लाईक, कमेंट, शेअर आणि ऑनलाईन, लाईव्हचं हे जग. आता तर पावसाळाही लाईव्ह सुरू आहे. कशा कशाची कमी नाहीय. पावसाला लाईक करतोय. अती झाला की कमेंट करतोय. पावसातल्या आठवणी शेअर करतोय आणि सगळं काही लाईव्ह करावंसं वाटतंय. अशा वेळी ज्यांनी आपल्या पावसाळी जेवणात लाईव्हनेस आणलाय त्या सुक्या माशांविषयी लिहिलं पाहिजे ना. म्हणूनच ही ‘पोस्ट’ तुमच्यासोबत शेअर करतेय...
पावसाळ्यात तरव्याच्या काढणी-लावणीचे दिवस सुरू होतं... आणि आई पांढऱ्या शुभ्र तांदळाच्या गरमागरम भाकरीवर सुकटाचा एकेक तुकडा ठेवी. मग आम्ही ती हातात घेऊन खात खात शेत गाठत असू... कधी कधी शेजारची आजी म्हणायची, चेडवा माजो घास काय घशाखाली उतारना नाय. याक सुकाट तरी भाज गो... नकुटभर सुकाट ताटात आसला तरी लय झाला... मग चुलीत फुललेल्या रसरशीत निखाऱ्यावर सुकाट भाजलं जाई... तो वास अजूनही हवाहवासा वाटतो.
मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांतील दिवसात कोकणात सगळ्याच गोष्टींची रेलचेल. किती खाऊ नी किती ठेऊ असं व्हायचं... मग त्यातल्या काही गोष्टी पावसाळ्यासाठी खास राखून ठेवल्या जात. अख्खे काजू कडक ऊन दाखवून ठेवायचे. फणसाच्या आठिळा भाजीसाठी किंवा उकडून खाण्यासाठी म्हणून सुकवून ठेवल्या जात. कैरीच्या फोडी, मिठ लावलेल्या मिरच्या असं बरंच काही सुकवून पावसाळ्यातली बेगमी होई. त्यात (त्यांच्या वासामुळे) लपवूनही न लपणारे हे सुके मासेही असत.
पावसाळ्याचे दिवस सुरू होण्यापूर्वी आठवडी बाजारातून सुके मासे आणले जात. सुके बोंबिल, सुकी बारीक आणि जाडी कोलंबी, पेडवे, तारले, बांगडे किंवा बांगडुले, मोतकं, दोडीया अशी नावं घेत सुक्या माशांची दुकानं पालथी घालून नीट खरेदी करून ते घरी आणले जात. मग ते साफ करून दोन-तीन उन्हं दाखवून व्यवस्थित कोरड्या स्वच्छ पुसून घेतलेल्या डब्यात ठेवले जात. मग पाऊस पडू लागला की, कधी एकदा तो डबा उघडला जातोय, याची वाट बघायचो.
एकीकडे चढणीचे मासे, कुर्ल्या हे सगळं ताजं ताजं मिळेच; पण सुक्या माशांचं सार किंवा नुसता तो भाजून खाल्याशिवाय चैन पडत नसे. तसा कोकणी माणूस अस्सल मासेखाऊ. माशांचा अलगद काटा काढायचा, तर तो त्यानेच. बाबांना माशांचं जेवण असलं की काटा कसा काढायचा, हे आम्हाला सांगण्याचा मोह आवरत नसे. मासे खाण्यातली, काटा काढण्यातली चलाखी त्यांच्याएवढी अजूनही जमलेली नाहीय; पण सुक्या बोंबलांना काट्यासहित खायचं असंही नंतर कळलं. सुके मासे मग ते बोंबील, बांगडे किंवा पेडवे असो... नुसते भाजून भाकरीसोबत किंवा पिठी भात आणि त्यासोबत एखादा भाजलेल्या सुकटाचा तुकडा अहा हा... ही चव ज्याने चाखली त्याने अगदी खाण्यातला स्वर्ग अनुभवला.
निखाऱ्यावर भाजलेले सुके मासे म्हणजे आयत्या वेळी तोंडी लावण्याची सोय. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात फक्त मोड आलेल्या कडधान्यांची पातळ आमटी किंवा सांबार करायचं. उकडा भात करायचा आणि तोंडी लावण्यासाठी सुकट भाजायचं म्हणजे भाजीची गरज भासत नाही. त्याचबरोबर सुक्या माशांची भाजी, सार किंवा कालवण करणं तसं वेळकाढू काम; पण त्याची चव पावसाळी दिवसात भारीच लागते. त्यामुळे ते करण्यावाचून राहवत नाही.
सुक्या बेडगी मिरच्या, लसूण, धणे, बडीशेप, ओलं खोबरं, तिरफळं यांचं वाटण घालून सुक्या बांगड्याचं किंवा पेडव्याचं सार भन्नाट लागतं. भाताबरोबर फक्त हे सार घेऊन खायचं. फाईव्ह स्टारचं जेवण विसरून जाल. खात्रीच.
त्यानंतर सुकी कोलंबी (बारीक-जाडी) जोवलो, गोलमो किंवा काही ठिकाणी याला सुकट असंच म्हटलं जातं. किंवा एकदम छोटे सुकवलेले मासेही मिळतात. तेही छान चविष्ट लागतात. सुक्या कोलंबीची कांदा, मालवणी मसाली, ओलं खोबरं घालून केलेली झटपट भाजी भारीच लागते.
एके दिवशी आईने भाकरी भाजण्याआधी सुकी बारीक कोलंबी कोरडीच तव्यावर भाजून घेतली आणि बाजूला ठेवली. मग भाकऱ्या भाजल्या आणि नंतर खोबऱ्याची हिरवी मिरची (सुकी बेडगी मिरचीही चालेल.) घालून पाट्यावर चटणी वाटली. आम्ही कुतूहलाने बघत बसलो की, आई करतेय तरी काय? सुकी बारीक कोलंबी भाजलीय आणि चटणी का वाटतेय. मग तिने सुकी भाजलेली कोलंबी पाण्यातून निथळून काढली आणि चटणीत घालून चमच्याने ढवळली. चवीपुरतं मिठ घालून आमच्या ताटात वाढली. त्या चटणीची चव काय भारीच होती. सुक्या जाड्या कोलंबीची कांद्याची पात घालून केलेली भाजीही मस्त लागते.
सुक्या माशात उठून दिसणारे बोंबिल आणि त्याच्या पाककृतींचा तर वेगळाच थाट. बोंबील साफ करून त्याचे दोन-तीन तुकडे करून त्यांची भाजी करायची किंवा पातळ रस्सा करायचा. आणि तोही बटाटा घालून. ओलं खोबरं, कांदा आणि लसणाचं वाटण करून मालवणी मसाला घालून झणझणीत जाडसर रस्सा करायचा. वरून चार कोकमं घालायला विसरायचं नाही. मग भाकरीसोबत किंवा भाताबरोबर खायचा.
कधी कधी लावणीच्या दिवसात कामांमुळे दमछाक व्हायची की भाकरीसोबत कुठली भाजी करायची? आणि तो प्रश्न सुक्या माशांमुळे पटकन सुटे. बारीक सुकी कोलंबी कोरडी भाजून पाण्यातून निथळून काढायची आणि त्यात कांदा बारीक चिरून घालायचा. मग मालवणी मसाला घालून वरून तेल टाकायचं आणि मस्त ढवळायचं की ही झटपट भाजी तयार. तसंच सुके बांगडे भाजून त्याचा काटा काढून त्यात कांदा, खोबरं, मालवणी मसाला, तेल मीठ टाकून किसमूर करायची हाही एक भारी प्रकार. किंवा भाजी करायला अजून वेळ मिळाला तर वांग्याची वाटण घालून पातळ थपथपीत भाजी करायची. त्यात सुकी कोलंबी कोरडी भाजून टाकायची किंवा सुक्या बोंबलाचे छोटे तुकडे करून त्यात घालायचे. अशी वांग्याची भाजी भाकरीसोबत किंवा आमटी न घेता भाताबरोबर खायला छान लागते.
सुके मासे आपल्या खाद्यसंस्कृतीतला आता एक अविभाज्य भाग आहे. आपल्या सोईने आवडीने कधीही बेत करून आपलं जेवणाचं ताट त्यांनी परीपूर्ण करू शकतो. सुके मासे म्हणजे पावसातली सोय... पावसातली बेगमी... पण त्या पलीकडेही त्याचं कवित्व आहे. आपण शहरात राहणारी माणसं सुक्या माशांचा बेत केव्हाही आखू शकतो; पण गावाकडे पावसाळ्याआधीच त्याची साठवण करावी लागते. पावसाळी दिवसात... चवीढवीचं काही खासकरून खावंसं वाटतं किंवा कुणीतरी आपल्याला गरमागरम जेवण करून वाढावं, असं वाटतं. खाण्याच्या बाबतीत आपले कुणीतरी लाड करावेत, असं वाटणं हे साहजिकच आहे. अशा वेळी घरातल्या सगळ्यांनी एकत्र या. सुक्या माशांच्या वर सांगितल्याप्रमाणे भन्नाट रेसिपी करा. शेतातल्या बांधावर जाऊन बसता नाही येणार; पण सगळ्यांनी मिळून ताव मारा. आणि हो त्याचबरोबर सोशल मीडियावरील आपल्या मित्रांना जळवायला विसरू नका. फोटो पोस्ट करा आणि लिहा भक्ती परब इंटिंग सुक्या बांगड्याचं सार विथ फिफ्टीन अदर्स... आणि टॅग करा त्यांना... मीही आता तेच करतेय...
वास इलो की नाय सुकटाचो?
पूर्वप्रसिद्धी जुलै २०१७, सकाळ मुंबई आवृत्ती
No comments:
Post a Comment