Sunday, 24 August 2014

स्वप्न (भाग दोन)

अशा या शिकारी मंडळींना मिळणारा मानसन्मान पाहून मुकुंदालाही वाटले की आपणसुद्धा बंदूक घ्यावी आणि शिकारीसाठी निघावे. एखादे रानडुकर मारूनच घरी परतावे. खूप दिवस याबाबत विचार करून त्याने बंदूक घेतली. गावातल्या नावाजलेल्या दोन शिकारी मित्रांकडून शिकारीचे धडे घ्यायला सुरुवात केली. मुकुंदाचा मुलगा आपल्या पित्याचे बंदूकीचे प्रशिक्षण न्याहाळीत होता. 

थोडी सवय झाली आनी बंदूक चालवचो अनुभव इलो काय, तू येवस्तीत शिकार करशीत, गावकरी मुकुंदाला प्रोत्साहन देऊ लागले. तर मुकुंदाच्या विरोधात असलेले तोंडातील पानाची पिंक टाकून म्हणायचे, ह्या मेल्याक काय जमाचा नाय पारधीचा. ह्यो नुसतो बारीक-सारीक  जनावराचीच शिकार करतलो. ह्येका काय रानडुकर कदी गावाचो नाय. मुकुंदा मात्र निराश न होता नियमितपणे पारधीला जात होता. पण अजूनही एकही शिकार त्याच्या हातून झाली नव्हती. त्यामुळे तो जरा चिंताग्रस्त होऊ लागला होता. 

पण त्या दिवशी रात्री तर त्याने कमालच केली. संध्याकाळी तो रम्या आणि सु-या या आपल्या शिकारी मित्रांसोबत शिकारीला गेला होता. हळूहळू अंधार पसरत चालला होता. घनदाट जंगलात ते तिघे वाट काढत-काढत सावजाचा माग काढत होते. खूप टेहळणी करूनसुद्धा सावजाचा पत्ता नव्हता. अचानक झुडूपात सरसर ऐकू आली. कुठले तरी जनावर आपल्या दिशेने येत असल्याची मुकुंदाला पक्की खात्री झाली. तो नीट न्याहाळू लागला. त्याचे शिकारी मित्र आसपास सावजाचा माग काढत होते. इतक्यात मुकुंदाला त्याच्या समोर थोड्या अंतरावर एक मोठेसे रानडुकर दिसले आणि त्याने लागलीच चतुराईने नेम धरला. बंदुकीचा चाप ओढून क्षणात रानडुकराला दोन बारात ठार केले. बंदूक झाडल्याचा आवाज ऐकून रम्या आणि सु-या चपापले ते मुकुंदाच्या दिशेने धावले. ते थोडे घाबरले होते. मुकुंदाने काय केले असे कोण जाणे…असे मनात येऊन ते समोर बघताच आश्चर्यचकित झाले. शाब्बास रे मुकुंदा…शेवटी तुया रानडुकराची शिकार केलंसच. तुया आता चांगलो तरबेज शिकारी झालंस. रम्या आणि 
सु-या त्याला असे काय काय बोलून त्याच्या धाडसाचे कौतुक करत होते. 

पण मुकुंदा मात्र स्तब्ध उभा राहिला होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. त्याने हातातली बंदूक खाली टाकली आणि मटकन खाली बसला. मुकुंदाला काय झाले? रम्या, सु-याला काहीच कळेना. “आज मी एका निरपराध मुक्या प्राण्याचा जीव घेतला रे…” असे म्हणून मोठ्याने कळवळून मुकुंदा रडू लागला. त्याच्या अशा बोलण्याने रम्या, सु-यालाही आपली चूक कळून आली. त्यांनी शरमेने माना खाली घातल्या. 

या सर्व घडलेल्या प्रकारानंतर गावात कुणाच्याही घरात बंदूक दिसेनाशी झाली. रामेश्वराला कौल त्यानंतर कधी गुरवाने लावला नाही आणि गावात रक्तबंबाळ झालेले रानडुकर काठीला बांधून देवळात आणले गेले नाही. मात्र गावाला सांस्कृतिक दृष्टीने जोडणारी रामेश्वराची जत्रा आणि जत्रेतील दशावतार दणक्यात साजरा झाला. आज त्या गावातली ती अंधश्रद्धा कायमची नाहीशी झाली होती. शिकारी असल्याचा मानसन्मान गळून पडला होता. ही घटना ज्या मुकुंदामुळे घडली त्याला आता गावातले लोक मानसन्मान देऊ लागले. मुकुंदाची बायको आपल्या नव-याचे शिकारीचे वेड कायमचे गेले म्हणून आनंदून गेली. पण मुकुंदाच्या मुलाचे नामवंत शिकारी होण्याचे स्वप्न मात्र स्वप्नच राहिले.    


शिकारीची ही प्रथा या कथेत फक्त संपुष्टात आली आहे. अजूनही कोकण आणि गोव्याच्या काही भागात अशा प्रकारची अंधश्रद्धा ठाण मांडून बसली आहे. तिचा समूळ नाश करण्यासाठी अशा अनेक मुकुंदांनी पुढाकार घेण्याची नितांत आवश्यकता आहे…

Friday, 15 August 2014

स्वप्न (भाग एक)


काही स्वप्न स्वप्नच राहिली तर चालू शकते. कारण काही अशी स्वप्नं प्रत्यक्षात साकार झाली तर घातक ठरू शकतात. आपल्या मूल्यांना ती हादरा देऊ शकतात. भूतदया हे आपले मूल्य आपण कसे विसरू शकतो…
 मिलला टाळे लागल्यावर लालबागहून मुकुंदने थेट आपल्या बायको मुलासह कोकण गाठले. वडिलोपार्जित जमिनीच्या तुकड्यावरच आता आपला पुढचा संसार सुरू ठेवायचा निश्चय त्याने पक्का केला. तो गावाला आला, पण गावक-यांना त्याचे काही विशेष असे काहीच वाटले नाही. तसा मुकुंद गावातील लोकांच्या तितकासा परिचयाचा नव्हता. मुंबईला राहत असताना तो गावी एक-दोन दिवसापुरता येई.
त्याने आपले जुने घर दुरुस्त करून घेतले. चाळीतल्या दहा-बाय बाराच्या खोलीतल्या संसाराला त्याने कौलारू घरात सजवायला सुरुवात केली. जमिनीत घामाच्या धारा वाहेपर्यंत तो खपू लागला. त्याचा मुलगा गावच्या शाळेत जाऊ लागला. बायको आजुबाजूच्या बायकांच्या गोतावळ्यात मिसळू लागली. नव-याला धीर देत संसार सावरू लागली. मुकुंदला हळूहळू गावकरी आपल्या गावचो माणूस म्हणून वागवू लागले.
मुकुांदाला शेतात राबताना पाहून गावक-यांना आपले हसू आवरणे कठीण जायचे. ह्येका आजून वायच कुदळीन खनाक येना नाय. ह्यो शेती काय करतलो? असा गावक-यांना प्रश्न पडे. बाकी मुकुंदाला शेतीचे काम तितकेसे काही जमले नाही.  
त्याने आपल्या सबंध शेतजमिनीत आंब्या-काजूच्या झाडांची आणि नारळाची लागवड करायचे ठरवले. तसे केलेही कारण जमिनीच्या तुकड्यात राबण्यात मुकुंदाला अजिबात रस नव्हता. त्याचे लक्ष  गावातल्या शिकारी लोकांकडे होते.
गावात पारध करणा-या लोकांना खूप मानसन्मान मिळायचा. रानटी प्राण्यांची शिकार करणे ही गावात प्रथा होती. नव्हे रानडुकरांची शिकार करणे ही एक अंधश्रद्धाच होती.
शिमग्याचे दिवस संपले की गावातल्या गुरवाकडून रामेश्वराला कौल लावला जायचा आणि त्या दिवसापासून पुढे दोन महिने पारधीचा हंगाम सुरू व्हायचा. गावातले नावाजलेले शिकारी म्हणजे ज्यांच्या नावावर चार-पाच तरी रानडुकर मारल्याची नोंद होती असे हे नावाजलेले शिकारी दोन-तीन दिवस घरी राहून बंदुकीच्या साफसफाईत वेळ घालवत. मग ते पारधीसाठी खांद्यावर बंदूक घेऊन एखाद्या वीरोत्तमासारखे सज्ज होत. आणि जंगलाच्या दिशेने वाटचाल करत. रात्रीच्या किर्र अंधारातही संपूर्ण जंगल पिंजून काढत.
एखादे रानडुकर पाणथळी जागेत आपली तृष्णा भागवत असलेले दिसले की त्याला बंदूकीने आडवे पाडले जायचे. त्याला काठीवर बांधून गावात आणायचे. गावातल्या सर्व घरांच्या मधून हर हर महादेव अशी गर्जना करत हिंडायचे. मग घराघरांतून सुवासिनी स्त्रिया बाहेर येऊन काठीवर चार पाय बांधलेल्या अवस्थेत लोंबकळणा-या डुकराला ओवाळायच्या आणि रक्तबंबाळ झालेल्या त्या डुकराच्या गळ्यात जास्वंदीच्या फुलांचा हार घालायच्या. ही मिरवणूक पार पडल्यानंतर डुकराला देवळात न्यायचे.
देवाला नैवेद्य दाखवला जायचा आणि नंतर त्याचे मटण करून गावजेवण घातले जायचे. हे सर्व यथासांग पार पडले की ज्याने हे रानडुकर मारले त्याची गावात एकदम कॉलर टाईट. दोन-तीन आठवडे मग त्याचा कौतुकसोहळा असायचा...पुढील कथा भाग दोनमध्ये.

Monday, 11 August 2014

श्रावणसरी मनसोक्त बरसल्या...

आज सकाळपासून मन फार उदास होतं. पूर्ण दिवस अस्वस्थतेत गेला. बाहेर निसर्ग श्रावणसरींत न्हाऊन निघाला होता. माझं मन मात्र आतल्या आत कुढत होतं.
संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर छत्री घेऊन पावसातून चालताना मन हळूहळू
था-यावर येऊ लागले. इतक्यात लक्ष बागेतल्या झाडांकडे आणि पानवेलींकडे गेले. असं वाटलं झाडं आणि ती हिरवीगार भिजणारी पानं खदखदून हसतायत. त्यांच्याकडे पाहून मलाही खूप छान वाटू लागलं. आपणच का बरं दुःखीॽ असा प्रश्न मीच मला विचारला... मन झालं पुन्हा हिरवं, ताजंतवानं... कोरंकोरं.

एखादा क्षण निघून जातो. एखादी घटना घडून जाते. एखादी व्यक्ती मनाला छळून जाते. या अशा गोष्टी लवकरात लवकर विसरून जाण्याची सवय मनाला लावायला हवी. नाहीतर वेड लागालची वेळ येईल. पण आज चांगला धडा मिळाला.
उगाच कुठे नि कसल्या मनात साचून राहिलेल्या गोष्टींचा विचारच सोडून द्यायचा. आता मागे वळून पहायचे नाही...पुढेच जायचे. मी ठरवलेले ध्येय गवसेपर्यंत नकारात्मक विचारांना माझ्या मनात आता जागा नाही.

श्रावणसरींनी माझं मन अगदी स्वच्छ धुवून टाकलं. त्या हिरव्यागार झाडांना पाहताना शुद्ध विचारांची शाल माझ्यावर पांघरली गेली. श्रावणसरींची किमया आजवर साहित्यातून अनुभवत आले होते. पण आज प्रत्यक्ष मी अनुभव घेतला. असं वाटतंय मनाला सुखावणा-या या श्रावणसरी बरसतच रहाव्यात

पुन्हा पुन्हा वाट आवर्जून वाट पाहीन या श्रावणसरींची...

फिलींग चिंब चिंब...श्रावणसरी मनसोक्त बरसल्या...


आपल्या संस्कृतीत श्रावणाचं असलेलं स्थान पुन्हा एकदा अधोरेखित झालं.






Friday, 1 August 2014

कलावंत आणि समाज

कलावंताला वास्तवाची जाणीव असते, असेही म्हणता येते आणि नसतेही असेही म्हणता येते. कारण कलावंताला वास्तव आहे त्या स्वरूपात स्वीकारण्याची इच्छा नसते. आणि ते वास्तव त्याला पूर्णपणे नाकारताही येत नाही. म्हणून ते बदलण्याची जबरदस्त ओढ असतेम्हणजेच त्याची कलाकृती. वास्तव बदलण्याचा हा जो कलावंताचा प्रयत्न आहे, तो ब-यापैकी समाजावर अवलंबून आहे. म्हणूनच हे पाहणे महत्त्वाचे आहे की समाज या वास्तवाचा सामना कसा करेलॽ

माणूस आपल्या आनंदासाठी, आधारासाठी समाज निर्माण करत असतो. आणि मरेपर्यंत या समाजालात घाबरत जगत राहतो...कसाबसाजे समाजाला घाबरत नाहीत, ते समाजाला एक वेगळी दिशा देऊ इच्छितात. त्यांना स्वतःच्या विचारांवर विश्वास असतो. ते समाजाला बदलण्याचा ध्यास घेतात. आपल्या कृतीवर आपल्या बोलण्यावर ठाम राहून समाजाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न करतात. हीच असते समाजपरिवर्तनाची नांदी. समाजपरिवर्तनाची नांदी कलावंताच्या हातूनही होऊ शकते. जर त्याची स्वतःची एक ठाम भूमिका, दृष्टिकोन असेल तर

आजकाल जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. क्षणभर विश्रांती घ्यायलाही कोणाकडे वेळ नाही. शांत बसून विचार करणेही शक्य नाही. राजकारण, समाजकारण, अर्थकारणाने वातावरण एवढे ढवळून निघाले आहे की या युद्धजन्य परिस्थितीतून कलावंतच सर्व सामान्य माणसाला बाहेर काढू शकतो. कारण कलेच्या सान्निध्यात माणसाला त्वरित विरंगुळा मिळतो. तो एका वेगळ्याच जगात ओढला जातो. कला माणसाच्या आयुष्यात सुखद क्षण निर्माण करते.

आपल्याला वाटते, भारतात धर्म, जातपात, समाजव्यवस्था, भाषावार प्रांतरचना या सर्वांमुळे एकसंघ भारताला धोका आहे. परंतु खरे मूळ राजकारणात आणि अर्थकारणात सापडते. कारण भारतीय संस्कृतीच्या सर्व मुलभूत गोष्टी राजकारणाने नियंत्रित केलेल्या दिसून येतात. कलाकृतीसुद्धा यातून सुटलेली नाही. श्रीमंत वर्ग आपल्याकडील धनाने कलेला तोलतो. अभिजन वर्ग आपल्या आकलनाने कलेचे सौंदर्य जाणून घेतो. मग सामान्य माणसाने काय करावेॽ तो बापडा उथळ रंजनातच समाधान मानून घेतो. कलाकृती आणि राजकारण याबाबत न बोललेलेच बरे! 



रविंद्रनाथ टागोर म्हणतात, कलावंत हा निसर्गाचा प्रेमी आहे. त्यामुळे तो निसर्गाचा गुलाम आहे तसाच तो मालकही आहे. पण सामान्य माणसाच्या बाबतीत म्हणायचे झाले तर तो कधी निसर्गाचा गुलाम राहणे पसंत करतो, नाहीतर आपल्या ताकदीच्या जोरावर निसर्गावरच मालकी हक्क गाजवू लागतो. निसर्गावर मात एकटा माणूस करू शकत नाही. त्याला इतरांचीही सोबत लागते. यातूनच समूहभावनासमाज निर्माण झाला असावा

कलावंत स्वतः कितीही दुःखी असला तरी तो आपल्या कलेने रसिकांना आनंद देतो. सर्जनशील कलावंतांना असलेला वेदनेचा शाप आणि त्याचे मूळ नेमके कशात आहे, हे सहसा त्यांना कधीच कळत नाही. यासाठी समाजाला मात्र जबाबदार धरता येणार नाही. कलावंताची शोकांतिका रसिकांच्या मनावरही आघात करतेच

आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...