Thursday, 9 October 2014

सुबल्याचा लगीन (भाग दोन)

अखेर सुबोध गावात आला त्याचे लग्न ठरले. मुंबईहून आणि शेजारच्या गावातून सुबोधची पाहुणेमंडळी आली. लग्न गावडेवाडीतच होणार होतं. पण सावंतवाडीहून येणाऱ्या वधुपक्षाच्या वऱ्हाडाला एका रात्रीसाठी कोणाच्या घरी उतरवायचं हा प्रश्न होता. गावाकडे ही एक पद्धत आहे.
ती पद्धत अशी की वधुपक्ष लांबच्या गावचा असल्यास त्याला गावात लग्नाच्या आदल्या दिवशी बोलवायचे. आणि वराचे घर ज्या वाडीत आहे, त्या वाडीतच वराचे घर आणि चार घरे सोडून पाचव्या घरात वास्तव्य करायचे. म्हणजे लग्नाच्या आदल्या दिवशीची रात्र घालवण्यासाठी आणि लग्न लागेपर्यंत तिथे रहायचे. तर गंमत अशी की वराचे घर व चार घरे सोडून वैशाली काकूचे घर पाचवे होते. वाडीतल्यांना वाटले वैशाली काकू परवानगी देईल की नाही. पण वैशाली काकूने परवानगी दिली आणि काकूचे घर लग्नासाठी सजवायला वाडीतली मंडळी आली. काकूंच्या खळ्यात मांडव घातला गेला. खळे शेणाने सारवण्यात आले. वाडीतल्या लोकांना काही वेळ खात्रीच पटत नव्हती की काकूने परवानगी दिली आहे. मग न राहवून तावडे काकूंनी त्यांना विचारले, 'काय गो वैशाली सुबल्याच्या पावन्यांका ऱ्हवाक जागा कशी दिलस'
तशी काकू म्हणाली, 'ह्या बगा झाला गेला इसरान जावया आपन. सुबल्याक माफ केलय मिया. चला जावा तयारी करूक लागा. होकलकारांचो टरक यैतच इतक्यात.'

मांडवाची, वैशाली काकूच्या घराची सगळी सजावट करून झाली. संध्याकाळी सहाच्या सुमारास वधुपक्षाडील मंडळी चौक्यातील गावडेवाडीत येऊन दाखल झाली. गावडेवाडकरांनी त्यांचे स्वागत केले. वैशाली काकूच्या घरातील एक खोली त्यांना त्यांचे सामानसुमान ठेवायला दिली. वाडीतल्या सगळ्यांना नवरी पाहण्याची घाई झाली होती. ती दिसायला सुंदर होती. साटम काकू म्हणाल्या, 'होकाल दिसाक बरी आसा...तर तिचे वाक्य तोडत तावडे आजी बोलली, 'बरी आसा पन वायच चकणी आसा.'
कातरवेळ झाली, दिवेलागण सुरू झाली. वैशाली काकूचे घर चहूबाजूच्या उजेडाने न्हाऊन गेले. थोड्या वेळाने नवरीला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू झाला. हळदीच्या कार्यक्रमात होवये (गाणी) म्हणणाऱ्या आंगणे काकूही आल्या. नवरी मुलगी पाटावर बसली, तिच्या बाजूच्या पाटावर धेडी (पाठराखीण) बसली. पहिला विधी हळद कांडण्याचा होता. मुसळाने हळद कांडण्यात आली. त्या मुसळाच्या वरच्या टोकावर नवरीच्या बहिणीने तळी (आरतीचे ताट) धरली. मग हळदीच्या गाण्याला सुरुवात झाली. वाडीतले श्रोते गाणी ऐकू लागले.

ताश्या ढोलाची काठी, मदी काय हळदीची वाटी
नवरीला हळद चढवीती, नवरी तुझी ग आई

हळद चढवून झाल्यावर दुसरं गाणं सुरू झालं.

नागचाफा, सोनचाफा
मदी काय हळदीचा लेपा
नवरीला हळद चढविली...

हळदीचा कार्यक्रम होवयांमुळे (गाण्यांमुळे) रंगात आला. रात्र झाली. लग्नसोहळ्याच्या लगबगीने थकलेले सर्वजण झोपी गेले. नवरी मुलीला व तिच्या काही खास पाहुण्यांना वैशाली काकूने घरात झोपायला सांगितले. पुरुषमंडळी घरासमोरच्या खळ्यात झोपली होती. जरा कुठे सर्वांना झोप लागत होती, तितक्यात खळ्यात ओरड ऐकू आली. वैशाली काकूंच्या घरातले सर्वजण जागे झाले, पाहतात तर काय, खळ्यात वाघमुंगळ्यांनी पुरुषमंडळी झोपली होती, त्या जागेला वेढा घातला होता. काही मुंग्या झोपलेल्या मंडळींना चावल्या होत्या. वैशाली काकू त्यांना म्हणाली, 'आज तिनसानाच खळा शेनान सारवलला होता, म्हनून ते मुंगळे इले असतील, तुमी वरच्या पडयेत येवन निजा.' काकूने सांगितल्यावर सर्व पुरुषमंडळी वरच्या पडवीत जाऊन झोपली. लग्नाचा दिवस उजाडला. रात्री वधुपक्षाकडील मंडळींना वाघमुंगळ्या चावल्या ही बातमी गावडेवाडीत सगळ्यांना समजली होती. खळे (अंगण) ओले असल्यामुळे मुंग्या आल्या होत्या. पण वैशाली काकूची सासू काही वेगळेच कारण सांगत होती. तिचे म्हणणे असे होते की, 'गावकारांच्या घरात कोन दारू पिवन इला काय, त्येंका असोच तरास होता. घरात भष्टकार झालो.'



वाडीतल्यांच्या हे लक्षात आले होते की वधुपक्षाकडील पुरुषमंडळी आली तेव्हा फुल टाईट होती. नवरीचा बापही झिंगत होता. बाकी सुबोधने आपल्याला शोभेल अशीच सासुरवाडी निवडली होती.
लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली. सर्वांची धांदल उडाली. लग्न वैशाली काकूच्याच घरी लागणार होते. मुहूर्त जवळ आला. नवरा मांडवात आला. सनई-चौघडा वाजला. मंगलाष्टके सुरू झाली. भटजींनी अंर्तपाट धरला. नवरी आली. दोघांनीही एकमेकांच्या गळ्यात हार घातले. होमाभोवती सात फेऱ्या झाल्या. जेवणाच्या पंगती उठल्या. पाहुण्यांनी नवरा-नवरीला आहेर दिला. सर्व मान-पान झाले.
थोड्याच वेळात वैशाली काकूच्या घराकडून सुबोधच्या घरापर्यंत वरात निघणार होती. इतक्यात नवरीचा बाप चक्कर येऊन पडला. वरात खोळंबली. सगळेजण नवरीच्या बापाविषयी चिंता करू लागले. पण नवरीची आई मात्र आपल्या सौभाग्याकडे पाहून काय समजायचे ते ती समजली. आणि वरातीतल्या मंडळींना उद्देशून म्हणाली, 'ह्या बगा उगाच काळजी करूचा काय कारण नाय. तेंका कालपासून दारू पिवक गावली नाय म्हनून ते अश्ये करतत. हेंच्यामुळे तुमी नको थांबू. तेंका हयसरच पडान ऱ्हवांदे. मिया येतय वराती वांगडा.' मग वरात निघाली. नवरदेवाच्या घरी पोहोचली.

सनई-चौघडा वाजे सप्त सुरात
सुबोधरावांचे नाव घेते, सासरच्या घरात

असा खणखणीत उखाणा घेऊन सुबोधच्या बायकोने उंबरठ्यावरचे माप ओलांडले. अशा प्रकारे सुबोधचे लग्न थाटामाटात पार पडले. पण थोड्याच दिवसात सुबोध भयंकर दारू पितो, हे त्याच्या बायकोला समजले. लग्नाची बोलणी करताना सुबोधने खोटे सांगितले होते की त्याचे कणकवलीला भाजीपाल्याचे मोठे दुकान आहे. पण प्रत्यक्षात तसे काहीच नव्हते. सुबोधने आपल्याला फसवले हे तिच्या लक्षात आले. ती तडक माहेरी सावंतवाडीला निघून गेली. गावडेवाडीत सगळ्यांना सुबोधचा संसार मोडल्याचे वाईट वाटत होते. बायकोच्या घर सोडून जाण्यामुळे सुबोधला अतिव दुःख झाले. इतके दिवस सुरू असलेल्या त्याच्या मस्तवाल आयुष्यात बायकोच्या जाण्यामुळे जोराचा झटका बसल्यासारखे झाले. तो भानावर आला. त्या झटक्यामुळे त्याने दारू कायमची सोडली. आणि वाडीतल्या लोकांना  तो
गयावया करून सांगू लागला...''मिया दारूडो आसलय तरी, माज्या बायकोवर माजा लय प्रेम आसा. तिका माज्या संसारात परत हाडूसाठी मिया कायव करूक तयार आसय. माका मदत करा. मिया आता कदीच दारू पिवचय नाय. माका तुमका वाटात ती शिक्षा करा. पन तिका घेवन येवक माजी मदत करा.''

वाडीतल्या लोकांना सुबोधची दया आली. मग वैशाली काकूनेच पुढाकार घेऊन ती सुबोधबरोबर सावंतवाडीला गेली. सुबोधच्या बायकोची समजूत काढून तिला गावडेवाडीत घेऊनच आली.
वाडीतल्या लोकांमुळे, खास करून वैशाली काकूंमुळे आणि सुबोधच्या बायकोच्या समजशक्तीमुळे सुबोधचा संसार मोडता मोडता सावरला... 





सुबल्याचा लगीन (भाग एक)

कौलारू घरे दाटीवाटीने वसलेल्या चौके गावातल्या गावडेवाडीत सुबोध गावडेचे छोटेसे, टुमदार घर होते. तिथे सुबोध आपल्या आई आणि भाऊ सुधाकर समवेत राहत होता. त्याचा मोठा भाऊ व त्याचे कुटुंब मुंबईत राहत होते. सुबोध आणि त्याचा धाकटा भाऊ सुधाकर हे कायमस्वरूपी गावीच रहात होते. दोघेही चौके आणि आजूबाजूच्या गावात छोटे-मोठे काम करून आपली उपजीविका करत. या दोघांना दारूचे भयंकर व्यसन होते. मध्यंतरीच्या काळात सुधाकर विरण गावात एका हॉटेलात कामाला लागला. गावातल्या लोकांना वाटले आता तरी सुधारेल, दारू सोडेल...पण काही बदल नाही. पगार झाल्यावर दारू ढोसून हा चौक्यात हजर!

पण काहीही म्हणा, दारू प्यायल्यावर त्याचा स्वभाव प्रेमळ आणि देवाणघेवाण करणारा होई. येताना गावडेवाडीतल्या बच्चेकंपनीसाठी आणि म्हाताऱ्या मंडळींना कधी बिस्किटचे पुडे, लाडू, शेव तर कधी फरसाण घेऊन येत असे. शेतावर गेलेले आई-बाप थकून-भागून घरी याचचे आणि मुलांच्या हातात खाऊचे पुडे, फरसाण बघून विचारणा करीत...'काय रे पोरग्यांनो सुधगो इलो की काय?'
सुधाकरची दारू पिण्याची सवय सुटली नाही तरी त्याचे ठिक चालले असताना, इकडे सुबोधची परिस्थिती जरा बिकटच होती. तो चौके गावात मासे, भाजीपाला, फळे विकण्याचा धंदा करत होता. सक्काळीच दारूचं टॉनिक पिऊन डोक्यावर मोठी टोपली घेऊन धडपडत, तोल सावरत कसाबसा गावात फिरे. कधी त्याच्या टोपलीत फळे तर कधी भाजीपाला आणि बुधवार, रविवारचे मासे असत. हे विकून थोडेफार पैसे मिळाले की पुन्हा संध्याकाळी दारू पिऊन तो गावडेवाडीतल्या घरी यायचा. शेजारच्या लोकांना शिवीगाळ करायचा, म्हाताऱ्या आईला त्रास द्यायचा...हे त्याचे वागणे नेहमीच चालायचे. 

एके दिवशी गावचे लोक त्याच्या या वागण्याला खूप कंटाळले...'आपण सुबल्याक कायतरी समज देवया'...या उद्देशाने त्यांनी आपला निर्णय गावडेवाडीचे प्रमुख रमाकांत काका यांना सांगितला. त्यानुसार वाडीतल्या लोकांची सभा भरली. तेव्हा सर्वांनी...'सुबल्याक समज देवा, तुमचा तो आयकात'... असे रमाकांत काकांना सांगितले. पण रमाकांत काकांनी मात्र वेगळाच निर्णय घेतला. त्यांनी सभेत उपस्थित असलेल्या महिला वर्गाला सांगितले...'आजपासून गावडेवाडीत कोणीही दारू पिऊन धिंगानो घालूक लागलो तर त्येका चपलाचो मार देवा'...सभा संपली. त्यानंतर चार – पाच दिवस झाले आणि वाडीतल्या बायकांच्या तावडीत सुबलो गावलो. बायकांनी रमाकांत काकांनी सांगितलेली सूचना लगेच अंमलात आणली. सुबोधला बायकांच्या हातून चपलाचा चांगला चोप मार मिळाला. बायकांच्या या चोप मार देण्याच्या कार्यक्रमाला वैशाली काकूंनी प्रमुख पुढाकार घेतला. त्याला कारणही तसंच होतं.

त्या दिवशी संध्याकाळी सुबोध दारू पिऊन पानंदीतून शिवीगाळ करत चालला होता. पानंद तर वैशाली काकूंच्या घराला लागूनच होती. त्यामुळे सुबोधचा आवाज वैशाली काकूने पहिल्यांदा ऐकला आणि चप्पल घेऊनच बाहेर येत शेजारच्या घरातल्या चार बायकांनाही हाक मारली. अशा प्रकारे ही दारूड्याला चपलाने मारण्याची वाडीतल्या बायकांची मोहीम यशस्वीरित्या पार पडली. आणि याचा परिणामही लगेच दिसून आला. सुबोधचा दोन-तीन दिवस अजिबात आवाज येत नव्हता. साटम काकांनी वाडीतल्या सर्वांना सुबोधने दारू सोडल्याची बातमी दिली. मग नंतर थोड्याच दिवसात सुबोध गाव सोडून निघून गेला. सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला की, 'ह्यो सुबलो गेलो तरी खय?'
रमाकांत काकांनी वाडीतल्या सर्वांना एकत्रित बोलावून सांगितले...'तो सुबलो खय गेलो, त्येका जावदेत, त्याच्या म्हाताऱ्या आवशीची काळजी घेवा. त्या सुधग्याचो पन खय पत्तो नाय'

त्यानंतर थोड्याच दिवसात सुबोधचा मोठा भाऊ आला आणि आईला घेऊन मुंबईला गेला. सुबोधला चौके गाव सोडून दोन वर्षे झाली होती की अचानक एक बातमी गावडेवाडीत पसरली. सुबोध सावंतवाडीला कामाला आहे आणि आता तिथल्याच एका मुलीशी तो लग्न करणार आहे. ती मुलगी नर्सरीत कामाला आहे. वाडीतल्या लोकांना आश्चर्याचा पुन्हा एकदा धक्का बसला. सर्वांना हेच वाटत होते की, 'ह्या सुबल्यात काय बगल्यान त्या सावंतवाडीच्या चेडवानं.'






Friday, 3 October 2014

प्रेरणादायी प्रेम


मनाचा विकास, विचारांचा नवेपणा असावा, भावनेचा उत्कर्ष दर्शवणारी कृती घडावी, आत सळसळणा-या असंख्य विचारांना व्यक्तता मिळावी, क्षणोक्षणी येणा-या गोड अनुभवांचं उदात्त ह्रदयंगम विश्व तेजस्वी कलाकृतीत प्रतिबिंबित व्हावं, अशी अभिलाषा बाळगणा-या प्रतिभावंत लेखकांच्या प्रेमाची गोष्ट त्यांचं आणि आमचं सेम नसतं या कथासंग्रहात शब्दबध्द झाली आहे.
साहित्यिकांच्या साहित्यकृतींकडे, त्यांच्या खाजगी आयुष्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न या कथासंग्रहात आहे. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील कोणत्या घटना त्यांच्या सृजनासाठी प्रेरणा ठरल्याएकंदरीतच त्या घटनांनी त्या साहित्यिकांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर आणि दृष्टिकोनावर कोणता प्रभाव टाकलेला आहे हे शोधण्याचा प्रयास या कथासंग्रहात आहे



विलक्षण प्रतिभावंतांच्या रहस्यमय व्यक्तिमत्त्वाची झलक वाचकांसमोर पेश करण्याचा प्रयत्न केला आहे.’’ शी मनोगतात मूळ लेखिका पुष्पा भारती यांनी आपली भूमिका मांडली आहे. चंद्रकांत भोंजाळ यांनी हा कथासंग्रहाचा मराठीत अनुवाद केला आहे. प्रेम या भावनेच्या स्पर्शानेच अनेकांचं आयुष्य बदलतं आणि काहींचं आयुष्य उद्ध्वस्तही होतं, असं आपण पाहिलंय. या उक्तीचा प्रत्यय देणारा त्यांचं आणि आपलं सेम नसतं हा प्रेमकथांचा संग्रह आहे.

कायाकल्प या कथेतून रेनर मारिआ रिल्के आणि बेनवेनुटा यांची पत्रांतून उलगडणारी भावस्पर्शी प्रेमकहाणी वाचताना आपल्याला थक्क व्हायला होते. कवी रेनर मारिआ रिल्के यांच्या सहवासाने समृद्ध झालेली बेनवेनुटा या कथेत आपल्याला भेटते. कवी रिल्के माझ्या प्रत्येक संघर्षात आणि विजयात मला साथ देणारी माझी प्रियदर्शनी’’ असा बेनवेनुटाविषयी आदर व्यक्त करतात. कवी रिल्केंच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृताम्याच्या नावाने बेनवेनुटा त्यांना पत्र लिहिते. “माझं व्यक्तिमत्त्व घडवण्यात तुमचा फार मोठा वाटा आहे. मी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी या शब्दाचं उच्चारण करत राहीन तो शब्द आहेधन्यवाद अशा भावस्पर्शी वाक्याने या तरल प्रेमकथेचा शेवट होतो.

मर्मभेदी लेखन करणारे अँतन चेकॉव्ह आणि लीडिया यांची प्रेमकहाणी मंत्रमुग्ध या शिर्षकाप्रमाणेच वाचकाला मंत्रमुग्ध करते. “जिवंत प्रतिभाच विचारांना जन्म देऊ शकते. जे काही अनुभवाल त्यावर पूर्ण इमानदारीने लिहाअसा सृजनाची वाट चालणा-या प्रत्येकाला आपलासा वाटावा असा प्रेमळ सल्ला देणारे चेकॉव्ह आणि चेकॉव्ह सोबतच्या अनंत आठवणींचे भांडार स्वतःमध्ये सामावून घेऊन जगणारी लीडिया यांची प्रेमकथा अनोखीच म्हणायला हवी

डेव्हिड कॉपरफिल्ड ही प्रसिद्ध कादंबरी लिहिणारा चार्ल्स डिकन्स ती आत्मकथा आहे हे जाणून होता. या कादंबरीच्या रूपात त्याने आपल्या प्रेयसीला अनमोल अशी भेट दिली होती. आणि त्याची प्रेयसी डोरा हिने ती भेट ओळखली होती. चार्ल्स डिकन्स आणि डोरा यांचं प्रेम एका प्रसिद्ध कादंबरीची सृजनप्रेरणा ठरलं. ही कथा वाचताना आपल्याही स्वप्नाची समाप्ती होऊ नये, असे वाटते.
जगप्रसिद्ध लेखक एच. जी. वेल्स याने पन्नास पुस्तकं लिहिली. आठशे पानांची आत्मकथा लिहिली. पण त्याच्या आयुष्याचं सार एका अडोतीस पानांच्या माईंड अँड एंड ऑन इट्स टॅथर या पुस्तकात सामावलेलं आहे. त्याची प्रेयसी कॅथी हिचा कॅन्सरने मृत्यू होतो. आणि कॅथीच्या भेटीपूर्वी तो जसा एकटा असतो तसाच तिच्या मृत्यनंतर एकटा, एकाकी होऊन जातो. अशी प्रेमकहाणी आहे एच. जी. वेल्स आणि कॅथीचीहजारों प्रतिबिंब एक सत्य!

आर्थर मिलरच्या लेखक व्यक्तिमत्त्वावर जिवापाड प्रेम करणारी सौंदर्यसाम्राज्ञी मर्लिन मनरो आणि विश्वविख्यात नाटककार आर्थर यांची प्रेमकहाणी दंतकथा बनून तुमच्या आमच्या मनात कायमची जिवंत राहिलेली आहे. कारण दंतकथेला विस्मृतीचा शाप नसतो. असे लेखकाने या कथेविषयी म्हटले आहे. “माझ्यासाठी प्रेमाचा अर्थ आहे विश्वास, भरवसा. लहान मूल ज्या विश्वासाने एखाद्याच्या मांडीवर झोपतं. त्याप्रमाणे आपण सर्वस्व सोपवून ज्याच्यावर विश्वास ठेवू शकू अशा माणसावर मी प्रेम करू शकते असा सुंदर विचार देणारी ही प्रेमाची गोष्ट आहे.

दस्तोवस्की आणि मारिया यांची अपराजेय प्रेमकथा आहे. आधुनिक जगातील ताणतणावांचे खोलात जाऊन विश्लेषण करणारा लेखक दस्तोवस्की. विलक्षण प्रतिभेचा धनी असलेला हा साहित्यिक आपल्या व्यक्तिगत जीवनात कसा होता, हे जाणून घेणासाठी अपराजेय ही कथा महत्त्वपूर्ण ठरते.
अशा या प्रेमाला शब्दात मांडू पाहणा-या प्रेमपत्रांसारख्या लिहिलेल्या जगप्रसिद्ध कलावंतांच्या  विलक्षण प्रेमकथा वाचताना प्रेमाची प्रेरणादायी अभिव्यक्ती अधोरेखित होते. म्हणूनच असं म्हणावसं वाटतं की त्यांचं आणि आपलं सेम नसतं


आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...