Monday, 5 June 2017

पडद्यावरची "प्यारी' मॉं!

कलावंत आपल्या कलेतून नाविन्याचा ध्यास घेत असतो. हा ध्यास त्याला कधी स्वस्थ बसू देत नाही. असा ध्यास घेणाऱ्यांपैकी एक गुणी अभिनेत्री रिमा लागू. त्यांनी हिंदी-मराठी सिनेमा, मालिका, नाटक आणि जाहिरातींमधून आपल्या अभिनयाची ताकद वेळोवेळो दाखवून दिली; पण त्यांच्या खास लक्षात राहणाऱ्या भूमिका या आईच्या आणि आईपणाच्या वेगळ्या व्याख्या मांडणाऱ्या होत्या. पडद्यावरच्या "प्यारी' "मॉं'ला ही आदरांजली... 



रिमा लागू आजच्या पिढीच्या आईचे मूर्तिमंत स्वरूप. सिनेमात मुख्य अभिनेता किंवा अभिनेत्रीची आई म्हणजे सहायक कलाकाराची भूमिका; पण रिमाजींनी त्यांच्या ममता आणि वात्सल्याने समरसून ती भूमिका अशी काही साकारावी की त्यांची मुख्य भूमिका आहे की अगदी काहीच दृश्‍यांपुरती याचे भानच राहू नये. त्यांच्याबद्दल लिहिताना त्यांचा एकेक सिनेमा नजरेसमोर तरळतोय. राजश्री प्रॉडक्‍शनच्या "हम साथ साथ है' सिनेमातल्या एका दृश्‍यात... त्यांच्या तिन्ही सुना नटून थटून बसल्यात, गोकुळाष्टमीचा सण आहे. त्या लाडक्‍या कान्हाची म्हणजेच त्यांच्या तिन्ही मुलांची त्यांच्याकडेच लाडे लाडे तक्रार करताहेत... मग गाणे सुरू होते... "मय्या यशोदा, ये तेरा कन्हय्या, पनघट पे मेरे पकडे है बैया...' तर या गाण्यात "मय्या यशोदा' हे दोन शब्द जेव्हा उच्चारले जातात, तेव्हा कॅमेरा रिमाजींच्या चेहऱ्यावर येतो. तेव्हा जो त्यांचा ममतेने ओतप्रोत असा प्रेमळ चेहरा दिसतो ना... प्रेक्षकांच्या तोंडून पटकन निघून जाते, आई असावी तर अशीच... 
मय्या यशोदा हे गाणेच नाही... याच सिनेमातले "ये तो सच है की भगवान है' या गाण्यात त्यांची तिन्ही मुले त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त गाणे म्हणतात. त्यात एक असे कडवे आहे की- 

जन्म देती है जो, 
मॉं जिसे जग कहे, 
अपनी संतान में प्राण जिसके रहे, 
लोरिया होठों पर, 
सपने बुनती नजर, 
नींद जो वार दे, 
हॅंस के हर दुःख सहे, 
ममता के रूप में है प्रभू, 
आपसे पाया ये वरदान है...धरती पे... 


हे संपूर्ण कडवे गायले जात असताना रिमाजींनी चेहऱ्यावर आईची माया दाखवणारा जो आंगिक अभिनय केलाय, त्याला तोड नाही. अशी कित्येक उदाहरणे देता येतील. त्यातही आवर्जून उल्लेख करावा अशी "वास्तव'मध्ये त्यांनी साकारलेली रघूची आई शांताची भूमिका. या सिनेमातला शेवटचा सीन अंगावर काटा आणतो. आई-मुलाच्या नात्यातील असे दृश्‍य क्वचितच कुठल्या सिनेमात असेल. सिनेमाचा शेवट अजिबात न विसरता येण्यासारखा आहे. रघू आणि त्याच्या आईमधला तो संवाद हे रिमाजींच्या अभिनय कारकिर्दीतले मानाचे पान. त्यांनी आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये आईच्या भूमिका केल्यात. त्यापैकी "कयामत से कयामत तक', "मैने प्यार किया', "आशिकी', "साजन', "दिलवाले', "हम आपके है कौन', "जुडवा', "येस बॉस', "कुछ कुछ होता है', "हम साथ साथ है', "वास्तव', "जिस देश में गंगा रहता है', "कल हो ना' ही नावे घेतल्याशिवाय त्यांच्याविषयी बोलणे केवळ अशक्‍य. 

राजश्री प्रॉडक्‍शनसोबत त्यांचे अनोखे नाते होते. "मैने प्यार किया', "हम आपके है कौन', "हम साथ साथ है' यातल्या रिमाजींनी साकारलेल्या भूमिका म्हणजे आईपणाची नवी व्याख्याच मांडणाऱ्या होत्या. त्या भूमिकांमध्ये रिमाजींशिवाय दुसरे कोणी ही कल्पनाही करू नये. इतक्‍या अप्रतिम त्यांनी त्या वठवल्या. प्रेम या नावाने त्यांनी मारलेली हाक अजूनही प्रेक्षकांच्या कानी येईल. इतके त्या भूमिकेतील आईच्या हाकेत वात्सल्य होते. सलमान खानची आई असेही त्यांना संबोधले जायचे. पडद्यावर त्या खरेच सलमानने साकारलेल्या प्रेमच्या आई वाटायच्या. राजश्री प्रॉडक्‍शनचे सिनेमे म्हणजे संस्कारी सिनेमे अशी ओळख; पण रिमाजींनी त्यांच्या संवादामधून जे आईपण दाखवले, ते कधीच अती वाटले नाही. अलीकडे आपण अतिशय भावनिक विषयावर कोण बोलायला लागले की अरे थांब... बस्स नको, असे वाटते. कारण आपल्याला ती खोटी आपुलकी वाटते; पण तुम्ही रिमाजींच्या आईच्या भूमिकेतील संवाद पाहताना किंवा ऐकताना असे वाटत नाही. इतकी सहजता त्यांच्या अभिनयात होती. 


बॉलीवूडच्या आताच्या आघाडीच्या अभिनेत्री - अभिनेत्यांच्या त्या आई झाल्या होत्या. त्यांच्याशी खऱ्या आयुष्यातही त्यांचे आई-मुलाचे नाते होते. हिंदीत काम करत असताना त्या मराठी सिनेमा आणि नाटकापासून अजिबात दूर गेल्या नाहीत. हिंदी-मराठी सिनेसृष्टी, हिंदी-मराठी मालिका आणि नाटके अशा माध्यमांमध्ये आपला वावर कायम ठेवला. 
"सिंहासन', "शुभमंगल सावधान', "बिनधास्त', "आई शपथ', "सावली', "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय', "घो मला असला हवा', "अनुमती', "कट्यार काळजात घुसली' (कट्यारीचा आवाज), "जाऊ द्यां ना बाळासाहेब' अशी त्यांच्या मराठी सिनेमांची नावे या क्षणी आठवताहेत. त्यात खास उल्लेख करावी अशी बिनधास्त आणि सावलीमधील त्यांची भूमिका. या दोन्ही सिनेमांतील त्यांच्या भूमिकेमध्ये जे वेगळेपण बघायला मिळालेय, हे केवळ अप्रतिम. त्यांच्यातल्या आईपणाला आपलेपणाची जी किनार लाभायची ती खास त्यांच्या शैलीमुळे. या शैलीला आपण आता मुकलो आहोत. 

मुलाला पाहून हंबरडा फोडणे म्हणजेच आईपण दाखवणे नव्हे तर डोळ्यांतून वात्सल्याची ओढ दाखवणेही आईपण असते हे रिमाजींनी दाखवून दिले. आईच्या भूमिकेला त्यांनी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. आई म्हणजे अगदी कारुण्याची, ममतेची साक्षात मूर्ती अशी जी प्रतिमा होती त्याला छेद दिला असे म्हणता येईल. त्यांनी साकारलेली आई चेहऱ्याने खास करून डोळ्यांनीच जास्त व्यक्त व्हायची आणि संवादाची त्याला जोड मिळाली की लाजवाब. दुसरा शब्दच नाही. 

हिंदी-मराठी सिनेमात त्या अभिनय करत होत्या तरी त्यांची मालिकांमधून खास ओळख बनली होती. त्यांच्यातल्या विनोदी अभिनेत्रीचे दर्शन मालिकांमुळे प्रेक्षकांना होऊ शकले. लहानपणी त्यांची "श्रीमान श्रीमती' ही मालिका लागायची. ती मालिका निखळ विनोदी मालिका म्हणून लोकप्रिय होतीच; पण यातील कलाकारांचेही छान सूर जुळले होते. रिमाजींनी साकारलेली कोकिला कुलकर्णी प्रेक्षक कधीच विसरणार नाहीत. त्यानंतर "तू तू मै मै' मालिकेत सुप्रिया पिळगावकर आणि रिमाजींची जुगलबंदी लय भारीच होती. वर्णन करायला शब्दच नाहीत. नुकतीच त्यांची भूमिका असलेली "नामकरण' मालिका स्टार प्लसवर सुरू आहे. त्यात त्या दयावंती मेहताची भूमिका साकारत होत्या. 
बॉलीवूड मातृत्वाला पारखे झालेय, अशी भावना समस्त बॉलीवूडकर व्यक्त करताहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रही त्यांच्या रूपात एका हरहुन्नरी अभिनेत्रीला मुकले आहे. "सासू माझी ढॉंसू' या नाटकाच्या प्रयोगाला शिवाजी मंदिरला त्यांच्याशी भेट झाली होती. तीच भेट शेवटची ठरली. साक्षात आईला भेटल्याचाच तो अनुभव होता.

अभिनय कलेतील न भरून निघणारे हे स्थान जे ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ आहे. रिमाजींच्या अभिनयातील ममत्वाने ते सदैव लखलखत राहील. 


Saturday, 1 April 2017

राहूया कनेक्टेड... wi-fi शिवाय!

इंट्रो - 

अलिकडे आपण कनेक्टेड असतो; पण आपल्या जवळच्याशी नव्हे तर कोणा लांबच्याशी... नेटद्वारे. दोन मित्र जरी भेटले तरी त्यांचा निम्मा वेळ व्हॉट्सअप चेक करण्यात जातो. एकमेकांशी भेटून बोलणं विसरत चाललोय का आपण?






काय बाबा, कशाला केलात फोन? ग्रुपवर टाकायचा ना मेसेज? साधं ‘हाय हॅलो’ बोलायच्या आधी नीरजचा असा डायलॉग ऐकल्यावर त्याच्या बाबांना काय बोलावं ते कळेना. त्यांनी फोनच ठेवला. 
बाजूला नेहा उभी होती. ती म्हणाली, ‘काय रे दादा, चिडतोयस का बाबांवर? त्यांना काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असेल ना...’ ‘अगं, पण तू बघतेयस ना, मी माझ्या बॉसबरोबर स्काईपवर बोलतोय... आणि १० मिनिटांचा जरा ब्रेक काय घेतला... वाजला लगेच फोन... 
हे देसाई कुटुंब. त्यांनी नव्या घरात शिफ्ट झाल्या झाल्या आधी घरात वाय-फाय कनेक्‍शन घेतलं. सगळं घर नीट लावायच्या आधी हे कुटुंब ऑनलाईन आलं. त्यांची ग्रुपवर चर्चा झाली. घराचं नवं डेकोरेशन, फर्निचर, घरात कुठली गॅजेट्स असावीत? अशी बरीच चर्चा त्यांच्या ग्रुपवर झाली. आजी-आजोबांना फिरायला गोव्याला पाठवलेलं होतं. त्यांनी ग्रुप चॅटिंगमध्येच त्यांना घरात काय काय हवं ते सांगितलं आणि ऑफलाईन झाले. बाबांना काहीतरी बोलायचं होतं म्हणून फोन केला, तर त्यांना हे उत्तर मिळालं. 
ऑनलाईन असणाऱ्यांचे असे संवाद आपल्याला नवे नाहीत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, रेल्वे स्टेशन आणि काही मोक्‍याची ठिकाणं अशा सगळीकडे वाय-फाय कनेक्‍शन सुरू होतातय. त्यामुळे हे संवाद नित्याचे होणार हे नक्की. हे जग टुगेदर नसलं तरी कनेक्‍टेड असणार हे ही नक्कीच. पण हे कनेक्‍शन आपुलकीचं असेल का? ते मात्र प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असेल. हल्ली घरात जेवण करण्यासाठी बाई ठेवायची झाली तर तिला विचारलं जातं, तुला यु-ट्युबवर जाऊन व्हिडीओ बघून रेसिपी करता येतात का? तर असं हे सगळं!
मधली पिढी, युवा पिढी आपल्या ऑफिस, करिअरच्या फेऱ्यात अडकलेली, आजी-आजोबा एखाद्या सोशल ग्रुपमध्ये हिरिरीने भाग घेणारे, नातवंडांना संस्कारांचा डेली डोस व्हॉट्‌सॲपवर देणारे... अशी ही कौटुंबिक जीवनशैली झालीय. यात कधी अती झालं की सगळं उलटपुलट होतं. कधी सोशल मीडियावर घरच्या कुरबुरी निघतात आणि त्यातून प्रकरण हातघाईवर; तर कधी एखाद्याच्या जीवावर उठणारे प्रसंग घडतात. 

हा सोशल मीडिया जसा सगळ्या नातेसंबंधात डोकावतोय, तसे त्याआधी त्याच्याबरोबर सध्या दुसऱ्या बाजूने इलेक्‍ट्रॉनिक गॅजेट्सने आपलं घर भरतंय. 
 जाहिरातीत आपल्या घरच्यांसाठी प्रेमाने ‘मागवा या या गोष्टी’ असं सांगतात, तसं आपण टीव्ही, फ्रीज, कुकर, मिक्‍सर, लॅपटॉप, मोबाईल असं एकेक सगळं मागवत जातो आणि शेवटी त्या गॅजेट्सच्याच आहारी जातो. म्हणून तर हल्ली आजीने नातवाला सांगितलं, बाळ विंडो उघड; तर नातू म्हणतो, उघडतो; पण आधी पासवर्ड सांग. मध्यंतरी एका जाहिरातीत असं दाखवलं होतं की बाळ जन्मल्यावर रडण्याऐवजी वाय-फायचा पासवर्ड विचारतं... पण खरंच अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते. जर आपण हातातलं गॅजेट सोडून इतरांशी चार शब्द बोललो नाही तर! ‘आवड असेल तर सवड नक्कीच मिळते’ यानुसार आपण आवडीने एकेक काम केलं ना, तर त्या कामाचं ओझं वाटत नाही.

 आपल्या आवडीचं रूपांतर व्यवसायात झालं तर.. या संकल्पनेला जन्म देऊन भारतीयांनी स्टार्टअपच्या विश्‍वात प्रवेश केला. पण पुन्हा ते आपल्या कुटुंबापासून तुटलेच. हेच जे तुटलेपण आहे, तेच आपल्याला सांधायचं आहे. आपल्या परदेशी मित्रांना किंवा ऑफिसमधल्या कलिग्सना इम्प्रेस करण्यासाठी ‘घर का खाना’ची तारीफ करू नका; तर खरंच एखादी डिश बनवून त्यांना खायला घाला; किंवा त्यांना घरी बोलवा. हवं तर त्याला कॉर्पोरेट गेट टुगेदर समजा.
अलीकडेच काही घटना अशा घडल्या की, वृद्धाश्रम आणि पाळणाघराविषयी बरंच काही बोललं जात होतं. तेव्हा बऱ्याच जणांचं असं मत होतं, की एकत्र कुटुंबपद्धती असेल तर अशा समस्या निर्माणच होणार नाहीत. पण मुद्दा हा आहे, की सुरुवात कोणी आणि कुठून करायची. पुन्हा ही गोष्ट फिरून हल्लीच्या आधुनिक मुलींवर येते. त्यांना सासू-सासरे नको असतात. अशा वेळी दोन्हीकडून प्रयत्न होणं गरजेचं आहे. बराचसा वेळ आपला ऑफिसमध्ये जातो. फ्लॅट संस्कृतीमळे शेजाऱ्यांशी चार हात लांबच राहणं आपण पसंत करतो. कारण आपण ‘टीटीएमएम’ वाली पिढी आहोत. तुझं तू, माझं मी हीच भाषा सध्या आपल्याला कळते. मग आपण, आपलं आणि आम्ही हे सगळे शब्द परके होऊन जातात.

असं सगळं सध्या चाललंय, खूप काही घडतंय. तरीही संवाद होत नाहीय. ऑनलाईन इतकी मित्रमंडळी जमवलीयत; पण कुणासोबत बसून कित्येक दिवस घटकाभर बोलल्याचं आठवत नाही. यावर उपाय काय, असं विचारलंत तर एक छोटासा उपाय सांगते. एके दिवशी कुटुंबातल्या सगळ्यांनी एकत्र या आणि मिक्‍सर, कुकर, ओव्हन अशी कुठलीच स्वयंपाकघरातील आधुनिक साधनं न वापरता सगळ्यांनी मिळून स्वयंपाक करा. आजी-आजोबांना त्यांच्या तरुणपणीची एखादी पाककृती विचारा आणि बनवा. त्या दिवशी सगळे ऑफलाईन राहा. मोबाईलमधील डेटा कनेक्‍शनही बंद ठेवा. किंवा एखादा दिवस घरातला वीजपुरवठा (लाईट कनेक्‍शन) बंदच ठेवा. बघा, काय काय अडतं ते. शक्‍यतो अडलं तरी त्याने तुम्हाला काही फरक पडलेला नाहीय, असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि मनसोक्त बोला. बोलताना विषय सगळे घरगुतीच ठेवा. पुन्हा गप्पांमध्ये ऑफिस आणू नका. मग बघा काय धमाल येते ती. आपल्या भावंडांसोबत सगळे विषय शेअर करा. अगदी मला माझ्या कॉलेजमधला तो मुलगा मला आवडायचा किंवा ‘डियर जिंदगी’मध्ये आलिया भट्ट काय दिसते ना. पण नाही; विराट कोहलीच भारी दिसतो, अशा सगळ्या विषयांवर तुम्हाल बोलता येईल आणि बोलला नसाल तर आपण आपल्या भावंडांशी या विषयावरही बोलू शकतो, याचं लय भारी वाटेल. ही इलेक्‍ट्रॉनिक (आधुनिक) उपकरणं आपल्या मदतीसाठी आहेत. त्यांची योग्य वेळी मदत घेऊन त्यांना बाजूला करायचं. नाहीतर ती आपली जागा कधी घेतील हे आपल्याला कळणारसुध्दा नाही...

‘जिंदगी’ चॅनेलवर ‘भागे रे मन’ नावाची एक मालिका लागायची. त्यात एक संवाद होता. ‘फॅमिली में चाहे कितने भी प्रॉब्लेम्स क्‍यूँ न हो, फोटो खिंचते वक्त चेहरे पे स्माईल होनी चाहिए।’ पण असे एकत्र मिळून फॅमिली सेल्फी पोस्ट करण्यापेक्षा एकत्र येण्यातली गंमत स्वतः अनुभवा. हल्ली करण्यापेक्षा आपण दाखवण्याला महत्त्व देत असल्यामुळे बऱ्याच गोष्टी करायच्या राहून जातात. आठवा आपल्या आई-बाबांना, मित्रांना, आजी-आजोबांना भेटून शेवटच्या गप्पा कधी मारल्यात? मी तर म्हणते, तेही जाऊ द्या. तुमचे तुम्हीच स्वतःला कधी भेटलात? हा प्रश्‍न विचारा. काय म्हणताय, थांबा जरा? लेटेस्ट सेल्फी कुठला अपलोड केलाय तो बघतो...?
थोडक्‍यात मला सांगयचंय ते हेच, की चला ऑफलाईन होऊ या. घर गॅजेट्सनी नाही तर आपल्या माणसांनी भरूया. नुसतेच कनेक्‍टेड नको टुगेदर होऊया आणि तुम्हाला हल्लीचा नियम तर माहितच आहे. दोन ब्लू स्टीक दिसल्या म्हणजे याचा अर्थ मॅसेज वाचला असं होत नाही. तसंच जोडलेले असूनही एकमेकांना भेटून खूप मनापासून काही बोलल्याशिवाय आपण एकत्र असू शकत नाही. नव्या वस्तू कधीही विकत घेता येतील; पण नाती ही जपावीच लागतात. नुकत्याच लावलेल्या छोट्याशा रोपट्याची आपण काळजी घेतो, तशी नात्यांचीही काळजी घ्यावी लागते. मगच ती फुलतात. म्हणूनच म्हणते, स्टे टुगेदर.  

इंट्रो २ - 
नव्या वस्तू कधीही विकत घेता येतील; पण नाती ही जपावीच लागतात. चला, ऑफलाईन होऊ या. घर गॅजेट्सनी नाही तर आपल्या माणसांनी भरूया. घरात वायफाय नसले तरी कनेक्टेड राहू शकतो हे स्वतःबरोबर इतरांनाही सांगूया...

 पूर्वप्रसिद्धी - सकाळ मुंबई आवृत्ती वर्धापनदिन विशेष लेख (२४ जानेवारी २०१७)




मालिका विश्‍वातील लखलखतं "रोहिणी' नक्षत्र

दामिनी, अवंतिका, अक्कासाहेब, राधिका असो की राजश्री प्रॉडक्‍शनच्या गाजलेल्या हिंदी मालिका. रोहिणी निनावेंच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली प्रत्येक व्यक्तिरेखा आणि मालिका लोकप्रिय होतेच. मालिकांच्या विश्‍वात आपल्या लेखणीने यशस्वी मालिकांची गुढी उभारणाऱ्या प्रसिद्ध लेखिका रोहिणी निनावे यांच्या मालिका लेखनाला नुकतीच 20 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला हा आनंदसंवाद. 
अश्‍शी आहे मी... 
मला लेखनाव्यतिरिक्त स्केचेस काढायला आवडतात. मी चांगली खवय्यी आहे. चांगलं-चुंगल खायला, खास करून बटाटावडा आवडतो. गाणं म्हणायला, ऐकायला आणि मस्त गाण्यावर नाचायलाही आवडतं. इतकं, की मला वाटतं की मी लेखिका नसते ना तर नृत्यांगनाच झाले असते! शॉपिंगही खूप आवडतं मला. लिहायला आवडतंच... तेही बेडरूममध्ये बेडवर बसून. सिंगापूर आणि कॅनडा ही माझी फिरण्याची आवडती ठिकाणं. लेखनाचा कंटाळा आला की टीव्हीवर बातम्या बघते. माझा आवडता तकिया कलाम आहे... gosh. 


Rohini Ninave

दामिनी ही माझी पहिली मालिका. मी लिहायला लागले तेव्हा फक्त दूरदर्शन होतं. ती पहिलीच दैनंदिन मालिका होती. त्या वेळी मुक्तपणे लिहीत गेले तशी ती मालिका आकार घेत गेली. फक्त बजेटचा विचार करून तेव्हा लिहीत होते. आता खूप गोष्टींचा विचार करावा लागतो. वाहिन्यांची संख्या वाढलीय. प्रत्येक वाहिनीचा एक वेगळा बाज आहे. प्रत्येक वाहिनीचे प्रेक्षक वेगवेगळ्या मानसिकतेचे असतात. त्यामुळे लिहिताना या सगळ्या गोष्टी डोक्‍यात ठेवाव्या लागतात. 
आता खूप काही बदललंय. पूर्वी कथा लिहून पाठवायचो. आता पटकथा ऐकवावी लागते. तेव्हा पटकथा ही कमी शब्दांत असायची, पण आता अध्यार्हून अधिक संवाद तुम्हाला पटकथेमध्ये लिहून द्यावे लागतात. म्हणजे जवळजवळ त्या दृश्‍याचं पूर्णतः मूव्हमेंटसहित वर्णन करावं लागतं. खूप डिटेलमध्ये लिहावं लागतं. मालिकांच्या भागांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कथा खूप फुलवत न्यावी लागते. थोडक्‍यात आटपू शकत नाही, त्यामुळे सतत नवनवीन विचार करावा लागतो. विविध वाहिन्यांवर एकाच वेळी अनेक मालिका सुरू असल्याने आपल्या मालिकेचा भाग जास्तीत जास्त उत्कंठावर्धक कसा होईल हे बघावं लागतं. आपण जे लिहितोय ते दुसऱ्या कुठल्या मालिकेत तर नाही ना आलंय हे बघावं लागतं. त्यासाठी विविध वाहिन्यांवर सुरू असलेल्या मालिकांवरही लक्ष ठेवावं लागतं. आधी निर्माते जायचे आपापली कथा घेऊन... आताही तसंच आहे, पण हल्ली जास्त प्रमाणात वाहिन्यांकडून निर्मात्यांना संकल्पना दिल्या जातात. मग त्या कथेचा कथाविस्तार करावा लागतो. मालिकेच्या कथेचा कॉपीराईट त्या त्या वाहिनीकडे असतो. ती कथा दुसऱ्या एखाद्या भाषेत प्रसारित झाली तर त्याची रॉयल्टी लेखकाला मिळत नाही. पूर्वी पर्वी ज्या मालिका मी लिहिल्या त्याचं डॉक्‍युमेंटेशन नीटपणे करू शकले नाही, पण जेव्हापासून लॅपटॉपवर काम करून लागले, तेव्हापासूनचा पटकथा आणि कथांचा माझ्याकडे संग्रह आहे. 
अलीकडे वाहिनी आणि निर्मात्यांची टीम मिळूनच कथा ठरवते. हे सांघिक असतं. पहिल्यांदा मी एकटीच कथा लिहायचे. आता वाहिन्यांमध्ये स्पर्धा वाढल्यामुळे वाहिनीचा कथाविस्तार करण्यामध्ये वाहिनीचा सहभाग असतो. सुरुवातीला एक महिन्याची कथा ठरवली जाते. त्यानंतर पटकथा लिहिली जाते. आपणच पटकथा-संवाद लिहिणार असू, तर पटकथेत एखादा दुवा सुटला तर तो संवाद लिहिताना जुळवून घेता येतो आणि तुम्हाला माहितेय की मीच लिहिणारेय तर मला पाहिजे तसे मी संवाद लिहू शकते, पण हेच जर दुसरा संवाद लेखक असेल, तर तुम्ही जो पटकथेत विचार केलाय तो संवादामधून येईलच असं नाही. कधी कधी उलटंही होतं. तुमच्या अपेक्षेहून उत्तम संवाद लिहिले जातात. जसं पुढचं पाऊल मालिकेत मी लिहिलेल्या पटकथेला मिथिला सुभाष यांनी उत्कृष्ट संवाद लिहिले होते. त्यामुळे पटकथा आणि संवाद एकमेकांना कॉम्प्लिमेंट झाले. असं होतं बऱ्याचदा, पण कधी तेवढ्या दर्जाचे संवाद नसतील तर त्रास होतो. 
मालिका लिहिताना डेडलाईन पाळावी लागते. त्यामुळे अक्षरशः घरातील सगळी व्यवधानं सांभाळून तुम्हाला लिहावं लागतं. एकदा तर असं झालं, की मी कॅनडाला सव्वा महिना होते आणि तिथून प्यार का दर्द है मिठा प्यारा प्यारा मालिकेचे एपिसोड पाठवायचे. अगदी सुट्टीनिमित्त सिंगापूर, लंडन, जयपूर, उदयपूर जिथे जिथे मी गेले तिथून संवाद लिहून पाठवलेले आहेत. जिथे जागा मिळेल तिथे बसून मी लेखन केलेलं आहे, पण हा माझाच नाही इतर लेखकांचाही अनुभव आहे. आपण कुठल्याही मनःस्थितीत असलो तरी ते सगळं बाजूला सारून लिहावं लागतं. खासगी आयुष्यात खूप दुःखी असलो तरी तुम्हाला आनंदी सीन लिहावा लागतो. 
सध्या शॉर्ट फिल्म्स, वेबसीरिज अशी नवनवी माध्यमं आली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लेखकांसाठी संधी निर्माण झाल्या आहेत, पण संधी मिळाली तरी माणसामध्ये प्रतिभा हवी. सर्वच नवोदित लेखक या माध्यमांच्या कसोटीवर खरे उतरतील असं होत नाही. लेखन फक्त तंत्र शिकून येत नाही. प्रतिभेचीही जोड लागतेच. वाहिन्यांमधून नव्या लेखकांना संधी दिली जाते, पण सुरुवातीला चांगले लेखन करणारे लेखक नंतर ढेपाळतात. मग वाहिन्या पुन्हा अनुभवी लेखकांकडे वळतात. काही वेळा असंही होतं, की प्रतिभा असूनही संधी मिळत नाही. अनेकदा मुंबई-पुण्याच्या लेखकांना पटकन संधी मिळते. मुंबईपासून दूर राहणाऱ्या लेखकांना संधीच मिळत नाही. त्यांना या क्षेत्रात कसं यायचं हे माहीतच नाही. त्यामुळे असं वाटतं, टॅलेंट हंट लेखकांसाठी आयोजित केले जावेत. कारण चांगल्या लेखकांची कमतरताच आहे आपल्याकडे. लेखन असं डिग्लॅमराईज्ड प्रोफेशन आहे, की त्यावर कुठलाही रिऍलिटी शो बनत नाही. लेखकाला कधी पुरस्कार द्यायला बोलावलं जात नाही. ज्या लेखकाच्या कथेवर आधारित संपूर्ण मालिका गाजते, त्या लेखकाला मात्र आपल्याकडे योग्य मान मिळत नाही. लेखनासाठी नवी माध्यमं आली असली, तरी त्या मालिकांच्या तुलनेत प्रेक्षकांपर्यंत अजून पोहोचलेल्या नाहीत. मराठी प्रेक्षक खूप कमी वेबसीरिज बघतात. त्यातही तरुण पिढीच वेब सीरिज बघते. 
मला वेबसीरिज लिहायची संधी मिळाली तर मी नक्की लिहीन. सध्या मालिकालेखनात बिझी असल्यामुळे इतर माध्यमांसाठी लिहिणं थोडं बाजूला राहिलंय, पण नव्या पिढीने ही माध्यमं हाताळली पाहिजेत. 
अवंतिका ही मालिका लिहिताना मी पूर्णपणे ती मालिका जगले. सगळ्या व्यक्तिरेखा खूप मन लावून घडवल्या होत्या. लिहिताना कसलाच अंकुश नव्हता. मालिकेतील सगळी पात्रं माझ्या खूप जवळची होती. मी, स्मिता तळवलकर, संजय सूरकर आमचं इतकं छान ट्युनिंग जमलं होतं. ते दोघे जण काही सूचना करायचे, पण हे करू नकोस, कधी वाद, भांडणं नाही झाली. इतकी प्रेमाने ती मालिका बनवली गेली होती. त्या मालिकेच्या शेवटच्या भागाचं पार्लेकरांसाठी खास स्क्रिनिंग ठेवलं होतं. तो शेवटचा भाग संपला तेव्हा आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं, की आता हे सगळं संपणार. 
लेखकाला सकाळी उठून पहिला विचार हाच येतो, की आता आपल्या मालिकेत काय होणार? म्हणजे सध्या माझ्या नवऱ्याची बायको मालिका लिहितेय... तर सकाळी उठल्यावर राधिका कशी वागेल? शनायाचं काय करायचं? असे विचार येतात. मराठीच्या तुलनेत हिंदीमध्ये बजेट खूप असतं, पण त्यामुळेच की काय, मराठी मालिकांत आयुष्याच्या खूप जवळ जाणारी खरीखुरी पात्रं वाटावीत अशी रचना असते. हिंदीमध्ये झगमगाटच खूप असतो, पण अपवाद असतातच. पवित्र रिश्‍ता मालिका आयुष्याच्या खूप जवळ जाणारी होती. त्यामुळे ती लोकप्रिय झाली. शेवटी कॅरेक्‍टर्स भिडतात मनाला. झगमगाट नाही. सध्या कितीही मोठा कलाकार घेतलात तरी स्वतःच्या बळावर सिनेमा किंवा मालिका खेचू नाही शकत. प्रेक्षकांना आता कथेत चांगला आशय पाहिजे, विषय पाहिजे. त्यामुळे प्रत्येक माध्यमात लेखनाला जास्त महत्त्व दिलं जातंय. 
मालिका लेखन करताना माझं प्रॉडक्‍शन हाऊसशी छान नातं जुळलं. संजय सूरकर, स्मिता तळवलकरांशी तर घरच्यासारखं नातं होतं. त्या दोघांशी सगळ्या गोष्टी शेअर करायचे. त्या मला अगदी हक्काने सांगायच्या आम्ही सीरियल करतोय आणि तुला लिहायचंय... तर मी लगेच हो म्हणायचे. त्यानंतर हिंदीमध्ये राजश्री प्रॉडक्‍शनबरोबर माझं चांगलं नातं निर्माण झालं. त्यांचे चित्रपट प्रेमळ आणि संस्कारी आहेत. तसेच ते सर्व जण वागतात. मी लिहिलेलं त्यांना आवडलं की रोज सकाळी सूरज बडजात्यांचा मेसेज यायचा की रोहिणीजी आपने बहुत अच्छा लिखा... अशा स्तुतीमुळे लिहायला हुरूप येतो. 
सध्याच्या मालिकेविषयी सांगायचं झालं तर माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेचं मला कथाबीज दिलं गेलं होतं आणि त्याचा कथाविस्तार मी केला. यामध्ये झी मराठीचे नीलेश मयेकर यांची खूप मदत झाली. त्यांचाही यात बऱ्यापैकी सहभाग होता. त्यांना माध्यमाची चांगली समज आहे. हल्ली स्वातंत्र्यापेक्षा मालिका हे चांगलं प्रॉडक्‍ट व्हावं यासाठी प्रयत्न केले जातात. चांगले लेखक, कलाकार, निर्माते आणि वाहिनीची चांगली लोकं एकत्र येतात तेव्हा ती मालिका लोकप्रिय होते, पण कधी वाटतं एखादी मालिका आपलं नशीब घेऊनच येते! 
आतापर्यंत मी लिहिलेल्या पात्रांविषयी सांगायचं झालं, तर अक्कासाहेबांचं पात्र खूप "ट्रीकी' होतं. एक दबदबा असलेली बाई, पण ती निगेटिव्ह नाही. ती सुनेला शिकवते, स्वातंत्र्य देते. चुकीच्या माणसाबरोबर चुकीचं आणि वाईटाशी वाईट वागते. हे पात्र साकारणं खूप कठीण होतं, पण त्या तुलनेत राधिका हे पात्र सोपं. प्रेक्षकांना ग्रे कॅरेक्‍टर नीट समजत नाही. फक्त शनायाचं ग्रे कॅरेक्‍टर चाललं. मला खूप इच्छा आहे, की एका खंबीर स्त्रीचं पात्र रेखाटावं. दामिनी ही व्यक्तिरेखा का आली? तर माझ्या मनामध्ये ती दामिनी होती. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी. शहरातल्या स्त्रिया शिकल्या-सवरलेल्या असल्या तरी घरगुती अत्याचार सहन करतात; तर त्यांनी हे सहन करू नये असंच मला वाटतं. राधिका शिकलेली आहे म्हणून काय झालं सध्या जे वास्तवात बायका सहन करतायत... ती तसं वागतेय, पण तिच्या पात्रातूनही आम्ही हेच सांगू इच्छितोय की स्त्रियांनी सहन नाही करायचं. 
मी कधीही मनाविरुद्ध लेखन करत नाही. एखाद्या मालिकेत मनाविरुद्ध लेखन करावं लागलं तर ती मालिका सोडून देते. एकदा तर असं झालं होतं, सतत षड्‌यंत्र करणाऱ्या नकारात्मक व्यक्तिरेखांचं पीक आलं होतं. तशा मालिका लिहिताना असं झालं होतं, की सतत कट-कारस्थानं याचाच विचार करावा लागायचा. तेव्हा लिहू नये वाटायचं. 
मालिका लिहिताना प्रेक्षकांचे गमतीशीर अनुभव येतात. अवंतिका लिहीत असताना एक वकील मला फोन करून सांगायचे, की मी सांगतो तसं तुम्ही लिहा. काही प्रेक्षक वेगवेगळा सल्ला देतात. एका पात्राला कथेत मूल होत नव्हतं; तर प्रेक्षकांचे फोन येत की काही तरी चमत्कार करा कथेत आणि मूल होऊ द्या! काही कलाकार तर असे असतात, की ते स्वतःचा ट्रॅकच लिहून आणतात. लेखकाला तसंच कर असं सांगतात. लिखाण सोपं नाही. एका मालिकेचे पहाटे 4 वाजता उठून संवाद लिहायचे, पण नंतर मात्र मानधनासाठी त्या निर्मात्यांना विनवण्या कराव्या लागायच्या. एखादी मालिका सुरू होण्याआधी लेखक सहा-सात महिने त्यावर काम करत असतो. त्याचं मोल त्याला मिळायला पाहिजे... अनुभवी असोत की होतकरू, लेखकाला त्यांचं मानधन वेळेत मिळायलाच हवं, पण लेखकांना त्यांचा योग्य मानही मिळायलाच हवा!

शब्दांकन - भक्ती परब, पूर्वप्रसिद्धी २९ मार्च २०१७ सकाळ मुंबई आवृती

Friday, 25 November 2016

‘त्या’ दहशतीची आठ वर्षं

सकाळच्या चहाबरोबर बातम्या वाचताना, ऐकताना आणि बघताना तेवढ्यापुरते चुकचुकतो आपण... सोशल मीडियावरच्या पोस्टना धडाधड लाईक, कमेंट आणि शेअर करत आपल्याला सामाजिक भान असल्याचं भासवतो... त्यामुळे रोजच्या धावपळीच्या जगण्यात वर्ष आणि तारखा बदलतात; पण आजूबाजूला आपल्याला अस्वस्थ करणाऱ्या घटना सुरूच असतात... 

तिथे सुरक्षाव्यवस्था नव्हती... गुप्तहेर यंत्रणांनी योग्य माहिती दिली नाही... पोलिसांकडे लढताना पुरेशी शस्त्रसामुग्री नव्हती... हा तर सरकारचा नाकर्तेपणा... पत्रकारांनी बेताल बातम्या दिल्या, त्यामुळे अतिरेकी सावध झाले... आपल्याला फक्त कारणं लागतात, आपल्या चुका इतरांवर ढकलण्यासाठी... अहो, मनाला एकदा विचारा आपण सजग होतो का? आपली काळजी घ्यायला, आपण सक्षम होतो का? 

२६/११  च्या त्या ६० तासांतला थरार मरिन ड्राईव्हच्या समुद्राला विचारा, तो तर क्षणाक्षणाला खवळून उठतो... पण त्याच्या त्या लाटांवर खिदळत आपण फक्त सुट्टीचा आनंद लुटतो. आज त्या किनाऱ्याच्या कडेला तुकाराम ओंबळेंचं समाधीस्थळ आहे. ते बघताना आपण फक्त हळहळतो आणि पुढे जातो निघून. आता कशी आहे सीएसटीची सुरक्षायंत्रणा? गेट वे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेलसमोर पोझ देऊन फोटो काढताना कधी हा विचार केलाय की, तुम्ही स्वमग्न राहिलात तर तुमचाही फोटो येऊ शकतो... न्यूज पेपरच्या हेडलाईनच्या बाजूला "सामान्य माणसांवर बेछूट गोळीबार!' सीएसटीला ट्रेन पकडण्याची कशाला इतकी घाई? एकदा थोडं थांबून तिथल्या पोलिसांची कधी विचारपूस केलीत? 

तो थरार अजून डोळ्यांसमोरून जात नाही म्हणता, मग... त्यासाठी तुम्ही या देशाचे नागरिक म्हणून तुमचं काही कर्तव्य आहे ना!

ते कर्तव्य बजावण्यासाठी आपण पुढे येणार नाही, तोपर्यंत वर्ष आणि तारखा बदलत राहतील. गुन्हेगारी, हिंसाचार, आतंकवाद आपल्या शेजारी येऊन नांदू लागेल... बघा काळजी घ्या... आपणच आपली ढाल व्हा... घाबरून भूमिका न घेता वावरणं सोपं असतं... निसर्गाकडून शिका आपणच आपलं अस्तित्त्व कसं जपायचं ते... 
कुणी आधार देईल, कुणी मदत करेल, अशी अपेक्षांची झूल कशासाठी?











Wednesday, 2 November 2016

तेजारती

आपापल्या व्यापात आपण सगळेच गुंतून गेलेलो असतो. इतके की आपले सण-उत्सवही विसरून जातो. पण अशा काही गोष्टी अवचित सामोऱ्या येतात आणि आत-आत दडपून टाकलेल्या गोष्टी बाहेर येण्यासाठी धडका देतात. दिवाळी असतेच आपल्या मनात. वाव मिळाला की बाहेर येते क्षणात...असेच काही क्षण जागवणारा प्रसंग...



हर्षदच्या हातात एक छान रेशमी गिफ्ट पॅक केलेला बॉक्‍स होता. तो पुढे पुढे येत होता... अंजली किचनमध्ये बिझी होती. त्याने तिच्या डोळ्यावर हात धरला... हॅप्पी पाडवा... अंजलीने तिच्या स्टाईलमध्ये मागे वळून पाहिलं. स्माईल केलं... ओके, नाईस शॉट! ग्रेट! दिग्दर्शकाने सूचना दिली. नेहा भानावर आली. तिला राहुलची खूप आठवण आली. फोन करू का, असा विचार डोकावून गेला. आज महाएपिसोड शूट होत होता. त्याआधी प्रोमो शूटिंग होतं. सेटवर येण्यासाठी नेहा सकाळीच घरातून निघाली. मढला पोहोचली तेव्हा सेटवर दिवाळी पाडवा सेलिब्रेशनचा सेट रेडी होता. तेव्हाही तिला सेटकडे बघून वाटलं, इथे राहुल असता तर... गेले दोन आठवडे एकमेकांना हाय-बाय करण्याएवढेच घरात होतो. दिवाळी सुरू व्हायला आठवडा राहिलाय. सिरियलचा टीआरपी वाढण्यासाठी खास प्रोमो शूट आणि दिवाळी सेलिब्रेशनचा ट्रॅक आणला होता. रायटरने इतके छान डायलॉग लिहिले होते की, ॲक्‍टर्स ते बोलत असताना नेहाला राहुल आठवत होता. काही खास सेलिब्रेशन सीन आणि प्रोमो शूटला नेहाला ईपी म्हणून सेटवर जावं लागे. तसंच आठवडाभरातून ठराविक वेळी ती सेटवर चक्कर टाकत असे. चॅनेल ऑफिसला प्रॉडक्‍शन हाऊसबरोबर वेगवेगळ्या सिरियल टॉपिकवर ब्रेन स्टॉर्मिंग चाललं होतं. त्यामुळे नेहा खूपच बिझी होती. दिवाळीआधीच सेटवर दिवाळी, घरात दिवाळीची लगबग सुरू होती. पण सासूबाईंनी तिला पूर्ण मोकळीक दिली होती. तिच्या कामाचा ताण त्यामुळे हलका झाला होता. पण घरी आपण वेळ देऊ शकत नाही, ही खंत होतीच. ठरलेल्या वेळेत शूट पूर्ण झालं. दिवाळी सेलिब्रेशनचे सगळे सीन शूट झाले. नेहाला उसंत मिळाली. पाडव्याचा दिवस होता. तिने ठरवलं की काहीही झालं तरी आज आपण हा पूर्ण दिवस राहुलसोबत घालावायचा. ती लगेचच सुट्टी टाकावी या हिशेबाने चॅनेल हेडकडे विचारणा करायला गेली तर ते म्हणाले, नाही, आत्ताच एक सीन तातडीने शूट करायचा आहे. तू पटकन सेटवर जा...
नेहा हिरमुसली. पण तिला माहीत होतं. वर्क कम फर्स्ट. राहुलने आणि तिने आपापल्या क्षेत्रातील कामाला नेहमीच प्राधान्य दिलं होतं. पुढच्या आठवड्यात राहुलला कॉन्फरन्ससाठी अमेरिकेला जायचं होतं. त्याआधी एक दिवस दोघांना एकत्र काही वेळ घालवायचा होता. खूप काही बोलायचं होतं. बरेच दिवसापासूनच्या निखळ गप्पा-गोष्टी करायच्या राहून गेल्या होत्या.  नेहा सेटवर जाण्यासाठी  निघाली... पण तिचं मन मात्र त्यात नव्हतं. ती सेटवर पोहोचली. सेट सजलेला दिसला... पण सेटवर कुणीच दिसत नव्हतं... गेले कुठे सगळे... ती सेटच्या मध्यभागी गेली आणि तिला मागून राहुलचा आवाज आला... हॅप्पी पाडवा...
नेहाचा चेहरा खुलला. राहुलला पाहिल्यावर पाठोपाठ नेहाचे सासू-सासरेही आले. त्या दोघांनाही या उभयतांची घुसमट कळत होती, जाणवत होती. सासूबाईंनी विचारलं, ‘काय नेहा, कसं वाटलं सरप्राईज... पाडवा म्हणजे दोघांनीही आपल्यासाठी वेळ काढणं. गिफ्ट काय कधीही खरेदी करू शकतो. तुम्ही दोघांनीही आज दिवसभर एकत्र राहून हा सण सेलिब्रेट करायचा आहे.’ सासूबाईंचं बोलणं पुरं होताच, सेटवरचा क्रू आला. मेकअप आर्टिस्ट सुशीलाताईंनी तर नेहाला हाताला धरून रूममध्ये नेलं. तिला सिरियलमधल्या लीड हिरॉईनसारखं नटवलं. मग काय सेटवरच नेहा आणि राहुलचा पाडवा थाटात साजरा झाला. दोघांनाही खूप बोलायचं होतं. पण समोरासमोर आल्यावर शब्दांची भाषा आनंदाश्रूंनीच सांगितली. आपल्या मनात जे आत असतं ते असं बाहेर येतंच. पण त्यासाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. नेहा आणि राहुलने आपल्या करियरला प्राधान्य दिल्यामुळे खूप गोष्टींचा त्याग केला होता. मित्रांनो, हा पाडवा आपल्या प्रियजनांसोबत साजरा करा. आनंद म्हणजे देणं आहे; घेणं नव्हे. जरी आपण निराशेच्या अंधारात असलो, तरी मनातली तेजारती आपणच जपायची असते...

(पूर्वप्रसिद्धी सकाळ मुंबई आवृत्ती)

Monday, 31 October 2016

दिवा तुमच्या मनातला...

फ्रेंड्‌स, हल्ली आपण इतके बिझी असतो की आपल्याला मॅसेज फॉरवर्ड करायलाही वेळ मिळत नाही. सोशल मीडियावर थोडंसं मित्रांशी हाय, हॅलो करतो तेवढंच; पण त्या पलीकडे काहीच करता येत नाही. घरच्यांशी किंवा जवळच्या मित्रांशी ग्रुपवरच मॅसेज, कमेंट करत बोलणं होतं. कॉलेज आणि क्‍लासचा अभ्यास, नव्यानं जॉईन केलेल्या ऑफिसमधल्या जबाबदाऱ्या, टेन्शन यामुळे मित्रांना आणि घरच्यांनाही वेळ देता येत नाही. पण नाराज व्हायचं नाही, उत्सव येतोय... मनात निराशेचा अंधार नका दाटू देऊ...दिवा तुमच्या मनात आहेच, तो प्रकाशमान ठेवा...

घरच्यांसाठी वेळ देणं 
घरच्यांसाठी वेळ देणं ही गोष्ट ए एस एपी झालेली आहे. आपल्या आई-वडिलांसाठी, नातेवाइकांसाठी आठवड्यातून काही वेळ राखून ठेवा. घरच्यांसोबत फिरायला जा किंवा एखादं फॅमिली फंक्‍शन अटेंड करा. वाटल्यास नातेवाईकांना फोन करून तुमच्याच घरी कट्‌टा टाकण्यासाठी बोलवा.

गावाला भेट द्या
शहरातल्या गडबडीत आपण गावाकडच्या आठवणींचं मोरपीस जपत असतो. कधी जायला मिळेल, याचे प्लान्सही बनवत असतो; पण जाणं काही होत नाही. गावाकडचे मोबाईलमध्ये असलेले पिक्‍स बघून हळहळत असतो. एखादा गावचा मित्र गावाकडचे हॅपनिंग्ज सांगून तुमचा इगरनेस वाढवत असतो, तर जास्त विचार करीत बसू नका. पटकन बॅग पॅक करा आणि आपल्या गावी एक दिवस का होईना भेट देऊन या.

मित्रांबरोबर ट्रॅव्हलिंग 
महिन्याभरातून एकदा सगळ्या मित्रांनी एकमेकांना ग्रुपवर मॅसेज करून एखादं हटके डेस्टिनेशन शोधा आणि सर्वांनी मिळून मनसोक्त भटका.

स्वप्नांचा पाठलाग करा
नेहमीच्या शेड्युलमध्ये बिझी असलात तरी स्वप्नं पाहणं सोडू नका. स्वप्नं आपल्याला रोज एखादा गोल सेट करण्यासाठी एनर्जी देत असतात. त्यामुळे स्वप्नं तर पाहायला हवीच आणि पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवत ते पूर्ण होण्यासाठी प्रयत्नही केले पाहिजेत.  

नवीन काहीतरी शिका  
रोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. हे फारसं कठीण नाही. रोज स्वतःच मी ही गोष्ट करणार असं ठरवा उदाहरणार्थ रांगोळी काढणं, पेटिंग करणं, लिहिणं, गार्डनिंग अशी कुठलीही एखादी गोष्ट करायची असं ठरवा आणि जस्ट गो फॉर इट.

स्वतःलाच चॅलेंज करा 
आपणच आपल्याला रोज चॅलेंज करीत रहायचं. असं एखादं काम किंवा असा एखादा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता येत नसेल, तर त्याला आव्हान म्हणून स्वीकारा. त्यात यशस्वी होण्यासाठी स्वतःला झोकून द्या.

काळजी करणं सोडून द्या 
छोट्या छोट्या गोष्टींची काळजी करणं सोडून द्या. कारण काळजी करीत बसलो की, आपला कामावरचा सर्व फोकस निघून जातो. एखादा विषय किंवा घटना तुम्हाला सतावत असेल, तर घरातील मोठ्यांशी चर्चा करून तो सोडवा. आतल्या आत ठेवून कुढत बसू नका. काही प्रश्‍न थेट बोलण्यानं नक्कीच सुटतील.

सोशल व्हा 
लोकांमध्ये मिसळा, एखादा विषय घेऊन त्यावर चर्चा करा. सोशल मीडियावर आपण सामाजिक गोष्टी आणि घडामोडींवर व्यक्त होतच असतो; पण एखादा ग्रुप जमवून चर्चा करणं किंवा इतरांची मतं जाणून घेणं हे सगळ्यात बेस्ट नाही का

मनमोकळं हसा
मनमोकळं हसायलाही हल्ली आपल्याला कारणं शोधावी लागतात. नाही तर मॅड आहे का रे हा? असं उगाच कुणी बोलायला नको; पण लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. एखादी विनोदी सीरियल बघा, मूव्ही बघा किंवा तुमच्या आवडीच्या काही हॉबिजमध्ये मन गुंतवा. मग बघा तुमच्या चेहऱ्यावर किती छान स्माईल येईल.

प्रेमात पडा
आणि हो... ही शेवटची पण महत्त्वाची गोष्ट. प्रेमात पडा, खरंच हे वयच आहे तुमचं प्रेमात पडायचं. तुमच्या वयाच्या अनोळखी मुला-मुलींशी छान मैत्री करा. एकमेकांचे विचार छान जुळले, असं वाटत असेल तर पुढची पायरी गाठायला काहीच हरकत नाही; पण रिलेशनशिप्स नेहमी एकमेकांना स्पेस द्या. आपले ऑफिसमधले कलीग्ज, कॉलेजमधले मित्र-मैत्रिणी आणि आपले नातेवाईक यांना प्रेमानं, मैत्रीच्या नात्यानं आपलंसं करा. 

(पूर्वप्रसिध्दी- सकाळ मुंबई आवृत्ती)




Saturday, 1 October 2016

तोंड उघडण्याआधी, मनाचं दार उघडा...(Smell It, Feel It & Have It)

एका CCD मध्ये दोन मित्र कॉफी पित होते. त्यातला एक दुसऱ्याला म्हणाला, काय यार आज काहीतरी वेगळं ट्राय करु या म्हटलं, तर तू नेहमीप्रमाणे ही काळी कॉफी मागवलीस. अरे ए, काळी कॉफी काय? हिला Espresso म्हणतात. या कॉफीचा मग असा उचलायचा, तिचा स्मेल घ्यायचा, फिल करायचं आणि मग ही कॉफी प्यायची असते. जाऊ दे, तुला नाही कळणार!” “पुढच्या वेळेस आपल्या नेहमीच्या कट्ट्यावर जाऊ या कटींग प्यायला.”
मित्रांनो, या संवादामधून हे सांगायचं आहे की कुणाला CCD मध्ये ब्रँडेड कॉफी पिताना फिल येतो, तर कुणाला कट्ट्यावरचा चहा पिताना फिल येतो. म्हणजेच एखादा पदार्थ (पाककृती) हा मनानं खाल्ला आणि प्यायला जातो. त्यानंतर त्याचा तोंड उघडून आस्वाद घ्यायचा असतो.
तोंड उघडण्याआधी मनाचं दार उघडा! हे वाक्य खाद्यसंस्कृतीच्या दृष्टिने फार महत्त्वाचं आहे. कारण मनाचं दार उघडणं. ही खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यातली पहिली पायरी आहे. ही पायरी आपण अलिकडे मिस करतोय. आईने आपल्या मुलांसाठी केलेला स्वयंपाक, बाबांनी आपल्या मुलांसाठी केलेला ब्रेकफास्ट, नव्या नवरीने आपल्या सासरी आल्यावर केलेला पहिला स्वयंपाक, नवऱ्याने बायकोसाठी आणि बायकोने नवऱ्यासाठी प्रेमाने केलेला स्वयंपाक, मित्रांनी एकत्र जमून कल्ला करत बनवलेली एखादी ऑफ बीट रेसिपी किंवा यू ट्यूब वर बघून स्वतःच स्वतःसाठी बनवलेली एखादी नवी रेसिपी, यातली गंमत, प्रेम आणि तो पदार्थ बनवताना होणारा आनंद आपण फिल करायला, हल्ली विसरतोय. त्यानंतर त्या पदार्थाला चांगली दाद मिळाली. आपलं कौतुक झालं. की अजून चार चाँद लागतात. पण आपल्याकडे आता एवढा वेळ कुठेय? ते फिल करायला. ९ ची ट्रेन पकडायची आहे, आज ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन आहे, लिखाणाचं खूप काम आहे, R&D करायचायं...ही सगळी कामं करता करता अक्षरशः आपण खाणं तोंडात कोंबतो आणि कामाला पळत सुटतो किंवा तो पदार्थ हातात घेऊन खात खातच आपण चालू लागतो. शुटींगला जाणारी मंडळी गाडीतच नाश्ता करतात. तर कुणाच्या कामाच्या रात्रीच्या शिफ्ट असल्या की आपलं आहारशास्त्रच बिघडून जातं.
जागतिक पातळीवरील आहारतज्ज्ञ थिंक ग्लोबल अँड इट लोकल असा सल्ला देत असताना आपल्या प्रत्येकावर ही जबाबदारी आहे की आपल्या पारंपरिक पाककृतींचा वारसा आपण जपला पाहिजे आणि तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे. मग हे आपल्या हातून कधी घडणार?
म्हणूनच मित्रांनो, आठवड्यातून एकदा आपल्या घरातील आजी-आजोबांसोबत खाद्यपदार्थांविषयी गप्पा मारा किंवा आई-बाबांसोबत बसून एखाद्या पाककृतीवर चर्चा करा. किंवा गावाकडे राहणाऱ्या आपल्या ओळखीतील कुणालातरी फोन करा आणि त्यांच्याकडून त्यांच्या बालपणी बनवल्या जाणाऱ्या पदार्थांविषयी त्यांना बोलतं करा.
या संवादातून तुमच्या माहितीच्या कोशात ५-६ नव्या रेसिपींची भर पडेल. कधी कधी सुट्टीच्या दिवशी, सणांच्या दिवशी कुटुंबातील सगळ्यांनी एकत्र मिळून स्वयंपाक करा. त्यातून एकमेकांच्या किचन टिप्स तुम्हाला कळतील. आपल्या कुटुंबासोबत बनवलेल्या पाककृतींची आणि आपल्याला नव्याने कळलेल्या पाककृतींची तुमच्या डायरीत नोंद करा किंवा त्या रेसिपीचे फोटो काढून ठेवा. महिन्यातून ३-४ अशा पाककृतींची नोंद तुम्ही ठेवलीत तर तुमच्याकडे वर्षभरात तिसेक पाककृतींचा खजिना तयार होईल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठेही गेलात किंवा घरी नेहमीचं जेवण जेवत असाल तर पदार्थ चांगला झाल्याबद्दल त्या व्यक्तिचं कौतुक करा. पदार्थ बनवण्यात एखादी उणीव राहिली असेल तर प्रेमळ शब्दात त्या व्यक्तिला समजून सांगा. एखाद्याने आपल्यासाठी स्वयंपाक केलाय किंवा नवी रेसिपी बनवलीय तर त्या गोष्टीला आधी फिल करा. मग त्यावर यथेच्छ ताव मारा. आणि एक लक्षात घ्या की कुठलीही रेसिपी कठीण किंवा सोपी आणि बरी किंवा वाईट नसते. रेसिपी ही रेसिपी असते ती बिघडली तर आपलं शरीराचं काय करेल, हे आपल्याला चांगलच ठाऊक आहे. त्यामुळे तुला एवढी साधी रेसिपी बनवता येत नाही किंवा कशी बनवायची माहित नाही असं म्हणून कुणाचं मन दुखवू नका. म्हणूनच आम्ही म्हणतोय की तोंड उघडण्याआधी मनाचं दार उघडा.
नवरात्रौत्सव सुरू झालाय. सर्वांच्या घरी त्याचीच लगबग सुरू असेल. आणि नऊ दिवसात कुठले पदार्थ करायचे? याचा विचार गृहिणी करत असतील. त्यांची मदत करा. त्यानंतर दिवाळी येईल. आपल्या मालवणी मुलखाचं फार कौतुक वाटतं. आपल्याला गणपतीला गावी जायचं तिकीट मिळालं की गोल्ड मेडल मिळाल्याचा आनंद होतो. हा आनंद असाच टिकवून ठेवा. वेगवेगळ्या पारंपरिक सणांच्या माध्यमातून सणासुदीचा आनंद मालवणी मुलखात वर्षभर साजरा होतो. यापुढेही ही परंपरा अशीच टिकून रहावी.
आता संपूर्ण भारतभराविषयी सांगायचं तर मित्रांनो, वर्षाच्या १२ महिने आपण वेगवेगळे सण, समारंभ साजरे करत असतो. त्यात आपण मनाने किती असतो? हा भाग वेगळा. पण सणांचं हे सेलिब्रेशन बघताना कधी कधी वाटतं, सगळा दिखावा आहे. आतून कोणी खुशच नाहीय. काही ना काही आपण मिस करतोय. ते नेमकं काय मिस करतोय? हे आपापल्या पातळीवर प्रत्येकाने त्याचा शोध घ्या. लाऊडस्पीकरच्या आवाजात आपल्या मनाचा आवाज हरवू देऊ नका.
या सोशल मीडियामुळे आपण प्रत्येकाला छोट्या मोठ्या सणांच्या शुभेच्छा देणं, हे काम आहे, असं समजून ते फॉरमॅलिटी म्हणून करतो. या ब्लॉगच्या आणि परबांचो पावनेर या पेज च्या माध्यमातून सणांच्या अशा प्रकारे कोरड्या शुभेच्छा देण्यापेक्षा काहीतरी नवा विचार द्यावा आणि हार्ट टू हार्ट संवाद साधावा यासाठी हा लेखन प्रपंच. आपलं हे पेज पाककृतींविषयी आहे, सण कसे साजरे करावेत? हे सांगण्यासाठी नाही. तरीपण एक वेगळा दृष्टिकोन द्यायला काय हरकत आहे, नाही का?  सो, आजपासून एखादा पदार्थ खायला सुरुवात करण्याआधी त्याला फिल करा. मग खा. एखादी नवी रेसिपी शिकलात किंवा तिच्याविषयी माहिती मिळाली तर त्याची नोंद तुमच्या डायरीत करा...फोटोसुध्दा काढा... आणि तोंड उघडण्याआधी मनाचं दार उघडा हे वाक्य नक्की लक्षात ठेवा...Smell It, Feel It & Have It!!!!!


(मालवणी खाद्यसंस्कृतीविषयी अधिक जाणून घेण्यासाठी परबांचो पावनेर या फेसबुक पेज ला भेट द्या.)

आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...