आज सकाळपासून मन फार उदास होतं. पूर्ण दिवस अस्वस्थतेत गेला. बाहेर निसर्ग श्रावणसरींत न्हाऊन निघाला होता. माझं मन मात्र आतल्या आत कुढत होतं.
संध्याकाळी
ऑफिस सुटल्यावर छत्री घेऊन
पावसातून चालताना मन हळूहळू
था-यावर येऊ लागले. इतक्यात लक्ष बागेतल्या झाडांकडे आणि पानवेलींकडे गेले. असं वाटलं झाडं आणि ती हिरवीगार भिजणारी पानं खदखदून हसतायत. त्यांच्याकडे पाहून मलाही खूप छान वाटू लागलं. आपणच का बरं दुःखीॽ असा प्रश्न मीच मला विचारला... मन झालं पुन्हा हिरवं, ताजंतवानं... कोरंकोरं.
एखादा क्षण निघून जातो. एखादी घटना घडून जाते. एखादी व्यक्ती मनाला छळून जाते. या अशा गोष्टी लवकरात लवकर विसरून जाण्याची सवय मनाला लावायला हवी. नाहीतर वेड लागालची वेळ येईल. पण आज चांगला धडा मिळाला.
उगाच कुठे नि कसल्या मनात साचून राहिलेल्या गोष्टींचा विचारच सोडून द्यायचा. आता मागे
वळून पहायचे नाही...पुढेच जायचे. मी ठरवलेले ध्येय गवसेपर्यंत नकारात्मक विचारांना माझ्या मनात आता जागा नाही.
श्रावणसरींनी
माझं मन अगदी स्वच्छ धुवून टाकलं. त्या हिरव्यागार झाडांना पाहताना शुद्ध विचारांची शाल माझ्यावर पांघरली गेली. श्रावणसरींची किमया आजवर साहित्यातून अनुभवत आले होते. पण आज प्रत्यक्ष मी अनुभव घेतला. असं वाटतंय मनाला सुखावणा-या या श्रावणसरी बरसतच रहाव्यात.
पुन्हा पुन्हा वाट आवर्जून वाट पाहीन या श्रावणसरींची...
फिलींग चिंब चिंब...श्रावणसरी मनसोक्त बरसल्या...
आपल्या संस्कृतीत श्रावणाचं असलेलं स्थान पुन्हा एकदा अधोरेखित झालं.
No comments:
Post a Comment