Wednesday, 22 July 2015

जोडीदार

ओळखीच्या माणसांचा
भोवती माझ्या पसारा
पण मला वाटतो हा
देखाव्याचा खेळ सारा

एकटेपण सोसून झाले
भावनेला शब्द गवसले
पण बोलताना मनासारखे
आसवांचे मेघ झाले

माझे रितेपण शोधते
सोबतीस एक साथी
स्वप्नांच्या गावातही
तो अजून अनोळखी

अनोळखी या वाटेवरती
चालते पुन्हा पुन्हा
प्रश्न सारे कोंडले
उत्तराला आसुसले
एका 'ती'ची ही आर्त साद. ती आयुष्याला खूप कंटाळली होती. ऑफिसमध्ये सारं काही ठिक होतं. पण तिच्या खाजगी आयुष्यात दिवसेंदिवस प्रचंड उलथापालथ होत होती. ऑफिसमधून घरी आल्यानंतरचा प्रत्येक क्षण तिची परीक्षाच घेत असे. तिचं लग्नाचं वय झालं होतं. तरी तिचं लग्न जमत नव्हतं. निर्बुद्ध समाज तिला नाही नाही ती लेबलं लावून मोकळा झाला होता. "वय वर्ष २८ आहे माझं. मी काही म्हातारी नाही झाले. काय कमी आहे माझ्यात? " ती स्वतःलाच प्रश्न विचारून समजावण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती.

अलिकडे तिला कुठेच बाहेर जाऊ नये असं वाटे. सगळ्यांच्या नजरा आपल्यावरच आहेत, असं तिला वाटे.  पण इथे मुंबईत रहायला आल्यापासून तिने एक गोष्ट मात्र कधीच चुकवली नाही ती म्हणजे महालक्ष्मीच्या मंदिरात जाणं. ती काही धार्मिक व्रतवैकल्यात गुरफटलेली मुलगी नव्हती. काळाच्या बरोबर चालणारी होती. पण तिला देवीच्या मंदिरांमध्ये जायला आवडे. त्यातूनही महालक्ष्मीच्या मंदिरात जायला विशेष आवडे. मंदिर तिच्या घरापासून जवळच होतं. ती सहज तिथे चालत जाऊ शकत असे. जवळपास २५ मिनिटं लागायची. तिला जेव्हा केव्हा मनापासून मंदिरात जावंसं वाटे तेव्हा ती आवर्जून जाई. पण मंदिरात जाण्याचे दोन खास दिवस तिचे ठरलेले होते. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी आणि ३१ डिसेंबरला ती न चुकता मंदिरात जायची. तिला मंदिरात गेल्यावर खूप प्रसन्न वाटायचं. आपल्या मनातल्या साऱ्या इच्छा, आकांक्षा ती घडाघडा देवीसमोर बोलून मोकळी व्हायची. आपल्या अश्रूंना न आवरता डोळ्यातून वाहू द्यायची. सकाळच्या वेळी पायी चालत मंदिरात जाणं, तिला खूप आवडायचं. "सकाळचीच वेळ मंदिरात येण्यासाठी उत्तम! " असं तिने ठरवूनच टाकलं होतं.
एके दिवशी घरी लग्नाच्या बाबतीत घडलेल्या प्रकाराने ती खूप दुखावली गेली होती. तिने अख्खी रात्र रडून घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती महालक्ष्मीच्या मंदिरात गेली. "इतकी मानहानी सोसत आपण का बरं जगायचं?" याचा जाब विचारायला ती देवीसमोर हात जोडून उभी राहिली. "आता जोवर माझं लग्न होत नाही. तोपर्यंत तुझ्या मंदिरात पाऊल टाकणार नाही. मी एकटी नसेन, माझा जोडीदारही माझ्यासोबत असेल. तेव्हाच तुझ्या मंदिराची पायरी चढेन. आता माझ्या लग्नाची काळजी मी नाही, तू करायचीस." देवीशी भांडून, तिला आव्हान देतच ती मंदिरातून बाहेर पडली.

दोन वर्षं उलटून गेली. तिचं लग्न झालं नाही. ती खूप चिडचिडी झाली होती. पण स्वतःलाच दोष देणं तिने बंद केलं होतं. तिला आता काहीही झालं तरी ताठ मानेनं जगाचयं होतं. समाजाचं बोलणं फारसं मनाला लावून घ्यायचं नाही, असं तिने ठरवलं होतं. ती कामात स्वतःला गुंतून घेऊ लागली. मग एके दिवशी खूप मनापासून मंदिरात जावंसं वाटलं. पण तिला आठवलं, आपण त्या दिवशी मंदिरात काय बोलून आलो होतो ते. "पण जाऊ दे ना काय हरकत आहे. मी मंदिरात एकटी गेले तर. मी देवीला नवस बोलले नव्हते. माझ्या मनातली एक वेडी भावना देवीसमोर बोलून बिनधास्त झाले होते. तो फक्त एक संवाद होता, माझ्या मनातील भावनांवर त्या दिवशी नियंत्रण ठेवू शकले नव्हते. एवढंच ते... त्यात काय एवढं कठोरपणे पाळायचं. मी आज जाणारच एकटी देवीच्या मंदिरात, बघू काय होतं ते. संध्याकाळी सोसायटीत थर्टी फर्स्टच्या पार्टीची तयारी सुरू होईल. मी नेहमी जाते तशी सकाळीच मंदिरात जाऊन येते." असं स्वतःशीच बोलून ती निघाली. मनात खूप विचार येत होते. खरंच अशी काही जादू घडली असती दोन वर्षात आणि मी माझ्या जोडीदारासोबतच मंदिरात आले असते तर... तिला या विचाराचं हसू आलं.
ये सब बातें फिल्मों में ठिक हैं, रियल लाईफ में ऐसा कुछ नही होता तिने आपल्या मनाला समजावलं. मंदिराचा कळस दिसू लागला. पुढच्या ५ मिनिटात ती मंदिराच्या प्रवेश दारापाशी पोहोचली. तिच्या मनात खळबळ माजली होती. चेहरा घामाघुम झाला होता. पायऱ्या चढताना तिला जाणवत होतं की ती एकटी नाहीय. कुणीतरी तिच्या सोबत चालतंय. पण तिने मागे वळून पाहिलं नाही. तिने ओटीचं ताट घेतलं.. झुळझुळती पिवळी ओढणी डोक्यावरून घेतली. पुजाऱ्याकडे ओटीचं ताट दिलं. तिने डोळे मिटले. "देवी मला माफ कर. माझी चूक झाली. मी त्या दिवशी काहीतरी वेड्यासारखं बरळून गेले. वाटलं होतं लवकरच माझी ती इच्छा पूर्ण होईल. आणि धावत तुझ्या दर्शनाला माझ्या जोडीदारासोबत येईन. पण असं झालं नाही. शेवटी ती मंदिरात न येण्याची स्वतःहून मलाच घातलेली अट मी मोडून काढली." पुढे ती बोलणार होती तितक्यात तिचा तोल गेला. ती खाली कोसळणार तोच तिला मागून कुणीतरी सावरलं. ती त्याच्या आधाराने उभी राहिली. पुजाऱ्याने ताट दिलं, घेण्यासाठी त्या दोघांनीही हात पुढे केला. पुजाऱ्याने दोघांना आशिर्वाद दिला. पुजाऱ्याच्या शब्दांनी ती भानावर आली. तिने आपल्या बाजूला वळून पाहिलं. एक तरुण मुलगा तिच्याकडेच पाहत उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी गवसल्याचं समाधान झळकत होतं. ती चालू लागली. तोही तिच्या मागोमाग चालू लागला. तिला जाणवलं कुणीतरी आपल्यामागे येत आहे. ती मागे वळली. तिने त्या मुलाचे आभार मानले आणि पुन्हा चालू लागली. तेवढ्यात तो म्हणाला, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आपण थोडं इथं बसूयात का?  तिलाही थकवा जाणवत होता. एवढ्याश्या चालण्याने ती कधी थकत नाही. पण कितीही संकटं आली तरी मी खंबीर आहे, असा मुखवटा जो गेली दोन वर्षं तिने चढवला होता. आज देवीसमोर हात जोडल्यावर तो मुखवटा गळून पडला होता. त्यामुळेच तिचा तोल गेला होता.
ती दोघंही बसली. तो बोलू लागला. "तुम्ही मला ओळखत नाही. पण मी तुम्हाला ओळखतो. दोन वर्षांपूर्वी सकाळच्या वेळी मी मंदिरात आलो होतो. त्या दिवशी मी पहिल्यांदा तुम्हाला मंदिरात पाहिलं. आणि मी तुम्हाला पाहताक्षणी तुमच्या प्रेमात पडलो. मला त्याच दिवशी तुमच्याशी बोलायचं होतं. तुम्ही मंदिरातून जाऊ लागलात तेव्हा मीही तुमच्या मागोमाग निघालो. पण आपल्या दोघांमध्ये खूप अंतर होतं. मी तुम्हाला हाकही मारू शकत नव्हतो. तितक्यात सिग्नल संपलं. नी गाड्या सुरू झाल्या. तुम्ही सिग्नलच्या पलिकडे निघून गेलात. पण तुमच्यामागे धावताना माझं सिग्नलकडे लक्षच नव्हतं. एका गाडीने मला धडक दिली. माझ्या दोन्ही पायांना खूप लागलं. गेली दोन वर्षं मी व्हिलचेअरवर होतो. पण गेली दोन वर्षं मी कशी काढली माझं मलाच ठाऊक. तुमचं नाव माहीत नाही. तुम्ही कुठं राहता हे माहीत नाही. मग कसा शोध घेणार होतो मी तुमचा. तुमचा चेहरा नजरेसमोरून हटत नव्हता. गेल्याच आठवड्यापासून कसल्याही आधाराशिवाय चालण्याचा प्रयत्न करतोय. आज सकाळी उठलो तेव्हा पायांमध्ये ताकद जाणवली आणि दोन पायांवर धड उभा राहू शकलो. उभा राहिलो तेव्हा पुन्हा नजरेसमोर तुमचा चेहरा आला नी मंदिरात यायचं ठरवलं. तुम्हाला भेटल्यावर आता कळतंय की माझ्या मनाने का ध्यास घेतला होता मंदिरात येण्याचा. माझ्या प्रेमाचा स्वीकार करा. मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही.
आतापर्यंत ती स्वप्नातच आपल्याला जोडीदाराला विनवणी करत होती. "किती छळतं हे एकाकीपण
एकदाचबस एकदाच तरी तू,  खराखुरा ये ना…" आणि आज तो तिच्या आयुष्यात खराखुरा आला होता.
               

दोघांच्याही डोळ्यात पाणी होतं. नजरेतूनच दोघांनी परस्परांचा स्वीकार केला. देवीसमोर पुन्हा एकदा दोघांनी मनोभावे हात जोडले. ती दोन मने आज एक होऊन तृप्त झाली होती. मंदिरातून घरी जाताना ती आता एकटी नव्हती. तिच्यासोबत तिच्या जिवाभावाचा जोडीदार होता.  

तो, ती आणि छत्री

ती एक स्वप्नाळू मुलगी होती. तिला पाऊस खूप आवडायचा. आभाळ भरून आलं की तिला खूप आनंद व्हायचा. मग ती आभाळाकडे बघत टाळ्या वाजवायची. तिच्यासाठी पाऊस म्हणजे जिवाभावाचा सखा!!!
पावसाळा हा तिचा आवडता ऋतू ती एखाद्या सणासारखा साजरा करायची. रोज उंबऱ्यावर बसून पावसाची वाट पाहायची. पावसाच्या रिमझिम सरी बरसू लागल्या की भान हरपून पावसात मनसोक्त भिजायची. तिच्या बालपणापासून तिने पावसाच्या सोबतीने अनेक मोहक क्षण अनुभवले होते. ते सारे अनुभव तिने ह्रदयाच्या कप्प्यात जिवापाड जपले होते.
गावचा पाऊस म्हणजे निसर्गाची अनोखी किमया होती. इथे शहरात आल्यापासून आता फक्त तिला आठवणीतल्या पावसाची सोबत होती. पण एके दिवशी तिने ठरवलं, पाऊस शहरातला काय, गावाकडचा काय, एकच! फक्त ठिकाणं वेगवेगळी!
आपण इथल्या पावसातही मनसोक्त मजा करायची. आणि आभाळ भरून आलं. तिला उत्सुकता होती की शहरातले लोक पावसाचं स्वागत कसं करतात याची. पण तिची घोर निराशा झाली. पाऊस आल्याचं कुणाच्या चेहऱ्यावर समाधान नव्हतं. सगळे नेहमीच्या रहाटगाडग्यात बिझी होते. काही जणांना तिने समुद्रावर जाताना पाहिलं  तेही छत्री घेऊन.
तिही छत्री घेऊन बाहेर पडली. खरंतर तिला छत्री न घेता भिजत जायचं होतं. पण काय करणार! असं एकटंच वेड्यासारखं भिजत कसं जाणार? लोग क्या कहेंगे? हा विचार डोक्यात येऊन ती छत्री घेऊन बाहेर पडली.
तिने छत्री घेतली होती खरी पण ती छत्री मधे मधे तिरकी करून कधी कधी थोड्या वेळासाठी बाजूला करत ती पावसाच्या सरींचा स्पर्श अनुभवत होती. किनाऱ्यावर पोहोचली तेव्हा आनंदाच्या कारंजाने तिच्या मनात उसळी घेतली. किनारा किती आकर्षक दिसत होता. सागरातून उसळणारी प्रत्येक लाट काहीतरी निरोप किनाऱ्याला सांगून परतत होती.
मरीन ड्राईव्हच्या फुटपाथवर छत्री घेऊन रिमझिम सरींत एकटक समुद्राकडे पाहताना ती भान हरपून गेली. मनोमन म्हणत होती... "यावर्षीच्या पावसात मी एकटीच भिजते आहे... ठिक आहे... पण पुढच्या वर्षीच्या पावसात माझ्यासोबत भिजायला तोही असेल. मी एकटी नसेन... मी एकटी नसेन... पाऊस पडायला लागला की मी लहान मूल होऊन जाते आणि वाटत राहतं माझ्यासोबत कुणीतरी असायला हवं... जिवाभावाचं... एकाच छत्रीतून त्याच्यासोबत चालण्याचा क्षण माझ्या आयुष्यात कधी येईल का?"
ती एकटी चिंब भिजलेला समुद्रकिनारा पाहताना कुणाचीतरी सोबत मागत होती. गावातून शहरात आल्यावर ती खूप एकटी पडली होती. हॉस्टेलमधल्या मुलींशी तिची फारशी मैत्री झाली नव्हती. तिच्या छत्रीवर, फुटपाथवर, समुद्रकिनाऱ्यावर पाऊस बेधुंद बरसत होता. तसाच तिच्या मनाच्या आभाळतल्या पावसानेही आत दाटी केली होती. फक्त तिच्या पापण्याआडून बरसायचा बाकी होता. आणि पुढे घडणाऱ्या भयानक प्रसंगाची तिने कल्पनाच केली नव्हती.
पावसामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. म्हणून चार बाईकस्वार तरुण फुटपाथवरून रोरावत चालले होते. त्यातल्या एकाने तिला जोरात धडक दिली.
पाऊस आल्यामुळे आनंदित झालेली ती क्षणार्धात फुटपाथवर कोसळली. कुणीच तिच्या मदतीला धावलं नाही. जो तो दुर्लक्ष करत, फक्त हळहळ व्यक्त करत पुढे निघून जात होता. अखेर त्या गर्दीतून एक तरुण मुलगा पुढे आला. त्याने तिला उचललं. ती बेशुद्ध अवस्थेत होती. हॉस्पीटलमध्ये पोहोचेपर्यंत मेंदूतून खूप रक्तस्त्राव झाला होता. दोन दिवसांनी ती शुद्धीवर आली. तिच्या आजूबाजूला कोणीच नव्हतं.
थोड्या वेळाने डॉक्टर आले. तिने डॉक्टरांना विचारलं, ... मी इथे कशी?
डॉक्टरांनी तिला सांगितलं... "शांत व्हा... तुमचा अपघात झाला होता. तो मुलगा तुम्हाला इथे घेऊन आला." डॉक्टरांनी पॅसेजमध्ये बसलेल्या मुलाकडे हात दाखवला.
तो मुलगा उठून तिच्याजवळ आला. तिने विचारलं, ... 'तुम्ही कोण?'
तो म्हणाला, "ते जाऊ देत... आधी मला सांगा तुमच्या घरी कोण कोण असतं?"
तुम्ही कुठे राहता?
तुमचे नातेवाईक... तुमचं नाव?
तुम्हाला इथे आणलं तेव्हा तुमची ओळख पटावी असं तुमच्याकडे काहीच नव्हतं. फुटपाथवर तुमच्या बाजूला फक्त एक छत्री पडली होती.
तिने मेंदूवर जोर दिला. आठवायचा प्रयत्न केला. पण तिला काहीच आठवेना.
डॉक्टर म्हणाले, ... "काळजी करू नका. आठवेल तुम्हाला हळूहळू... ताण घेऊ नका... थोडा वेळ शांत पडून रहा..."
ती स्वप्नाळू मुलगी आपली ओळख कायमची विसरून गेली होती. घरच्यांशी संपर्क साधण्याचं काहीच साधन हाती उरलं नव्हतं. त्याने मात्र तिला अंतर दिलं नाही. तिला पूर्ण बरं वाटल्यावर तो तिला आपल्या घरी घेऊन गेला. वर्षभराच्या सहवासाने दोघे मनाने खूप जवळ आले होते. ती आपली ओळख त्याच्या डोळ्यात शोधत होती. आपलं सारं जग ती त्याच्याच डोळ्यात पाहत होती. दोघांनी लग्न केलं.

आता ते आठवड्यातून दोनदा तरी मरीन ड्राईव्हला येतात. आणि पावसात भिजायला तर एकाच छत्रीतून आवर्जून ती दोघं मरीन ड्राईव्हला येतात. ती लहान मूल होऊन त्याच्यासोबत सरींचा स्पर्श मनसोक्त अनुभवते. त्याला वाटतं,  तिला इथे आणलं तर काहीतरी आठवेल. तिच्या कुणीतरी ओळखीचं भेटेल. पण पुढच्याच क्षणी तो प्रचंड घाबरूनही जातो. "तिच्या ओळखीचं कुणी भेटलं नी तिला माझ्यापासून कायमचं दूर घेऊन गेलं तर..." कारण आता तिच्याशिवाय आपल्या आयुष्याची तो कल्पनाच करू शकत नाही...


पूर्वप्रसिध्दी - १७ जुलै २०१५, साप्ताहिक लोकप्रभा

Tuesday, 14 April 2015

स्मारकांचा अट्टाहास कशासाठी?

चाळीतल्या ऐनापुरे मामांचं नुकतच निधन झालं होतं. नेहमी गडबड गोंगाट असणाऱ्या चाळीत शांतता पसरली होती. पण ती काही दिवसांचीच पाहुणी असणार होती... पुन्हा झालं गेलं विसरून चाळीचं वातावरण पुन्हा निवळणार होतं. पण बरेच दिवस लोटले, ऐनापुरे मामांना जाऊन... धार्मिक विधीही पार पडले होते. तरी चाळीतलं वातावरण काही पूर्वपदार येईना. मामांचा चाळीवर, चाळीतल्या माणसांवर खूप जीव होता. आणि चाळीतल्या मोठ्या माणसांपासून ते लहानग्यांपर्यंत सर्वांना मामांचा लळा होता.
एके दिवशी दुपारच्या जेवणानंतर चाळीतली काही मंडळी चाळीसमोरच्या छोटेखानी आवारात बसली होती. त्यातल्या एकाने विषय काढला, "खूप दिवस झाले मामांना जाऊन.  त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे. ती काही केल्या भरून निघत नाही." इतक्यात दुसरा एकजण म्हणाला,  "आपण ऐनापुरे मामांची समाधी बांधूया."  त्याच्या अशा बोलण्याने चाळीसमोरच्या आवारातील अस्ताव्यस्त घोळका गंभीर झाला. त्या घोळक्यातील एक-दोन टाळकी थोडंसं हसलीही होती. 'समाधी' हा शब्द ऐकून. मग बरंच विचारमंथन झालं. पण समाधी बांधण्याच्या निर्णयाप्रत कुणीही येईना. आठवडाभर यावर उलट-सुलट चर्चा सुरू होती. आणि या चर्चेने पार खालची पातळी गाठली होती. ऐनापुरे मामांच्या स्मृती राहिल्या बाजुलाच. हे असंच होत आहे हल्ली. समाधी किंवा स्मारक बांधण्यामागचा उदात्त हेतू आपण विसरत चाललो आहोत. आणि समाधी, स्मारक यावर विचार (?) करण्यात नाहक शक्ती खर्च करतो आहोत.
खरे पाहता याची काही एक आवश्यकता नाही. कारण हे सारे रिकामटेकडेपणाचे उद्योग आहेत. हे सद्यस्थितीच्या स्मारकांच्या चाललेल्या वादांवरून वाटतं.  असं म्हणतात की माणूस रिकामपणाचा वेळ कसा घालवतो. यावर त्याची संस्कृती अवलंबून असते. या मताचा विचार केला तर असं दिसून येईल की आता समाजात पुतळा, स्मारकांची संस्कृती मूळ धरू पाहत आहे.
मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि प्रसिद्ध लेखिका इरावती कर्वे यांनी त्यांच्या परिपूर्ती या लेखसंग्रहातील बीज-क्षेत्र या लेखात एक विधान केलं होतं की "समाजात  नैसर्गिक घटनांपेक्षा सामाजिक संकेतांनाच जास्त प्राधान्य असते. इतकेच नाही तर नैसर्गिक घटनांचा उपयोग सामाजिक संकेताना बळकटी आणण्यासाठी होतो. "


आजचे पुतळ्यांचे राजकारण पाहता हे विधान आजच्या परिस्थितीला चपखलपणे लागू होते. सामान्य व्यक्ती असो वा एखादी महान व्यक्ती असो. मृत पावल्यानंतर तिचा अंत्यविधी होईपर्यंत घडणारी प्रत्येक घटना नैसर्गिक असते. पण एकदा का अंत्यविधी पार पडला की नंतर अस्थी विसर्जन, श्राद्धविधी ते अगदी पुतळा किंवा स्मारक होण्याची जी प्रक्रिया सुरू होते ती सामाजिक संकेतांमुळेच. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय?  तर त्याचं उत्तर असं आहे की मृत व्यक्तीच्या अस्थी विसर्जन कुठे करतो तर व्यक्तीच्या घरचे लोक गरीब असतील तर जवळपासच्या समुद्रात आणि श्रीमंत असतील तर नाशिक, काशी अशी अस्थिविसर्जनाच्या ठिकाणांची यादी वाढत जाते. मग श्राद्धविधी तोसुद्धा ऐपतीप्रमाणे होत असतो. आणि नंतर पुतळा किंवा स्मारकाचा विचार.


मला वाटतं, पुतळा आणि स्मारकाचा विचार हा पूर्णपणे भावनिक पातळीवर होत असतो. कारण भारतीय मनोविचारांचा पक्षी भावनेचे पंख लावून उडत असतो. अलिकडचे राजकारण पाहता भावनिक आवाहनांना जोर आल्याचं दिसतं आहे. पुतळे आणि स्मारकाबद्दल आपण कसे भावूक होतो याचं उदाहरण द्यायचं झालं तर 'अजिंठा' हा नितीन देसाई यांचा चित्रपट. या चित्रपटातील शेवटच्या दृश्यात मेजर रॉबर्ट गीलला हे कळतं की पारो आता या जगात नाही. ती आपल्याला कायमची सोडून गेली आहे. त्याला खूप दुःख होतं. दुःखाच्या आवेगाने तो कोसळतो. नंतर तो समाधीसमोर नतमस्तक होताना चित्रपटात दाखवले आहे. हे दृश्य इतकं परिणामकारक आहे की पाहताना वाटतं, रॉबर्ट गीलचा सारा दुःखावेग, भावनांचा कल्लोळ त्या समाधीत बंदिस्त झाला आहे आणि गिलसाहेब मनातून थोडे शांत झालेले दिसतात.
गजमल माळी यांच्या 'कल्पद्रुमाची डहाळी' या नाटकाच्या मनोगतात लिहिल्याप्रमाणे मेजर रॉबर्ट गील यांनी ज्या टेकडीवर बंगला बांधला होता. त्याच आवारात पारोची समाधी आहे. आणि गिलसाहेबांची समाधी चर्चयार्ड भुसावळ येथे आहे. पारो आणि गिलचं उत्कट प्रेम आणि निष्ठा  येणाऱ्या पिढीला कळावी म्हणून या दोन्हीही समाधींचं अनन्यसाधारण महत्त्व आहे.
भारतात अशा अनेक पुरातन समाधी, स्मारके आहेत ज्यांना आपल्या भावनिक दृष्टिकोनातून अधिक महत्त्व आहे. एखादी व्यक्ती किंवा महनीय व्यक्ती यांच्या जाण्याने आपल्या आयुष्यात जी कमतरता निर्माण होत असते. ती भरून काढण्यासाठी आपण काही मार्ग शोधत असतो. समाधीचा विचार त्यापैकीच एक.


प्रसिद्ध मानसशास्त्र तज्ज्ञ जॉन ग्रे यांनी त्यांच्या मार्स-व्हीनस मालिकेतील 'मार्स अँड व्हीनस स्टार्टींग ओव्हर' या पुस्तकात आपल्या आयुष्यातून निघून गेलेल्या व्यक्तींच्या स्मृतीसाठी, आपले भावनिक समाधान व्हावं, यासाठी काही उपाय सांगितले आहेत. ते असे... स्मृतीमध्ये एखादं झाड किंवा विशेष रोपटं तुमच्या प्रिय व्यक्तीच्या आठवणीत लावा. आणि त्याचं संगोपन करा. तुमच्या बागेचा एक कोपरा तिच्या/त्याच्या नावे अर्पण करा. तुमच्या प्रिय व्यक्तीची कशावर श्रद्धा होती ते आठवा. तेथे काही तिच्या नावे देणगी द्या आणि शक्य झाले तर, जर ते सार्वजनिक ठिकाण असेल तर एखादे छोटेसे स्मृतिचिन्ह तिचं नाव कोरून बसवा. हे सारे उपाय विधायक आहेत. कारण त्या व्यक्तीबद्दलची आस्था त्यात आहे.
एखादी महान व्यक्ती मृत पावली तर तिचे अंत्यविधी केले त्याच जागी त्याची समाधी अथवा स्मारक व्हावं का?  एखाद्या जागेला त्या व्यक्तीचे नाव द्यावे का? सार्वजनिक ठिकाणी तिचं स्मारक बांधावं का? अशा प्रश्नांना धार्मिक आधार नसून भावनिक अधिष्ठानच अधिक असल्याचं दिसतं. हिंदू धर्माच्या संकल्पनेत श्राद्ध विधीला भव्य, दिव्य असं स्थान आहे. मृत व्यक्तीसाठी ह्यात व्यक्तींनी केलेल्या क्रिया म्हणजे श्राद्ध असा समज सर्वत्र रूढ झालेला आहे. परंतु 'शास्त्र असे सांगते' या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे, "प्राचीन सुरींनी श्राद्धकर्माची अमर्याद व्याप्ती लक्षात घेऊनच संपूर्ण मानवी जीवन श्रद्धामय करण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला दिसून येतो. त्यास अनुसरून व्यक्तीचे निधन झाल्यावरच नव्हे तर ती व्यक्ती ह्यात असतानाच तिच्याशी मायेने व प्रेमाने एकरूप होऊन तिच्या उन्नतीसाठी व उत्क्रांतीसाठी आपल्याकडून होतील तितके प्रयत्न करणे हेदेखील एक प्रकारचे श्राद्धच होय. श्राद्धाची ही उत्तुंग व उदात्त संकल्पना ह्रदयाशी भिडल्यावर हातून होणारी प्रत्येक क्रिया म्हणजे श्राद्ध ठरते."

माझ्या या अल्पवाचनावरून मला वाटतं की आपली श्राद्धाची संकल्पना इतकी भव्य, दिव्य आहे तर स्मारक, समाधीची गरज का भासते?  तर यामागे दडलेला असतो, सामाजिक संकेत आणि दिखाऊगिरी. कारण परदेशी लोकांप्रमाणे आपला स्मारकांकडे पाहण्याचा कलात्मक दृष्टिकोन नसतोच आणि मृत व्यक्तीच्या चांगल्या विचारांना आत्मसात करण्याचा मोठेपणा आपण दाखवत नाही. हिंदू धर्मात अस्थी निषिद्ध असल्याने आपण अस्थी विसर्जन करतो. आणि दहन झाले ती जागा अपवित्र होऊ नये म्हणून प्राचीन काळापासून काळजी घेतल्याचं दिसून येतं. म्हणून त्या ठिकाणी मठ, मंदिर, समाधी उभी राहते. किंवा दहन झाले त्या जागेवरील पाषाण (दगड) आणून घराजवळील आवारात समाधी बांधली जाते. पण आता या प्रक्रियेला दिखाऊ स्वरूप आल्याने वादंग निर्माण होतात.
मृत पावलेली महान व्यक्ती सदैव स्मरणात रहावी, तिचं स्मारक व्हावं ही भावना रास्त आहे. पण याचा अतिरेक वाईट. ती महान व्यक्ती आपल्या विचारांनी आणि आपल्या असण्याने समाजाला अमूल्य असा वैचारिक ठेवा देऊन जाते. तो ठेवा आपण आचरणातून जतन करून ठेवायला हवा. प्रसिद्ध मानसशास्त्र तज्ज्ञ जॉन ग्रे यांनीच म्हटल्याप्रमाणे मृत व्यक्तीला आठवताना त्या व्यक्तीने केलेल्या चांगल्या गोष्टी आठवा. तसेच दैनंदिन आयुष्यात त्यांचे नेहमी स्मरण करा. त्यासाठी त्यांचे पुतळे, स्मारक उभारण्याची काहीच आवश्यकता नाही. शहरांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे जागेची समस्या भेडसावत आहे. पुतळे आणि स्मारके उभारण्याच्या जागी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील अशी घरं उपलब्ध करून दिली तर ही खरी विधायक गोष्ट ठरेल.
स्वतःच्या महत्त्वकांक्षेसाठी आणि टेंभा मिरवण्यासाठी ज्यांनी स्मारकांचे मुद्दे उपस्थित करून सध्या जो काही बाजार मांडलाय, त्याकडे सर्वसामान्य माणसाने दुर्लक्ष केलेलंच बरं. उगाच त्या मुद्द्याशी आपल्या भावना जोडून स्वतः तोंडघशी का पडायचंजोपर्यंत महात्म्यांच्या विचाराचं अमृत आपण आपल्या आचरणातून शरीराच्या नसानसातून भिनवत नाही. तोपर्यंत स्मारकांचा हा अट्टाहास न केलेला बरा!!!!


अरबी समुद्रात शिव स्मारक बांधण्याचा वाद सुरूच आहे.

Sunday, 1 March 2015

रंगुनी रंगात साऱ्या

कॉलेजमध्ये असताना नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, मुंबई येथील संग्रहात असलेली राजा रविवर्म्याची चित्रं मी पाहिली होती. त्यावेळी चित्रं कशी पहावीत? याचं ज्ञान मला नव्हतं. त्यामुळे राजा रविवर्म्याची चित्रं म्हणजे देव-देवतांची चित्रं एवढंच मला समजलं होतं. काही चित्रांमधील आखीव-रेखीव चेहरे उठून दिसत होते. काही चित्रांमधील भाव मला जवळचे वाटले होते. काही चित्रं मला माझ्या त्यावेळच्या समजूतीप्रमाणे तेव्हा बोल्ड वाटली होती. परंतु १८ व्या शतकात केरळ राज्यातील किलीमानूर येथे जन्मलेल्या रविवर्म्याने आपली चित्रकला कशी जोपासली असेल?  त्याला कलेचा छंद कसा जडला? चित्रकलेला सर्वार्थाने समर्पित होताना त्याच्या मनात नेमक्या काय भावना होत्या? असे अनेक प्रश्न ती चित्रं पाहताना माझ्या मनात होते. पण पुढे त्याचा पाठपुरावा करणं माझ्याकडून राहूनच गेलं. त्यानंतर त्याच्या चित्रांविषयी काही लेख माझ्या वाचनात आले. आणि माझ्या मनात पुन्हा एकदा राजा रविवर्म्याला जाणून घेण्याची ओढ निर्माण झाली. त्याचबरोबर दोन विशेष उल्लेखनीय कारणं म्हणजे अलिकडेच माझ्या वाचनात आलेली रणजित देसाई यांची व्यक्तिचित्रणात्मक कादंबरी राजा रविवर्मा. त्यानंतर ७ नोव्हेंबर २०१४ ला प्रदर्शित झालेला केतन मेहता दिग्दर्शित सिनेमा रंगरसिया.

 मी सर्वप्रथम रणजित देसाई यांनी लिहिलेली कादंबरी वाचली. त्यांनी काही वर्षं संशोधन करून राजा रविवर्मा या मनस्वी चित्रकाराला कादंबरीतून साकार केलं. केरळमधील किलीमानूर येथील रविवर्मा नामक बालकाचं बालपण ते जगप्रसिद्ध राजा रविवर्मा बनण्यापर्यंतचा प्रवास त्यांनी कादंबरीमध्ये अतिशय ओघवत्या शैलीमध्ये रेखाटला आहे. त्याचा मृत्यू या घटनेपाशी कादंबरीचा शेवट होतो.
परंतु तोपर्यंत वाचकाच्या मनात मात्र राजा रविवर्मा या चित्रकाराचं चित्रं रेखाटलं जाईल...याची खबरदारी लेखकानं घेतली आहे. ही रणजित देसाई यांच्या लेखणीची किमया. कलावंत सर्वसामान्य माणसापेक्षा निसर्गाच्या अधिक जवळ असतो. हा धागा पकडून लेखकाने केरळ आणि आसपासच्या परिसराचं अप्रतिम निसर्गवर्णन कादंबरीत केलं आहे. ते वाचताना खूप छान वाटतं. त्या काळातील मुंबई शहराचे वर्णन वाचताना अनेक संदर्भ आपल्याला त्यात सापडतात.

राजा रविवर्मा याच कादंबरीवर आधारित केतन मेहता या दिग्दर्शकाने रंगरसिया हा सिनेमा बनवला आणि त्याची पटकथा लिहिली. त्यामुळे राजा रविवर्म्याचा शोध घेताना माझी उत्सुकता अजून वाढली. कारण साहित्यकृतीचं माध्यमांतर या माझ्या आवडत्या अभ्यास विषयासाठी हे सुंदर उदाहरण माझ्यासमोर होतं. राजा रविवर्मा ही व्यक्तिचित्रणात्मक कादंबरी वाचल्यानंतर मी सिनेमा पाहिल्यामुळे माझ्यावर काही प्रमाणात कादंबरीचा प्रभाव होता. तो मग हळुहळु कमी होत गेला. कादंबरीचा हेतू जसा राजा रविवर्म्याला एक प्रतिभावंत चित्रकार म्हणून साकार करणे हा होता, तसाच हेतू दिग्दर्शक केतन मेहता यांचा होता. राजा रविवर्म्याला दृश्यमाध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडताना त्यांचा हा हेतू ६० टक्केच पूर्ण झाला आहे. तो १०० टक्के पूर्ण झाला असता परंतु पटकथेची मांडणी याला मारक ठरली. ती उपकारक ठरली असती आणि पात्र परिचय (Establishment Of Charactater’s)   नीट झाला असता तर सर्व व्यक्तिरेखा उठावदार झाल्या असत्या. दिग्दर्शकाने भूतकाळ आणि वर्तमानकाळ अशी सांगड घालण्याचा प्रकार पटकथेत अवलंबला. त्यामुळे त्याची पटकथेवरील पकड सैल झाली. चित्रपटातील गाणी, संगीत खटकत नाहीत. परंतु ती अभिनीत करताना काही त्रुटी राहिल्या आहेत.

राजा रविवर्मा

राजा रविवर्मा या कादंबरीत रणजित देसाई यांनी एका कलावंताची एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची दृष्टी आणि सर्वसामान्य माणसाची एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची दृष्टी यातील फरक यशस्वीरित्या दाखवला आहे. हा फरक दिग्दर्शकही सिनेमात दाखवण्यात यशस्वी झाला आहे. कादंबरीमध्ये राजा रविवर्म्याचा प्रवास वाचकाला भारावून टाकतो. परंतु सिनेमातील राजा रविवर्मा हे मध्यवर्ती पात्रं आपला प्रभाव पाडण्यास असमर्थ ठरतं.
ज्येष्ठ कलासमीक्षक शर्मिला फडके यांनी पुन्हा एकदा राजा रविवर्मा या लेखात असे म्हटले आहे की, "रंगरसिया चित्रपटात राजा रविवर्मा याच्या आयुष्यातील अनैतिहासिक घटना दाखवण्यात आल्या आहेत.  इतिहासातले खरे संदर्भ कादंबरीतील काल्पनिक घटनाक्रमांपेक्षाही जास्त मनोरम आहेत. राजा रविवर्मा संदर्भातल्या कपोलकल्पित कहाण्यांना फाटा देऊन, त्याचं एक अभिजात कलावंत म्हणून असलेलं मूल्य डोळसपणे समजावून घेतलं पाहिजे."

चित्रपट आणि कादंबरी ही दोन्ही माध्यमं वेगवेगळी असल्यामुळे त्या त्या माध्यमातील हे अधिक-उणे जाणवले. त्या त्या माध्यमाच्या काही मर्यादा असतात. त्यानुसार राजा रविवर्मा साकार झाला, एवढंच म्हणण्याला आता वाव आहे. पण सिनेमापेक्षा कादंबरीच सरस ठरते. राजा रविवर्मा या कादंबरीत राजा रविवर्मा या पात्राच्या तोंडी एक सुरेख वाक्य आहे...जेव्हा हेतू आणि दृष्टी यांना एक स्वप्न दिसू लागतं तेव्हाच कलाकृती जन्म घेते...
हेच राजा रविवर्मा या सच्चा कलावंताच्या जीवनाचं संचित आहे, असं मला वाटतं. ते त्याने आपल्याला प्रेरणा देण्यासाठी निर्माण केलं. १५ व्या आणि १६ व्या शतकाच्या सुमारास ART FOR ART SAKE OR ART FOR SOCIETY असे दोन मतप्रवाह नव्यानं उद्यास आले. या मतप्रवाहाची झळ रविवर्म्यालाही सोसावी लागली. त्यासाठी त्याला कोर्टाची पायरी चढावी लागली. पण तो खचला नाही. अतिशय धैर्याने त्याने आपल्यावर चालवण्यात आलेल्या खटल्याला तोंड दिले...स्वतःला आणि आपल्या कलेला पुन्हा एकदा सिद्ध केले. १९ व्या शतकात कलेबद्दल अनभिज्ञ असणाऱ्या सर्वसामान्य जनापर्यंत आपली कला पोहोचवण्यासाठी यशस्वी धडपड केली. त्याने प्रिंटींग प्रेसच्या माध्यमातून आपली छापील चित्रं घराघरात पोहोचवली. हा एका कलावंताचा कला समजावून सांगण्याचा प्रयत्न होता. चित्रं कसं पहावं...हा विचार त्या काळातही रविवर्मा सामान्यजनांना सांगू पाहत होता.

 "१९व्या शतकात शेवटच्या दशकात राजा रविवर्मा (१८४८-१९०६) या चित्रकाराच्या चित्रनिर्मितीने भारतीयांचे लक्ष वेधून घेतले. तैलरंगाचा वापर करून चित्रे काढणारा हा पहिला भारतीय स्वशिक्षित चित्रकार. पुराणातील प्रसंग, भारतीय देवदेवता असे विषय व युरोपीयन अकॅडमिक वास्तववादी शैली स्वीकारून तैलरंगात त्यांनी चित्रे केली. इतकेच नव्हे तर ओलिओग्राफिक्स (मुद्राचित्रे) काढून त्यांनी चित्रकलेत व्यायसायिकताही आणली. त्यांच्या देवदेवतांच्या प्रिंट्सनी सर्वसामान्यांच्या मनात भारतीय चित्रकलेबद्दलच्या सौंदर्य कल्पनाही रूजवल्या." ( संदर्भ - ललित मासिक, सप्टेंबर २०१३, दृश्यकला विशेषांक, माधव इमारते)
राजा रविवर्म्याने पाश्चिमात्य शैली आणि भारतीय जनमाणसाला आपलेसे वाटतील असे विषय निवडल्यामुळे भारतातच नव्हे तर आंतराष्ट्रीय स्तरावर त्याच्या चित्रांना लोकप्रियता लाभली.
राजा रविवर्मा या मनस्वी कलावंताला जाणून घेताना मला खूप छान वाटलं. त्याचा आपल्या कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. त्याच्याविषयीचा हा लेख आटोपता घेताना मला कविवर्य सुरेश भटांच्या ओळी आठवत आहेत...
रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा...

राजा रविवर्मा यांची एक अप्रतिम कलाकृती


वरील लेखातील ३ मिनीटांचा भाग मी आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरील ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात १८ डिसेंबर २०१४ ला सादर केला होता.

   

Thursday, 19 February 2015

मोरपिशी आठवण

काही आठवणी मोरपीसासारख्या असतात. आपलं एखादं आवडतं पुस्तक खूप दिवसांनी वाचायला घ्यावं आणि त्यात नेमकं मोरपीस ठेवलेलं सापडावं. ते मोरपीस हातात धरून चेहऱ्यावरून फिरवावं. नेमक्या याच वेळी असंख्य आठवणी दाटून येतात आणि त्या आठवणी मोरपिसासारख्या होऊन जातात.
अशीच ही तुझ्याबद्दलची एक मोरपिशी आठवण... सहाव्या-सातव्या इयात्तेत असल्यापासूनच लिहिणं या गोष्टीशी मन एकरूप व्हायला लागलं होतं. तेव्हापासून लिहिणाऱ्या, निर्मितीशीलतेच्या कळा सोसणाऱ्या प्रत्येकाविषयी आदर वाटत आलाय. हा आदर आजतागायत टिकून आहे. त्यामुळेच लिहिणं, नवनिर्मिती करणं हे क्रियापट न वाटता विशेषण झालं आहे.
त्या दिवशी तू ग्रंथालयात आलास आणि मला ''सिग्मंड फ्रॉईड नावाचं विश्वास पाटील यांचं पुस्तक आहे का?'' असं विचारलंस. मी हो म्हणतच आत गेले आणि ते पुस्तक घेऊन आले. ते पुस्तक तुझ्या हाती देताना मी तुला अतीव आदरानं वितारलं होतं... तुम्ही लेखक आहात का?
तू हो म्हणालास आणि तुझ्या ओळख नावाच्या मालिकेविषयी सांगितलंस. त्याच दिवसापासून तुझ्या लेखनाविषयी माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. ती उत्सुकता अजूनही टिकून आहे. एका नाट्यमहोत्सवात तुझं नाटक मी पाहिलं. त्यानंतर एका काव्यसंमेलनात तुझ्या कविता ऐकल्या.  
तू ज्या मालिकांसाठी लेखन केलंस त्या मालिकाही मी पाहिल्या. तू तुझ्या प्रगल्भ लेखणीतून आजवर जे वास्तव मांडत आला आहेस, त्याला तोड नाही. तुझं नाट्यलेखन, मालिका-चित्रपटांचं पटकथा-संवादलेखन आणि काव्यलेखन वाचलं तेव्हा हाच प्रश्न मनाला सतावत होता कशी आणि कितीक वादळं पेलली असतील तुझ्या कोवळ्या मनानं. त्यामुळेच खंबीर विचारांशी तुझी जन्मगाठ बांधली गेलीय. तुझ्या लेखनातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे तुझा प्रॅक्टिकल आशावाद. हे ज्या दिवशी मला जाणवलं त्याच दिवशी तुला पु.शि.रेगेंचं सावित्री हे पुस्तक वाचायला द्यायला हवं, हे मनाशी ठरवलं होतं. आणि ते तुला दिलंही. आणि माझ्या अपेक्षेप्रमाणे तुलाही ते आवडलं.
मानसशास्त्रात गरुडाची गोष्ट सांगितली जाते. याच गोष्टीचाच आधार घेऊन मी असं म्हणेन की तू तुझ्या लेखनाच्या प्रांतात आता गरुड आहेस. स्वतःला असा खुराड्यात बंदिस्त करून घेऊ नकोस. नव्या वाटा तुझ्यासमोर खुल्या आहेत. त्यांचं स्वागत कर. तुझ्या लेखनकलेवर माझं खूप प्रेम आहे. तू असाच लिहित राहावास... यासाठी माझ्या तुला खूप खूप शुभेच्छा. तू तुझ्या लेखनात येणाऱ्या अडथळ्यांना पाहून हार मानू नकोस. तुझ्या मनात फुलणाऱ्या साऱ्या स्वप्नांना मूर्त रूप दे आणि यशस्वी हो.

तुझ्या लिखाणातून उमटणाऱ्या प्रत्येक शब्दात
ते सामर्थ्य निमार्ण होऊ दे,
जेणेकरून समाजातल्या विविध स्तरावर
त्याची चर्चा आणि पडसाद उमटतील
लिहित रहा...थांबू नकोस!

अशा शब्दांत तू मला लेखनासाठी प्रेरणा दिलीस. एकाच प्रांतात वावरणारी दोन माणसं सहसा एकमेकांचं कौतुक करत नाहीत. पण तू मात्र याला अपवाद ठरलास. तुझ्या अवतीभवती सतत मित्रमैत्रिणींचा घोळका असतो. तरी मला असं वाटतं की कविमनाचा तू मात्र त्या गर्दीतही एकटा असतोस. म्हणून तुला सांगावसं वाटतं की -

संयम आणि धैर्य राख
उफाळून येणाऱ्या ऊर्जेला
संस्काराने सृजनरूप दे
मनाला खूप एकाकी वाटेल तेव्हा
शब्दांच्या राज्यात जा...

तुझ्याशी ग्रंथालयात ओळख झाल्यानंतर त्या दिवसापासून आतापर्यंत मी जे लेखन केलं ते तू मला दिलेल्या प्रेरणेमुळेच केलं. त्याचं सारं श्रेय तुला आहे. मी गमावलेला सकारात्मक आशावाद लेखनाच्या माध्यमातून तुझ्यामुळेच मला पुन्हा नव्याने गवसला. आता तुझ्या आठवणींचं मोरपीस हीच माझ्या लेखनाची प्रेरणा...


पूर्व प्रसिद्धी १६ डिसेंबर २०१४, कार्यक्रम - ऐसी अक्षरे रसिके, आकाशवाणी मुंबई

Saturday, 7 February 2015

विटी दांडूः एका खेळात सामावलेली छोट्यांची मोठी गोष्ट

आजच्या स्क्रिन जनरेशनसाठी त्यातही खास करून बालदोस्तांसाठी एखादी गोष्ट सांगायची आणि ती गोष्ट त्यांना बोअर न करता सांगायची म्हणजे महाकठीण काम. पण ही कामगिरी पार पाडण्यात विटी दांडू या चित्रपटाचा दिग्दर्शक (गणेश कदम) यशस्वी झाला आहे. त्यामुळे 
हा चित्रपट केवळ लहानांसाठी न राहता आजोबा-वडील-मुलगा अशा तीन पिढ्यांना सामावून घेत एका रेशमी माळेत गुंफला गेला आहे. टीव्ही, स्मार्ट फोन, टॅब, आय पॅड अशा सतत कुठल्या ना कुठल्या तरी स्क्रिनसमोर चार भिंतीच्या आत बसून अख्खं जग कवेत घेऊ पाहणाऱ्या या बच्चेकंपनीला काही सांगायचं म्हटलं तरी कुठल्या शब्दात आणि कसा संवाद साधावा हे आजच्या पिढीसमोर मोठ्ठं प्रश्नचिन्ह आहे. या चित्रपटातही आजच्या पिढीतील आजोबांना हा प्रश्न पडतो...आणि या प्रश्नाचा त्यांनी घेतलेला शोध म्हणजेच विटी दांडू हा अप्रतिम चित्रपट. निसर्गाच्या शांत, नितांत नयनरम्य वातावरणात घडणारी धगधगत्या क्रांतिकारी बाण्याची ही गोष्ट पाहताना भान हरपून जाते.

चित्रपट कला ही टीमवर्क आहे. टीममधील प्रत्येकाचे काम चोख झाले की तो चित्रपट सर्वोत्तम ठरतो. याचीच प्रचिती विटीदांडू चित्रपट पाहताना आली. एक उत्कृष्ट दर्जेदार कथा (विकास कदम), त्या कथेला तोडीस तोड असणारी सक्षम पटकथा आणि प्रभावी संवाद (अभिराम भडकमकर) हे या चित्रपटाचे बलस्थान आहे. चित्रपटातील आशयाला साजेशी गाणी आणि प्रवाही संगीत चित्रपटातील कथेला पूरक ठरले आहे. याला संकलकाच्या (जयंत जठार) उत्तम कामगिरीची जोड मिळाली आहे.
दिलीप प्रभावळकर, रविंद्र मंकणी, शुभंकर अत्रे, निशांत भावसार, यतिन कार्येकर यांच्या उत्कृष्ट अभिनयाने नटलेला हा चित्रपट. त्याचबरोबर क्रांतीकारकांच्या भूमिका निभावणारे कलाकारही आपल्या अभिनयकौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकतात. 

एका पिढीची तिच्या पुढील पिढीला वाचवण्याची धडपड त्यासोबत आजोबा-नातू या नात्यातला गोडवा वाढवत नेणाऱ्या एका क्रांतीकारी गोष्टीची पटकथाकाराने सहज-सुरेख गुंफण केली आहे. त्यामुळे चित्रपट कुठेही उपदेशपर तत्त्वज्ञान सांगणारा न होता विटी दांडू या खेळातून भव्य-दिव्य परंतु आपल्याला पचेल-रुचेल असा सुंदर विचार देऊन जातो.
शेवटच्या दृश्यापर्यंत प्रेक्षकांची उत्कंठा वाढवत नेणारी, नसानसांत देशप्रेम भिनलेल्या क्रांतिकारकांची ही गोष्ट आणि पटकथेतील वेगवान दृश्यमालिकेमुळे चित्रपट अत्यंत प्रभावीपणे साकार झाला आहे. या चित्रपटातील दाजी (गोविंदाचे आजोबा) या पात्राचा नावेतील सीन अतिशय अप्रतिम चित्रित झाला आहे. पात्राच्या मनातील खळबळ, तिचे अधांतरी हिंदकळणारे विचार याला देखणं दृश्यरुप दिग्दर्शकाने दिलं आहे. आजच्या पिढीचे आजोबा-नातू आणि ब्रिटीशकालातील आजोबा-नातू यांच्या नात्यातील दुवा सांधताना कुठेही विस्कळितपणा जाणवत नाही. स्वतःच स्वतःचं स्वातंत्र्य गमावून बसणारी आजची पिढी आणि आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणारी त्या काळातील पिढी यांना गोष्टीत एकत्र आणताना चित्रपटात करण्यात आलेली विटी दांडू या खेळाची योजना अतिशय स्तुत्य आहे. त्यामुळे चित्रपट मनोरंजक आणि सरस ठरतो.

कोकणातील समृद्ध निसर्ग या चित्रपटाच्या देखणेपणात अधिक भर घालतो. निसर्गाच्या सान्निध्यात घडणारी, सळसळत्या रक्ताच्या क्रांतीकारी बाण्याची ही गोष्ट मनाला मोहवून टाकते.  हा चित्रपट पाहताना आपणही त्या विटी दांडूच्या खेळात नकळत सामील होतो आणि त्या खेळातील आनंद लुटता-लुटता त्या गोष्टीत पूर्ण रमून जातो. खरंच आपल्या सभोवताली असणारा निसर्ग आणि आपल्या भारत देशाला लाभलेला ऐतिहासिक वारसा अनमोल आहे. तो प्रत्येक पिढीने जतन करायला हवा आणि आपल्या पुढील पिढीपर्यंत तो समर्थपणे पोहोचवायला हवा. आणि तो हसत-खेळत पोहोचवायला हवा. विटी दांडू हा चित्रपट आपल्याला स्वातंत्र्य हवं या तीन शब्दांभोवती फिरणारा आहे. याच तीन शब्दात या चित्रपटाच्या कथेतील गंमत दडलेली आहे. हेच तीन शब्द चित्रपटाच्या कथेला उच्च शिखरावर नेऊन ठेवतात.


आपल्याला स्वातंत्र्य हवं...आपल्याला मनसोक्त खेळण्याचं स्वातंत्र्य हवं. आपल्याला विचारांचं स्वातंत्र्य हवं. निसर्गाशी मैत्री करण्याचं स्वातंत्र्य हवं. आपल्याला गुलामगिरीतून मुक्त होण्याचं स्वातंत्र्य हवं, स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचं स्वातंत्र्य हवं. आपल्या देशाचा वैभवशाली इतिहास जाणून घेण्याचं स्वातंत्र्य हवं. मनमोकळा संवाद साधण्याचं स्वातंत्र्य हवं.. यातील उल्लेख केलेले हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तू लहान - मी मोठा हा भेदभाव आपण विसरू शकलो तरच आयुष्यातील प्रत्येक क्षण हा खेळासारखा असेल. कधी हार, कधी जित हा निसर्ग नियम तर चालूच राहील. पण खेळण्यातील गोडी, धांगडधिंगा, मौज, गंमत कधीही हरवू द्यायची नाही. मग तो खेळ विटी दांडूचा असेल किंवा अन्य कोणताही... खेळातील प्रत्येक क्षण आनंदाने अनुभवायचा हे तर आपल्याच हाती आहे. चला, तर मग! हा चित्रपटरुपी विटी दांडूचा खेळ पाहत छोट्यांच्या मोठ्या गोष्टीत मनापासून सामील होऊ या आणि पाहू या हा खेळ कसा रंगतोय ते...विटी दांडू हा प्रत्येकाने आर्वजून पहावा असा चित्रपट आहे.  

आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...