Thursday, 19 April 2018

अबोल प्रेमाचा प्राजक्त


प्राजक्ताचं बहरणं, पाहिलं नाही कधी, गोष्ट तशी साधी-सुदी... होय, अगदी छोटीशीच गोष्ट आहे ऑक्टोबर या सिनेमाची. पण थोडं लक्ष दिलं तर खूप मोठं काहीतरी सांगू पाहणारी. तसं तर मोठ्या मोठ्या गोष्टींच्या मागे धावणारे आपण छोट्या छोट्या गोष्टी नजरेला दिसत असल्या तरी त्यांच्याकडे लक्ष देत नाही किंवा आपलं लक्ष जात नाही. कसली असते ही घाई, जरा थांबा क्षणभर...
प्राजक्ताचं लाजणं, भुईवर गळून पडल्यावरही पावसाचे थेंब पडल्यावर खुदकन हसणं, क्षणाचं आयुष्य असलं तरी भरभरून सुगंध उधळणं... खूप काही सांगू पाहतंय इवलसं ते प्राजक्ताचं फूल. या फुलांचा प्रवास फुलण्यापर्यंत ते सुगंध उधळीत जमिनीवर मूकपणे गळून पडण्यापर्यंतचा...त्याच्याबद्दलच्या काही आख्यायिकांचा, गाण्यांचा, साहित्य-संस्कृतीतील संदर्भाचा ऑक्टोबर सिनेमाचे दिग्दर्शक शूजित सरकार आणि लेखिका जुही चतुर्वेदी यांनी अगदी समरसून अभ्यास केलाय. हे सिनेमाभर जाणवत राहतं. कारण प्राजक्ताचं रुपक वापरून या सिनेमाची पटकथा अप्रतिम बांधली गेलीय.  




आपण आपल्या माझं माझं जगण्याच्या नादात इतके दंग होऊन जातो की क्षणाक्षणातून मिळणाऱ्या अगणित प्राजक्त फुलांसारख्या आनंदाला मुकत असतो. प्राजक्त फुलांचं आयुष्य किती क्षणिक, आपलं त्यांच्याकडे लक्ष जाईपर्यंत ते फूल जमिनीवर गळून पडलेलं असतं.
काही ठिकाणी याला दुःखाचं फूल असं म्हणतात, ते एका आख्यायिकेमुळे. पण खरंतर हे प्राजक्ताचं फूल आपल्याला खूप काही सांगू पाहतं. आयुष्यातील बऱ्या वाईट घटना प्रसंगांना सामोरं जाताना कसलाही हिशेब मांडू नये आणि उद्या काय होणार याचा विचार न करता ही प्राजक्त फुलं आजचा आनंद, सुख आपल्याला कसं वाटायचं ते शिकवतात. तसंच आपणही आनंद, सुख अगदी मनापासून इतरांना द्यावं.
ऑक्टोबर सिनेमाही आपल्याला हेच सांगतो. ही कथा आहे डॅन म्हणजेच दानिश वालिया आणि शिवुलीची. बंगाली भाषेत प्राजक्ताला शिवुली म्हणतात. प्राजक्ताचा रंग बघा... पांढऱ्या पाकळ्या आणि देठ केशरी (भगवा) रंगाचा तसे हे दोघे... ती शांत, संयत, प्राजक्ताची फुलं अलगद वेचून त्याचा सुवास घेणारी, मी कशी वेगळी आहे हे जाणवून देण्याचा कसलाही आटापिटा नाही. तो मात्र देठासारखा. केशरी रंगासारखा... बंडखोर, काहीतरी वेगळं करण्याची जिद्द असलेला, नियमांना तोडणारा, बंधनं झुगारून देणारा, स्टार्टअप स्वरुपात स्वतःच्या रेस्टॉरेंटचं स्वप्न पाहणारा, त्याचं हे वेगळेपण सिनेमात छान विनोद निर्मितीही करतं. तसंच त्याचं अधूमधून प्रश्न विचारणं आपल्यातल्या माणूसपणाला भानावर आणतं...
दोघेही हॉटेल मॅनेजमेंट शिकल्यावर दिल्लीतील एका पंचतारांकित नावाजलेल्या हॉटेलमध्ये ट्रेनीचं काम करत असतात.
हे दोघेही प्राजक्ताच्या फुलांचं प्रतिनिधीत्व करतायत...

पण मुद्दा हा आहे की प्राजक्ताच्या फुलांकडे जसं लक्ष जात नाही. तसं या दोघांचंही भिन्न स्वभावाचं वागणं कुणाच्याही लक्षात येत नाही, अगदी त्यांनाही नाही. जोपर्यंत त्यांचं आयुष्य कमालीचं बदलून टाकणारी ती गंभीर घटना घडत नाही. ती घटना घडल्यानंतर मात्र प्रेक्षक म्हणून आपलंही आणि सिनेमातील इतर व्यक्तिरेखांचंही त्यांच्याकडे लक्ष जातं. हॉटेलमधल्या पार्टीत ती घटना घडण्याआधी शिवुली आपल्यासोबतच्या मित्र-मैत्रिणींना प्रश्न विचारते, व्हेअर इज डॅन...आणि त्यानंतर मनाला सुन्न करणारी ती घटना. प्राजक्ताच्या फुलांबद्दल एक आख्यायिका अशी सांगितली जाते की एका राजकुमारीनं सुर्याशी लग्न करण्याचा हट्ट धरला होता. आणि तिच्या वडलांनी, तिने विनंती केल्यावर सूर्यही तिच्याशी लग्न करायला होकार देतो. ती राजकन्या नववधूच्या वेशात तयार होऊन सूर्याची वाट बघत असते, पण सूर्य येत नाही. त्यावेळी ती, कुठे आहेस तू? हा प्रश्न मनोमन विचारत असते, जसं शिवुली विचारते, व्हेअर इज डॅन... सूर्य न आल्यामुळे चिडून ती राजकन्या लग्नमंडपातल्या होमकुंडातील अग्नीत जीव देते. त्यामुळे असं म्हटलं जातं प्राजक्ताची फुलं सूर्यावरील रागाने रात्री फुलतात आणि सूर्योदय व्हायच्या आत ती जमिनिवर गळून पडतात. बंगाली साहित्यात रविंद्रनाथांची शिवुली फूल नावाची एक कविताही आहे. तर हे प्राजक्ताचं फूल मूक आक्रोश करत जमिनीवर पडतं तशीच शिवुलीच्या बाबतीत घडणारी ती घटना.
त्यानंतर सिनेमातील व्यक्तिरेखांचं वेगवेगळ्या पद्धतीने वागणं, एकाच परीस्थितीत माणूस किती वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होतो, वागतो हे सिनेमा पाहताना लक्षात येतं. डॅनने शिवुलीसाठी दिवस - रात्र एक करणं, शिवुलीच्या आईने शिवुली, आपली दोन लहान मुलं, तिचा दीर, आपल्यातलं शिक्षकीपण हे सगळं सांभाळत वागणं, शिवुलीच्या मित्रांचं वागणं असं सगळया व्यक्तिरेखांचे विविध पैलू शिवुलीच्या बाबतीत घडलेल्या त्या एका गंभीर घटनेने प्रेक्षक म्हणून लक्षात घेता घेता त्या कथेत आपण रंगून जातो. कथनाची ही शैली फार विलक्षण आहे. यात डॅन आणि शिवुलीचं त्या घटनेनंतरचं वागणं, त्यांचं नातं कसं आहे, ते कसं यापुढे उलगडणार यात आपण सिनेमा पाहताना गुंतून जातो. दिग्दर्शन आणि लेखनाचा इथेच विजय होतो.

सिनेमा पूर्ण पाहिल्यावर आपल्याला यावर कशी प्रतिक्रिया व्यक्त करावी ते कळत नाही. हेच या सिनेमाचं यश आहे. कुठला विषय मांडायचाय असा आरडाओरडा नाही, संवादाचा मारा नाही, काहीतरी संदेश देण्याचा केविलवाणा प्रयत्न नाही. सिनेमाचा शेवट झाल्यावर वाटत राहतं काहीतरी मिसिंग आहे, आणि हे जे मिसिंग आहे तेच तर आपल्याला शोधत शोधत परीपूर्ण व्हायचंय.
मित्र-मैत्रिणीतलं नातं, प्रेम असो किंवा आपुलकीचं कुठलंही नातं असो.... हे प्रेम असं का...काय आहे हे नातं... कुठलं नातं आहे हे आणि हे असं का आहे... असे हजारो प्रश्न जसे डॅनला तो शिवुलीसाठी काही करू पाहतो तेव्हा विचारले जातात, तसे प्रश्न विचारण्यापेक्षा तो क्षण काय सांगतोय तसं वागलं तरच त्या क्षणाला महत्त्व आहे. आणि अशा क्षणाक्षणात भरभरून जगण्यानेच तर नाती समृद्ध होतात, अधिक घट्ट होतात. एकमेकांना माणूस म्हणून आपण समजून घेऊ लागतो. डॅनने प्राजक्ताची फुलं शिवुलीजवळ ठेवणं, आपला फोटो तिच्या बेडजवळ दिसेल असा लावणं, तिच्या आयब्रोज करण्यासाठी ब्युटीशियनला आणणं, तिच्या घरच्यांना धीर देणं अशा बऱ्याच बारीक सारीक गोष्टी यात कुठेही हिरोगिरी येऊ न देता दिग्दर्शकाने सुंदर मांडल्या आहेत.

पाहिलं तर प्राजक्ताचं ते इवलंसं फूल. पण त्या फुलाने डॅन आणि शिवुलीच्या अबोल नात्यामध्ये जिवंतपणा आणला. असा जिवंतपणा अलिकडे नात्यांमध्ये फार अभावानेच आढळतो. तर अशांसाठी हा सिनेमा प्राजक्ताचा सडा बनून आलाय. अबोल प्रेमाचे असे काही क्षण एखादी कलाकृती आपल्याला शिकवणीचे रुप धारण न करताही देते तेव्हा अशा कलाकृतीविषयी बोलण्यासारखं, लिहिण्यासारखं खूप काही असतं.
मुळात प्रेमासाठी किंवा एखादी भावना व्यक्त करण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो खरंतर, फक्त आपलं मन त्या क्षणी तिथे असलं पाहिजे. क्षणाक्षणाला रंग बदलणाऱ्या, भूमिका बदलणाऱ्या या माणसांच्या जगात प्राजक्त फुलांसारख्या माणसांचं असणं अधोरेखित करणाऱ्या शूजित सरकार, जुही चतुर्वेदी, वरुण धवन, बनिता संधू यांचं मानपासून कौतुक. सिनेमॅटोग्राफर अविक मुखोपाध्यायचंही विशेष कौतुक.
प्राजक्ताचं फूल जेव्हा गळून पडतं, तो आक्रोश आपण समजू शकत नाही, पण एखादं नातं तुटतं, कायमचं पारखं होतं तेव्हा मात्र मनाचा आकांत, आक्रोश, असंख्य, असह्य वेदना होतात. पण हा सिनेमा पाहताना तो ज्या प्रकारे चित्रित झालाय त्यात कुठेही बटबटीतपणा नाही, भावनांचा कल्लोळ नाही. एकेक फ्रेम कौशल्याने अगदी प्राजक्त फुलांसारखी हळुवार उलगडत गेलीय.
हा सिनेमा डॅन आणि शिवुलीच्या अबोल नात्याचा आहे, तेवढाच तो शिवुली आणि तिच्या आईचा (गितांजली राव) आहे. आई-मुलीचं एक वेगळंच परीमाण लाभलेलं नातं या सिनेमात आहे. प्राजक्ताची उपमा इथे आईसाठी पण आहे. कारण आईचं आपल्या कुटुंबासाठीचं असलेलं समर्पण. बंगाली संस्कृतीत नववधूची सासरी रहायला आल्यावर पहिल्या दिवशी प्राजक्ताच्या फुलांनी ओटी भरण्याची एक रीत आहे. त्यामुळेच की काय तिथल्या स्त्रियांमध्ये आपसूकच हे प्राजक्तगुण येत असावेत. हा संदर्भ शिवुलीच्या आईमध्ये दिग्दर्शकाने थेट नाही पण खुबीने दाखवलाय. शिवुलीची आई विद्या अय्यर ही आयआयटीत प्रोफेसर आहे. ती विद्यार्थ्यांना तन्मयतेने शिकवते, आपल्या दोन लहान मुलांना हॉस्पीटलच्या आवारातही शांत जागा शोधते, तिचं त्यांच्या अभ्यासाकडेही लक्ष आहे. आपल्या दीरालाही ती समजावतेय, त्याचा शिवुलीवरील उपचार बंद करण्याचा विरोध मोडून काढतेय, शिवुलीची खूप काळजी वाटतेय, पैशांची जुळवाजुळव करतेय. नवरा नसल्यामुळे घराची जबाबदारी तिच्यावर आहे इतक्या सगळ्या गोष्टी ती करतेय...पण कुठेही दुःखानं कोसळणं नाही, ओक्साबोक्शी रडणं नाही... आईपणाची एक निराळीच संयमी व्याख्या म्हणून या व्यक्तिरेखेकडे पाहता येईल. परिस्थितीला शरण जात नाही, झुकत नाही, कंटाळत नाही... ती त्याचा सामना करते. तुम्ही आई असाल तर हा सिनेअनुभव तुम्हाला उभारी देईन, नसाल तर मार्गदर्शक बनेल. आईपण हे सुखावणारं, तितकंच भावनेनं ओथंबलेलं प्राजक्त फुलासारखंच तर आहे...

प्राजक्त फूल हे सगळ्या फुलात वेगळं आहे, क्षणिक आयुष्य असलं तरी स्वतःचं वेगळेपण त्यानं अबाधित ठेवलंय. तसा हा सिनेमा आहे. प्राजक्त फुलांकडे समर्पित वृत्ती आहे. कारण समर्पणात निरपेक्ष त्यागाची भावना असते. प्रेमाने दुसऱ्याला आपलंसं करण्याची इच्छा असते. कलाकृतीही अशीच असते. नाहीतर कोण कुठला तो डॅन आणि ती शिवुली त्यांच्यातील अबोल प्रेमाचा प्राजक्त फुलला तरी असता का... प्राजक्ताच्या फुलासारखी शिवुली जाता जाता डॅनचं आयुष्य बदलून जाते. त्याला जगण्याचं नवं भान देते. सिनेमात शेवटच्या प्रसंगात घर सोडताना प्राजक्ताच्या झाडाची काळजी करणाऱ्या आईला डॅन म्हणतो, मी घेऊन जातो ते झाड... त्याचं ते झाड घेऊन जाणं म्हणजे त्याला त्याच्या शिवुलीच्या अबोल नात्यातुनही क्षणभर का होईना मिळालेला आनंद, भावनांची समज... तो जणुकाही त्याच्याकडचं सुखंच वाटायला निघालाय...
खरंच, गावाकडच्या अंगणातल्या, कौलारू शाळेच्या आवारातल्या किंवा अगदी एखाद्या बागेत लावलेल्या प्राजक्ताची पखरण यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये नक्की अनुभवा. पण त्याआधी ऑक्टोबर हा सिनेमा पाहून मनात साठवायला हवा.  

No comments:

Post a Comment

आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...