Thursday, 21 December 2017

त्यांचा चार्ली, आपला देवा!

आज देवा हा मराठी सिनेमा प्रदर्शित झालाय. त्यानिमित्ताने चार्लीच्या आठवणी जाग्या झाल्या. आणि लिहावसं वाटलं. कारण हेच की चार्लीसारखा अप्रतिम सिनेमा मराठीत यायलाच हवा होता...

टेसा नावाची एक ग्राफिक आर्टीस्ट... तिचे आई-वडील तिच्या लग्नासाठी सतत मागे लागलेत. तिला तर एवढ्यात लग्नच करायचं नाहीय आणि ती एके दिवशी घरातून पळते. आणि केरळमधल्या अशा एका ठिकाणी येऊन पोहोचते, जिथवर तिचे घरचे पोहोचू शकत नाहीत. आपल्या एका फ्रेंडच्या मदतीने ती एक खोली भाड्याने घेते. त्या खोलीत पाऊल टाकताच क्षणी खोलीतला सगळा पसारा पाहून ती खोली तिला अगदी नकोशी वाटते. आणि ती खोली बदलून मिळावी अशी मागणी तिथल्या संबंधितांकडे करते. पण नेमक्या त्याचवेळी तिला त्या खोलीत एक अतिशय भन्नाट, आश्चर्यचकीत करून सोडणारं असं काहीसं हाती लागतं. तिच्यासाठी तो एक खजिना असतो. (कारण काय तर तिचं ग्राफिक आर्टीस्ट असणं, म्हणजे थोडक्यात प्लॉट पॉईंट वन आधीचा ओपनिंग सीन) आता तो काय खजिना, कसला खजिना ते सिनेमा पाहताना किंवा ज्यांनी हा सिनेमा पाहिलाय त्यांना कळलंच असेल. तर हा सिनेमा आहे २०१५ मध्ये मल्याळम भाषेत प्रदर्शित झालेला चार्ली.
त्या खजिन्यात तिला जे काही सापडतं त्यामुळे तिची चार्लीला भेटण्याची उत्सुकता आणि कुतूहल दिवसेंदिवस वाढत जातं. तिच्या डोक्यात एकच विचार... कसा आहे चार्ली, कोण आहे हा चार्ली, मी त्याला कधी भेटणार...आणि ती त्याच्या शोधात निघते. मग कशी ती त्याच्या रोज नव्याने प्रेमात पडते, तिचा शोध पूर्ण होतो का? ती चार्लीला भेटते का? चार्ली आणि टेसाचं नातं कसं उलगडत जातं? हे सगळं सिनेमात पाहताना आपलीही क्षणाक्षणाला उत्सुकता वाढवतं आणि कुतूहल कायम ठेवत शेवटी आनंदाचा सुखद धक्का दिग्दर्शक आपल्याला देतो.


चार्लीची भूमिका मल्याळम सिनेमात डुलकर सलमानने (Dulquer Salmaan) साकारलीय. ती इतकी अप्रतिम की त्याला तोड नाही. या अभिनेत्याची याच सिनेमामुळे फॅनच व्हायला झालं मला. त्यानंतर त्याचे आधीचे उस्ताद हॉटेल, काली, बँगलोर डेज, हंड्रेड डेज ऑफ लव्ह, ओ कधाल कनमनी हे सिनेमे पाहिले. तो अभिनेता म्हणून एक वेगळंच रसायन आहे. तो अजून एका वेगळ्या लेखाचा विषय होऊ शकेल. मल्याळममधील स्टार अभिनेते मामुटी यांचा तो मुलगा म्हणून नव्हे तर त्याने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केलीय. तो अफलातून अभिनेता तर आहेच. पण अतिशय गोड गळ्याचा गायकही आहे. या सिनेमातलं गाजलेलं गाणं चुंदरी पेन्ने हे त्याने गायलंय. यामागेही एक लय भारी कारण आहे. या सिनेमात एकूण ८ गाणी, त्यातलं चुंदरी पेन्ने हे गाणं डुलकरनेच गावं अशी संगीतकार गोपी सुंदर याची इच्छा होती. गोपी सुंदर हा डुलकरचा खूप चांगला मित्र. त्यामुळे डुलकरने हे गाणं गायलं. हे गाणं चार्ली सिनेमात चार्ली त्याच्या शोधात निघालेल्या टेसाला उद्देशून गातोय. असं दाखवण्यात आलंय आणि देवा सिनेमात याच चालीत देवा अँथम बांधण्यात आलंय.

चुंदरी पेन्ने म्हणजे सुंदर मुलगी आणि टेसाला उद्देशून या गाण्याची मल्याळम शब्दरचना फारच सुंदर आहे. अभिनेता डुलकर सलमानचं जसं कौतुक करावं तितकं कमी तसंच पार्वथी या अभिनेत्रीचं. तिनेही मस्त भूमिका साकारलीय. क्युरीयस, क्षणाक्षणाला चकीत होणं, शोधक नजर, टेसाची उत्सुकता खूप छान अभिनीत केलीय. ही भूमिका देवा सिनेमात तेजस्विनी पंडीत करतेय. (पण ती यात लेखिका दाखवलीय.) आणि अर्थातच चार्लीची भूमिका अंकुश चौधरी करतोय. ट्रेलर आणि गाण्यांमधला दोघांचा अभिनय बघून असं वाटतंय की दोघांनीही आपल्या भूमिका छान पेलल्या आहेत. चार्लीमध्ये अजून एक महत्त्वपूर्ण भूमिका आहे ती म्हणजे डॉ. कनी. अपर्णा गोपीनाथ हीने ती भूमिका केलीय. ही भूमिका देवा सिनेमात स्पृहा जोशी करतेय. तिचा लूक यात खूपच छान दिसतोय.

देवा सिनेमा मल्याळम चार्लीचा ऑफीशीयल रिमेक आहे, असं विकीपीडीवर नोंदवण्यात आलंय. आणि हे आता सगळ्यांना माहितेय. पण मल्याळम सिनेमा जशाच तसा आम्ही घेतला नसून त्याच्या कथेचं मराठीत रुपांतरण केलंय असं देवाच्या टिमने काही प्रमोशनल इव्हेंट दरम्यान सांगितलंय. आणि ते जाणवतंय. पण ट्रेलर, ‘जराशी जराशी’ आणि ‘रोज रोज नव्याने’ या गाण्यांमधले काही सीन ओळखीचे वाटले.
सिनेमा बघताना माझ्या आणि माझ्या बहिणीच्या डोक्यातही असाच विचार आला होता की याच चार्लीचा मराठीत रिमेक वगैरे करण्यात आला तर त्याला कोकणची पार्श्वभूमीच असायला हवी. आणि नेमकं तसंच घडलं. हे खूप भारी वाटतंय. (खरंतर माझी बहिण हर्षदा हिच्या आग्रहामुळेच मी चार्ली पाहिला.) सिनेमातलं खेळकर, हलकं फुलकं तरीही गूढ, रम्य आणि कोड्यात टाकणारं तिथल्या जागांचं सौंदर्य हे सारं कोकणातच दिसू शकतं. देवा सिनेमाच्या निमित्ताने कोकण एका वेगळ्या दृष्टीकोनातून पहायला मिळणार आहे. कोकणातल्या लोककला दशावतार, नमन असं सगळं देवा सिनेमात पहायला मिळणार.

काहींचा असा समज असतो की दाक्षिणात्य सिनेमे म्हणजे तद्दन मसालापट असतात. त्यांच्यासाठी चार्ली म्हणजे सणसणीत चपराक ठरावी. कारण इतका कलात्मक आणि मनोरंजनाने परीपूर्ण असा हा सिनेमा आहे की आपणच कल्पनाच करू शकत नाही. अशा प्रकारे याच्या पटकथेची मांडणी आणि दिग्दर्शन करण्यात आलंय. सारंच भन्नाट आहे. अक्षरशः वेड लावतं. मार्टीन प्रक्कट यांनी चार्ली दिग्दर्शित केलाय. त्यांनीच उन्नी आर.(जयचंद्रन परमेश्वरन नायर) यांच्यासोबत मिळून त्याची पटकथा लिहिलीय. त्यासाठी दोघांनाही विभागून केरळ राज्याचा पुरस्कार मिळालाय. मूळ कथा उन्नी आर. यांची. तेसुद्धा एक लघुकथेतलं नावाजलेलं व्यक्तिमत्त्व. मल्याळम साहित्य आणि सिनेमात उन्नी आर. यांचं नाव आदरानं घेतलं जातं. ते कथालेखक तर आहेतच. तसंच ते अभिनेते, निर्मातेही आहेत. पण त्यांच्या करिअरची सुरुवात केरळमधील एका साप्ताहिकात उपसंपादकाच्या नोकरीने झाली. त्यांचा पत्रकारीतेचाच अनुभव या कथेपर्यंत घेऊन आला असेल असं चार्ली बघताना वाटून जातं. प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी कुठल्यातरी वेगळ्याच स्टोरीच्या शोधात असणं, हे तिथून आलं असावं, टेसाचं पात्र. असो यात खूप काही सांगण्यासारखं आहे.


मुळात माणसाला प्रत्येकाला या ना त्या नावाने संबोधून त्याला चौकटीत अडकवण्याची घाई असते. पण काही माणसं अशी चार्लीसारखी असतात. ती मात्र आपल्याला कोड्यात टाकतात त्यांच्या वागण्याने... त्यांना काय नावं द्यावं, काय म्हणावं, कुठल्या चौकटीत बसवावं या विचारात आपण असतो. नी ही चार्लीसारखी व्यक्तिरेखा आपल्याला सतत आश्चर्यचकीत करत राहते. मग तिला काय म्हणावं स्वच्छंदी, असीम, मुक्त पक्षी, अलबेला, अद्भूत, वाऱ्याची शितल सुखद झुळूक की अतरंगी...अख्खा आनंदाचा गाव ज्याच्यात वसलाय त्याला नेमकी हाक कशी मारावी, कुठल्या नावात बंदीस्त करावं. तर खरंच त्यांना असं कुठल्याही चौकटीत बंदीस्त करूच नये. त्यांना त्यांच्या आनंद वाटण्याच्या मिशनवर सोडून द्यावं. त्यांच्या चौकसपणाला चमत्काराचं रुप देता येईल, पण तात्पुरतं.

खरंतर चार्लीची गोष्ट साधीसोपी आहे. त्याला आपल्या आजुबाजुच्या साऱ्या माणसांना सुखी झालेलं पहायचंय. माणसांना आश्चर्याचा धक्का देताना त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पहायचंय. जसं देवा सिनेमातल्या एका संवादात अभिनेता अंकुश चौधरी म्हणतो. देवा सिनेमाच्या साऱ्या टिमचं अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांनी चार्लीला मराठीत आणलं. महत्त्वाचं म्हणजे कोकणच्या पार्श्वभूमीची निवड केली. चार्ली सिनेमा संपूर्ण आश्चर्याने भरलेला आणि भारलेला आहे. पण तरीही त्यातला शेवटचा सीन अगदी बारकाईने पाहण्यासारखा आहे. केरळमध्ये थ्रिसुर पुरम फेस्टीव्हल होतो. तो यात क्लायमॅक्सला दाखवलाय. आणि इतक्या लार्ज स्केलवर हे शूट करण्यात आलंय की त्याची भव्यता कित्येक दिवस डोळ्यांसमोरून हटणार नाही अशीच.
देवा सिनेमात दिसणारं कोकणही असंच आश्चर्यचकीत करतं. अंकुश चौधरी, तेजस्विनी पंडीत, स्पृहा जोशी यांचे लूक खूपच छान, फ्रेश वाटतायत. अमितराज यांची गाणीही मस्त आहेत. हर्षवर्धनचा आवाजही जराशी जराशी गाण्यात मस्त वाटतोय. दिग्दशर्क मुरली नलप्पा यांच्या कामगिरीचं कौतुक तर सिनेमा पाहिल्यानंतरच करता येईल. पण विश्वास वाटतोय देवा निराश करणार नाही.आणि आर्वजून उल्लेख करावा लागेल तो लेखकांच्या टीमचा. देवा सिनेमाची पटकथा अश्विनी शेंडे हिने लिहिलीय. असं म्हणतात की Writer and Creativity is the package of feelings. Nobody can make it, Nobody can destroy it, Nobody can explain it, But innocent people can feel it…
म्हणून कदाचित अश्विनी हिने तेजस्विनीच्या माया नावाच्या पात्राला लेखिका दाखवलंय. कारण चार्लीत तर इनोसंस आहेच पण टेसाही तितकीच इनोसंट आहे. गीतकार गुरू ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांचं गीतलेखनही छान झालंय.

आपल्याला चार्लीच्या गोष्टीतून काय शिकायला मिळतं. तर कुतूहल. आपलं कुतूहल नेहमी जागृत असेल तर व्यक्ती म्हणून आपण नव्या गोष्टींचा शोध घेत राहतो. आणि शोधाच्या वाटेवर येणाऱ्या साऱ्यांना आनंदाचे क्षण देऊ शकतो. पण कुतूहल संपलं तर सारंच निरस होऊन जाईल...काहीही झालं तरी चेहऱ्यावरचं गोड हसू आणि प्रत्येक दिवस सुरू झाल्यावर आपल्याला एक वेगळं, काही छान करता येईल ते बघणं... अतिशय सकारात्मक उर्जा देणारा हा सिनेमा आहे. कलावंत ह्रदयाच्या माणसाने तर हा सिनेमा अजिबात चुकवू नये. कारण प्रत्येक कलावंताला (लेखक, चित्रकार) यांना हा सिनेमा वेगळा जाणवेल. आणि सर्वसामान्य प्रेक्षकांना हा सिनेमा ‘आनंद देत असता आनंद घेत जावे’ हे विंदांनी सांगितलेल्या ओळींचा अर्थ उमगावा तसा उमगेल...
अगदी थोडक्यात चार्ली म्हणजे गोड स्माईल...So Keep Smiling…

No comments:

Post a Comment

आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...