पहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगांची
जादू अशी घडे ही, या दोन लोचनांची’
शाळकरी दिवस संपता संपता महाविद्यालयाच्या गुलाबी वळणावर कविता भेटायची. प्रेमाच्या बेधुंद सरी तनमनाला भिजवून जायच्या. ज्येष्ठकवी मंगेश पाडगावकरांच्या या कवितेला संगीतकार श्रीनिवास खळे यांनी तितकीच भावोत्कट चाल दिली. आणि त्या वयाच्या कित्येक कुमार-कुमारींच्या मनोवस्थेला सुरेल संगीतात लाजत लाजत हळुवार गुणगुणत वाट मिळाली. कवितांनी उमलत्या वयातील प्रेमाला शब्दबद्ध केल्यामुळे त्यावेळच्या तरुणाईच्या भावनांना व्यक्त होणं सोपं झालं. मग अरूण म्हात्रे यांच्या कवितांतून ते गुलाबी मन थोडं जागं झालं....ते दिवस आता कुठे, जेव्हा फुले बोलायची, दूर ती गेली तरीही सावली भेटायची... असं काहीसं पुढे व्हायला लागलं. एकंदरीतच ते दिवस आता कुठे असंच आता दिसू लागलंय. आणि हे सत्य आहे.
त्यावेळच्या चित्रपटांनी, संगीताने, साहित्याने खरंच जादू केली होती. कित्येकांच्या डायरीत, पुस्तकात आठवणींची मोरपीसं, गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या, प्रेमपत्राचा गुलाबी कागद असायचा. तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल लिहिलेल्या प्रेमभरल्या उपमांच्या ओळी असायच्या. पहिल्या भेटीची हुरहूर असायची, नात्यांची मजा उलगडण्यात असते हे मानणारी ती हळवी पिढी. पहिल्या प्रेमाला जपायची छोट्या छोट्या गोष्टींतून, आठवणींतून. कधी त्याला व्यक्तता मिळायची, कधी नाही मिळायची. म्हणून पहिल्या प्रेमाच्या आठवणींना कोणी कधी पुसून टाकत नव्हतं, तर त्या जपल्या जात होत्या. आजही आपल्या आजी-आजोबांना विचारलंत तरी ते किती चेहऱ्यावर तजेला आणून त्यांच्या स्वप्नातली ती आणि तो विषयी सांगतील. त्यांच्या बोलण्यातही अगदी उत्साह ओसंडून वाहताना दिसेल. मंदिरात जाण्याचा बहाणा, ग्रंथालयात पुस्तकं चाळण्याचा बहाणा असं बरंच काही. ज्यांना त्यांचं पहिलं प्रेम भेटे (मिळे) त्यांचं ठिक आहे, पण ज्यांना ते फक्त स्वप्नातच मिळे त्यांच्यासाठी समाजाने कांदे-पोह्यांचा साग्रसंगीत कार्यक्रम आखून दिला होताच. आता तो चित्रपटात किंवा मालिकेत घर जुन्या विचारांचं आहे हो! हे दाखवण्यासाठी १५ ते २० मिनिटं कांदे-पोह्यांचं दृश्य दाखवलं जातं. पण खरंच वरून ती मुला-मुलींना भेटण्याची समाजमान्य चौकट असली तरी त्यात धोके होतेच. मुलीला कमीपणा मिळायचा. मुलाचं नाक नेहमी वर अशा सोहळ्यात. तिने चहा, कांदे-पोहे स्वतः बनवून पाहुण्यांसाठी घेऊन यायचं नी मग प्रश्नांच्या फैरी सुरू व्हायच्या. मुलीचं नाव नीट माहित असलं तरी पहिला प्रश्न असायचा काय गं पूर्ण नाव सांग तुझं....इथपासून ते स्वयंपाक येतो का, गाता येतं का, शिवणकाम येतं का...चालून दाखव... सुईत दोरा ओवून दाखव इथवर त्या प्रश्नांच्या फैरी पोहोचायच्या मुलीला नकोसं व्हायचं...
या कांदेपोह्यांच्या कार्यक्रमांचंही रुपडं समाजातील स्तरानुसार बदलत गेलं. ते अगदी अलिकडे आलिशान हॉटेल, रेस्टॉरेंटमध्ये भेटणं, कॅफेमध्ये भेटणं असं सुरू झालं. मुलाकडच्या, मुलीकडच्या सगळ्यांनी एकमेकांना अशाप्रकारे भेटताना वरून म्हणायचं भेटताना की हे साधं भेटणं आहे हो, यात औपचारिकता कशासाठी? पण पुढे जाऊन या पद्धतीलाही कांदे-पोह्याचंच रुप आलं. पण तेही आधुनिक म्हणून मुला-मुलींना मान्य झालं. पण आता मुलं-मुली दोघेही खूप शिकतात. त्यांचे करिअर, नोकरी आणि व्यवसाय विषयक अनेक प्रश्न असतात. आपल्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा आता स्वप्नाळू राहिल्या नाहीत. त्या व्यावहारिक झाल्या आहेत. घरं सांभाळायचं म्हटल्यावर कित्येक मुली धसका घेतात, इथे रोज ऑफिस गाठायची घाई आणि सासरच्या घरात इतकी माणसं सगळं भयंकर वाटू लागतं तिला... शिक्षणाच्या जोरावर पुढे आलेल्या मुली आधुनिक विचार कर्त्या झाल्या तरी मुलं मात्र अजून पारंपरिक आणि आधुनिकतेच्या हिंदोळ्यावर अधांतरी झोके घेतायत.
पूर्वी घरातल्या वडीलधाऱ्यांना इतकंच कशाला आजुबाजुला राहणाऱ्या मंडळींना, नातेवाईकांना मुला-मुलींच्या अपेक्षा माहित असायच्या. त्यामुळे ओळखीतून अनेक लग्नगाठी जुळायच्या. मुला-मुलींविषयी त्यांच्या घरची मोठी माणसं खात्रीने काही गोष्टी सांगायची. त्यामुळे परस्परांना निवड करणं सोपं व्हायचं, विश्वास वाटायचा. पण आता नात्यात आणि पिढ्यांमध्ये बदलत्या काळानुसार अंतर वाढतंय त्यामुळे माझा लाडका मुलगा किंवा मुलगी असली तरी तिच्या आवडीनिवडीविषयी काही ठामपणे घरच्यांना ते सांगता येत नाही. तरुणाई शिक्षणाच्या स्पर्धेत अडकली, मग शिक्षण घेतल्यावर योग्य नोकरी किंवा व्यवसायात टिकून राहण्यासाठी जीवाचं रान करू लागली. त्या नादात त्यांचा आपुलकीच्या नात्यांशी बंध कमजोर होऊ लागला. तो नात्यातल्या ओलावा, ती माया, तो आपलेपणा राहिला नाही. त्यामुळे मनमोकळं बोलायचं, पण ते बोलायचं तरी कोणाशी अशी कित्येकांची अवस्था होते.
आजच्या पिढीलाही आपल्या व्यग्र दिनक्रमातून पावसात भिजावसं वाटतं, तिची किंवा त्याची सोबत असावी असं वाटतं, जशी कवितांमध्ये वर्णन केलेली असते ना अगदी तशी. पण वेळ नसतो. बाहेर मस्त पाऊस पडत असतो आणि ज्या डोळ्यांनी स्वप्नं पहायला हवीत ते डोळे संगणक, लॅपटॉप, आय पॅड अशा कुठल्यातरी स्क्रिनवर खिळलेले असतात, कॉफीचा मग ही वाफाळत थंड होऊन जातो, त्याचंही भान राहत नाही. मग चिडचिड...ताण...कटकट... कधीतरीच निवांत चार क्षण आजच्या पिढीला अनुभवायला मिळतात तेव्हाही घरच्यांपेक्षा ऑफिसमधल्या सहकाऱ्यांसोबत फिरायला प्राधान्य दिलं जातं. कारण घरापेक्षा ऑफिसमध्येच जास्त वेळ जातो ना... तर महत्त्वाचा आहे वेळ...
आजच्या तरुण पिढीलाही ‘डोळे मिटून घेता, दिसतेस तू समोर, फुलवून पंख स्वप्नी, अन् नाचतात मोर, झाली फुले सुगंधी, माझ्या ही भावनांची...’ पाडगावकरांच्या या ओळींतली भावना अनुभवायची आहेच. पण ती त्यांच्या त्यांच्या पद्धतीने. त्यासाठी त्यांचा जोडीदार शोधण्यासाठी घरच्यांनीही मागे लागायची आवश्यकता आहेच. पण ते आधुनिक झाले तशी जोडीदार शोधण्याची पद्धतही आधुनिक व्हायला हवी, असायला हवी. म्हणजे जिथे शिक्षण, नोकरी-व्यवसाय, त्यांची पॅशन, आवड-निवड, स्पर्धेतही टिकून राहून सकारात्मकतेने पुढे जाऊ, एकमेकांना समजून घेऊ, एकमेकांचे आधार न होता सोबती होऊ म्हणणारा जोडीदार सापडेल अशी काहीतरी व्यवस्था हवी. जसं की लग्न जमवणारी संकेतस्थळं आणि त्यांची apps. लग्नाळू तरुण-तरुणींसाठी अगदी योग्य. त्यांना हवं तसंच. आजच्या पिढीसाठी वेळ खूप महत्त्वाचा आहे. तो वेळ १०-१२ वेळा कांदे-पोह्यांच्या कार्यक्रमात घालवायचा नाहीय. कित्येक मुला-मुलींना नुसतं भेटून त्यांना होकार-नकाराच्या झुल्यावर झुलवायचं नाहीय. म्हणून थेट आणि स्पष्ट विचार करणाऱ्या आजच्या पिढीसाठी एबीपी वेडींगसारखं संकेतस्थळ हवंय. जिथे अनेक शक्यतांना पडताळून पाहता येईल, तेही विश्वासार्ह पद्धतीने.
पण हे कांदे-पोह्यांचे कार्यक्रम मागे पडून लग्नसंस्थेत ही आधुनिकता का आली? त्याच्या मागेही काही कारणं आहेत. लग्न करण्याचा पारंपरिक आता हेतू बदललाय. आधी लग्न हा एक विवाह संस्कार होता. एका कुटुंबाचं दुसऱ्या कुटुंबाशी जोडलं जाणं होतं. आता नात्यातली शारिरिक आणि भावनिक गरज याला महत्त्व आलंय. त्यामुळे लग्नाचं वय बदलत आहे. लग्न करण्याच्या पारंपरिक पद्धतींमध्ये बदल आवश्यक आहे. लग्न विधींनाही आता तेवढं महत्त्व उरलेलं नाही. पण तरीही लग्न संस्था ही समाजाचा आजही महत्त्वाचा पाया आहे. पण मनासारखा जोडीदार मिळायला भाग्य लागतं, लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात वगैरे अशा विधानांचा आजच्या पिढीवर प्रभाव नाही. आहे हे, असं आहे ते स्वीकारून पुढे जाण्यावर भर देणारी ही पिढी आहे. मनासारखा जोडीदार मिळावा म्हणजे काय, त्यात कोणकोणत्या गोष्टी यायला हव्यात हे आजची पिढी स्वतः ठरवते आहे. घर, नोकरी-व्यवसाय, कामाची पद्धत, पत, स्वभाव, कुटुंबाविषयी जाणून घेणं, मुला-मुलींचा मित्रपरीवार कसा आहे, दोघांपैकी एकाला कुठल्या गोष्टीचा त्याग करावा लागला तर कुणी नमतं घ्यायचं? या सगळ्याचा सारासार विचार करून आजची पिढी जोडीदाराची निवड करू लागली आहे.
त्यामुळे ‘ती’ला ‘तो’ भेटणार आणि त्याला ‘ती’ भेटणार पण वेगळ्या पद्धतीने. असं म्हणूया हवंतर. पण ओढ ही युगांची हे मात्र सत्य आहे ते असंच चिरंतन राहणार आहे. कारण नाती बदलली, काही कारणांमुळे नात्यात दुरावा आला तरी नाती जपायला हवीत, तुटता कामा नयेत याची काळजीही आजच्या पिढीला आहे. फक्त कधी कधी त्यांचा गोंधळ उडतो, तेव्हा मोठ्यांनी त्यांना समजून घ्यायला हवं. कारण प्रत्येकाला वाटत असतं अख्या जगाने नाकारलं तरी कुणीतरी आपल्याला पूर्णपणे स्वीकारायला हवं, आपल्यावर पूर्णपणे विश्वास ठेवायला हवा, जिवापाड प्रेम करायला हवं, आपल्याला त्याने सुख-दुखात पूर्णपणे पाठिंबा द्यायला हवा. तेव्हाच आपण आपल्याला आयुष्यात जे काही मिळवायचं आहे, जे ध्येय गाठायचं आहे ते गाठू शकतो. अशी व्यक्ती म्हणजे मुलामुलींसाठी पहिल्यांदा त्यांचे आई-वडील असतात. मग ती जागा जोडीदाराने घ्यायला हवी अशी गोड अव्यक्त भावना असते. म्हणूनच पण ओढ ही युगांची या चार शब्दांचं महत्त्व आजची पिढीही जाणून आहे.
पूर्वप्रसिद्धी लोकसत्ता मुंबई वृत्तांत २१ जुलै २०१८
No comments:
Post a Comment