्यावर मात करण्यासाठी कुठल्या क्षमता अंगी बाणवल्या पाहिजेत त्याचा
विचार करा. वेळ पडल्यास मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्या. तुम्हाला कुणाकडून,
कुणामुळे त्रास होत असेल, तर मोकळेपणाने बोला. तुमच्याकडे माध्यमं आहेत.
पोलिसयंत्रणा आहे. पत्रकार मंडळी आहेत. तुम्ही बोलल्याशिवाय ही गोष्ट घडणार नाही.
६.तुम्ही शिक्षित आहात, तुमचं करिअर, नोकरी, व्यवसाय
करत असाल तरीही एखादी वेगळी कला जोपासा. किंवा शिका. कारण पैश्याने माणूस जगतो. पण
कला माणसाला जगण्यातला आनंद मिळवून देते. जिथे अजूनही मुलींना शिक्षणापासून वंचित
ठेवलं जातंय. असा परीसर तुम्हीच शोधून काढा आणि त्यांनाही शिक्षणाचा हक्क तुम्ही
मिळवून देण्याचा व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न करा.
७.आठवडाभरातून स्वतःसाठी काही वेळ काढा. यावेळी इतर
कुठलाही विचार मनात आणू नका. यू हॅव टू बी युवरसेल्फ. स्वातंत्र्य हवं म्हणजे
नेमकं काय हे आधी नीट समजून घ्या. तुम्हाला व्यक्ती म्हणून जगताना, समाजात
वावरताना जी बंधनं येतात, अडथळे येतात. त्यामुळे तुमच्या प्रगतीला खीळ बसत असेल,
घुसमट होत असेल तर त्या विरोधात तुम्ही तुमचा आवाज उठवला पाहिजे. यासाठी अखिल
पुरुषजातीचा राग राग करु नये. एकीला एक अनुभव आला म्हणून दुसरीनेही राग राग करणं
चुकीचं आहे. स्वातंत्र्य म्हणजे पुरुष ज्या ज्या गोष्टी करतात ते आपल्याला करायला
मिळाल्या पाहिजेत. हा समज चुकीचा आहे. आपणच आपल्याला प्रत्येक दिवशी नवं काही
शिकण्याची सवय लावा.
८.आपण जिथे राहतो तो परीसर, आपलं ऑफीस किंवा आपला नेहमी
संपर्क येतो अशी ठिकाणं...यामध्ये काही चांगलं काही घडावं असं तुम्हाला वाटतंय तर
त्याची सुरुवात तुम्ही स्वतःपासून करा. आपला सन्मान आपणच आधी करायला शिका. तुम्ही
आधी एक स्त्री म्हणून स्त्रिला सन्मान द्या.
९.स्वतःचा आनंद कशात आहे, हे शोधा. आपल्या स्वतःला
व्यक्त करण्यासाठी एक माध्यम निवडा म्हणजे ते लेखन, चित्रकला, नृत्य असं काहीही
असू शकतं. तुम्हाला वाटतं ना मालिका, सिनेमात आपल्यासारखी स्त्री अजून का नाही
दाखवत तर स्वतः आधी काळाप्रमाणे बदल स्वीकारा. मग त्याचंही प्रतिबिंब तुम्हाला
मनोरंजनात नक्की दिसेल. पण त्याआधी मनमोकळं जगा. आणि असं जगताना तुम्हाला काही
अडचणी येत असतील तर त्यावर मात करण्यासाठी स्वतः मार्ग शोधा. यासाठी आपल्या पुरुष
सहकाऱ्यांची, आपल्या जोडीदाराची, ज्येष्ठांची मदत घेण्यात कमीपणा मानू नका. कारण
प्रत्येकाकडे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन असतंच असं नाही. स्त्रियांमध्ये प्रचंड
क्षमता आहे...या क्षमतांचा विकास करण्याचा संकल्प आजच्या दिवशी करुया. पुरुष हे
तुमचे शत्रू नाहीयेत. खरंतर आपले शत्रू आपणच असतो. जेव्हा आपण स्वतःला पूर्णपणे
समजू, ओळखू तेव्हाच आपण सक्षम होऊन इतरांना, समाजाला नवी दिशा दाखवू
शकू...त्यामुळे सगळ्या मैत्रिणींना एकच सांगणं, स्वतःला ओळखा, खोटं वागू नका...खरं
खरं सांगा आणि खरं खरं जगा... आणि मनापासून जे करावंसं वाटतंय ते करण्याचा निर्धार
करा... महिलादिनाच्या खूप खूप शुभेच्छा...
No comments:
Post a Comment