Sunday, 24 August 2014

स्वप्न (भाग दोन)

अशा या शिकारी मंडळींना मिळणारा मानसन्मान पाहून मुकुंदालाही वाटले की आपणसुद्धा बंदूक घ्यावी आणि शिकारीसाठी निघावे. एखादे रानडुकर मारूनच घरी परतावे. खूप दिवस याबाबत विचार करून त्याने बंदूक घेतली. गावातल्या नावाजलेल्या दोन शिकारी मित्रांकडून शिकारीचे धडे घ्यायला सुरुवात केली. मुकुंदाचा मुलगा आपल्या पित्याचे बंदूकीचे प्रशिक्षण न्याहाळीत होता. 

थोडी सवय झाली आनी बंदूक चालवचो अनुभव इलो काय, तू येवस्तीत शिकार करशीत, गावकरी मुकुंदाला प्रोत्साहन देऊ लागले. तर मुकुंदाच्या विरोधात असलेले तोंडातील पानाची पिंक टाकून म्हणायचे, ह्या मेल्याक काय जमाचा नाय पारधीचा. ह्यो नुसतो बारीक-सारीक  जनावराचीच शिकार करतलो. ह्येका काय रानडुकर कदी गावाचो नाय. मुकुंदा मात्र निराश न होता नियमितपणे पारधीला जात होता. पण अजूनही एकही शिकार त्याच्या हातून झाली नव्हती. त्यामुळे तो जरा चिंताग्रस्त होऊ लागला होता. 

पण त्या दिवशी रात्री तर त्याने कमालच केली. संध्याकाळी तो रम्या आणि सु-या या आपल्या शिकारी मित्रांसोबत शिकारीला गेला होता. हळूहळू अंधार पसरत चालला होता. घनदाट जंगलात ते तिघे वाट काढत-काढत सावजाचा माग काढत होते. खूप टेहळणी करूनसुद्धा सावजाचा पत्ता नव्हता. अचानक झुडूपात सरसर ऐकू आली. कुठले तरी जनावर आपल्या दिशेने येत असल्याची मुकुंदाला पक्की खात्री झाली. तो नीट न्याहाळू लागला. त्याचे शिकारी मित्र आसपास सावजाचा माग काढत होते. इतक्यात मुकुंदाला त्याच्या समोर थोड्या अंतरावर एक मोठेसे रानडुकर दिसले आणि त्याने लागलीच चतुराईने नेम धरला. बंदुकीचा चाप ओढून क्षणात रानडुकराला दोन बारात ठार केले. बंदूक झाडल्याचा आवाज ऐकून रम्या आणि सु-या चपापले ते मुकुंदाच्या दिशेने धावले. ते थोडे घाबरले होते. मुकुंदाने काय केले असे कोण जाणे…असे मनात येऊन ते समोर बघताच आश्चर्यचकित झाले. शाब्बास रे मुकुंदा…शेवटी तुया रानडुकराची शिकार केलंसच. तुया आता चांगलो तरबेज शिकारी झालंस. रम्या आणि 
सु-या त्याला असे काय काय बोलून त्याच्या धाडसाचे कौतुक करत होते. 

पण मुकुंदा मात्र स्तब्ध उभा राहिला होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. त्याने हातातली बंदूक खाली टाकली आणि मटकन खाली बसला. मुकुंदाला काय झाले? रम्या, सु-याला काहीच कळेना. “आज मी एका निरपराध मुक्या प्राण्याचा जीव घेतला रे…” असे म्हणून मोठ्याने कळवळून मुकुंदा रडू लागला. त्याच्या अशा बोलण्याने रम्या, सु-यालाही आपली चूक कळून आली. त्यांनी शरमेने माना खाली घातल्या. 

या सर्व घडलेल्या प्रकारानंतर गावात कुणाच्याही घरात बंदूक दिसेनाशी झाली. रामेश्वराला कौल त्यानंतर कधी गुरवाने लावला नाही आणि गावात रक्तबंबाळ झालेले रानडुकर काठीला बांधून देवळात आणले गेले नाही. मात्र गावाला सांस्कृतिक दृष्टीने जोडणारी रामेश्वराची जत्रा आणि जत्रेतील दशावतार दणक्यात साजरा झाला. आज त्या गावातली ती अंधश्रद्धा कायमची नाहीशी झाली होती. शिकारी असल्याचा मानसन्मान गळून पडला होता. ही घटना ज्या मुकुंदामुळे घडली त्याला आता गावातले लोक मानसन्मान देऊ लागले. मुकुंदाची बायको आपल्या नव-याचे शिकारीचे वेड कायमचे गेले म्हणून आनंदून गेली. पण मुकुंदाच्या मुलाचे नामवंत शिकारी होण्याचे स्वप्न मात्र स्वप्नच राहिले.    


शिकारीची ही प्रथा या कथेत फक्त संपुष्टात आली आहे. अजूनही कोकण आणि गोव्याच्या काही भागात अशा प्रकारची अंधश्रद्धा ठाण मांडून बसली आहे. तिचा समूळ नाश करण्यासाठी अशा अनेक मुकुंदांनी पुढाकार घेण्याची नितांत आवश्यकता आहे…

No comments:

Post a Comment

आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...