काही स्वप्न स्वप्नच राहिली तर चालू शकते. कारण
काही अशी स्वप्नं प्रत्यक्षात साकार झाली तर घातक ठरू शकतात. आपल्या मूल्यांना ती हादरा
देऊ शकतात. भूतदया हे आपले मूल्य आपण कसे विसरू शकतो…
मिलला टाळे लागल्यावर
लालबागहून मुकुंदने थेट आपल्या बायको मुलासह कोकण गाठले. वडिलोपार्जित जमिनीच्या तुकड्यावरच
आता आपला पुढचा संसार सुरू ठेवायचा निश्चय त्याने पक्का केला. तो गावाला आला, पण गावक-यांना
त्याचे काही विशेष असे काहीच वाटले नाही. तसा मुकुंद गावातील लोकांच्या तितकासा परिचयाचा
नव्हता. मुंबईला राहत असताना तो गावी एक-दोन दिवसापुरता येई.
त्याने आपले जुने घर
दुरुस्त करून घेतले. चाळीतल्या दहा-बाय बाराच्या खोलीतल्या संसाराला त्याने कौलारू
घरात सजवायला सुरुवात केली. जमिनीत घामाच्या धारा वाहेपर्यंत तो खपू लागला. त्याचा
मुलगा गावच्या शाळेत जाऊ लागला. बायको आजुबाजूच्या बायकांच्या गोतावळ्यात मिसळू लागली.
नव-याला धीर देत संसार सावरू लागली. मुकुंदला हळूहळू गावकरी आपल्या गावचो माणूस म्हणून वागवू लागले.
मुकुांदाला शेतात राबताना
पाहून गावक-यांना आपले हसू आवरणे कठीण जायचे. ह्येका आजून वायच कुदळीन खनाक येना नाय.
ह्यो शेती काय करतलो? असा गावक-यांना प्रश्न पडे. बाकी मुकुंदाला शेतीचे काम तितकेसे
काही जमले नाही.
त्याने आपल्या सबंध
शेतजमिनीत आंब्या-काजूच्या झाडांची आणि नारळाची लागवड करायचे ठरवले. तसे केलेही कारण
जमिनीच्या तुकड्यात राबण्यात मुकुंदाला अजिबात रस नव्हता. त्याचे लक्ष गावातल्या शिकारी लोकांकडे होते.
गावात पारध करणा-या
लोकांना खूप मानसन्मान मिळायचा. रानटी प्राण्यांची शिकार करणे ही गावात प्रथा होती.
नव्हे रानडुकरांची शिकार करणे ही एक अंधश्रद्धाच होती.
शिमग्याचे दिवस संपले
की गावातल्या गुरवाकडून रामेश्वराला कौल लावला जायचा आणि त्या दिवसापासून पुढे दोन
महिने पारधीचा हंगाम सुरू व्हायचा. गावातले नावाजलेले शिकारी म्हणजे ज्यांच्या नावावर
चार-पाच तरी रानडुकर मारल्याची नोंद होती असे हे नावाजलेले शिकारी दोन-तीन दिवस घरी
राहून बंदुकीच्या साफसफाईत वेळ घालवत. मग ते पारधीसाठी खांद्यावर बंदूक घेऊन एखाद्या
वीरोत्तमासारखे सज्ज होत. आणि जंगलाच्या दिशेने वाटचाल करत. रात्रीच्या किर्र अंधारातही
संपूर्ण जंगल पिंजून काढत.
एखादे रानडुकर पाणथळी जागेत आपली तृष्णा भागवत असलेले दिसले
की त्याला बंदूकीने आडवे पाडले जायचे. त्याला काठीवर बांधून गावात आणायचे. गावातल्या
सर्व घरांच्या मधून हर हर महादेव अशी गर्जना करत हिंडायचे. मग घराघरांतून सुवासिनी
स्त्रिया बाहेर येऊन काठीवर चार पाय बांधलेल्या अवस्थेत लोंबकळणा-या डुकराला ओवाळायच्या
आणि रक्तबंबाळ झालेल्या त्या डुकराच्या गळ्यात जास्वंदीच्या फुलांचा हार घालायच्या.
ही मिरवणूक पार पडल्यानंतर डुकराला देवळात न्यायचे.
देवाला नैवेद्य दाखवला जायचा आणि
नंतर त्याचे मटण करून गावजेवण घातले जायचे. हे सर्व यथासांग पार पडले की ज्याने हे
रानडुकर मारले त्याची गावात एकदम कॉलर टाईट. दोन-तीन आठवडे मग त्याचा कौतुकसोहळा असायचा...पुढील कथा भाग दोनमध्ये.
No comments:
Post a Comment