Saturday, 19 August 2017

सोशल श्रावण

आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व घडामोडींचा उत्स्फूर्त आविष्कार  सोशल मीडियावर पाहायला मिळतो. श्रावणही त्याला अपवाद नाही. कसा आहे हा सोशल श्रावण? सकाळ वृत्तपत्राच्या श्रावण लाईव्ह या विशेष फिचरमध्ये आम्ही सोशल श्रावण हे खास सदर ठेवलं होतं. त्यात दर आठवड्याच्या श्रावणाविषयीच्या सोशल ट्रेंडचं मी निरिक्षण केलं आणि चार आठवड्याचे चार लेख लिहिले. हे चार लेख इथे पोस्ट करतेय...


पहिला आठवडा...

परंपरा आणि नवतेचा श्रावणी मेळ

सोशल मीडियावर काही दिवसांपासून श्रावण हा हॅशटॅग वापरून ट्विट, पोस्ट करायला सुरुवात झाली आहे. यू-ट्युब, इन्स्टाग्राम, फेसबुक, हॉट्‌सॲप आणि ट्विटरवर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील श्रावण पोस्टना बहर आला आहे. इन्स्टाग्रामवर इंग्रजीत श्रावण हा हॅशटॅग वापरून केलेल्या हजारो पोस्ट दिसल्या. त्यात मेंदी काढलेल्या हातांचे फोटो उठून दिसताहेत. सोनू गाण्याचा धुमाकूळ, आठवडाभर मलिष्काची चर्चा, महिनाभरात जीएसटीवर आधारित विनोदांनी धमाल उडवून दिली होती. ती अजूनही सुरू आहे. त्यात आता आपला लाडका श्रावण महिना सुरू होतोय. त्यामुळे साहजिकच नेटकरांनी आता त्यांचा मोर्चा श्रावणाकडे वळवलाय. सोशल मीडियावर नेहमीच विषयांचं वैविध्य दिसतं. तसं ते श्रावणातही दिसतंय. श्रावणी सोमवार, भगवान शंकराविषयीच्या पोस्ट, शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट, श्रावणातील निसर्गाचे विविध विभ्रम टिपणारे फोटो, काही विनोदी तर काही गंभीर अशा पोस्ट श्रावणाविषयी वाचायला आणि पाहायला मिळताहेत.
‘कोणी श्रावण असो वा नसो. रविवार म्हणजे रविवार!’ असं म्हणत काहींनी मांसाहाराने भरलेल्या ताटाचे फोटो पोस्ट केले आहेत, तर काहींनी विनोदी होणं पसंत केलं. 'पहिला मित्र-श्रावण लागला राव. तर दुसरा मित्र म्हणतो, तू काय श्रावण लागेपर्यंत झोपला होता का?' तर दिग्दर्शक केदार शिंदेनी असं ट्विट केलं की माझ्यातला रावण मारण्याचा अल्पसा प्रयत्न म्हणजे श्रावण...आज दुपारपासून सुरू...
काही नेटकरांनी गटारीला खूप विनोदांची जोड दिली तर काहींनी त्यांना दीप अमावास्येचं महत्त्व सांगून गंभीर भूमिका घेतली. आजचा दिवस म्हणजे आषाढ महिन्याची अखेर आणि श्रावण मासारंभ होण्याआधीचा दिवस. त्यामुळे दीपपूजा केली जाते आणि नैवेद्य दाखवला जातो...असे उपदेश सुरू झाले. त्यावर फार काही कमेंट न करता नेटकरांनी आपला विनोदी सूर कायम राखला. त्यात मराठीतील प्रसिद्ध कथाकार सतीश तांबे यांनी श्रावणाविषयी एक पोस्ट लिहिली ती अशी की... 
धार्मिकतेचे काही फायदे असतातच
जसं की सरदारजी आणि बावाजी
सिगरेटी फुकत नाहीत
मुसलमानांच्यात दारू पिणाऱ्यांचे प्रमाण
तुलनेत कमी आहे... 
आणि श्रावण पाळणारे 
अट्टल बेवडेदेखील 
महिनाभर लिवरला विश्रांती 
आणि घरच्यांना सुखशांती देतात...
आला श्रावण श्रावण...  
या पोस्टला शंभरच्या वर लाईक्स मिळाले आणि काहींनी वेगवेगळी मतं मांडत त्यावर कमेंट केल्या. एकूणच सोशल मीडियावर सगळे उत्स्फूर्तपणे श्रावणाविषयी व्यक्त झाले. काहींच्या पारंपरिक पोस्ट तर काहींच्या आधुनिक विचार मांडणाऱ्या नवतेच्या पोस्ट आणि हा सारा श्रावणी मेळ छान जमून आला. श्रावणाची ही तर सुरुवात आहे. अजून पुढे काय काय बहार चढते हे पाहण्यासाठी सोशल श्रावणात मनापासून सामील व्हा. आणि लाईक, कमेंट आणि शेअर करत राहा.

दुसरा आठवडा...
एकदम कडक श्रावण 

संस्कार याला म्हणतात... श्रावण सुरू झाला आणि तिने जिन्स आणि टॉपमधला तिचा डीपी बदलून साडीमधला ठेवला, गुणी आहे खरंच! अशी हास्यमय श्रावण लाट प्रत्येकाच्या व्यग्र दिनक्रमात एक हसरी फुंकर घालणारी ठरली.  
श्रावण महिन्याचा दुसरा आठवडा नेटकरांनी आपल्या फोटो, पोस्ट, व्हिडीओजने मस्त रंगीबेरंगी करून टाकला. त्यात आकर्षण होतं ते खाद्यविषयक फोटो आणि पोस्टचं. श्रावण म्हणजे गोडाधोडाचे पदार्थ किंवा उपवासाचे पदार्थ एवढ्यावरच न थांबता काहींनी हटके रेसिपीज आणि त्यांचे फोटो पोस्ट केले आणि वाहवा मिळवली; तर काहींनी विनोदात रंगून जाऊन... ‘दो दिवाने शहर में, रात या दोपहर में, साबुदाना ढुंडते है...’ असा सूर आळवला; तर काहींनी कोंबड्यांचे फोटो पोस्ट करून त्याला फोटो ओळ दिली... श्रावणाचा आनंद साजरा करताना... काही नेटकरांनी नागपंचमीच्या सणाची विविध रूपं दाखवणारी माहिती, फोटो आणि त्या सणाचं वेगळेपण अधोरेखित केलं. काहींनी याही आठवड्यात निसर्गात रमणच पसंत केलं. त्यामुळे त्यांच्या वॉलवर निसर्गाचे विविध विभ्रम टिपणारे फोटो पाहायला मिळाले; तर काही मुलींनी, महिलांनी छान छान ड्रेस आणि साड्या नेसून काढलेल्या फोटोंनी अगदी फॅशन वीकचा फील दिला.
श्रावण (मराठी आणि इंग्रजी), श्रावणमंथ, श्रावणमास अशा हॅशटॅगची चलती सोशल मीडियावर दिसली. मराठीमध्ये श्रावणावर आधारित कवितांची देवाण-घेवाण व्हॉट्‌सॲपवर झाली. त्यात कुसुमाग्रजांची ‘हसरा, नाचरा, जरासा लाजरा, सुंदर साजिरा, श्रावण आला...’ ही कविता व्हिडीओच्या रूपात जास्त शेअर केली गेली. त्याचबरोबर विनोदी मूड कायम राखत एक भन्नाट व्हिडीओही व्हायरल झाला. त्यात असं होतं, की एक जण जेवायला बसला आहे. त्याच्या तोंडासमोर एक भाजलेला मासा टांगलेला आहे आणि तो जेवताना त्या माशाचा वास घेत घेत जेवतो आहे. त्या व्हिडीओखाली अशी ओळ लिहिली होती की, आमचा श्रावण एकदम कडक म्हणजे कडक.
काही ठिकाणी खास श्रावणात खाद्यपदार्थांच्या विशेष स्पर्धा ठेवण्यात येतात. त्या स्पर्धांविषयी आणि काही हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समधील श्रावण विशेष पदार्थांची रेलचेल अशा आशयाच्या पोस्टही सोशल मीडियावर फिरत होत्या.
महाराष्ट्रात कोकण, खानदेश, पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा अशी प्रादेशिक विभागानुसार सण; विशेषतः आपण श्रावणाविषयी लिहितोय तर श्रावण साजरा करण्यात वैविध्यता दिसून येते. याचं लख्ख प्रतिबिंब सोशल मीडियावर पाहायला मिळालं. कोणी श्रावण पाळतंय, कोणी उपवास धरलाय, तर कुणी कुठलंही व्यसन करत नाहीय. श्रावण महिन्यात येणारे सण साजरे करण्यातलं वेगळेपण असं सारं प्रादेशिकतेमुळे खुलून सोशल मीडियावर साजरं झालं. शहरी मंडळीनी जास्त करून खाद्यपदार्थांच्या पोस्ट टाकण्याला पसंती दिली. जाता जाता विशेष उल्लेखनीय म्हणजे मराठीतील प्रसिद्ध गीतकार गुरू ठाकूर यांनी त्यांच्या गीताच्या काही ओळी मराठीत श्रावण हा हॅशटॅग वापरून ट्‌विट केल्या. त्या अशा होत्या...
नितळ नदीच्या, 
कातळ पाठीला,
हिरवा कंच शहारा
सोनिया उन्हात,
न्हाऊन माखून, 
आल्या गं श्रावणधारा

तिसरा आठवडा
विनोदाची बरसात आणि थोडासा इमोशन 

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, 
क्षणात येते सर सर शिरवे क्षणात फिरुनि ऊन पडे 
अशा सुंदर सुंदर कवितांची देवाण-घेवाण होत पुन्हा एकदा विनोदी सूर पकडत श्रावणाचा तिसरा आठवडा सुरू झालाय. श्रावण महिन्याची गंमतच काही और आहे. याच महिन्याविषयी आजवर भरभरून लिहिलं गेलंय. शाकाहारी की मांसाहारी, अशा न थांबणाऱ्या चर्चेला कारणीभूतही हा श्रावणच आहे. 
श्रावण सुरू असल्यामुळे "फ्रेंडशिप-डे'चे कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत आहेत. तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी. किंवा 
तो श्रावण नसतानाही खातो, 
तो श्रावणातही खातो, 
कारण नॉनव्हेज आवडणाऱ्यांचा धर्म नसतो साहेब!!! किंवा 
श्रावण कोणी कोणी पकडलाय त्याला सोडून द्या, त्याची आई घरी त्याला शोधतेय किंवा 
लहानपणी आई मुलाला श्रावण "बाळ' म्हणायची, आता श्रावण "पाळ' म्हणते... आणि त्यात विनोदी काव्याची भर... उदाहरणादाखल 
श्रावण मासी सुरमई मानसी 
कोलम्बी दिसते चहुकडे 
क्षणात येती मनी खेकडे 
क्षणात येती चिकन वडे 
अशा सगळ्या विनोदांनी व्हॉटस-ऍप भरून गेलं. त्याचबरोबर माशांचे फोटो आणि त्याखालची फोटो ओळ अशी, की ज्यांनी श्रावण पाळलाय त्यांच्यासाठी... अशा बऱ्याच सोशल मीडिया फोटोंनी आपल्या फोनमधल्या डेटामध्ये वाढ झाली. 
त्याचबरोबर उल्लेखनीय म्हणजे एक उंदीर आणि मांजराचा व्हिडीओ सगळीकडे फिरतोय आणि त्याच आशयाचा एक फोटोही आहे- "माझा श्रावण सुरू आहे. एकदम कडक म्हणजे कडक. सहनशक्तीचा अंत पाहू नका.' 
त्यातच स्वप्नील परब नावाच्या एका मुलाची रक्षाबंधनच्या निमित्ताने एक पोस्ट वाचनात आली. फारच गंभीरपणे त्याने ते लिहिलं होतं. बहीण-भावाच्या नात्याविषयीचा एक वेगळा दृष्टिकोन त्याने मांडला. आजची तरुण पिढी सोशल मीडियासारख्या माध्यमातून आपल्या भावना इतक्‍या तरलपणे व्यक्त करू शकते, याचं आश्‍चर्य वाटलं. त्याने एक घटना सांगितली आहे. त्याचबरोबर आपलं त्या पोस्टखाली मत व्यक्त केलंय. त्यात तो असं लिहितो- बहिणीच्या रक्षणाची शपथ घेताना इतर स्त्रियांनाही कमी लेखू नका. कारण त्यासुद्धा कुणाच्या तरी बहिणी असतात. तुमच्या बहिणीच्या बाबतीत इतर पुरुषांनी असा विचार केला तर? रक्षाबंधनाच्या निमित्ताने हे क्षण नात्यांचा सर्वोच्च आनंदाचा क्षण बनवा. सख्खी नसली तरी एका स्त्रीला बहीण मानन्यात खूप धन्यता असते. 
शेवटी असं म्हणावंसं वाटतं, आपलं प्रत्येकाचं आयुष्य हे श्रावण सरींसारख असतं. येणाऱ्या सुख-दुःखाकडे ऊन-पावसाचा खेळ म्हणून पाहा. आयुष्य हिरवंगार होऊन जाईल. हसत-खेळत श्रावणाचा मस्त आनंद लुटा. कधी दिलखुलास दाद; तर कधी विनोदांची बरसात; पण त्याचबरोबर यात थोडासा इमोशन भी जरुरी है... 

चौथा आठवडा
श्रावण येतो आधी मनात

दहीहंडी आणि पोरगी चांगली दिसली म्हणून कोणत्याही थराला जाऊ नये... थोबाड फुटण्याची दाट शक्‍यता असते... 
पुढे हसणारे इमोजी... नेटकरांसाठी गेला आठवडा संमिश्र घडामोडींचा होता. मराठा क्रांती मोर्चाची मोठी लाट सोशल मीडियावर धडकली. तरी श्रावणाची रंगत तसूभरही कमी झाली नाही. सकाळीच काही मेसेजेस व्हॉट्‌सॲपवर आले. ते वाचल्यावर मन प्रसन्न झालं. कारण खात्री पटली की सोशल श्रावणाचा फिवर अजून कमी झालेला नाहीय. मेसेजमध्ये दहीहंडीचं चित्र होतं आणि त्याला हाताने टच करा आणि गंमत बघा अशा आशयाचा तो मेसेज होता. साहजिकच त्या हंडीला टच केल्यावर स्क्रीनवर मोठी उंचावर बांधलेली दहीहंडी दिसायची आणि गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. असे अनेक मेसेज वाचायला आणि बघायला मिळाले. गोविंदा, हंडी, गोपाळकाला, कृष्णजन्म याविषयीच्या मेसेजना बहार आल्याने सणाची सांस्कृतिक बाजू अधोरेखित झाली; पण नेटकर आपल्या स्वातंत्र्यदिनालाही विसरले नाहीत. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणारे मॅसेजही फॉरवर्ड होऊ लागलेत. त्यातच श्रावण बाळ आणि श्रावण पाळ अशा आशयाच्या पोस्ट काही थांबल्या नाहीत.
श्रावणात बेसनाची पोळी आणि भाजलेली कारली यांची चव काही औरच आणि पुढे हास्य इमोजी त्याचबरोबर एक मस्त मांसाहारी पदार्थांनी भरलेलं ताट आणि त्याच्यासोबत काही ओळी तिथे लिहिल्या होत्या. 
श्रावणमासी
म्हावरा आणसी
उपवास सोडीसी
(तेव्हा कुठे)
हर्ष मानसी
श्रावण म्हटला की वेगवेगळ्या फुलांचा पानांचा उत्सव. निळी, पांढरी, पिवळी आणि गुलाबी फुलं आपापल्या रंगांनी वेड लावतात. ट्‌विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर कोकणातील बरेचसे ग्रुप ॲक्‍टिव्ह आहेत. त्यांनी व्हेज-नॉनव्हेज याविषयी आणि श्रावण पाळायचा की नाही पाळायचा यावर ओपीनियन पोल घेतले. काही कोकणवासीयांनी मात्र आपल्या गावाकडच्या आठवणींत रमणं पसंत केलं. हिरव्यागार भातशेतीतून घराकडे येणारी पायवाट, तेरड्याची आणि हरणाची गुलाबी आणि पिवळी फुले. असं सगळं पाहताना मनाला अलगद झोका दिला आणि तो गावाकडच्या बालपणीच्या आठवणींत घेऊन गेला. आता श्रावण संपता संपता नेटकरांना वेध लागलेत लाडक्‍या बाप्पाच्या आगमनाचे. त्याचेही मी येतोय अशा आशयाचे मॅसेज सोशल मीडियावर फिरू लागले आहेत. काहीजण इको फ्रेंडली मूर्ती घरी आणण्याचं आवाहन करतायत, तर काहीजण कमी उंचीची गणेशमूर्ती घरी आणा, असं सांगतायत... श्रावण म्हणजे चैतन्य आणि
सोशल मीडियाचाही महत्त्वाचा गुण म्हणजे चैतन्य. विषय कुठलाही असो, माहिती कुठलीही असो तुम्हाला साध्या सोप्या शब्दात वाचायला आणि बघायला मिळते. कितीही काही झालं तरी इथल्या चैतन्याला उत्स्फूर्तपणे झळाळी चढते.
सध्या विविध विषयांवरचे लाईव्ह आपल्या सोशल मीडियावर पाहायला मिळतात आणि इथला लाईव्हनेस तर कायमच टिकून असतो. शब्दांतूनही अलगद साकारतो. अजित राऊळ यांच्या फेसबुक वॉलवरील कवितेच्या या ओळी पाहा... 

श्रावण येतो आधी मनात 
उंच बांधतो नभी कनात

श्रावण येतो आधी वनात
गाणे होते कवी मनात

श्रावण दिसतो गवतफुलात
आणि हासतो हरित तृणात

श्रावण खुलतो तनामनात
आनंदाच्या सरोवरात

श्रावण दिसतो जनमानसात 
चैतन्यच ये नसानसात

असं म्हणतात की मन आणि छत्री यांचा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा ते उघडले जातात. श्रावण महिनाही असाच आहे. श्रावण महिन्यातील सणावाराच्या निमित्ताने आपण आपल्या कुटुंबासोबत असतो. त्यामुळे आपल्यावर कशाचच ओझं नसतं आणि सोशल मीडियाचंही तसंच आहे. आपल्याला मनमोकळं करण्याची संधी तो देत असतो. त्या संधीचा भरभरून लाभ घेतला पाहिजे. याचा अतिरेक मात्र होता नये. आपलं स्वातंत्र्य आपणच अबाधित राखलं पाहिजे... नाही का?




No comments:

Post a Comment

आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...