भूतकाळात घडून गेलेल्या चांगल्या आणि आनंद देणाऱ्या गोष्टी नेहमी आठवाव्यात.
त्यामुळे पुन्हा एकदा तो क्षण आपल्यासमोर जिवंत होतो आणि आपल्याला पुनःप्रत्ययाचा
आनंद देतो. बालपणात घडलेले असे कित्येक घटना-प्रसंग दिवसभरातील कामाच्या व्यापात
आपल्याला आठवले की आपल्या चेहऱ्यावर हसू फुटतं. भूतकाळातील अशाच सुंदर आठवणींपैकी
ही एक आठवण...
गणोबा गणोबा, कुठे गेला होतास?
कोकणात
कोकणातून काय आणलंस?
फणस...
नीटसं, काही आठवत नाही, पण अशा काहीशा शब्दातला संवाद बालपणी कानावर पडला होता.
सांगायचा मुद्दा हा, कोकण म्हटलं की ‘फणस’ या फळाची रेलचेल. यासाठी वेगळे पुरावे द्यायला
लागत नाहीत.
आमच्या गावच्या घरी बरीच वर्ष आमचं हक्काचं असं फणसाचं झाड नव्हतं. त्यामुळे
खूप वाईट वाटायचं. मग आम्ही ६-७ वर्षांचे असताना आईने फणसाची ७-८ झाडं लावली.
त्यातली ६ झाडं आता खूप मोठी झालीत. आणि मोठाले फणसही झाडांवर दिसू लागले. ज्या
दिवशी पहिला फणस आम्ही भावंडांनी झाडावर पाहिला, तेव्हा प्रचंड खूश झालो
होतो...
पण त्याआधी आमच्याकडे फणसाचं झाड नव्हतं तेव्हा आम्ही माळेच्या फणसाचे फणस
भाजीसाठी किंवा पुसभाजी करण्यासाठी घेऊन यायचो. आणि पिकलेले कापे-बरके फणस आम्हाला
शेजाराच्या घरांतील काका-काकू आणून द्यायचे.
पण त्याआधी ‘माळेचो फणस’ म्हणजे काय? ते सांगते.
आमच्या परबवाडीत गोसावी आडनावाची काही घरं आहेत. त्यांच्यामध्ये एक अशी रीत आहे
की त्यांच्या समाजातील कोणी व्यक्ती मृत झाल्यास आपल्या परसातलं एक झाड दान
करायचं. म्हणजे त्या झाडाला फुलांची माळ घालायची. या रीतीप्रमाणे आमच्या वाडीत
त्यांनी फणसाचं झाड दान केलं होतं. त्या झाडाला माळ घातली होती. असं आमच्या
शेजारची आजी सांगायची. ती खूप वयस्कर होती, पण आम्ही तिला ‘वहिनी’ म्हणून हाक मारायचो. ती
आम्हाला वाडीतल्या खूप जुन्या झालेल्या, विस्मरणात गेलेल्या गोष्टी सांगायची.
त्यातलीच ही एक...
म्हणजे रीतीनुसार माळेच्या फणसाचे फणस कोणीही काढून नेऊ शकत असे. पण आम्हाला
आता माळेच्या फणसाची वाट बघावी लागत नाही. आमच्या परबवाडीत भरपूर फणसाची झाडं
आहेत.
फणस हे फळ मला खूप गंमतीशीर वाटतं. वरून काटे, आतून गोड...त्याची भाजी करा
किंवा असेच पिकल्यावर खा... आणि गऱ्यातील आठीळा भाजून खा, उकडून खा, त्याची
भाजी करा किंवा सांबाऱ्यात घाला.
आमच्या गावी फणसाची भाजी करायचो तो दिवस म्हणजे एक मोठा सोहळा असायचा. आम्ही
चार-पाच घरांची मुलं, बायका सगळे एकत्र जमायचो. भाजीचे फणस मधुकाका फोडून द्यायचे.
मग आम्ही सगळे तो फणस साफ करायला सुरुवात करायचो. मोठ्या बायकांच्या फणस साफ करता
करता इकडच्या तिकडच्या गजाली सुरू व्हायच्या, आम्हाला वाटायचं त्यांचं लक्ष
नाहीय...आम्ही हळूच साफ करता करता कच्चे गरे अधून-मधून तोंडात टाकायचो. भाजी
करेपर्यंत धीर धरवतो तरी कुठे...
मग मोठ्या काकू दम भरायच्या, कच्चे गरे खाऊ नका, पोटात दुखेल...पटपट साफ
करा...मगे ताटलेत भाजी आणि पेज घेवन हवी तेवढी भाजी खावा, आमी काय बोलाचव नाय...
गजाली मारत असल्या तरी मोठ्या बायकांचं लक्ष असायचंच आमच्यावर!
मग आम्ही शांतपणे फणस साफ करायचो...
फणस साफ करून झाल्यावर कुणाच्या तरी एकाच्याच घरच्या चुलीवर ती भाजी मोठ्या
अल्युमिनिअमच्या टोपात शिजवली जाई. भाजी तयार झाल्यावर काकू सगळ्या मुलांना हाका
मारायच्या. वाडगाभर उकड्या तांदळाची पेज आणि बशीभर भाजी घेऊन फणसाच्या झाडाखाली
असलेल्या आमच्या खळ्यात(अंगणात) बसायचो.
तेव्हा आम्ही एक गंमत करायचो. पेज पिण्यासाठी चमचा न घेता, फणसाच्या झाडाची
पानं घेऊन त्याची हाताने खोलपी करायचो. त्या खोलपीने पेज प्यायची. खूप मजा
वाटायची. त्या फणसाच्या भाजीची चव अजुनही जिभेवर रेंगाळते...
मार्च-एप्रिल महिन्यामध्ये आमच्या इथल्या शहरातल्या मार्केटमध्ये एक फणसवाला
येतो. त्याच्याकडे छोटे कुयरी फणस, पिकलेले फणस आणि भाजीचे कच्चे फणसही असतात.
त्याच्याकडून फणस खरेदी करताना त्याच्याशी किंमतीमध्ये घासाघीस करताना गावाकडे
खळ्यात भाजीसाठी आणलेले सात-आठ फणस ओळीने ठेवलेले आठवतात. मग कळत नाही का हसायलाच
येतं. त्या फणसवाल्याशी इतर भाजीवाल्यांसारखी मैत्री केलीय. त्यामुळे त्याच्याकडे
कच्चे फणस असले की तो अगदी हाक मारून बोलावतो. कच्चा फणस खरेदी केल्यावर हातावर
दोन पिकलेले कापे गरे ठेवतो. म्हणतो, तुझ्याएवढीच मला एक मुलगी आहे, ती
बिहारमधल्या एका गावात राहते. त्याच्या चेहऱ्यावर माझ्याकडे बघून मुलीच्या आठवणीचं
एक समाधान आणि माझ्या चेहऱ्यावरही एक समाधान... फणसाची भाजी करताना गावाकडच्या
फणसाची भाजी करतानाच्या आठवणींचं...
|
मालवणी मसाला घालून केलेली फणसाची भाजी |
|
भाजीसाठी साफ केलेला फणस |