कुछ दिन तो गुजारो गुजरातमें... बीग बीअमिताभ यांचा आग्रह एेकत होते, अशातच गुजरात
टुरिझमचं आमंत्रण आलं. केला दौरा गुजरातचा. गुजरातमध्ये ‘गुजारलेले’ ते चार
दिवस म्हणजे, दिवाळीआधीच दिवाळीचा फिल देणारे होते. गुजरातमधली अहमदाबाद
आणि वडोदरा ही दोन शहरं, तिथल्या वास्तू आणि सृष्टीसौंदर्य जवळून पाहता
आलं, त्याचा आनंद तुमच्यासोबत शेअर करतेय...
पूर्वप्रसिद्धी १९ ऑक्टोबर २०१७ सकाळ मुंबई आवृत्ती, टुडे पुरवणी सदराचे नाव भ्रमणरंग
लक्ष्मी विलास राजवाडा |
शाळेतल्या इतिहास-भूगोलाच्या पुस्तकांनी आपल्या देशाचंच नाही; तर
जगाचं दर्शन घडवलेलं असतं. नेमक्या त्याच शाळेच्या दिवसात आपल्याला इथे
जाता आलं असतं तर...? पण शक्य नसतं. पण तिथे कधीतरी गेलं पाहिजे, ही
यानिमित्तानं आपल्या मनात रुजलेली पर्यटनाची पहिली पायरी असते.
असं
सगळं मनात असताना अचानक योग जुळून आला... गुजरातभेटीचा. गुजरात म्हणजे
पहिल्यांदा आठवतात ते महात्मा गांधी. नवरात्र, गुजरातची खाद्यसंस्कृती आणि
गुजराती भाषा असं बरंच काही. एका मालिकेसाठी तयारी करत असताना गुजराती
संस्कृतीचा जवळून परिचय झाला होता. पण प्रत्यक्षात गुजरातला जाणं झालं
नव्हतं. त्यामुळे अहमदाबाद एअरपोर्टला उतरल्यापासून आपल्या मनात असलेल्या
गुज्जू गोष्टी तिथे गेल्यावर तशाच जुळतात का, हे पाहणं नकळत सुरू झालं.
अहमदाबादला
हॉटेलवर पोहोचलो. हॉटेलच्या मागच्या बाजूला साबरमतीचा सुंदर सुशोभित
नदीकाठ दिसत होता. नदीकाठी सुंदर बाग होती. हा भाग रिव्हर साईड म्हणून
ओळखला जातो. त्यानंतर गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातल्या मोढेराला गेलो.
सूर्यमंदिराचा अतिशय शांत आणि रम्य परिसर होता तो. पुष्पावती नदीच्या
तीरावर वसलेला. चालुक्य साम्राज्याचा राजा दुसरा भीमदेव याने हे मंदिर
बांधलं. हिंदू वास्तुकलेचं अतिशय देखणं रूप. सभामंडप, त्याच्या छतावरील
नक्षी, समोरचं कुंड, गाभारा, त्यावर कोरीवकाम करून केलेली नक्षीदार कलाकुसर
आम्हाला आश्चर्यचकित करत होती. आपली प्राचीन संस्कृती किती समृद्ध होती,
याचीच साक्ष पटली. आम्ही तिथे गेलो तेव्हा तिथे एका हिंदी मालिकेचं
शूटिंगही सुरू होतं. गुजरात टुरिझमचा सिनेमॅटिक टुरिझम हाही एक विभाग आहे.
त्याचंच उदाहरण हे असं दिसलं. गुजरात राज्याला बॉलीवूड फ्रेंडली टुरिझमसाठी
पुरस्कारही मिळाले आहेत. हे आपल्या महाराष्ट्रातही अधिक चांगल्या पद्धतीनं
होऊ शकतं, असं वाटून गेलं.
मोढेराचं सूर्यमंदिर |
मेहसाणा जिल्ह्यातल्या परतीच्या
प्रवासात एका रस्त्यालगत असलेल्या पथिक आश्रमामध्ये गुजराती
खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेतला आणि मन तृप्त झालं. गुजराती पद्धतीची कढी, सेवा भाजीसारख्या
काही विशेष तिथल्या भाज्या. बाकी ढोकळा, खाकरा, फाफडा, गाठीया तर
गल्लोगल्ली दिसायचेच. त्यातले काही वेगळे प्रकार तिथे खायला मिळाले.
अहमदाबाद
म्हणजे गुजरात का दिल आणि इथे आलात नि ‘लॉ गार्डन’ला गेला नाहीत, तर खूप
काही मिस कराल! तिथे खूप सारी मनसोक्त शॉपिंग करता येते. अगदी स्वस्त भावात
आपल्याला तिथल्या कलाकुसरीच्या वस्तू, कपडे, काही ज्वेलरीचे प्रकार...
बांधणीची डिझाईन तिथे मस्तच मिळते.
दुपारी इथे वामकुक्षीची
पद्धत नसावी. साबरमती आश्रमात दुपारी पोहोचलो. तेव्हा जाताना रस्त्यांवरही
चहल-पहल दिसली आणि आश्रमात तर पर्यटकांची झुंबडच होती. तिथून दिसणारी साबरमतीही
नितांतसुंदर होती. गाधींजींचा मुख्य साबरमती आश्रम आणि त्याच्या
आजूबाजूलाही छोटी घरं वाटावीत, अशी रचना केलेले इतर आश्रम होते. सगळ्यांना
पांढरा आणि चॉकलेटी रंग होता. आजूबाजूला खूप सारी फुलझाडं होती. तिथे
गेल्यावर ‘साबरमती के संत तुने कर दिया कमाल’ या गाण्याची धून कानात ऐकू
येतेय की काय असं वाटलं. गंमत म्हणजे सोबतच्या मैत्रिणीच्या कानातही ती धून
होतीच... गंमतच. मग कळलं की प्रत्यक्षात तिथे काही गाणंबिणं वाजत नव्हतं.
(केमिकल लोचा? नाही...) तो त्या वातावरणाचा परिणाम होता.
गांधीजी जिथे सूत
कातायला बसायचे ती जागा, कस्तुरबांची खोली, पाहुण्यांची खोली, स्वयंपाकघर
असं सगळं त्या आश्रमात पाहायला मिळालं. समोर व्हरांडा. तिथून खाली उतरलं की
साबरमतीकाठची पांढरी वाळू. तिथे गांधींजींचा जीवनप्रवास उलगडणारं
संग्रहालयही आहे. ‘दांडी मार्च’ निघाला ती प्रतिकृती तिथे आहे. इतिहासात
आपण गांधीजींचा सत्याग्रह, त्यांची असहकार आंदोलनं, असं सगळं वाचलंय. पण
त्याची सुरुवात आणि दिशा साबरमतीतून ठरवली गेली. त्या वास्तूने तो सारा
इतिहास अजूनही जागता ठेवलाय आपल्यासाठी.
साबरमतीच्या परिसरातून
भारावलेल्या अंतःकरणाने (हे थोडंसं अती वाटेल; पण व्हायला झालंच होतं
भावूक) बाहेर पडलो.
सिद्दी सय्यद मशीद पाहिली. मार्बलवर सुबक जाळीकाम
केलेल्या नक्षीने लक्ष वेधलं. अहमदाबादमधील ही प्रसिद्ध मशीद. लगोलग आमचा
प्रवास वडोदऱ्याच्या दिशेने सुरू झाला. वडोदरा ही गुजरातची सांस्कृतिक
राजधानी. इथला थाट, इथला रुबाब काही औरच.
इथे वातावरणात उत्साह
आहे. म्हणजे ‘केम छो’ म्हटल्यावर ‘मजामा’ असं उत्तर आलं की समजावं ती
व्यक्ती वडोदऱ्याचीच आहे. इथल्या नुक्कडवर मसाला चहा, फाफडा, गाठीया
खाण्यासाठी पावलं वळतातच. वडोदरा म्हणजे जुनं बडोदा संस्थान. त्यामुळे यहाँ
की फिजाएँ मराठा राजा तिसरे सयाजीराव गायकवाडांचे गुण गाते. इथे
मराठमोळेपणही पुरेपूर आहे.
वडोदऱ्यातल्या प्रत्येक ठिकाणी
सयाजीरावांची सोबत आपल्याला जाणवते. सयाजी बाग, लक्ष्मी विलास राजवाड्यासमोरची बाग, तिथलं
संग्रहालय सारं काही डोळ्यांचं पारणं फेडतं. सयाजीरावांच्या काळात बडोदा
संस्थान कलापूर्ण प्रेक्षणीय नगरी होती. ती ओळख आजही टिकून आहे.
‘लक्ष्मी-विलास’ राजवाड्याची भव्यता आपल्या नजरेत मावत नाही, कॅमेऱ्यातही
बंदिस्त करता येत नाही. ते वैभव तिथे जाऊनच अनुभवता येतं. तिथल्या
वस्तुसंग्रहालयातलं कलादालन समृद्ध आहे. जगभरातील कलाविश्वाचा उत्कृष्ट
नजारा तिथे पाहायला मिळतो. कलेची श्रीमंतीच इथे वसली आहे.
वडोदरा संग्रहालय |
लक्ष्मी-विलास
राजवाड्याच्या समोरची हिरवळ, कारंजी, मोरांचं बागडणं हे सगळं काही शब्दात
मांडणं अवघडच. वास्तुकलेचा इतका अप्रतिम आविष्कार पाहण्यासाठी चार दिवस
नाहीच पुरणार. वडोदरा शहरातलं हे वैभव पाहण्यासाठी घाई करून चालत नाही.
राजा रविवर्मा यांच्यावरील चरित्रात्मक कादंबरीत उल्लेख होता, की त्यांना
सयाजीरावांनी खास चित्रं काढण्यासाठी आमंत्रण दिलं होतं. रविवर्मांनी इथे
येऊन जी तैलचित्रं काढली, त्याचं प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं. आजच्या
आर्ट एक्झिबिशनचा तो पाया आहे. ती चित्रं तिथे पाहायला मिळाली. आर्ट
गॅलरीची रचना अशी होती की, नैसर्गिक प्रकाश त्यावर पडून चित्रांचं सौंदर्य
उलगडलं जावं. न्यूड पेंटिंग; तसंच शिल्पकला पाहताना त्या काळातील कलात्मकता
किती प्रगल्भ होती हे जाणवलं. अलीकडे आपण ‘कलाजाणीवा’ यावर व्याख्यान देत
आणि ऐकत बसतो. त्यापेक्षा ती खरी अनुभूती घेण्यासाठी वडोदऱ्यातील
लक्ष्मी-विलास राजवाडा आणि संग्रहालय परिसरात जायलाय हवं.
माझा
दृढ विश्वास आहे, की आपल्या संस्कृतीमध्ये जेवढं समृद्धीचं भांडार आहे,
तेवढं कोणाकडेच नाही. आपण आपल्याला संस्कृतीला पुरतं ओळखलेलं नाही, असे
गांधीजींचे शब्द साबरमतीच्या संग्रहालयात वाचले होते, ते या क्षणी आठवतायत.
अहमदाबाद आणि वडोदरामध्ये गुजारलेल्या त्या चार दिवसांत तिथल्या गुज्जू
संस्कृतीला जाणून घेता आलं. ती आनंदयात्रा आठवणीत कायम राहील.
पूर्वप्रसिद्धी १९ ऑक्टोबर २०१७ सकाळ मुंबई आवृत्ती, टुडे पुरवणी सदराचे नाव भ्रमणरंग
No comments:
Post a Comment