Saturday, 17 September 2016

घावन्यांची गोष्ट

दोन इले पावने, चार केले घावने असं गुणगुणत मालवणी गृहिणी पटकन घावने करायला चुलीजवळ बसते. पण घावन्यांच्या या पाककृतीची गोष्ट खूप मजेशीर आहे.
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका आटपाट नगरात एका राजाचं राज्य होतं. राजाला कला, संस्कृतीची खूप आवड होती. त्याचबरोबर हा राजा एक उत्तम खवय्या होता. वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणं, त्याला खूप आवडायचं. राजाच्या राजमहालात रोजचा स्वयंपाक आणि त्याचबरोबर रोज नानाविध पक्वान्नं बनवण्यासाठी १०-१२ आचारी (बल्लवाचार्य) होते. एके दिवशी राजाच्या मनात आलं आणि त्याने सर्व बल्लवाचार्यांना बोलावलं. त्यांना सांगितलं की तुम्ही केलेला स्वयंपाक मी रोज चवीनं खातो. पण आज मला एक वेगळाच खाद्यपदार्थ हवा आहे, जो पटकन बनणारा असेल, साधा, सोपा असेल, पटकन पोट भरणारा असेल, अगदी कमी सामुग्री आणि आपल्या राज्यात उपलब्ध असलेल्या धान्यातूनच बनेल, तो खाद्यपदार्थ दिसायलाही नावीन्यपूर्ण असेल...
राजाच्या बोलण्याने सगळे पाककुशल आचारी विचारात पडले, त्यांना काही असा पदार्थ सापडेना... त्यांनी राजासमोर हार मानली. मग राजाने राज्यात प्रधानाकरवी दवंडी पिटवली. जो कोणी असा नावीण्यपूर्ण पदार्थ राजासमोर सादर करेल. त्याला योग्य तो इनाम दिला जाईल...
राज्यातील सगळी मंडळी कामाला लागली. सगळ्यांनी आपापल्यापरीने खाद्यपदार्थ बनवले आणि दिवसभरात एकेक करून राजासमोर सादर केले, पण राजाला काही पसंत पडेनात. अखेर संध्याकाळ होता होता एक आजीबाई हातात एक ताट घेऊन आल्या. राजासमोर त्या ताटावरचं झाकणं उघडलं आणि त्यांचा पदार्थ दाखवला...तो पदार्थ होता घावने...
राजा ते ताटभर घावने पाहून चकीत झाला. त्याने पदार्थाची चव पाहिली. त्याला ती आवडली. घावन्याचा गोल आकार आणि खास करून घावन्यावर असलेले सारख्या आकाराचे ठिपके लक्ष वेधून घेत होते. राजा म्हणाला, मला हा खाद्यपदार्थ आवडला. पण आजीबाई मला एक सांगा, या घावन्यावर तुम्ही ठिपके कसे पाडलेत... यावर आजीबाई हसून म्हणाल्या. घावन्यामध्ये पीठ, मीठ आणि पाणी मिसळलेलं असतं. हे मिश्रण बीडं नावाच्या जाड बुडाच्या तव्यावर पसरलं जातं. हे मिश्रण पसरण्याआधी बिडाच्या तव्यावर तेल सोडून त्यानंतर केळीच्या पानाच्या देठाने किंवा कांद्याच्या चकतीने ते तेल त्या बिडाच्या तव्यावर नीट पसरवायचं. मग त्यावर हे मिश्रण घालायचं की आपोआप त्या पिठाला अशी ठिपक्याची जाळी पडते. ती दिसतानाही छान दिसते...
आजीबाईंचं हे स्पष्टीकरण ऐकून राजा थक्क झाला. त्याने आजीबाईंना हजार सुवर्णमुद्रा दिल्या. आणि त्यांचा सन्मान केला.
अशी एक घावन्यांची जन्मकथा मला आईने आणि आजीने सांगितली होती. तर मंडळी या गोष्टीवरून लक्षात आलंच असेल हे घावने म्हणजे किती सुंदर, सोपी पाककृती आहे ते! हे घावने करताना ते सुरय भाताचे केले जातात.
मालवणी मुलखात खास करून वालय आणि बेळा या प्रकारचा पारंपरिक भात पिकतो. भात पिकाच्या इतर सुधारित आणि संकरित जातीही आहेत. त्याचे उकडे तांदूळ आणि सुरय तांदूळ केले जातात. उकडे तांदूळ म्हणजे भात (भाताचे गोटे) उकडून ते सुकवलं जातं त्यानंतर ते गिरणीतून सडून आणलं जातं, त्याला उकडे तांदूळ म्हणतात.
तर सुरय तांदूळ म्हणजे भात (भाताचे गोटे) न उकडता तसेच गिरणीतून सडून आणले जाते.
याच सुरय तांदळाच्या पिठाचे घावने केले जातात. आपण शहरी भागात राहत असू तर आपण रोजच्या जेवणातील भात करण्यासाठी जे तांदूळ वापरतो, ते वापरले तरी चालेल.

हे सुरय तांदूळ साफ करून करून स्वच्छ धुवून रोवळीत निथळत ठेवले जातात. त्यानंतर रोवळीतून काढून ते एका स्वच्छ कपड्यावर पसरून घातले जातात. हे पसरवलेले तांदूळ नीट सुकले की त्याची जात्यावर पिठी दळली जाते. त्यानंतर हे पिठ चाळणीने चाळून मग ते पिठ घावने करायला घेतलं जातं. मालवणी मुलखात तवशाचे घावने, सातकप्याचे घावने आणि साधे घावने असे तीन प्रकारे घावने केले जातात. अधिक माहितीसाठी आणि मालवणी पाककृतींसाठी खालील परबांचो पावनेर या फेसबुक पेज ची लिंक बघा.

https://www.facebook.com/malvanicuisine/


सुरय तांदळाच्या पिठाचे घावने, फोटो-हर्षदा परब

फणसाच्या भाजीविषयीची एक आठवण

भूतकाळात घडून गेलेल्या चांगल्या आणि आनंद देणाऱ्या गोष्टी नेहमी आठवाव्यात. त्यामुळे पुन्हा एकदा तो क्षण आपल्यासमोर जिवंत होतो आणि आपल्याला पुनःप्रत्ययाचा आनंद देतो. बालपणात घडलेले असे कित्येक घटना-प्रसंग दिवसभरातील कामाच्या व्यापात आपल्याला आठवले की आपल्या चेहऱ्यावर हसू फुटतं. भूतकाळातील अशाच सुंदर आठवणींपैकी ही एक आठवण...
गणोबा गणोबा, कुठे गेला होतास?
कोकणात
कोकणातून काय आणलंस?
फणस...
नीटसं, काही आठवत नाही, पण अशा काहीशा शब्दातला संवाद बालपणी कानावर पडला होता. सांगायचा मुद्दा हा, कोकण म्हटलं की फणस या फळाची रेलचेल. यासाठी वेगळे पुरावे द्यायला लागत नाहीत.
आमच्या गावच्या घरी बरीच वर्ष आमचं हक्काचं असं फणसाचं झाड नव्हतं. त्यामुळे खूप वाईट वाटायचं. मग आम्ही ६-७ वर्षांचे असताना आईने फणसाची ७-८ झाडं लावली. त्यातली ६ झाडं आता खूप मोठी झालीत. आणि मोठाले फणसही झाडांवर दिसू लागले. ज्या दिवशी पहिला फणस आम्ही भावंडांनी झाडावर पाहिला, तेव्हा प्रचंड खूश झालो होतो...
पण त्याआधी आमच्याकडे फणसाचं झाड नव्हतं तेव्हा आम्ही माळेच्या फणसाचे फणस भाजीसाठी किंवा पुसभाजी करण्यासाठी घेऊन यायचो. आणि पिकलेले कापे-बरके फणस आम्हाला शेजाराच्या घरांतील काका-काकू आणून द्यायचे.
पण त्याआधी माळेचो फणस म्हणजे काय? ते सांगते.
आमच्या परबवाडीत गोसावी आडनावाची काही घरं आहेत. त्यांच्यामध्ये एक अशी रीत आहे की त्यांच्या समाजातील कोणी व्यक्ती मृत झाल्यास आपल्या परसातलं एक झाड दान करायचं. म्हणजे त्या झाडाला फुलांची माळ घालायची. या रीतीप्रमाणे आमच्या वाडीत त्यांनी फणसाचं झाड दान केलं होतं. त्या झाडाला माळ घातली होती. असं आमच्या शेजारची आजी सांगायची. ती खूप वयस्कर होती, पण आम्ही तिला वहिनीम्हणून हाक मारायचो. ती आम्हाला वाडीतल्या खूप जुन्या झालेल्या, विस्मरणात गेलेल्या गोष्टी सांगायची. त्यातलीच ही एक...
म्हणजे रीतीनुसार माळेच्या फणसाचे फणस कोणीही काढून नेऊ शकत असे. पण आम्हाला आता माळेच्या फणसाची वाट बघावी लागत नाही. आमच्या परबवाडीत भरपूर फणसाची झाडं आहेत.
फणस हे फळ मला खूप गंमतीशीर वाटतं. वरून काटे, आतून गोड...त्याची भाजी करा किंवा असेच पिकल्यावर खा... आणि गऱ्यातील आठीळा भाजून खा, उकडून खा, त्याची भाजी करा किंवा सांबाऱ्यात घाला.
आमच्या गावी फणसाची भाजी करायचो तो दिवस म्हणजे एक मोठा सोहळा असायचा. आम्ही चार-पाच घरांची मुलं, बायका सगळे एकत्र जमायचो. भाजीचे फणस मधुकाका फोडून द्यायचे. मग आम्ही सगळे तो फणस साफ करायला सुरुवात करायचो. मोठ्या बायकांच्या फणस साफ करता करता इकडच्या तिकडच्या गजाली सुरू व्हायच्या, आम्हाला वाटायचं त्यांचं लक्ष नाहीय...आम्ही हळूच साफ करता करता कच्चे गरे अधून-मधून तोंडात टाकायचो. भाजी करेपर्यंत धीर धरवतो तरी कुठे...
मग मोठ्या काकू दम भरायच्या, कच्चे गरे खाऊ नका, पोटात दुखेल...पटपट साफ करा...मगे ताटलेत भाजी आणि पेज घेवन हवी तेवढी भाजी खावा, आमी काय बोलाचव नाय... गजाली मारत असल्या तरी मोठ्या बायकांचं लक्ष असायचंच आमच्यावर!
मग आम्ही शांतपणे फणस साफ करायचो...
फणस साफ करून झाल्यावर कुणाच्या तरी एकाच्याच घरच्या चुलीवर ती भाजी मोठ्या अल्युमिनिअमच्या टोपात शिजवली जाई. भाजी तयार झाल्यावर काकू सगळ्या मुलांना हाका मारायच्या. वाडगाभर उकड्या तांदळाची पेज आणि बशीभर भाजी घेऊन फणसाच्या झाडाखाली असलेल्या आमच्या खळ्यात(अंगणात) बसायचो.
तेव्हा आम्ही एक गंमत करायचो. पेज पिण्यासाठी चमचा न घेता, फणसाच्या झाडाची पानं घेऊन त्याची हाताने खोलपी करायचो. त्या खोलपीने पेज प्यायची. खूप मजा वाटायची. त्या फणसाच्या भाजीची चव अजुनही जिभेवर रेंगाळते...

मार्च-एप्रिल महिन्यामध्ये आमच्या इथल्या शहरातल्या मार्केटमध्ये एक फणसवाला येतो. त्याच्याकडे छोटे कुयरी फणस, पिकलेले फणस आणि भाजीचे कच्चे फणसही असतात. त्याच्याकडून फणस खरेदी करताना त्याच्याशी किंमतीमध्ये घासाघीस करताना गावाकडे खळ्यात भाजीसाठी आणलेले सात-आठ फणस ओळीने ठेवलेले आठवतात. मग कळत नाही का हसायलाच येतं. त्या फणसवाल्याशी इतर भाजीवाल्यांसारखी मैत्री केलीय. त्यामुळे त्याच्याकडे कच्चे फणस असले की तो अगदी हाक मारून बोलावतो. कच्चा फणस खरेदी केल्यावर हातावर दोन पिकलेले कापे गरे ठेवतो. म्हणतो, तुझ्याएवढीच मला एक मुलगी आहे, ती बिहारमधल्या एका गावात राहते. त्याच्या चेहऱ्यावर माझ्याकडे बघून मुलीच्या आठवणीचं एक समाधान आणि माझ्या चेहऱ्यावरही एक समाधान... फणसाची भाजी करताना गावाकडच्या फणसाची भाजी करतानाच्या आठवणींचं...

मालवणी मसाला घालून केलेली फणसाची भाजी

भाजीसाठी साफ केलेला फणस

भाजीसाठी काढलेले फणस
https://www.facebook.com/malvanicuisine/
मालवणी पाककृतींसाठी परबांचो पावनेर या फेसबुक पेज ची वरील लिंक ओपन करा.

 

Thursday, 15 September 2016

नदीकिनाऱ्यालगतची मालवणी खाद्यसंस्कृती

कोकण म्हटलं की समुद्रकिनारा आणि कोकणातील खाद्यसंस्कृती म्हटलं की भात, मासे आणि नारळ या पलिकडे आपण सहसा जात नाही. भूगोलात एक प्रश्न विचारला जायचा, समुद्रकिनाऱ्यावरील लोकांचे अन्न कोणते...तेव्हा गुरुजींनी शाळेत सांगून ठेवलं होतं की या उत्तराला डोळे झाकून भात आणि मासे असंच उत्तर लिहायचं. कोकण म्हणजे समुद्रकिनारा आणि जेवणात भात, मासे त्याचबरोबर अलिकडे सर्वांच्याच तोंडी असलेली रेसिपी म्हणजे कोंबडी वडे. पण समुद्रकिनारा नसला तरी नदी, ओढ्याच्या (व्हाळ) काठावर वसलेली गावांची खाद्यसंस्कृती किती समृध्द आहे. तेही आपण जाणून घेतलं पाहिजे. 

मला आठवतंय आमच्या कॉलेजमध्ये वेंगुर्ल्याच्या मॅडम होत्या, त्या नेहमी आम्हाला चिडवायच्या, तुम्हाला नदीकडच्या लोकांना काय कळणार ताज्या माशांचं महत्त्व आणि त्याच्या पाककृती. त्यावेळी त्यांना उत्तर द्यायला यायचं नाही. कारण त्यांच्या वयाचा मान राखून बोलता यायचं नाही. आम्ही माशांच्या पाककृतींमध्ये लसूण वापरतो. यालाही त्या हसायच्या. आमची नदीकडची खाद्यसंस्कृती किती बेस्ट आहे, हे पटवून देता यायचं नाही. पण आता तसं राहिलेलं नाही. म्हणूनच समुद्राकडच्या मंडळींनी नदीकडच्या लोकांना चिडवू नये. दोन्हीकडच्या खाद्यसंस्कृती समृध्द आहेत. कारण दोघांचीही खाद्यसंस्कृती जगभर मालवणी खाद्यसंस्कृती याच नावाने ओळखली जाते.

समुद्रकिनाऱ्यालगतच्या गावात ताजे मासे सहज मिळतात. त्यामुळे त्यांच्या माशांच्या पाककृतीमध्ये कांद्याचा वापर आढळतो. नदीकडच्या मंडळींकडे समुद्राचे मासे त्यांच्या गावच्या बाजारात येतात. तेव्हा ते त्यांना मिळतात. ते घरी आणेपर्यंत उशीर होतोच. त्यामुळे हे मासे शिजवताना त्यात लसूण वापरला जातो. कांदा नाही वापरत. त्याचबरोबर नदीकडची मंडळी सुके मासे घरी आणून त्याची साठवणूक करतात. जोडीला नदीचे मळये मासे, शिंपल्या, कोके, खेकडे जेवणात असतातच.
नदीकडच्या काही गावांमध्ये जेवणात मटण वारंवार केलं जातं. काही ठिकाणी पाहुणे आले की त्यांना पावनेर (मेजवानी) म्हणून मटणाचं जेवण केलं जातं. 

नदीकडच्यांच्या ताटात महिन्यातून दोनदा ते तिनदा मासे दिसतात. कोंबडी, बकरा, ससा, जिवाद, साळींदर, डुकर, भेकरं यांचं मटण असतं. मटणाचा रस्सा करतील आणि सुकं मटणही करतील. कोकणातील काही गावांमध्ये गावपारध होते. तेव्हा डुकर मारला जातो. त्याचं गाव जेवण असतं. (इथे या प्राण्याचा उल्लेख करून कुठल्याही समाजाला दुखावण्याच्या हेतू नाही.)
म्हणूनच नदीकडच्या लोकांची समुद्राचे आणि नदीचे मासे, सुके मासे, आणि मटण त्याचबरोबर शाकाहारी जेवण अशी मिश्र आणि समृद्ध अशी खाद्यसंस्कृती आहे. सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार या वारी मालवणी मंडळींच्या जेवणात शाकाहारी पदार्थ असतात. खासकरून गोडी डाळ आणि तिकटी डाळ तर असतेच असते. तसेच मालवणी मंडळी आमटी किंवा सार मसाल्याचं केलं असलं तर भाजीत हिरवी मिरची घालतात. भाजी मसाल्याची केली तर आमटी आणि सार हिरव्या मिरचीचं करतील. हे कसं तर ते आपण वेगवेगळ्या पाककृतींच्या माध्यमातून परबांचो पावनेर या पेजवर पुढे बघणारच आहोत.


आमचं गाव मालवण तालुक्यात असलं तरी मालवण, कुडाळ आणि कणककवली या तीन तालुक्यांच्या मध्यभागी आहे. त्यामुळे नदीकडच्या समृध्द खाद्यसंस्कृतीविषयी जिव्हाळा आहे. आमच्या गावात दिवसभरातून एकदा सकाळी एक एसटी मालवणला जाते. तेवढाच काय तो आमचा मालवण तालुक्याशी संबंध. पण तरीही समुद्रकिनाऱ्याचं आकर्षण काही सुटलेलं नाही. ते वाढतच जाणार आहे. असं असलं तरी नदीच्या काठावर बसून नदीकाठाची संस्कृती अनुभवणं यातही वेगळी गंमत आहेत. नदी जशी प्रत्येक काठावर वेगवेगळ्या रुपात येऊन तिथली लोकसंस्कृती समृध्द करते. तशीच नदीकाठावरील लोकांच्या खाद्यसंस्कृतीची रुपं आहेत. तिही प्रत्येकाने अनुभवायलाच हवी. त्यांचा आस्वाद घेतलाच पाहिजे, हा आस्वाद फाईव्ह स्टार हॉटेल, रेस्टॉरेन्ट मधल्या सवयींचा चष्मा उतरवून निखळ, मनसोक्त घ्यायला हवा.

ओवळिये गावची जीवनवाहिनी असलेली तिसगा नदी, फोटो योगेश परब
https://www.facebook.com/malvanicuisine/

परबांचो पावनेर या पेज ची लिंक

Sunday, 10 July 2016

६ शब्दांची गोष्ट

#sixwordstory

१)मंगळवाल्या मुलीची पत्रिका हरवली; लग्न ठरलं!

२)२९ वर्षांच्या एका लेखिकेला इच्छामरण हवंय...

३)मुंबयच्या धयकाल्यात गावचा चेडू हरावला आसा...

४)आपल्या माणसांबरोबर जिंकायचं नाही, जगायचं आहे.

५)मन मोकळं केलं नि जायबंदी जाहलो...

६)फक्त स्त्रियाच असलेलं एक गाव आहे...

७)लेखनाची केलेली स्तुती; आनंददायी तिककीच दुःखदायी

८)तू चंचल आहेस, म्हणून संपलं सगळं...

९)कौलारू घर; टपटप पडणारी पावसाची सर

१०)Love is something that finds you.

११)मेरी कहानी किताबों से शुरू हुई

१२)अलग सोच; खुद से नया रिश्ता

१३)स्टोरी छान आहे; पण मसाला हवा.

१४)मनातल्या पावसाचा भार शब्दांनी कितीदा वहायचा...

१५)काश हम कॉलेज में मिलें होतें...

१६)आरसा सत्य सांगतो, कागद खोटं बोलतो...

१७)निरागसतेला चुरगाळणारी माणसं, हसतात-खिदळतात-ओरडतात

१८)तू काय करतेस? सध्याचा गंभीर प्रश्न

१९)पागल दिल अकेला तड़पता रहा, बेवजह...

२०)हस्ती ढूँढनें निकले, कश्ती ले डूबी...

२१)गोंधळलेली तरुणाईबसला शिक्का, काय करणार?

२२)Yesterday & tomorrow exist for today…

२३)The root of suffering is attachment…

२४)दुष्काळावर चर्चास्थळः फाईव्ह स्टार हॉटेल

२५)कला आनंद देते आणि दुःखंही देते...

२६)कुणालाच माहीत नाही, तो कलावंत आहे...

२७)प्रेमासाठी आसुसलेला; तडफडला, आम्ही नाही पाहिला...

२८)उजेडाचं वेड असलेला माणसांच्या अंधारात हरवून गेला...

२९)Words & visuals happily married “in real”

३०)सध्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पैशानेच मिळतात!

३१)ती बघा! बॉयकटमारलेली स्त्रीवादी लेखिका...

३२)स्त्रीलेखिकांचं स्त्रीवादी लेखनविकतचं दुखणं...

३३)कलम का सहारा, कलम हो गया


अर्नेस्ट हेमिंग्वे या प्रसिध्द लेखकानं पहिल्यांदा वरील ६ शब्दांची गोष्ट लिहिली. त्यानंतर ६ शब्दात गोष्ट लिहिण्याची सुरुवात झाली.

Thursday, 7 July 2016

स्वप्नातला राजकुमार

Hi! मी तुझ्या स्वप्नातला राजकुमार बोलतोय तुझ्याशी, या पत्राच्या माध्यमातून... ज्याची स्वप्नं तू कळत्या वयाची झालीस तेव्हापासून आतुरतेने पाहतेयस. पहिल्यांदा मी तुला Sorry म्हणतो. पण ‘Sorry’ हा खूपच साधा शब्द झाला. तुझ्या आयुष्यात मी असणार की नाही?’ असे प्रश्न उपस्थित केले गेले. तेव्हा तू खचून गेली नाहीस, तुझ्या या अनोळखी अव्यक्त प्रियकरावर विश्वास ठेऊन प्रेम करतच राहिलीस. म्हणूनच म्हणतो, हा ‘Sorry’ शब्द खूपच साधा आणि त्याच्याहीपेक्षा तुला सहन कराव्या लागणाऱ्या वेदना तीव्र आहेत. तू आतापर्यंत कसं एकटीनं सारं सहन केलं असशील, याची कल्पना करणंही मला असह्य होतंय... कितीदा तुझं मन दुखावलं गेलं असेल, तू कित्येक रात्री माझ्या आठवणीने जागत घालवल्या असशील. खूपदा तुझा प्रेमावरचा विश्वास डगमगला असेल, तरीही तू माझी वाट पाहत राहिलीस. कितीदा पावसात एकटीच भिजत राहिली असशील, माझं तुझ्यासोबत असण्याचं स्वप्न पाहत. फेसाळता समुद्रकिनारा पाहिल्यावर, बहरलेला ऋतू पाहिल्यावर, गुलाबाची लाल फुलं पाहिल्यावर तुझ्या मनात माझ्याविषयीची प्रेमभावना दाटून येत असेल.
Now Relax! तुझी ही प्रतिक्षा लवकरच संपेल. कारण मी लवकरच तुझ्या आयुष्यात येईन आणि तुझा प्रेमावरचा विश्वास दृढ करेन.
Prince Charming, भावी प्रियकर, स्वप्नातला राजकुमार, होणारा नवरोबा अशा कितीतरी नावांनी तुझ्या डायरीतली कित्येक पानं फक्त मी कसा असेन यावर लिहिली असशील. मला माहीत आहे की तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारा मी या जगात आहे की नाही असं तुला कधीकधी व्याकूळतेने नियतीला विचारावसं वाटतं. तुला त्या अधीर नात्याची ओढ लागलेली आहे आणि ती तू लपवू शकत नाहीयेस, तुझे डोळे सतत मला शोधतायत...बस ! आता तू काहीच करू नकोस, सावर स्वतःला आणि हा बघ मी आलोय. कुठल्याही क्षणी तुला भेटेन. सकाळी तू ऑफीसला जाताना घाई घाईत Train पकडशील तेव्हा हळूच मी तुझ्या बाजूने जाईन. तू Facebook open करशील तेव्हा Suggest Friends च्या List मध्ये माझं नाव असेल. तुझ्या मित्र-मैत्रिणींच्या आग्रहाखातर तू तुझ्या आवडत्या एक साध्याशा ड्रेसमध्ये पार्टीत येशील, तिथेही तुला मी भेटेन कदाचित. तुझ्या आवडत्या लेखकाचं पुस्तक शोधत तू Crossword मध्ये रमलेली असशील आणि मला तुझा धक्का लागेल... किंवा Market मध्ये Shopping करत असताना अचानक तुझं माझ्याकडे किंवा माझं तुझ्याकडे लक्ष जाईल.
अशा कितीतरी ठिकाणी आता मी तुला भेटण्याची शक्यता आहे. कारण मी तुला भेटायला आलोय. आणी कायमचा तुला प्रेमाच्या राज्यात नेण्यासाठी आलोय.
मला माहीत आहे की तू आतापर्यंत एकटीच होतीस, लोक तुला ३० वर्षांची घोडनवरी झालीस म्हणून टोमणे मारत असतील. सगळ्यांच्या लटक्या चिडवण्याला, हिणवण्याला तू वैतागली असशील. त्यामुळे तुला माझा रागही आला असेल. तुझं माझ्यावर रागावणं स्वाभाविक आहे. पण तू काळजी करू नकोस. तुला प्रेमाची वाट दाखवणारा, तुझ्या आयुष्यात Thrill आणि Excitement  घेऊन येणारा...तो मीच आहे, मी आलोय. ज्याच्याशी तू तुझी सगळी सुखं-दुःख मनमोकळेपणाने बोलू शकशील.
सगळं काही संपलं असताना मी तुझ्यासोबत आहे असं म्हणणारं कोणीतरी तुझ्यासोबत असावं ही तुझी इच्छा स्वार्थी नाही, Natural आहे. म्हणूनच तुला अजिबात वाट पहायला न लावता, एकही क्षण न दवडता मी आलोय, तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी.
आतापर्यंत तू माझ्यासाठी थांबलीस आणि प्रेमावरचा विश्वास उडू दिला नाहीस म्हणून मला अगदी मनापासून तुला Thanks म्हणायचं आहे. मीही तुझ्यासारखा चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे जेव्हा कधी आपण भेटू तेव्हा मी तुला आवडेन आणि तू माझा Sole mate म्हणून स्वीकार करशील. तू खूप चांगली आहेस, निरागस आणि निखळं हसणं कधी विसरू नकोस. मी येतोय.

तू माझ्या आठवणीत जागून कितीतरी sad songs download करून त्यांची playlist बनवली असशील. ती आता कायमची delete कर… कारण तुला आता फक्त माझ्यासोबत romantic songs गुणगुणायची आहेत. प्रेमात पडणं किती सुंदर असतं त्याची जाणिव तुला आहे पण मी तुझ्यासोबत नसल्याने तू आतल्या आत झुरते आहेस. तुला प्रेमाची अनुभूती देण्यासाठी मी येतोय. प्रेमात पडल्यावर परस्परांना पाहताना नजरेत हरवून जाणं, तरीही स्वतःला स्वतःच नव्याने सापडणं, म्हणजे काय असतं? याची जादू अनुभवायला सज्ज हो. तुझी Love Songs ची playlist तयार ठेव. अब दिल में Guitar बजनी चाहिए...तड़पनेवाले मन को अब प्यारीसी धुन गुनगुनाने दो...
मी आता तुझ्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाही. कधी तुला भेटतो असं झालं आहे. मला माहितेय माझा हात हातात घेऊन तुला खूप गोष्टी सांगायच्या आहेत. मलाही त्या गोष्टी तुझ्यात हरवून जाऊन ऐकायच्या आहेत. मला तुझा चेहरा पाहत तुझ्या गालांना स्पर्श करायचा आहे. तुला डोळ्यात साठवायचं आहे. तुझ्या केसांवरून तुझ्याही नकळत अलगद हात फिरवायचा आहे. तुझ्या चेहऱ्यावर kiss करत तुला घटट् मिठी मारायची आहे. आणि तुला सांगायचं आहे की मी या क्षणाची किती वाट पाहिलीय.
मला माहितेय मला भेटल्यावर तुझ्याही भावना यापेक्षा वेगळ्या नसतील. आपली लवकरच भेट होईल. तुझं सारं दुःख विसरून जा. हा बघ मी आलोय. निराशेचे काळे ढग बाजुला कर. मनावरचं मळभ दूर कर. अश्रुंना आत कोंडू नकोस वाहू दे. मोकळी हो. कदाचित तुझ्या घराच्या समोरून जो रस्ता जातो तिथून तू वळतानाही मी तुला भेटेन...
तुझाच,
तुझ्यावर मनापासून प्रेम करणारा तुझा भावी प्रियकर...

Wednesday, 8 June 2016

परबांचा घर

ओवळिये गावच्या परबवाडीत...आवाटाची पानंद संपल्यावर...पयला दिस्ता ता परबांचा घर...हिर्यागार झाडांच्या सावळेत हसनारा...वाटेवरच्या वाटसऱ्याक वायच बसातरी म्हन्नारा...
घरटो सोडून गेलेल्या पाखरांसाठी... परबांचा घर हाया घालता
केळीची पाना नी माडाच्या हिर्या सावळांसारखीघरातल्यांवर लय माया तेची
मन माजा धावता हाघरा समोरच्या पांदीतना घराकडेआजुनव जिव गुंतलो आसा, दारातसून दिसनाऱ्या खळ्यात, जेना ल्हानाचा मोठा केल्यान...
झाडाझुडपात लपलला परबांचा घर ...आटावता हा माका पाटल्या दारातसून, फुडल्यादाराक पळान...घरावांगडाच खेळलेली लपाछपी...कितीकव शिकलय, मोठा झालय, शहरात ऱ्हवलय...तरी इसरा कशी तुझी कुस? इसरान कशो गिलाव्याच्यो भिंती? …असो, एकय दिवस जायत नायज्या दिवशी माका माज्या गावच्या घराची आटवन येना नायशहरात ऱ्हवानसुधा गावचा घर’… ‘मनात घरकरून आसता

रडाक येता, आटवनी येडा-खुळा करून सोडततमाका माज्या घरासामनीच्या खळ्यात उब्या करतत ल्हानसा आसा आमचा परबांचा घरपन बंगल्याक सुदा येवची नाय तेची सर...

Thursday, 28 April 2016

फॉग

सागर खरंतर त्या दिवशी थोडासा टेन्शनमध्ये होता. चाळीतल्या माणसांच्या टोमण्यांनी नाही तर त्याला नवी एक हटके कव्हर स्टोरी करण्याची संधी साप्ताहिक ह्युमन बींगच्या संपादकांनी दिली होती. त्यामुळे तो त्या कव्हर स्टोरीला जाण्याआधी फार लक्षपूर्वक आपले प्रश्न विचारायचे मुद्दे छोट्या डायरीत टिपून घेत होता. नंतर त्याने आपला जिवाभावाचा जोडीदार असलेला कॅमेरा बॅगेत ठेवला. कव्हर स्टोरी करताना फोटोही तितकेच महत्वाचे आहेत, असं संपादकांनी सांगितलं होतं. तू लिहिलेलं मॅटर कमी पडलं तर लावता येतील. तसंही लोकांना हल्ली बातम्या वाचायच्या नसतात, फक्त पहायच्या असतात. तेव्हा काहीही करून फोटो हे हवेतच.असं संपादकांचं म्हणणं. 

गेल्याच आठवड्यात तो एका स्मशानभूमीत कव्हर स्टोरीसाठी गेला असताना तर संपादकांनी चक्क सांगितलं... प्रत्यक्ष प्रेत जळतानाचे फोटो हवेत... त्यातला एक फोटो निवडून साप्ताहिकाच्या कव्हरपेज वर लावला जाईल. तसे त्याने फोटो काढलेही... पण संपादकांनी, प्रकाशकांनी ते फोटो पाहिले तेव्हा त्यांनाच दरदरून घाम फुटला आणि फोटो कव्हरपेजवर नाही छापला ती गोष्ट वेगळी...
तर असा हा धडाडीचा पत्रकार शोध पत्रकारितेतील उगवता तारा सागर... आता नव्या कव्हर स्टोरीसाठी सज्ज झाला होता. जाण्यासाठी कपडे घालत असताना त्याच्या खोलीत वाऱ्याची झुळूक आली, आणि त्या झुळकीबरोबर परफ्युमचा अतिशय सुवासिक असा सुगंध आला.
व्वा छान सुगंध आहे, तो नकळत बोलून गेला. त्याच्या बाजुच्या खोलीत साटम आडनावाचं एक जोडपं रहात होतं. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे सेंट, परफ्युम्स लावण्याचा भारी नाद होता. अगदी परदेशातून त्याची खरेदी केली जात असे.
तेही जोडपं त्याचवेळी बाहेर पडलं. सागरने विचारलं नेहमी प्रमाणे, काय वहिनी आज कुठला परफ्युम?”
तर तिच्या मिस्टरांनी उत्तर दिलं. आजकल तो भाई फॉग चल रहा है
जाऊ दे, तुला काय कळणार त्यातलं, तुम्ही बसा कागदावर खर्डेघाशी करत...
मी सांगत होतो, तो कॉर्पोरेट कंपनीतला जॉब स्वीकारला असतास तर असं गल्लीगल्लीत डायरी पेन आणि गळ्यात कॅमेरा लटकवून फिरण्याची पाळी नसती....
हे साटम आडनावाचं जोडपं सागरला त्याच्या जॉबवरून हिणवण्याची एकही संधी सोडत नसे. आजही त्यांनी त्याच्या जॉबविषयी बोलण्याकडे मोर्चा वळवल्यावर त्यांच्या बोलण्याला लगाम घालत सागरने त्यांना मध्येच थांबवलं. त्याचं काय आहे... मिस्टर साटम, तुम्हाला सांगितलं असतं सगळं... पण माझं पत्रकारितेचं वेड तुम्हाला नाही कळणार, असो... मला उशीर होतोय... तुम्हालाही होत असेल ना...चला निघूया ...आपापल्या वाटेने...
त्यानंतर सागर कामाठीपुराच्या ४थ्या गल्लीत शिरला. तिथल्या काही बायकांची तो मुलाखत घेणार होता. सागरने काही मुद्दे, काही प्रश्न विचारायचे मनाशी ठरवले होते, ते त्याने त्यांना विचारले.
सगळ्यांच्या मुलाखती खूपच रंगल्या. मधे-मधे सागर नोट्स, काही टिपणं डायरीत लिहित होता. काही गोष्टी रेकॉर्डही केल्या. दुपार होत आली. त्याने मुलाखती घेणं थांबवलं. त्याला कव्हर स्टोरीसाठी हवी होती ती पुरेशी माहिती मिळाली होती. त्याचा लिखाणाचा दृष्टिकोन स्पष्ट होत होता.
रेड लाईट एरियातील बायकांविषयी त्याला सहानुभूती नव्हती, आता कितीतरी सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत, यांना या दलदलीतून बाहेर काढायला पण या बायका काही त्यांना साथ देत नाहीत. पण याच भागातली श्वेता मात्र तशी नव्हती, तिने शिक्षण घेऊन आपली वेगळी वाट शोधली. तिचीच गोष्ट सागर आपल्या कव्हर स्टोरीतून मांडणार होता, त्यासाठी पूरक इतर काही बायकांच्याही त्याने मुलाखती घेतल्या होत्या.
मग कॅमेरा घेऊन काही फोटोग्राफ्स त्याने काढले. त्या रेड लाईट एरियात थोडं फिरून पाहणी केली. आणि तो जायला निघाला होता. तितक्यात एका बंद दुकानाच्या शटरमागून जोरजोरात थपडा मारल्याचा आवाज आला.
सागरची नजर त्या आवाजाच्या दिशेने गेली. त्याच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. मला वाचवा, मला वाचवा असा हळू दबका आवाजही येऊ लागला. त्याने शटर उघडून बघण्याचा प्रयत्न केला. पण त्याला ते उघडेना, आसपास कुणीच नव्हतं. त्या एखाद्या मोठ्या खोक्याप्रमाणे दिसणाऱ्या बंद खोलीला कुठून खिडकी किंवा आत जायला काही जागा मिळते का, पाहण्यासाठी तो डाव्या बाजूने वळला, थोडं पुढे गेल्यावर एक खिडकी दिसली. त्यावर त्याने जोरात हाताने गुद्दे मारले, त्याबरोबर ती खिडकी उघडली. आणि काय आश्चर्य सकाळी त्याने त्याच्या खोलीत उभं राहून जो परफ्युमचा सुगंध फिल केला होता, तसाच परफ्युमचा सुगंध आतून येत होता. तो थबकला. आत काळोख होता. त्याने हाक दिली, कोण आहे आत? त्याबरोबर साटम वहिनींनी आतून आवाज दिला. अहो, मला सोडवा, मला जबरदस्ती इथे पकडून आणलं आहे त्या नराधमांनी...सागरने साटम वहिनींचा आवाज ओळखला पण त्याचा विश्वास बसत नव्हता. मागच्या बाजूस एक उभा पत्रा दरवाजासारखा लावलेला होता. सागरने तिथे जाऊन जोरात हिसडे दिले आणि तो दरवाजा उघडला, आत घाबरलेल्या साटम वहिनींनी सागरच्या पायावरच लोळण घातली, मला इथून सोडवा, माझी मदत करा. सागरने त्यांना धीर दिला, म्हणाला, वहिनी मी सागर, तुम्हाला काहीही होणार नाही, काळजी करू नका, चला कोणी यायच्या आत निघू आपण...

सागर साटम वहिनींना घरी घेऊन आला. मिस्टर साटम सागरला सारखं सारखं थँक्यू म्हणत होते. स्वतःच्या चुकीबद्दल क्षमा मागत होते. सागर अधिक काही बोलला नाही, फक्त जाता जाता एवढंच म्हणाला, मिस्टर साटम कुठलंही प्रोफेशन बरं-वाईट नसतं. आज माझ्या पत्रकारितेच्याच प्रोफेशनमुळे वहिनींना वाचवू शकलो. पण तुम्हाला त्याची कदर नाही, आप के यहाँ तो फॉग चल रहा है...या धुक्यामुळे आंधळे होऊ नका, समोरच्या माणसाला पैशात न तोलता त्याचे गुण बघा...


आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...