Thursday, 28 December 2017

कलेच्या क्षितीजावरील एक 'हिरा'बाई

'पुरुषानेही स्त्रीवर अव्यभिचारी, अचल प्रेम करायला हवे. स्त्रीनिष्ठा अपेक्षिणाऱ्या पुरुषांच्या दुटप्पी आणि दांभिकतेचा निषेध करावा तितका थोडाच. प्रेमाच्या साम्राज्यात स्त्री-पुरुष समान हवेत...' अशा वेळोवेळी धाडसी विचार मांडणाऱ्या हिराबाई पेडणेकर. त्यांचं आद्य महिला नाटककार म्हणून कार्य तसं दुलर्क्षित राहिलं असतं. पण लेखिका शिल्पा सुर्वे यांनी मात्र या गुणी, कलावंत ह्रदयाच्या आणि धाडसी लेखिकेचं चरीत्र शब्दबद्ध केलं आणि आजच्या पिढीला त्यांची ओळख करून दिली. अलिकडे काहीही माहिती हवी झाल्यास आपण विकीपीडीवर जातो. गुगल करतो. तिथे जेवढं काही वाचायला मिळेल, सापडेल तेवढंच आपल्याला वाटतं की एवढीच माहिती आहे. यापुढे फार काही कुणाचं कार्य नसेलच. अशा व्यक्तिमत्त्वांविषयी वाचायला क्वचित हल्ली पुस्तकांचा आधार घेतो. पण काही निखळ, निरलस सुंदर वाचायचं असेल तर आजही पुस्तकांशिवाय पर्याय नाही.
कारण मराठीतही काही वेगळ्या वाटेवरची, एखाद्या विस्मृत गेलेल्या व्यक्तिमत्त्वाचं आयुष्य उलगडणारी पुस्तकं तितक्‍याच तरलतेने लिहिली जातायत. याचं अलिकडंचं ताजं उदाहरण म्हणजे शिल्पा सुर्वे


यांनी लिहिलेलं हिराबाई पेडणेकरांचं चरीत्रात्मक पुस्तक.
पत्रकारितेचा 13 वर्षाचा अनुभव गाठीशी असणाऱ्या लेखिका शिल्पा सुर्वे यांना पत्रकाराच्या शोधक नजरेने त्यांना हिराबाईपर्यंत पोहोचवलं आहे. कारण अतिशय मनापासून घडवलेली ही कलाकृती आहे, हे पुस्तक वाचताना जाणवतंय. ज्या काळात स्त्रिया रंगभूमीवर काम करत नव्हत्या. नाटकातंही स्त्रीपात्र पुरुषच करत अशा काळात हिराबाईंचं संगीत दामिनी रंगभूमीवर झळकलं. हिराबाईंचा संगीतमय असला तरी हा काळजाला भिडणारा प्रवास लेखिकेने ओघवत्या शैलीत रेखाटलाय. हिराबाईंची संगीत साधना, कलेच्या क्षेत्रात वेगळं काही करण्याची धडपड, प्रस्थापितांच्या साम्राज्याला त्यांनी धडका देणं, एक माणूस म्हणून प्रत्येक पावलांवर त्यांना करावा लागलेला संघर्ष हे वाचताना सुन्न व्हायला होतं. पालशेतला निघण्याआधी हिराच्या मैत्रिणी सुधा आणि अंजनी भेटायला येतात तो प्रसंग अधिक तरल हळवा झालाय. हिरा सगळ्यापासून दूर पालशेतला जाऊन राहणार याचं मैत्रिणींना दुखही झालं होतं आणि अखेर तिच्या जिवाभावाचा माणूस भेटला म्हणून समाधानही झालं होतं. पुस्तकातील असे कित्येक छोटे छोटे प्रसंग छान रंगले आहेत. गिरगावातील कांदेवाडीचा परीसर कधी मधी दिसतो. पण आता तो परीसर पाहताना एक वेगळी दृष्टी मिळेल. या परीसराने एका महत्त्वाकांक्षी कलावंत गायिकेची धडपड पाहिली, तिचा संघर्ष पाहिला. तिची कला पाहिली. पण त्यातून इतर वलयांकित नाट्यमंडळींसारखा आपल्याला मान मिळावा या स्वप्नाला मात्र या जागेने अपुरं राहताना पाहिलं. हे सारं आठवेल. अशा त्या काळातील कित्येक कलावंतांची धडपड मुंबईने खास करून दक्षिण मुंबईने पाहिली असेल. त्यातल्या हिराचा परीचय आपल्याला शिल्पा सुर्वे या लेखिकेमुळे झाला. हे वाचक म्हणून प्रत्येकाला समाधान देणारं आहे. पण हिराची शोकांतिका चटका लावून जाते.

पूर्वप्रसिद्धी सकाळ मुंबई आवृत्ती

Thursday, 21 December 2017

त्यांचा चार्ली, आपला देवा!

आज देवा हा मराठी सिनेमा प्रदर्शित झालाय. त्यानिमित्ताने चार्लीच्या आठवणी जाग्या झाल्या. आणि लिहावसं वाटलं. कारण हेच की चार्लीसारखा अप्रतिम सिनेमा मराठीत यायलाच हवा होता...

टेसा नावाची एक ग्राफिक आर्टीस्ट... तिचे आई-वडील तिच्या लग्नासाठी सतत मागे लागलेत. तिला तर एवढ्यात लग्नच करायचं नाहीय आणि ती एके दिवशी घरातून पळते. आणि केरळमधल्या अशा एका ठिकाणी येऊन पोहोचते, जिथवर तिचे घरचे पोहोचू शकत नाहीत. आपल्या एका फ्रेंडच्या मदतीने ती एक खोली भाड्याने घेते. त्या खोलीत पाऊल टाकताच क्षणी खोलीतला सगळा पसारा पाहून ती खोली तिला अगदी नकोशी वाटते. आणि ती खोली बदलून मिळावी अशी मागणी तिथल्या संबंधितांकडे करते. पण नेमक्या त्याचवेळी तिला त्या खोलीत एक अतिशय भन्नाट, आश्चर्यचकीत करून सोडणारं असं काहीसं हाती लागतं. तिच्यासाठी तो एक खजिना असतो. (कारण काय तर तिचं ग्राफिक आर्टीस्ट असणं, म्हणजे थोडक्यात प्लॉट पॉईंट वन आधीचा ओपनिंग सीन) आता तो काय खजिना, कसला खजिना ते सिनेमा पाहताना किंवा ज्यांनी हा सिनेमा पाहिलाय त्यांना कळलंच असेल. तर हा सिनेमा आहे २०१५ मध्ये मल्याळम भाषेत प्रदर्शित झालेला चार्ली.
त्या खजिन्यात तिला जे काही सापडतं त्यामुळे तिची चार्लीला भेटण्याची उत्सुकता आणि कुतूहल दिवसेंदिवस वाढत जातं. तिच्या डोक्यात एकच विचार... कसा आहे चार्ली, कोण आहे हा चार्ली, मी त्याला कधी भेटणार...आणि ती त्याच्या शोधात निघते. मग कशी ती त्याच्या रोज नव्याने प्रेमात पडते, तिचा शोध पूर्ण होतो का? ती चार्लीला भेटते का? चार्ली आणि टेसाचं नातं कसं उलगडत जातं? हे सगळं सिनेमात पाहताना आपलीही क्षणाक्षणाला उत्सुकता वाढवतं आणि कुतूहल कायम ठेवत शेवटी आनंदाचा सुखद धक्का दिग्दर्शक आपल्याला देतो.


चार्लीची भूमिका मल्याळम सिनेमात डुलकर सलमानने (Dulquer Salmaan) साकारलीय. ती इतकी अप्रतिम की त्याला तोड नाही. या अभिनेत्याची याच सिनेमामुळे फॅनच व्हायला झालं मला. त्यानंतर त्याचे आधीचे उस्ताद हॉटेल, काली, बँगलोर डेज, हंड्रेड डेज ऑफ लव्ह, ओ कधाल कनमनी हे सिनेमे पाहिले. तो अभिनेता म्हणून एक वेगळंच रसायन आहे. तो अजून एका वेगळ्या लेखाचा विषय होऊ शकेल. मल्याळममधील स्टार अभिनेते मामुटी यांचा तो मुलगा म्हणून नव्हे तर त्याने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केलीय. तो अफलातून अभिनेता तर आहेच. पण अतिशय गोड गळ्याचा गायकही आहे. या सिनेमातलं गाजलेलं गाणं चुंदरी पेन्ने हे त्याने गायलंय. यामागेही एक लय भारी कारण आहे. या सिनेमात एकूण ८ गाणी, त्यातलं चुंदरी पेन्ने हे गाणं डुलकरनेच गावं अशी संगीतकार गोपी सुंदर याची इच्छा होती. गोपी सुंदर हा डुलकरचा खूप चांगला मित्र. त्यामुळे डुलकरने हे गाणं गायलं. हे गाणं चार्ली सिनेमात चार्ली त्याच्या शोधात निघालेल्या टेसाला उद्देशून गातोय. असं दाखवण्यात आलंय आणि देवा सिनेमात याच चालीत देवा अँथम बांधण्यात आलंय.

चुंदरी पेन्ने म्हणजे सुंदर मुलगी आणि टेसाला उद्देशून या गाण्याची मल्याळम शब्दरचना फारच सुंदर आहे. अभिनेता डुलकर सलमानचं जसं कौतुक करावं तितकं कमी तसंच पार्वथी या अभिनेत्रीचं. तिनेही मस्त भूमिका साकारलीय. क्युरीयस, क्षणाक्षणाला चकीत होणं, शोधक नजर, टेसाची उत्सुकता खूप छान अभिनीत केलीय. ही भूमिका देवा सिनेमात तेजस्विनी पंडीत करतेय. (पण ती यात लेखिका दाखवलीय.) आणि अर्थातच चार्लीची भूमिका अंकुश चौधरी करतोय. ट्रेलर आणि गाण्यांमधला दोघांचा अभिनय बघून असं वाटतंय की दोघांनीही आपल्या भूमिका छान पेलल्या आहेत. चार्लीमध्ये अजून एक महत्त्वपूर्ण भूमिका आहे ती म्हणजे डॉ. कनी. अपर्णा गोपीनाथ हीने ती भूमिका केलीय. ही भूमिका देवा सिनेमात स्पृहा जोशी करतेय. तिचा लूक यात खूपच छान दिसतोय.

देवा सिनेमा मल्याळम चार्लीचा ऑफीशीयल रिमेक आहे, असं विकीपीडीवर नोंदवण्यात आलंय. आणि हे आता सगळ्यांना माहितेय. पण मल्याळम सिनेमा जशाच तसा आम्ही घेतला नसून त्याच्या कथेचं मराठीत रुपांतरण केलंय असं देवाच्या टिमने काही प्रमोशनल इव्हेंट दरम्यान सांगितलंय. आणि ते जाणवतंय. पण ट्रेलर, ‘जराशी जराशी’ आणि ‘रोज रोज नव्याने’ या गाण्यांमधले काही सीन ओळखीचे वाटले.
सिनेमा बघताना माझ्या आणि माझ्या बहिणीच्या डोक्यातही असाच विचार आला होता की याच चार्लीचा मराठीत रिमेक वगैरे करण्यात आला तर त्याला कोकणची पार्श्वभूमीच असायला हवी. आणि नेमकं तसंच घडलं. हे खूप भारी वाटतंय. (खरंतर माझी बहिण हर्षदा हिच्या आग्रहामुळेच मी चार्ली पाहिला.) सिनेमातलं खेळकर, हलकं फुलकं तरीही गूढ, रम्य आणि कोड्यात टाकणारं तिथल्या जागांचं सौंदर्य हे सारं कोकणातच दिसू शकतं. देवा सिनेमाच्या निमित्ताने कोकण एका वेगळ्या दृष्टीकोनातून पहायला मिळणार आहे. कोकणातल्या लोककला दशावतार, नमन असं सगळं देवा सिनेमात पहायला मिळणार.

काहींचा असा समज असतो की दाक्षिणात्य सिनेमे म्हणजे तद्दन मसालापट असतात. त्यांच्यासाठी चार्ली म्हणजे सणसणीत चपराक ठरावी. कारण इतका कलात्मक आणि मनोरंजनाने परीपूर्ण असा हा सिनेमा आहे की आपणच कल्पनाच करू शकत नाही. अशा प्रकारे याच्या पटकथेची मांडणी आणि दिग्दर्शन करण्यात आलंय. सारंच भन्नाट आहे. अक्षरशः वेड लावतं. मार्टीन प्रक्कट यांनी चार्ली दिग्दर्शित केलाय. त्यांनीच उन्नी आर.(जयचंद्रन परमेश्वरन नायर) यांच्यासोबत मिळून त्याची पटकथा लिहिलीय. त्यासाठी दोघांनाही विभागून केरळ राज्याचा पुरस्कार मिळालाय. मूळ कथा उन्नी आर. यांची. तेसुद्धा एक लघुकथेतलं नावाजलेलं व्यक्तिमत्त्व. मल्याळम साहित्य आणि सिनेमात उन्नी आर. यांचं नाव आदरानं घेतलं जातं. ते कथालेखक तर आहेतच. तसंच ते अभिनेते, निर्मातेही आहेत. पण त्यांच्या करिअरची सुरुवात केरळमधील एका साप्ताहिकात उपसंपादकाच्या नोकरीने झाली. त्यांचा पत्रकारीतेचाच अनुभव या कथेपर्यंत घेऊन आला असेल असं चार्ली बघताना वाटून जातं. प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी कुठल्यातरी वेगळ्याच स्टोरीच्या शोधात असणं, हे तिथून आलं असावं, टेसाचं पात्र. असो यात खूप काही सांगण्यासारखं आहे.


मुळात माणसाला प्रत्येकाला या ना त्या नावाने संबोधून त्याला चौकटीत अडकवण्याची घाई असते. पण काही माणसं अशी चार्लीसारखी असतात. ती मात्र आपल्याला कोड्यात टाकतात त्यांच्या वागण्याने... त्यांना काय नावं द्यावं, काय म्हणावं, कुठल्या चौकटीत बसवावं या विचारात आपण असतो. नी ही चार्लीसारखी व्यक्तिरेखा आपल्याला सतत आश्चर्यचकीत करत राहते. मग तिला काय म्हणावं स्वच्छंदी, असीम, मुक्त पक्षी, अलबेला, अद्भूत, वाऱ्याची शितल सुखद झुळूक की अतरंगी...अख्खा आनंदाचा गाव ज्याच्यात वसलाय त्याला नेमकी हाक कशी मारावी, कुठल्या नावात बंदीस्त करावं. तर खरंच त्यांना असं कुठल्याही चौकटीत बंदीस्त करूच नये. त्यांना त्यांच्या आनंद वाटण्याच्या मिशनवर सोडून द्यावं. त्यांच्या चौकसपणाला चमत्काराचं रुप देता येईल, पण तात्पुरतं.

खरंतर चार्लीची गोष्ट साधीसोपी आहे. त्याला आपल्या आजुबाजुच्या साऱ्या माणसांना सुखी झालेलं पहायचंय. माणसांना आश्चर्याचा धक्का देताना त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पहायचंय. जसं देवा सिनेमातल्या एका संवादात अभिनेता अंकुश चौधरी म्हणतो. देवा सिनेमाच्या साऱ्या टिमचं अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांनी चार्लीला मराठीत आणलं. महत्त्वाचं म्हणजे कोकणच्या पार्श्वभूमीची निवड केली. चार्ली सिनेमा संपूर्ण आश्चर्याने भरलेला आणि भारलेला आहे. पण तरीही त्यातला शेवटचा सीन अगदी बारकाईने पाहण्यासारखा आहे. केरळमध्ये थ्रिसुर पुरम फेस्टीव्हल होतो. तो यात क्लायमॅक्सला दाखवलाय. आणि इतक्या लार्ज स्केलवर हे शूट करण्यात आलंय की त्याची भव्यता कित्येक दिवस डोळ्यांसमोरून हटणार नाही अशीच.
देवा सिनेमात दिसणारं कोकणही असंच आश्चर्यचकीत करतं. अंकुश चौधरी, तेजस्विनी पंडीत, स्पृहा जोशी यांचे लूक खूपच छान, फ्रेश वाटतायत. अमितराज यांची गाणीही मस्त आहेत. हर्षवर्धनचा आवाजही जराशी जराशी गाण्यात मस्त वाटतोय. दिग्दशर्क मुरली नलप्पा यांच्या कामगिरीचं कौतुक तर सिनेमा पाहिल्यानंतरच करता येईल. पण विश्वास वाटतोय देवा निराश करणार नाही.आणि आर्वजून उल्लेख करावा लागेल तो लेखकांच्या टीमचा. देवा सिनेमाची पटकथा अश्विनी शेंडे हिने लिहिलीय. असं म्हणतात की Writer and Creativity is the package of feelings. Nobody can make it, Nobody can destroy it, Nobody can explain it, But innocent people can feel it…
म्हणून कदाचित अश्विनी हिने तेजस्विनीच्या माया नावाच्या पात्राला लेखिका दाखवलंय. कारण चार्लीत तर इनोसंस आहेच पण टेसाही तितकीच इनोसंट आहे. गीतकार गुरू ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांचं गीतलेखनही छान झालंय.

आपल्याला चार्लीच्या गोष्टीतून काय शिकायला मिळतं. तर कुतूहल. आपलं कुतूहल नेहमी जागृत असेल तर व्यक्ती म्हणून आपण नव्या गोष्टींचा शोध घेत राहतो. आणि शोधाच्या वाटेवर येणाऱ्या साऱ्यांना आनंदाचे क्षण देऊ शकतो. पण कुतूहल संपलं तर सारंच निरस होऊन जाईल...काहीही झालं तरी चेहऱ्यावरचं गोड हसू आणि प्रत्येक दिवस सुरू झाल्यावर आपल्याला एक वेगळं, काही छान करता येईल ते बघणं... अतिशय सकारात्मक उर्जा देणारा हा सिनेमा आहे. कलावंत ह्रदयाच्या माणसाने तर हा सिनेमा अजिबात चुकवू नये. कारण प्रत्येक कलावंताला (लेखक, चित्रकार) यांना हा सिनेमा वेगळा जाणवेल. आणि सर्वसामान्य प्रेक्षकांना हा सिनेमा ‘आनंद देत असता आनंद घेत जावे’ हे विंदांनी सांगितलेल्या ओळींचा अर्थ उमगावा तसा उमगेल...
अगदी थोडक्यात चार्ली म्हणजे गोड स्माईल...So Keep Smiling…

Tuesday, 5 December 2017

स्त्रीविषयक कायदे आणि बाबासाहेब

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्त्री-स्वातंत्र्याविषयीचे विचार परिवर्तन घडवून आणणारे होते. स्त्रियांना समान न्याय मिळावा यासाठी हिंदू कोड बिल कायद्याच्या स्वरूपात ते साकार करू पाहत होते. बाबासाहेबांचा स्त्रीविषयक आणि स्त्रियांच्या प्रश्‍नांविषयी दृष्टिकोन कसा होता. हे 'डॉ. आंबेडकर आणि हिंदु कोड बिल' या चांगदेव  भगवान खैरमोडे यांच्या पुस्तकाचा आधार घेऊन मांडण्याचा हा प्रयत्न...



डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्रीमुक्तीविषयक विचार काळाच्या कक्षा ओलांडून जाणारे होते. समस्त मानवजातीच्या आणि स्त्रियांच्या स्वातंत्र्य, समता, न्याय या मूल्यांसाठी ते लढले. स्त्रियांच्या प्रगतीवरच समाजाची प्रगती अवलंबून असते, असे त्यांचे मत होते. "लग्न झालेल्या प्रत्येक मुलीने पतीची मैत्रीण म्हणून त्याच्या प्रत्येक कार्यात सहकार्य द्यावं; मात्र गुलामासारखं वागण्यास खंबीरपणे तिने नकार द्यावा व समतेसाठी आग्रह धरावा.' बाबासाहेबांचा हा विचार आजही आदर्शवत आहे. बाबासाहेबांनी स्त्रीमुक्तीचा विचार राष्ट्रीय दृष्टिकोनातून केला. ज्या देशात 50 टक्के स्त्रिया स्वतंत्र नसतात तो देश अर्धाअधिक गुलाम असतो, असे सांगताना स्त्रीशक्तीचं सृजनात्मक स्वरूप राष्ट्रविकासाला जोडण्याचं कार्य त्यांनी केलं. बाबासाहेबांची स्त्रीमुक्तीची वैचारिक बैठक गौतमबृद्ध, ज्योतिबा फुले, कबीर या तीन गुरूंच्या प्रभावातून निर्माण झाली होती. कुटुंबप्रमुखाची हुकूमशाही आणि स्त्रियांची गुलामगिरी हाच सामाजिक विषमतेला, गुलामगिरीला खतपाणी घालणारा घटक आहे. या घटकाला हादरे दिल्याशिवाय कुटुंबात व समाजातही स्त्री-पुरुष समानता येणे अशक्‍य आहे. हे बाबासाहेबांनी पुरते ओळखले होते. म्हणून त्यांनी महिलांविषयक प्रश्‍नांचा सुक्ष्मपणे अभ्यास केला.

पुरुषप्रधान धर्मव्यवस्थेत स्त्रिया या पुरुषांच्या गुलाम आहेत. बालविवाह, पुनर्विवाहास विरोध, विधवा विवाहास विरोध, सतीची चाल अशा घातक रूढी-परंपरेच्या बेड्यांनी स्त्रियांना जखडून ठेवून त्यांचे उदात्तीकरण करण्यात आले आहे हे त्यांनी जाणले. भारतातील जाती, हिंदू स्त्रियांची उन्नती व अवनती, पाकिस्तान अर्थात भारताची फाळणी तसेच भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथांतून बाबासाहेबांनी स्त्रियांच्या उद्धारासाठी विचारपेरणी केलेली आहे. स्त्रिच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाला कवडीचीही किंमत नाही. हा मनूचा कोता दृष्टिकोन आजही दिसतो. धर्म कोणताही असो, पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत स्त्रीच्या स्वातंत्र्याबद्दल आजही गैरसमज आहेत. स्त्री स्वातंत्र्यामुळे समाजात स्वैराचार माजेल. अनैतिकता, उपभोगवास, पाश्‍चात्याचं अंधानुकरण, कुटुंबसंस्थेचा विध्वंस इ. दोष निर्माण होतील, अशी टीका केली जाते. स्त्री स्वातंत्र्याचा विचारही एक फॅशन आहे, असेही म्हटले जाते.

स्त्रियांची सर्जनशीलता केवळ मुलं जन्माला घालण्यापुरती मर्यादित न ठेवता, विविध क्षेत्रांत तिला कर्तृत्वाची उंच शिखरं गाठण्याची संधी देणं. यात मानव जातीचे हित आहे. ही भूमिका घेऊन आंबेडकरांनी स्त्रीमुक्तीचा वसा घेतला आणि स्त्रियांच्या धर्मप्रणित गुलामगिरीच्या विरोधात ते उभे ठाकले.
डॉ. आंबेडकरांनी कायद्याच्या माध्यमातून महिला सबलीकरणाचं जे कार्य केलं ते ऐतिहासिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण आहे. राज्यघटनेत स्त्रीविषयक कायद्यांचा समावेश त्यांनी केला. मजूरमंत्री या पदावर असताना गिरण्या, कारखाने येथे काम करणाऱ्या कामगार स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीनं वेतन मिळावं. स्त्रियांना बाळंतपणासाठी रजा मिळावी. महिलांच्या मुलांसाठी कामाच्या ठिकाणी पाळणाघर असावीत. वयात आलेल्या सर्वच पुरुषांबरोबर स्त्रियांनाही मताधिकार असावेत, अशा विविध मागण्या करून त्या संमत करून घेतल्या. एक भारतीय नागरिक म्हणून स्त्रियांना ते सर्व हक्क असावेत जे पुरुषाला असतात. स्त्रीला खऱ्या अर्थाने एक नागरिक, स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगता यावं यासाठी ठोस विचार व खंबीर भूमिका घेऊन डॉ. आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाचा मसुदा मांडला होता.

हिंदू कोड बिलातील स्त्रीला मिळालेले हक्क व अधिकार महिला सबलीकरणाच्या प्रक्रियेला चालना देणारे होते. द्विभार्या प्रतिबंध, घटस्फोटाचा अधिकार, वारसा हक्क, दत्तक कायदा स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगण्यासाठी आवश्‍यक असलेली समान संधी इ. अनेक गोष्टींना कायद्याचे रूप देण्याचा प्रयत्न हिंदू कोड बिलाच्या रूपाने त्यांनी केला. कायद्याच्या माध्यमातून स्त्रियांनी सक्षम व्हावे यासाठी ते झटले. आंबेडकरांनी स्त्री शिक्षणावरही भर दिला. सामाजिकदृष्ट्या महिलांची उन्नती व्हावी, असे बाबासाहेबांचे मत होते. स्त्रियांना स्वयंनिर्णयाच्या अधिकारापासून वंचित केल्यास राष्ट्रीय आर्थिक विकासाची गती रोखली जाईल. म्हणून स्त्रिया स्वावलंबी असल्या पाहिजेत, असे ते आपल्या भाषणांतून सांगत. आज स्त्रियांना सामाजिक क्षेत्रात व्यावसायिक स्वातंत्र्य मिळालं आहे. त्याचा पाया घालण्याचं काम आंबेडकरांनी केलं. त्यांच्यामुळेच महिला सबलीकरणाचा मार्ग प्रशस्त झाला आहे. "स्त्रियांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढलं पाहिजे.' आंबेडकरांचे स्त्रीमुक्तीच्या संदर्भातील असे विचार अतिशय प्रेरणादायी आणि कल्याणकारक आहेत. जुन्या चालीरीती, परंपरांवर आधारित असलेली क्रूर विषमता, समाजातील रूढी-परंपरा की ज्या स्त्रियांना मानसिक, शारीरिक दुबळं बनवितात, स्त्रियांचं स्वातंत्र्य नष्ट करतात अशा विषमतेत होरपळणाऱ्या स्त्रियांना स्वतंत्र करणं, समान हक्क प्राप्त करून देणं हा हिंदू कोड बिलाचा उद्देश होता.

स्त्रीला जागृत करून तिला अधिक संरक्षण देऊन पुरुषांच्या जाचातून मुक्त करण्यासाठी तिला समानता, आर्थिक, राजकीय, सामाजिक स्वातंत्र विशेष कायद्याने द्यावे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात होते. म्हणून त्यांनी हिंदू कोड बिलाचा आग्रह धरला होता. महिला सबलीकरण म्हणजे स्त्रियांचं आध्यात्मिक, राजनैतिक, सामाजिक आणि आर्थिक सामर्थ्य वाढविणं. यामध्ये त्यांच्या स्वतःच्या क्षमतांसंबंधी त्यांचा आत्मविश्‍वास विकसित करण्याच्या अधिकाराचा समावेश आहे. बाबासाहेबांची स्त्रीविषयक भूमिका ही अशी अत्यंत व्यापक आणि दूरगामी होती. हिंदू कोड बिल हे स्त्री स्वातंत्र्याचा जाहीरनामाच होतं. 1947 पासून 1951 पर्यंत संसदेमध्ये भारतीय स्त्रियांचा हक्क आणि अधिकारांसाठी बाबासाहेब सनातन्यांशी संघर्ष करत होते. भारत सरकारने 2001 हे महिला सबलीकरणाचं वर्ष म्हणून घोषित केलं आहे. त्याचा जो बोजवारा उडाला त्याची फलनिष्पत्ती आज आपण पाहतो आहोत. अशा वेळी लक्षात येतं की, बाबासाहेबांसारख्या द्रष्टा विचारवंत पुन्हा होणे नाही. आजच्या बदलत्या परिस्थितीत स्त्री स्वातंत्र्याची चर्चा विज्ञान, तंत्रज्ञान, पोलिस, शिक्षण आदी क्षेत्रांत स्त्रियांचा जो सहभाग आहे, त्यामागे डॉ. आंबेडकरांचे विचार आणि कार्यकर्तृत्वाची संपदा आहे. बाबासाहेबांनी महिला सबलीकरणांचं महत्त्व जाणलं होतं. त्या दृष्टीने ठोस पावलंही उचलली. कायद्याच्या माध्यमातून आज पुन्हा आपणा सर्वांना बाबासाहेबांचे विचार आठवण्याची गरज आहे. महिला सबलीकरणाच्या बाबतीत तरी त्यांच्या विचारांना पुन्हा अनुसरण्याशिवाय तरणोपाय नाही. 

Friday, 1 December 2017

ससूनची कलासंध्या!

Intro - समुद्रकिनारा ही अशी जागा आहे जिथे संध्याकाळ खूपच सौंदर्यवती होऊन भेटते; पण अशी संध्याकाळ `कला`वती होऊन भेटली तर? अशी संध्याकाळ अनुभवायला मिळाली ससून डॉकला. खरंतर इथल्या हवेतला गंध साधारणतः मत्स्यप्रेमींनाच आवडतो, इतरांचा मात्र नाकाला हात जातो! पण, या दोघांनीही ससूनला जाऊन कलाप्रेम जपायला हरकत नाही. कारण तिथे एक प्रदर्शन तुमची वाट पहातंय. कलाप्रेमी नसलात तरीही इथली कला भावेलच तुम्हाला... कारण जीवनापेक्षा कला कधीही वेगळी नसतेच...


ही गोष्ट आहे शनिवारी संध्याकाळी साधारण साडेपाचच्या दरम्यानची. एरवी चित्रपट, मॉल, हॅंगआऊट किंवा फूड जॉईट्‌सकडे वळणारी तरुणाईची पावलं ससून डॉककडे वळत होती. तीही कलेच्या ओढीने. इतक्‍या उत्साहाने सहभागी झालेल्या १५ ते ३० वयोगटातील तरुणाईला खूप दिवसांनी असं कलेत रमताना पाहता येत होतं. हे खूपच भारी वाटत होतं. तसं पाहायला गेलं तर १४२ वर्षांपासूनचा सर्वांत जुना मासळी बाजार अशी ससून डॉकची ओळख. ‘साऊथ मुंबई इज द हार्ट ऑफ मुंबई’ आणि ‘अदर्स आर ओन्ली पार्ट ऑफ मुंबई’ असं अभिमानाने सांगणाऱ्या दक्षिण मुंबईकरांच्या खूप आठवणी या जागेशी जोडल्या गेल्या आहेत. हे मासेखाऊ मुंबईकरांचं एक हक्काचं मार्केट; पण अलीकडे मच्छी का पानी असं कोणी ओरडलं तरी लांब पळणारे अनेक जण माशांचा इतका तीव्रतेने वास येणाऱ्या त्या ठिकाणी होते.


मस्त मॉड फंकी, हिप्पी, शॉर्टसमध्ये आलेली कूल तरुणाई कलेचा आस्वाद घेत होती. नेहमीपेक्षा इथला नूर वेगळाच होता. मच्छीमारांची संथ लगबग होती. काही जण जहाजांवर सामानसुमान लादत होते. काही जण जाळी सोडून ठेवत होते. मधूनच एक कोळंबीने भरलेला ट्रक दिसला. काही सुके मासे खाली पडलेले दिसले. कोळी महिलांची टोपल्या घेऊन जाण्याची लगबग असं सगळं सुरू होतं. त्याचबरोबर तिथे दिसणारी कलात्मकताही लक्ष वेधून घेत होती. जिथे जहाजं थांबतात आणि मासे बाहेर नेण्यासाठी भरले जातात, त्या लांबलचक शेडची भिंत रंगात न्हाऊन निघाली होती. रस्त्याच्या कडेला लागूनच असलेल्या एका मोठ्या शेडच्या भिंतीवर मासेवाल्या कोळी महिलेचं चित्रं दिसलं. तिच्या टोपलीत एक मोठा मासा होता आणि तिच्या चेहऱ्यावरचे बोलके भाव आकर्षित करणारेच होते.


या डॉकवर एक चार मजली इमारत आहे. ती इमारत बाहेरून आणि आतून कलेने आणि कलाकारीने अगदी ओतप्रोत नटली आहे. इथला कोपरा न्‌ कोपरा पाहायला एक संध्याकाळ तर अपुरीच पडेल. या इमारतीत आत जाण्यासाठी मोठी रांग लागली होती. निःशुल्क असलं तरी हे प्रदर्शन पाहण्यासाठी फॉर्मालिटी पार पाडव्या लागतात. त्या करून आम्ही आत गेलो आणि अक्षरशः अवाक्‌ झालो.

‘द स्टार्ट फाऊंडेशन’ने हे कलाप्रदर्शन मच्छीमार कोळी बांधवांना समर्पित केलंय आणि आम्ही हे त्यांना डेडिकेट करतोय असा गाजावाजा न करता ते कलेतूनच दाखवून दिलंय. ‘आर्ट इज ॲक्‍टिव्हिटी दॅट प्रोड्युसेस ब्युटी’ या टॉलस्टॉयच्या म्हणण्याचा मथितार्थ ही संपूर्ण इमारत पाहताना समजला. चित्रकलेचे विविध प्रकार इथे पाहायला मिळाले. कुठे प्लास्टिकचा वापर करून केलेलं डिझाईन; तर कुठे भिंतीवर सर्वसामान्य माणसांची काढलेली पोर्ट्रेट, अमूर्त कलेचे काही नमुनेही इथे पाहायला मिळाले. स्प्रे पेंटिंग, वॉल पेंटिंग, कागदाचा आणि खास करून टाकाऊ वस्तूंचा वापर करून इथे शिल्पकला आणि आर्ट वर्क करण्यात आलं होतं. शेवटच्या मजल्यावर एक महाकाय माशाचा सापळा मधोमध टांगलेला होता. त्या मजल्यावर खुर्च्याही मांडलेल्या होत्या आणि स्क्रिनिंगसाठी खास जागा होती. तिथे स्टार्ट इंडिया फाऊंडेशनने कशा प्रकारे कलात्मक विचार करून ससून डॉकचा मेकओव्हर केला, त्याची चित्रफीत तिथे दाखवली जात होती.

कोळी वेशभूषेतील कमरेवर टोपली घेतलेली महिला, जाळं टाकणारे मच्छीमार आणि फक्त जाळ्याचा वापर करून केलेली कलाकृती आत शिरताच दृष्टीस पडते. तिथे अजून भारी सोनेरी लालसर रंगांच्या मशांनी भरलेलं फिश टॅंक होतं. त्यात काही मोबाईल आणि काही इतर इलेक्‍ट्रिक गॅजेट्‌स टाकलेली होती. म्हणजे हा एक प्रकारचा प्लास्टिक कचराच आणि तो माशांना म्हणजेच एकूणच सागरी जिवांना कसा हानीकारक आहे, हे अगदी उत्तमरीत्या दाखवलं होतं. तर एके ठिकाणी चांदीच्या रंगाचा पत्रा आणि चादरी किंवा गोधड्यांसारखा दिसणारं डार्क रंगाचं कापड वापरून एक सुंदर आर्ट वर्क करण्यात आलं होतं; पण भिंतीवरची कलाकारी सगळ्यात भन्नाट होती. त्यावर एका स्त्रीचं चित्रं खूपच बोलकं होतं. साडी नेसलेली आणि कमरेवर हात घेतलेली अशी ती. त्यातला तिचा स्वाभिमानी स्वॅग लक्षवेधी होता.

शहरातील सार्वजनिक इमारती आणि रस्त्यांवर साकारण्यात येणाऱ्या कलाकृतीला ‘स्ट्रीट आर्ट’ म्हणतात. त्यानुसार ‘स्ट्रीट आर्ट’ला प्रोत्साहन देण्यासाठी ‘स्टार्ट इंडिया फाऊंडेशन’ने मुंबईत दुसऱ्यांदा हा फेस्टिव्हल आयोजित केलाय. ससून डॉकप्रमाणेच मुंबईतील अजून काही महत्त्वाच्या ठिकाणांचा कलात्मक कायापालट या फेस्टिव्हलमधून करण्यात येणार आहे. नोव्हेंबर महिन्यातच इथे कलाकारीला सुरुवात झाली. अजून काही भाग सुशोभित करण्याचं आणि स्ट्रीट आर्टचं काम इथे सुरू आहे. संपूर्ण डिसेंबर महिना हे कलाप्रदर्शन सगळ्यांना पाहता येणार आहे.
कला ही अशी गोष्ट आहे, जिने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे नेहमीच समाजात बदल घडवून समतोल साधण्याचा प्रयत्न केलाय. ही क्षमता असलेली कला ही एकमेव गोष्ट आहे, यावर पुन्हा नव्याने विश्‍वास बसला. याला कारण ससूनला अनुभवलेली कलामय संध्याकाळ. कलेचा आनंद आणि कलेचा आस्वाद सर्व स्तरातील कलारसिकांना घेता यावा. विविध कलाप्रकार समजून घेता यावेत यासाठी अशी प्रदर्शनं भरायला हवीत.
ससून डॉकला माशांचा वास सहन करूनही जाणारे खूप असतात, मत्स्यप्रेम (ताजी मासळी) हे त्याचं कारण होतं; पण आता मत्स्यप्रेमींबरोबर कलाप्रेमीही तिथे मुद्दाम जातील हे नक्की!

पूर्वप्रसिद्धी - सकाळ मुंबई आवृत्ती 
1 डिसेंबर 2017 
टुडे पुरवणी (पान क्रमांक 4, कलारंग)




आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...