नुकताच
गिरीश मोहिते दिग्दर्शित ‘गुरूपौर्णिमा’ हा चित्रपट पाहिला. नातं की करिअर या प्रश्नाने
निर्माण केलेल्या अनेक समस्यांनी ग्रासलेल्या तरूण पिढीला विवाहानंतरही याच समस्यांशी
पावलोपावली झागडावे लागते. यावर उपाय काय, यातून मार्ग कसा काढायचा, तडजोड कुणी करायची,
एकमेकांना समजून कसं घ्यायचं…या सर्वांची उत्तरं आपल्या ‘गुरूपौर्णिमा’ या चित्रपटातून
मिळतात.
या
चित्रपटामध्ये साचेबद्ध आयुष्य जगू पाहणारे पौर्णिमाचे आई-वडील आहेत. आपल्या करिअरचा
ध्यास घेतलेली पौर्णिमा आहे. आपल्या कलेवर प्रेम करणारा, नात्यांना सावरण्यासाठी धडपडणारा
गुरू आहे. गुरूच्या सुखाचा सतत विचार करणारी त्याची आई आहे. अशी अनेक पात्रं या चित्रपटामध्ये
आपल्या ठायी असलेल्या अनेक भावभावनांचा पुरस्कार करताना आपल्याला पाहायला मिळतात. या चित्रपटाची कथा स्वप्निल गांगुर्डे यांनी लिहिली असून पटकथा आणि संवाद
जितेंद्र देसाई यांचे आहेत.
कला
सर्वसामान्य माणसाला क्षणभराचा विरंगुळा देते, पण कलेच्या प्रेमात असणा-या माणसाचे
आयुष्यच त्या कलेच्या ध्यासाने झपाटलेले असते. अशी व्यक्ती कलेचा ध्यास घेताना आपल्या
कलेला समजून घेणा-या व्यक्तीच्याच शोधात असते. या चित्रपटात गुरू कसबेकर या दिग्दर्शकाचे
पात्र अभिनेता उपेंद्र लिमये याने साकारले आहे. एक ध्येयवेडा दिग्दर्शक, कलाप्रेमी,
प्रियकर आणि पती अशा फेजमधून जाताना तो समर्थपणे यातून मध्यममार्ग शोधतो. पण आपल्या
करिअरच्या (अभिनय) क्षेत्रात यशाच्या पाय-या चढताना पौर्णिमा (सई ताम्हणकर) मात्र कौटुंबिक
जबाबदा-या पेलताना असमर्थ ठरू लागते. मग पुढे काय होते, नातं की करिअर या प्रश्नाचं
उत्तर त्यांना सापडतं का, पौर्णिमाला आपली चूक सुधारण्याची संधी मिळते का, या सगळ्या
प्रश्नांचा उलगडा होण्यासाठी गुरूपौर्णिमा हा चित्रपट पहायलाच हवा.
आपल्या
मनातील भावना समजू शकेल. आपल्याशी सुसंवाद साधू शकेल आणि मानसिक आधार देऊ शकेल, अशा
जोडीदाराच्या शोधात आपण असतो. पण अलिकडे लग्न म्हटले की आजच्या तरुणाईसमोर असंख्य प्रश्न
उभे ठाकलेले दिसतात. लग्न या सर्वोत्तम संस्काराची ते भावना आणि विचार पणाला लावून
चिकित्सा करू लागतात. त्यातून प्रश्नांची, समस्यांची भली मोठी यादी तयार होते. नातं
आणि करिअर सांभाळून आपलं सहजीवन साजरं करणं, फारच कमी जोडप्यांना जमतं.
प्रेमात पडणं ही नैसर्गिक, सहज स्वाभाविक घटना आहे. पण मग त्यातला स्वप्नाळूपणा विरून गेला की वास्तवाची झळ बसू लागते. एकमेकांबद्दल कितीही प्रेम असलं, वागता - बोलताना एकमेकांना सांभाळून घेतलं, कितीही उदात्त दृष्टिकोन ठेवला तरी उमलणारं प्रेम कोमेजू लागतं.
आपण
भारतीय लोक लग्न हा संस्कार मानतो. त्यात प्रेम, शारीरिक गरज आणि कुटुंबव्यवस्था या
तीनही गोष्टी अंतर्भूत आहेत. यातील कुठलीही गोष्ट वरचढ ठरू नये. या चित्रपटात या तिन्ही
गोष्टींमुळे गुरू आणि पौर्णिमाच्या नात्यात संघर्ष निर्माण होतो. या तिन्ही गोष्टीतील
कुठलीही एकच गोष्ट महत्त्वाची मानून विवाहबंधन साजिरे होत नाही. प्रेम, शारीरिक गरज
आणि कुटुंबव्यवस्था या तिन्ही गोष्टी लग्न संस्थेत महत्त्वाच्या आणि परस्परपूरक आहेत.
या
चित्रपटातील पौर्णिमाच्या आई-वडीलांची भूमिका काही प्रेक्षकांच्या पचनी पडणार नाही.
त्यांना वाटेल आजच्या काळात सिनेक्षेत्रात काम करणा-या स्त्रियांकडे आणि पुरुषांकडे
पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. पण या चित्रपटातील पौर्णिमाच्या आई-वडलांसारखे पालक अजूनही
या समाजात आहेत. त्यांना बुरसटलेल्या किंवा मागास विचारसरणीचे न मानता साचेबद्ध आयुष्य
जगू पाहणा-या, आयुष्यातील आव्हांनाना घाबरणा-या गटाचे ते प्रतीक आहेत. त्यांनी साधं-सरळ
आयुष्य स्वीकारलेलं आहे आणि त्यांना त्यातच आयुष्य सन्मानाने जगल्यासारखे वाटते. पण
आपल्या करिअरच्या ध्यासाने, कलेच्या ध्यासाने अनेक आव्हानांना तोंड देण्या-या तरुण
पिढीचे प्रतिनिधी असलेले गुरू आणि पौर्णिमा काही काळासाठी दुरावून पुन्हा आयुष्य नव्याने
सांधताना दिसतात. आपलं प्रोफेशन आणि रिलेशन यांच्याकडे स्वतंत्रपणे पाहिले पाहिजे, हा सकारात्मक
बदल ही या चित्रपटाची सर्वांत सुंदर बाजू आहे. ऐकावी
वाटते, स्पर्शातली कविता पुन्हा पुन्हा… हे गाणं अतिशय रोमॅँटिक आणि श्रवणीय झालं आहे.
सध्यस्थिती पाहता विवाहसंस्था - कुटुंबव्यवस्था यांचा पायाच ढासळण्याची लक्षणे प्रकट होऊ लागली आहेत. आजच्या नात्यांमध्ये दिखाऊगिरी वाढलेली दिसते. लग्न तर कुणीही करतं परंतु वैवाहिक जीवन समृद्ध आणि समाधानी होण्यासाठी जे प्रयत्न करतात त्यांनाच त्या वैवाहिक, कौटुंबिक जीवनातून सहजीवनाचा खरा आनंद मिळतो.
सध्यस्थिती पाहता विवाहसंस्था - कुटुंबव्यवस्था यांचा पायाच ढासळण्याची लक्षणे प्रकट होऊ लागली आहेत. आजच्या नात्यांमध्ये दिखाऊगिरी वाढलेली दिसते. लग्न तर कुणीही करतं परंतु वैवाहिक जीवन समृद्ध आणि समाधानी होण्यासाठी जे प्रयत्न करतात त्यांनाच त्या वैवाहिक, कौटुंबिक जीवनातून सहजीवनाचा खरा आनंद मिळतो.
शेवटच्या
श्वासापर्यंत एकमेकांवर विश्वास ठेवण्याचा अलिखित करार म्हणजे प्रेम. हा विश्वास विवाहबंधनाने
अधिक दृढ होतो. असं म्हणतात की माणूस जोडणं म्हणजे जग जोडणं. आपल्या समाजात आपण विवाह
संस्काराने माणसं जोडण्याच्या या प्रक्रियेला सुरुवात करतो. ही समज या चित्रपटातील
नायक गुरूकडे आहे. त्याला नाती तोडण्यापेक्षा नाती जोडायला आवडतं.
विवाहानंतर
सहजीवनाचे महत्त्व अधोरेखित व्हायला हवे. आपल्या कुटुंब पद्धतीत आपण सहजीवनाचा
आग्रह धरत नाही. त्यामुळे सहजीवन ही संकल्पना आजतागायत प्रत्यक्षात साकारतानाचं प्रमाण
कमी आहे.
स्त्री-पुरुष
यांच्यात सामंजस्य आणि स्नेह नांदताना दिसेल तेव्हाच ख-या अर्थाने समानता येईल. एकमेकांवर
अंमल गाजवण्याची धडपड जिथे असते तिथे सहजीवन शक्य होत नाही. म्हणजेच समाजात दोघांचाही
दर्जा, कदर व किंमत सारखी राहू शकली तरच सहजीवन शक्य होते.
स्वतःच्या
व जोडीदाराच्या स्वभावाची वैशिष्ट्ये समजली की ती जुळवून घेण्यासाठी स्वतःमध्ये काय
व कोणते बदल करायचे हे समजते. आणि असे सकारात्मक बदल वैवाहिक नात्याला वेगळं परिमाण
देत असतात.
विवाह
समुपदेशक वंदना कुलकर्णी एके ठिकाणी असं म्हणतात की, परस्पर सहवासातून एकमेकांची भावनिक
समृद्धी करणं, आस्था दाखवणं, दिलासा देणं, एकमेकांचा आदर करणं अशातून वैवाहिक नातं
उमलतं, फुलतं आणि मग कौटुंबिक जीवन सुंदर होतं. म्हणूनच जेव्हा स्त्री, पुरुष एकमेकांतील
भेद-वैशिष्ट्य यांचा जाणिवपूर्वक आणि प्रेमादरानं स्वीकार करतील तेव्हाच प्रेम बहरण्याची
शक्यता निर्माण होते. आणि त्यांच्या नात्यातील ही पौर्णिमा चंद्रासोबत साजरी होते… या
चित्रपटाचे गुरूपौर्णिमा हे नाव अतिशय समर्पक आणि सूचक आहे. चित्रपटातून तरुण पिढीला
ब-याच प्रश्नांची उकल होईल. हा चित्रपट नवविवाहितांनी जरूर बघावा आणि आपल्या वैवाहिक
जीवनात थोडसं डोकावून पहावं. नात्यांना जपणारी सहजीवनाची ही गुरुपौर्णिमा अनुभवायलाच
हवी.
( ही चित्रपट समीक्षा नसून चित्रपट पाहिल्यानंतर
माझ्या मनात उमटलेल्या विचारांचं संकलन आहे.)
No comments:
Post a Comment