Sunday, 29 July 2018

पिवळा गुलाब


आमच्या गावाकडच्या परसबागेत जास्वंदीपासून ते गुलाब अबोलीपर्यंत वेगवेगळ्या रंगांची, गंधाची फुलं होती. अजूनही आहेत. त्या बागेकडे पाहिलं की प्रसन्न वाटायचं.
एके दिवशी आईने बाजारातून एक पिवळ्या गुलाबाचं रोपं आणलं. या गुलाबाच्या पाकळ्या वरून पिवळ्या गडद रंगाच्या आणि खालून लालूस रंगाच्या होत्या. काय त्याच्या रंगाचा आणि देखणेपणाचा रुबाब विचारू नका.

त्याआधी आम्ही कधी पिवळा गुलाब पाहिलाच नव्हता. त्यामुळे कुतूहल तितकंच अप्रूप की बागेत लावल्यावर याला पहिलं फूल येईल ते पिवळ्या रंगाचंच असेल ना...
पण हळहळू या गुलाबाच्या रोपाने इतर सर्व फुलझाडात आपली जागा वरचढ केली. त्यामुळे बागेत आल्यावर पहिलं लक्ष त्याच्याकडेच जाऊ लागलं. 

एके दिवशी तर या गुलाबाच्या झाडावर २५ फुलं फुलली होती. तो क्षण अजुनही नजरेसमोर ताजा आहे.
त्यावेळी शाळेत, कुठल्या समारंभात किंवा अगदी घरी असल्या तरी बायकांना फुलं केसात माळण्याचा सोस होता. आजंही आहे, पण कमी झालाय. त्यामुळे आईने सांगितलं, की वाडीतल्या बायका त्या गुलाबाच्या फुलांकडे बघून फुलं मागायच्या आत यातली काही फुलं नीट तोड आणि त्यांना नेऊन दे. तसं केलंही. सगळ्या बायका खूश झाल्या.


त्या दिवसांत शाळेत फुलं माळून जायचाही एक वेगळाच स्वॅग होता. कधी अबोलीचा मोठा गजरा तर कधी मोगऱ्याचा, त्यात सुरंगीचा गजरा भाव खावून जायचा. पण आमच्या घरी सगळ्यांना त्या पिवळ्या गुलाबाचंच कौतुक. एके दिवशी आई म्हणाली, तुमच्या शाळेतल्या बाईंनाही नेऊन दे या पिवळ्याचं गुलाबाचं फूल. तेव्हा शाळेत बाईंना फुलं नेऊन देण्यासाठी मुलींमध्ये चढाओढ असायची. आपण दिलेलं फूल किंवा गजरा बाईंनी माळला की मुलींना भारी वाटायचं. एके दिवशी मी बाईंना पिवळा गुलाब नेऊन दिला. बाईंना ते फूल खूप आवडलं. 

मग अधूनमधून अशी पिवळ्या गुलाबाची फूलं मी त्यांना देऊ लागले. मग पावसाळा जवळ आला तसा बाई मला म्हणाल्या, या गुलाबाची एक छोटी फांदी आणून देशील का... मी आईला विचारलं...आईसुद्धा हो म्हणाली. गावाकडे पावसाळी दिवसात फुलझाडांच्या फांद्या लावण्याचा शिरस्ता अजुनही आहे. आईने मग मला एक छोटी फांदी छाटून दिली आणि बाईंना द्यायला सांगितली. बाई खूश झाल्या. पण त्यानंतर आम्ही मात्र नाखूश झालो. कारण आमचं गुलाबाचं झाड हळूहळू सुकू लागलं. आणि एके दिवशी मरून गेलं. 

बाईंना याची फांदी तोडून दिली म्हणूनच आमचं गुलाबाचं झाड आमच्यापासून दूर गेलं. हेच तेव्हा आमच्या बालमनात पक्क बसलं. त्यानंतर शाळेतही फुलं माळून जाणं कमी होत गेलं. बाईंनाही फूल नेऊन देणं बंद झालं. मुंबईत रहायला आल्यानंतर आमच्या शेजारच्या काकू हळदी कूंकू घालतात तेव्हा पांढरी सोनटक्याची फुलं वाटतात. ती फुलं एकदा कॉलेजमध्ये माळून गेल्याचं आठवतंय. आणि अधून-मधून मोगऱ्याचा गजरा किंवा सोनचाफ्याची फुलं बाजारातून आणते. तेवढाच काय तो फुलांचा सहवास.

आज विचार करते तेव्हा वाटतं, बाईंच्या विचारण्याचा आदर करत नीट नाही म्हणून सांगितलं असतं तर पिवळ्या गुलाबाचं झाड वाचलं असतं का....का त्याचं अस्तित्त्व तेवढ्यापुरतंच होतं... पावसाळ्यात गावाकडे दरवर्षी फुलझाडं लावतो. त्यावेळी पिवळ्या गुलाबाची आठवण पुन्हा ताजी होते. शहरात आल्यावर आता कित्येक रंगाची गुलाबाची फुलं मी पाहिली. पण त्या पिवळ्या गुलाबाच्या झाडाची आठवण कळीसारखी टवटवीतच राहतेय. या घटनेमुळे माझा आवडता रंग पिवळा हे एकदम फायनलच झालं. त्यामुळे कपडे खरेदी करताना किंवा एखाद्या गोष्टीसाठी रंगाची निवड करताना पिवळ्या रंगाला झुकतं माप देते.
कसं असतं ना मानवी मन? आपलं हरवलेलं काहीतरी असं आसपासच्या सगळ्यात शोधत राहणारं?

पूर्वप्रसिद्धी - मुंबई आकाशवाणीवर ऐसी अक्षरे १३,१४,१५ एप्रिल २०१८


पण ओढ ही युगांची...

पहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगांची
जादू अशी घडे ही, या दोन लोचनांची

शाळकरी दिवस संपता संपता महाविद्यालयाच्या गुलाबी वळणावर कविता भेटायची. प्रेमाच्या बेधुंद सरी तनमनाला भिजवून जायच्या. ज्येष्ठकवी मंगेश पाडगावकरांच्या या कवितेला संगीतकार श्रीनिवास खळे यांनी तितकीच भावोत्कट चाल दिली. आणि त्या वयाच्या कित्येक कुमार-कुमारींच्या मनोवस्थेला सुरेल संगीतात लाजत लाजत हळुवार गुणगुणत वाट मिळाली. कवितांनी उमलत्या वयातील प्रेमाला शब्दबद्ध केल्यामुळे त्यावेळच्या तरुणाईच्या भावनांना व्यक्त होणं सोपं झालं. मग अरूण म्हात्रे यांच्या कवितांतून ते गुलाबी मन थोडं जागं झालं....ते दिवस आता कुठे, जेव्हा फुले बोलायची, दूर ती गेली तरीही सावली भेटायची... असं काहीसं पुढे व्हायला लागलं. एकंदरीतच ते दिवस आता कुठे असंच आता दिसू लागलंय. आणि हे सत्य आहे. 
त्यावेळच्या चित्रपटांनी, संगीताने, साहित्याने खरंच जादू केली होती. कित्येकांच्या डायरीत, पुस्तकात आठवणींची मोरपीसं, गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या, प्रेमपत्राचा गुलाबी कागद असायचा. तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल लिहिलेल्या प्रेमभरल्या उपमांच्या ओळी असायच्या. पहिल्या भेटीची हुरहूर असायची, नात्यांची मजा उलगडण्यात असते हे मानणारी ती हळवी पिढी. पहिल्या प्रेमाला जपायची छोट्या छोट्या गोष्टींतून, आठवणींतून. कधी त्याला व्यक्तता मिळायची, कधी नाही मिळायची. म्हणून पहिल्या प्रेमाच्या आठवणींना कोणी कधी पुसून टाकत नव्हतं, तर त्या जपल्या जात होत्या. आजही आपल्या आजी-आजोबांना विचारलंत तरी ते किती चेहऱ्यावर तजेला आणून त्यांच्या स्वप्नातली ती आणि तो विषयी सांगतील. त्यांच्या बोलण्यातही अगदी उत्साह ओसंडून वाहताना दिसेल. मंदिरात जाण्याचा बहाणा, ग्रंथालयात पुस्तकं चाळण्याचा बहाणा असं बरंच काही. ज्यांना त्यांचं पहिलं प्रेम भेटे (मिळे) त्यांचं ठिक आहे, पण ज्यांना ते फक्त स्वप्नातच मिळे त्यांच्यासाठी समाजाने कांदे-पोह्यांचा साग्रसंगीत कार्यक्रम आखून दिला होताच. आता तो चित्रपटात किंवा मालिकेत घर जुन्या विचारांचं आहे हो! हे दाखवण्यासाठी १५ ते २० मिनिटं कांदे-पोह्यांचं दृश्य दाखवलं जातं. पण खरंच वरून ती मुला-मुलींना भेटण्याची समाजमान्य चौकट असली तरी त्यात धोके होतेच. मुलीला कमीपणा मिळायचा. मुलाचं नाक नेहमी वर अशा सोहळ्यात. तिने चहा, कांदे-पोहे स्वतः बनवून पाहुण्यांसाठी घेऊन यायचं नी मग प्रश्नांच्या फैरी सुरू व्हायच्या. मुलीचं नाव नीट माहित असलं तरी पहिला प्रश्न असायचा काय गं पूर्ण नाव सांग तुझं....इथपासून ते स्वयंपाक येतो का, गाता येतं का, शिवणकाम येतं का...चालून दाखव... सुईत दोरा ओवून दाखव इथवर त्या प्रश्नांच्या फैरी पोहोचायच्या मुलीला नकोसं व्हायचं...


या कांदेपोह्यांच्या कार्यक्रमांचंही रुपडं समाजातील स्तरानुसार बदलत गेलं. ते अगदी अलिकडे आलिशान हॉटेल, रेस्टॉरेंटमध्ये भेटणं, कॅफेमध्ये भेटणं असं सुरू झालं. मुलाकडच्या, मुलीकडच्या सगळ्यांनी एकमेकांना अशाप्रकारे भेटताना वरून म्हणायचं भेटताना की हे साधं भेटणं आहे हो, यात औपचारिकता कशासाठी? पण पुढे जाऊन या पद्धतीलाही कांदे-पोह्याचंच रुप आलं. पण तेही आधुनिक म्हणून मुला-मुलींना मान्य झालं. पण आता मुलं-मुली दोघेही खूप शिकतात. त्यांचे करिअर, नोकरी आणि व्यवसाय विषयक अनेक प्रश्न असतात. आपल्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा आता स्वप्नाळू राहिल्या नाहीत. त्या व्यावहारिक झाल्या आहेत. घरं सांभाळायचं म्हटल्यावर कित्येक मुली धसका घेतात, इथे रोज ऑफिस गाठायची घाई आणि सासरच्या घरात इतकी माणसं सगळं भयंकर वाटू लागतं तिला... शिक्षणाच्या जोरावर पुढे आलेल्या मुली आधुनिक विचार कर्त्या झाल्या तरी मुलं मात्र अजून पारंपरिक आणि आधुनिकतेच्या हिंदोळ्यावर अधांतरी झोके घेतायत.
पूर्वी घरातल्या वडीलधाऱ्यांना इतकंच कशाला आजुबाजुला राहणाऱ्या मंडळींना, नातेवाईकांना मुला-मुलींच्या अपेक्षा माहित असायच्या. त्यामुळे ओळखीतून अनेक लग्नगाठी जुळायच्या. मुला-मुलींविषयी त्यांच्या घरची मोठी माणसं खात्रीने काही गोष्टी सांगायची. त्यामुळे परस्परांना निवड करणं सोपं व्हायचं, विश्वास वाटायचा. पण आता नात्यात आणि पिढ्यांमध्ये बदलत्या काळानुसार अंतर वाढतंय त्यामुळे माझा लाडका मुलगा किंवा मुलगी असली तरी तिच्या आवडीनिवडीविषयी काही ठामपणे घरच्यांना ते सांगता येत नाही. तरुणाई शिक्षणाच्या स्पर्धेत अडकली, मग शिक्षण घेतल्यावर योग्य नोकरी किंवा व्यवसायात टिकून राहण्यासाठी जीवाचं रान करू लागली. त्या नादात त्यांचा आपुलकीच्या नात्यांशी बंध कमजोर होऊ लागला. तो नात्यातल्या ओलावा, ती माया, तो आपलेपणा राहिला नाही. त्यामुळे मनमोकळं बोलायचं, पण ते बोलायचं तरी कोणाशी अशी कित्येकांची अवस्था होते.
आजच्या पिढीलाही आपल्या व्यग्र दिनक्रमातून पावसात भिजावसं वाटतं, तिची किंवा त्याची सोबत असावी असं वाटतं, जशी कवितांमध्ये वर्णन केलेली असते ना अगदी तशी. पण वेळ नसतो. बाहेर मस्त पाऊस पडत असतो आणि ज्या डोळ्यांनी स्वप्नं पहायला हवीत ते डोळे संगणक, लॅपटॉप, आय पॅड अशा कुठल्यातरी स्क्रिनवर खिळलेले असतात, कॉफीचा मग ही वाफाळत थंड होऊन जातो, त्याचंही भान राहत नाही. मग चिडचिड...ताण...कटकट... कधीतरीच निवांत चार क्षण आजच्या पिढीला अनुभवायला मिळतात तेव्हाही घरच्यांपेक्षा ऑफिसमधल्या सहकाऱ्यांसोबत फिरायला प्राधान्य दिलं जातं. कारण घरापेक्षा ऑफिसमध्येच जास्त वेळ जातो ना... तर महत्त्वाचा आहे वेळ...
आजच्या तरुण पिढीलाही डोळे मिटून घेता, दिसतेस तू समोरफुलवून पंख स्वप्नी, अन् नाचतात मोर, झाली फुले सुगंधी, माझ्या ही भावनांची...  पाडगावकरांच्या या ओळींतली भावना अनुभवायची आहेच. पण ती त्यांच्या त्यांच्या पद्धतीने. त्यासाठी त्यांचा जोडीदार शोधण्यासाठी घरच्यांनीही मागे लागायची आवश्यकता आहेच. पण ते आधुनिक झाले तशी जोडीदार शोधण्याची पद्धतही आधुनिक व्हायला हवी, असायला हवी. म्हणजे जिथे शिक्षण, नोकरी-व्यवसाय, त्यांची पॅशन, आवड-निवड, स्पर्धेतही टिकून राहून सकारात्मकतेने पुढे जाऊ, एकमेकांना समजून घेऊ, एकमेकांचे आधार न होता सोबती होऊ म्हणणारा जोडीदार सापडेल अशी काहीतरी व्यवस्था हवी. जसं की लग्न जमवणारी संकेतस्थळं आणि त्यांची apps. लग्नाळू तरुण-तरुणींसाठी अगदी योग्य. त्यांना हवं तसंच. आजच्या पिढीसाठी वेळ खूप महत्त्वाचा आहे. तो वेळ १०-१२ वेळा कांदे-पोह्यांच्या कार्यक्रमात घालवायचा नाहीय. कित्येक मुला-मुलींना नुसतं भेटून त्यांना होकार-नकाराच्या झुल्यावर झुलवायचं नाहीय. म्हणून थेट आणि स्पष्ट विचार करणाऱ्या आजच्या पिढीसाठी एबीपी वेडींगसारखं संकेतस्थळ हवंय. जिथे अनेक शक्यतांना पडताळून पाहता येईल, तेही विश्वासार्ह पद्धतीने.
पण हे कांदे-पोह्यांचे कार्यक्रम मागे पडून लग्नसंस्थेत ही आधुनिकता का आली? त्याच्या मागेही काही कारणं आहेत. लग्न करण्याचा पारंपरिक आता हेतू बदललाय. आधी लग्न हा एक विवाह संस्कार होता. एका कुटुंबाचं दुसऱ्या कुटुंबाशी जोडलं जाणं होतं. आता नात्यातली शारिरिक आणि भावनिक गरज याला महत्त्व आलंय. त्यामुळे लग्नाचं वय बदलत आहे. लग्न करण्याच्या पारंपरिक पद्धतींमध्ये बदल आवश्यक आहे. लग्न विधींनाही आता तेवढं महत्त्व उरलेलं नाही. पण तरीही लग्न संस्था ही समाजाचा आजही महत्त्वाचा पाया आहे. पण मनासारखा जोडीदार मिळायला भाग्य लागतं, लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात वगैरे अशा विधानांचा आजच्या पिढीवर प्रभाव नाही. आहे हे, असं आहे ते स्वीकारून पुढे जाण्यावर भर देणारी ही पिढी आहे. मनासारखा जोडीदार मिळावा म्हणजे काय, त्यात कोणकोणत्या गोष्टी यायला हव्यात हे आजची पिढी स्वतः ठरवते आहे. घर, नोकरी-व्यवसाय, कामाची पद्धत, पत, स्वभाव, कुटुंबाविषयी जाणून घेणं, मुला-मुलींचा मित्रपरीवार कसा आहे, दोघांपैकी एकाला कुठल्या गोष्टीचा त्याग करावा लागला तर कुणी नमतं घ्यायचं? या सगळ्याचा सारासार विचार करून आजची पिढी जोडीदाराची निवड करू लागली आहे.
त्यामुळे तीला तो भेटणार आणि त्याला ती भेटणार पण वेगळ्या पद्धतीने. असं म्हणूया हवंतर. पण ओढ ही युगांची हे मात्र सत्य आहे ते असंच चिरंतन राहणार आहे. कारण नाती बदलली, काही कारणांमुळे नात्यात दुरावा आला तरी नाती जपायला हवीत, तुटता कामा नयेत याची काळजीही आजच्या पिढीला आहे. फक्त कधी कधी त्यांचा गोंधळ उडतो, तेव्हा मोठ्यांनी त्यांना समजून घ्यायला हवं. कारण प्रत्येकाला वाटत असतं अख्या जगाने नाकारलं तरी कुणीतरी आपल्याला पूर्णपणे स्वीकारायला हवं, आपल्यावर पूर्णपणे विश्वास ठेवायला हवा, जिवापाड प्रेम करायला हवं, आपल्याला त्याने सुख-दुखात पूर्णपणे पाठिंबा द्यायला हवा. तेव्हाच आपण आपल्याला आयुष्यात जे काही मिळवायचं आहे, जे ध्येय गाठायचं आहे ते गाठू शकतो. अशी व्यक्ती म्हणजे मुलामुलींसाठी पहिल्यांदा त्यांचे आई-वडील असतात. मग ती जागा जोडीदाराने घ्यायला हवी अशी गोड अव्यक्त भावना असते. म्हणूनच पण ओढ ही युगांची या चार शब्दांचं महत्त्व आजची पिढीही जाणून आहे.
पूर्वप्रसिद्धी लोकसत्ता मुंबई वृत्तांत २१ जुलै २०१८

ग्रंथालयातली दिवाळी


काय... दिवाळी...दिवाळी तर कधीच संपलीय आणि यावर्षीच्या दिवाळीला अजून अवकाश आहे. तर असं तुम्हाला वाटणं साहजिक आहे. पण मी ते बोलतेय ग्रंथालयातल्या दिवाळी विषयी. कारण ग्रंथालयात काम करणं हा माझ्यासाठी एक भन्नाट अनुभव होता. मुझको जहाँ मिल गया, असंच वाटतं नेहमी. कारण आमच्या ग्रंथालयात हे दोन शब्द दिवसभरात दोनदा तरी तोंडी येतातच.
गेल्याच आठवड्यात ग्रंथालयात गेले तेव्हा दिवाळी अंकांचं कमी दरात वाटप सुरू होतं. आणि मग ते सगळे जुने दिवस आठवले. 

दिवाळी सुरू व्हायच्या आधी महिनाभर ग्रंथालयाची दिवाळी सुरू व्हायची. बाजारात वेगवेगळ्या विषयांना वाहिलेले, मुखपृष्ठांनी आकर्षित करणारे दिवाळी अंक दाखल व्हायचे. त्याआधी ललित मासिकातून त्यांच्या ट्रेलरसारख्या जाहिराती वाचलेल्या असायच्या. त्यामुळे खूप उत्सुकता असायची की यावर्षी कुठले नविन विषय, लेखक वाचायला मिळणार.
आम्ही ग्रंथालयाच्या सभासद संख्येला, त्यांच्या आवडीला नजरेसमोर ठेऊन दिवाळी अंक खरेदी करायचो. दिवाळी अंक घेऊन ग्रंथालयात आल्यापासून आमची दिवाळी सुरू व्हायची. त्यांना कव्हर घालणं, त्यांची पानं मोजणं, दोऱ्याने शिवणं, त्यांच्यावर नंबर घालणं, शिक्का मारणं हे सगळे ग्रंथालयीन सोपस्कार कशासाठी तर तो अंक वाचकाकडे जाऊन सुखरुप ग्रंथालयात परत यावा यासाठी. दिवाळीच्या पहिल्या दिवशीच्या आधीचा दिवस ग्रंथालयात दिवाळी अंक देण्याचा दिवस म्हणून उजाडायचा. सक्काळीच दादरच्या फुलमार्केटमध्ये जाऊन सजावटीसाठी घासाघीस करून फुलं आणायचो.

सगळ्या दिवाळी अंकांना त्यांच्यासाठी खास सजवलेल्या टेबलावर छान मांडून ठेवायचो. ग्रंथालयात त्याच दिवशी रांगोळी काढायचो. त्यावेळी टेबलावर, काही रॅकवर नटून-थटून दिवाळी अंकांच्या रुपात बसलेलं ते अक्षर साहित्य बघून खूप आनंद व्हायचा. पण दिवाळी अंकाचं वाटप सुरू झाल्यावर तर अजूनच मजा यायची. वाचकांची आपला आवडता दिवाळी अंक पहिल्याच दिवशी घेण्यासाठी झुंबड उडायची. काही वाचक सांगायचे, अगं आमच्यासाठी हा दिवाळी अंक ठेव, तो दिवाळी अंक ठेव. मग आम्ही ग्रंथालयातले सगळे एकमेकांकडे बघून डोळे मिचकावायचो. कारण आमच्यासाठी सगळे वाचक समानच होते. कोणी लाडका नाही- कोणी दोडका नाही. काही वाचक तर दिवाळीचा फराळ, मिठाई वगैरे देऊन आम्हाला मस्का मारायचे. त्यावेळी आम्ही खूप श्रीमंत असल्याचं फिलींग यायचं.

याहीवर्षी ग्रंथालयात गेले होते, यावेळी ग्रंथालयातील वाचक म्हणून गेले होते. तर दरवर्षीप्रमाणे दाराशी रांगोळी दिसली, फुलांच्या माळांनी सजवलेलं टेबल दिसलं. टेबलावर काहीच म्हणजे अगदी ५-६ चं दिवाळी अंक दिसले. आणि मनातून अतिशय आनंद झाला. चेहऱ्यावरही हसू उमटलं. माझ्याबरोबरची मैत्रीण मला म्हणाली, अगं टेबलावर ५-६ च दिवाळी अंक आहेत. आणि तू हसतेस काय... पण मी तिला कसं सांगू शकणार होते की दिवाळी अंकाचा किंवा रोज वाचायला जाणाऱ्या पुस्तकांचा रॅक रिकामा दिसला की किती आनंद होतो ते... नाहीतर अलिकडे पुस्तकांना रॅकवरच धूळ खात पडावं लागतंय अशा बातम्या आपण वाचतो, ऐकतो.

ग्रंथालयातल्या बाई वाचकांच्या आवडीनिवडीविषयी सांगत होत्या. खरंतर तिथे गेल्या गेल्या दिवाळी अंकांचे फोटो काढण्याच्या विचारात होते. पण टेबल बरचसं रिकामी दिसल्यावर खात्री पटली. वाचक दुरावला नाहीय. दिवाळी अंकांची आमची परंपरा आपण आजही अभिमानाने मिरतोय. ग्रंथालयातली ही अक्षर साहित्याची दिवाळी दरवर्षी ४ महिने सुरू असते. मग पुढच्या दोन महिन्यात ते दिवाळी अंक वाचकांकडून गोळा केले जातात. अशा पद्धतीने सगळे दिवाळी अंक परत आले की हे दिवाळी अंक त्या त्या दिवाळी अंकाच्या किंमतीप्रमाणे पाव टक्क्याने विकायला काढले जातात. ज्यांना दिवाळी अंक खास संग्रही ठेवायचे असतात त्यांच्यासाठी अशी खरेदी म्हणजे पर्वणीच असते. माझ्याही हाती दरवर्षीच्या नियमाप्रमाणे असेच विकत घेतलेले काही दिवाळी अंक होते. आणि वाचनसंस्कृती टिकून असल्याचा मनात न मावणारा आनंद.

पूर्वप्रसिद्धी - मुंबई आकाशवाणीवरील ऐसी अक्षरे १३,१४,१५ एप्रिल २०१८



आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...