Wednesday, 25 June 2014

विचारांची भव्यता

Sea is common for all, But some take pearls, some take fishes and some come out with just wet legs. World is common to all we only get what we try for…

सकाळीच हा सुंदर मोजक्या शब्दात व्यापक अर्थ सामावलेला एसएमएस वाचला. एकूणच दिवसाची सुरुवात सकारात्मक आणि प्रसन्न झाली. आजचा दिवस काही खासच आहे, असे वाटून गेले




समुद्राचं उदाहरण असलेला वरील एसएमएस असल्यामुळे, 
मित्रांनो! या समुद्राविषयीची एक गंमत सांगते… 

कधी एकटे असताना किंवा स्वतःसाठी थोडा वेळ काढून सहजच समुद्र किना-यावर फिरायला जा. समुद्र किना-यावरील वाळूत बसून समुद्राची भव्यता, समुद्राची निळाई तुमच्या डोळ्यांमध्ये साठवून घ्या. तिथला खारा वारा आपल्या मोकळ्या श्वासात भरून घ्या. सगळे ताण-तणाव क्षणभर विसरून जा आणि शांत व्हा. आता तुमच्यासमोर अथांग पसरलेल्या सागराच्या भव्यतेचं निरीक्षण करा. 

समुद्राच्या लाटांकडे पहा.  विचार करा… लाटा आपल्याला काय सांगू पाहत आहेत. लाटांकडे पाहताना असं वाटतं की समुद्रामध्ये काहीतरी सतत हालचाल सुरू आहे. उसळणा-या लाटा म्हणजे सागराचं चैतन्य. लाटांकडून काय शिकता येईलतर याचं उत्तर आहे सातत्य.
एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. या प्रयत्नांमध्ये सातत्य असावे लागते आणि त्याचबरोबर चिकाटी लागते. आपल्याला हे लाटांकडून शिकण्यासारखं आहे.

समुद्राकडे एकाग्र होऊन पाहताना जिथे आपली नजर जाते तिथवर पाणीच पाणी दिसते. समुद्राची ही भव्यता आपल्या विचारांमध्ये आणता आली, तर फारच सुंदर. कारण एखादी छोटी गोष्ट करतानाही त्यामागचा विचार मोठा असला पाहिजे. 
समुद्राकडून आपण खूप काही घेत असतो. समुद्र या चराचर सृष्टीचा एक प्रभावशाली घटक आहे. याची वैज्ञानिक आणि भौगोलिक कारणं आपण शिक्षणाच्या अभ्यासक्रमातून अभ्यासली आहेत.

परंतु या ठिकाणी आपण समुद्रावर एकटे आलो असताना पूर्णतः निखळ मनाने समुद्र आपल्याला जे सांगू पाहतोय ते ऐका. जो लांबच लांब समुद्रकिनारा आपल्याला दिसतोय तो स्थिर आहे. त्याने समुद्रात निर्माण झालेली कित्येक वादळे पाहिली आहेत, झेलली आहेत. आपले मनही या किना-यासारखे कणखर असायला हवे. आपल्या आयुष्यात संकटांच्या स्वरूपात कितीही वादळं आली तरी आपल्या स्वप्नांचा किनारा आपणच जपला पाहिजे.

हे फारच तात्विक वाटेल पण समुद्राकडून अशा कितीतरी गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. परंतु त्या आत्मसात करताना मनाचा मोठेपणा आपण दाखवायला हवा…   


मित्रांनो! आपला एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्याचबरोबर एखादी गोष्ट प्रत्यक्षात साकार करण्यासाठी मनापासून प्रयत्न करतो तेव्हा आपण यशस्वी होतोच. 

फक्त समुद्राकिना-यावरून निघताना समुद्राकडून विचारांची भव्यता सोबत घ्यायला मात्र विसरू नका!


Friday, 20 June 2014

पाऊस म्हणजे आपलं मन

पाऊस या तीन अक्षरी शब्दात आनंदच आनंद भरून राहिला आहे. पाऊस म्हणजे चैतन्याने भारलेले वातावरणपण अलिकडे पाऊस म्हणजे मनाची मनसोक्त मुशाफिरीकुठेॽ तर निसर्गाचं नंदनवन असलेल्या कोकणात. कारण पाऊस येण्याची चाहूल लागली की मला माझं बालपण आठवतं. कोकणासारख्या निसर्गसमृद्ध प्रांतात बालपण साजरं झाल्यामुळे निसर्गाची विविध लोभसवाणी रुपं मी पाहिली आहेत, अनुभवली आहेत. पावसाच्या मोसमाकोकणातलं वातावरण कसं असतंॽ याचं वर्णन करायला शब्दच अपुरे पडतील म्हणूनच त्या आठवणी जागवताना, पावसाच्या वाहत्या पाण्यात कागदी होडी सोडावी तशी ही आठवण शब्दबद्ध करते आहे.



वैशाख वणवा असह्य होईस्तोवर पावसाची चाहूल लागायची. ज्येष्ठ महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यात पेरणीला सुरुवात व्हायची. शेतावर सगळ्यांची लगबग सुरू व्हायची. आणि आम्हा मुलांना कधी एकदा रेनकोट, छत्री घेतोय आणि पावसाची मजा अनुभवत शाळेत जातोय, असे होऊन जायचे.

घराकडून शाळेत पोहोचायला अर्धा-पाऊण तास तरी लागे. पण छत्री घेऊन, रेनकोट घालून शाळेत जाताना ती पावसाळी सहलच असायची. मला तर वाटे पावसाच्या दिवसात पावसाने शाळेत जाताना आणि पुन्हा घरी येताना अशा दोन्ही वेळेला आपल्या सोबत असावे. अगदी मनसोक्त चिंब भिजूनच घरी यावे…गावाकडच्या आठवणी आठवाव्या तेवढ्या थोड्याच…

पाऊस आला की मनाला खूप शांत आणि टवटवीत वाटू लागतं. झाडं जशी पावसात भिजून पावसाची मजा लुटतात, तशीच आपल्यालाही लुटता यावी असं सारखं वाटत राहतं. आणि झाडांचा हेवा वाटू लागतो.
पावसाळी दिवसात मनाचे हे विविध खेळ मनातच खेळले जात असतात. म्हणूनच
मला वाटतं पाऊस ही मानसशास्त्रीय संज्ञा आहे. साहित्याबरोबर मानसशास्त्र विषय विविध पुस्तकातून अभ्यासताना मला एक गोष्ट लक्षात आली की पावसाचं नातं मानसशास्त्राशी आहे. कारण गंमत पहा ना! आपण जसा विचार करतो तसे पावसाचे विविध विभ्रम आपल्याला पहायला मिळतात.

आपण आनंदात असलो तर पाऊस आपल्याला आनंददायी वाटतो. आपण दुःखी असलो तर पाऊसही आपल्याला करूण, हुरहुर लावणारा, दुःखी-कष्टी वाटतो.



काही महिन्यांपूर्वी अ रेनी डे नावाचा चित्रपट पाहिला. त्या चित्रपटातील विषयाने तर माझ्या पावसाच्या मानसशास्त्रीय संज्ञेला अधिकच बळकट केले.
दीड तास पावसात भिजण्याची अनोखी किमया या चित्रपटाने केली.
तो चित्रपट पाहून घरी पोहोचेपर्यंत मन आणि पाऊस…मन आणि पाऊस हे दोन शब्द माझ्या विचारांमध्ये सारखे येत होते. त्यानंतर विज चमकावी तसा लख्ख प्रकाश पडला. मनातला विचार चमकून पुन्हा मनातच तरंगू लागला. कारण पावसाचं मनाशी असलेलं नातं आता अधिक दृढ वाटू लागलं.
अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी नायिकेच्या मनात बरसणा-या पावसाचे उत्कट भाव आपल्या सशक्त अभिनयातून व्यक्त केले. पाऊस आणि मन यातील साधर्म्य चित्रित करताना दिग्दर्शक राजेंद्र तालक यांची एकेक फ्रेम अक्षरशः पावसात भिजूनच नजरेसमोर साकार होत होती. अशी प्रतिकात्मकता मी कित्येक वर्षानंतर चित्रपटात पाहत होते.
त्यामुळे तो चित्रपट म्हणजे मन भारावून टाकणारी, पावसाचं मनाशी असलेलं नातं उलगडणारी अप्रतिम कलाकृती होती.

रसूल पुकुट्टी यांच्या कलात्मक ध्वनिमुद्रणातून चित्रपटात बरसलेल्या पावसाने माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले. का बरं हा सबंध चित्रपटभर पाऊस पडतोयअसा सर्वसामान्य प्रेक्षकासारखा पहिला प्रश्न उभा राहिला. नंतर एकामागोमाग प्रश्नांची माळच गुंफली गेली. पण मग हळुहळु त्या सा-या प्रश्नांची उत्तरं माझी मलाच उलगडत गेली.

आपल्या प्रत्येकाच्याच मनामध्ये पाऊस असतो. कधी तो आनंदाश्रुंनी सोबत करतो. तर कधी दुःखाश्रू होऊन मन हलकं करतो. पण कधी कधी आपणच आपल्या मनात बरसणा-या पावसाकडे दुर्लक्ष करतो. आणि आतल्या आत अक्षरक्षः घुसमटत जगू पाहतो.
पाऊस म्हणजे आपल्या संस्कृतीचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. पावसामुळेच तर आपलं जीवन आहे.

आपल्या मनातल्या पावसाला ओळखा. त्याला बरसू द्या. तो सुखाचा असेल तर तुम्ही आनंदी व्हाल आणि तुमच्यासोबत इतरांनाही आपल्या आनंदात सहभागी करून घ्याल. आणि तो पाऊस दुःखाचा असेल तरीही त्याला अडवू नका. बरसू द्या. तुमचं मन मोकळं होऊ द्या. त्यामुळे मनावरचं मळभ दूर होऊन मनाचं आभाळ स्वच्छ होऊन जाईल, त्याला नवी उभारी मिळेल…पुन्हा आनंदाच्या पावसात भिजण्यासाठी…



पावसाच्या येण्याने चराचर सृष्टी तृप्त होऊन जाते. मग आपलं मन तर इतकं नाजूक आहे…

त्याला कितीसा वेळ लागणार आहे, नवचैतन्याने भारून जाण्यासाठी… काय पटतंय ना

पाऊस म्हणजे आपलं मन

चला आजपासून मनमोकळं जगू या…

आणि इतरांनाही मनमोकळं जगण्यासाठी मी आहे तुझ्यासोबत असा विश्वास देऊ या.

Monday, 16 June 2014

स्वतःशी संवाद

   रात्रीचं जेवण आटोपल्यानंतर चाळीसमोरच्या मैदानात शतपावली करायला जाणं, हे नित्याचचचाळीतली सगळी लहान-थोर मंडळी, मस्त गप्पा मारत एकमेकांची विचारपूस करत फे-या मारणे सुरू असते. त्या दिवशी असेच आम्ही जेवणानंतर मैदानात आलो. संध्याकाळी पाऊस पडून गेला असल्यामुळे वातावरणात गारवा होता

चाळीसमोरची गुलमोहोराची, वडाची, पिंपळाची आणि अशोकाची झाडे तजेलदार दिसत होती. ज्येष्ठ पौर्णिमेचा चंद्र गुलमोहोराच्या फांदीआडून इतका सुंदर दिसत होता, की क्षणभर त्याच्याकडे पाहतच रहावेसे वाटले. हळुहळु फे-या मारायचं सोडून सगळ्यांच्या गप्पाच सुरू झाल्या.

आज खूप दिवसांनी आम्हा चौघीजणींची जिवलग मैत्रीण कॅथरीन भेटली. ती आम्हाला गोव्याला तिने किती धम्माल केली त्या विषयी सांगू लागली. त्यानंतर तिने आम्हाला एक सुंदर इंग्रजी गाणं तिच्या मोबाईलवर ऐकवलं. तिला ख्रिसमसच्या गोष्टी सांगणं खूप आवडतं आणि आम्हाला त्या ऐकायला आवडतं. ती नेहमी नव्या नव्या गोष्टी आम्हाला सांगत असते. कधी आमच्यात इंग्लिश लिट्रेचर विरुद्ध भारतीय साहित्य अशा साहित्यिक गप्पाही होतात.

पण त्या दिवशी तिने ऐकवलेलं गाणं पौर्णिमेच्या चंद्रासारखं लख्ख मनावर कोरलं गेलं.

गाण्याचं शिर्षक Hero
गीतकार Mariah Carey

There's a hero
If you look inside your heart
You don't have to be afraid
Of what you are
There's an answer
If you reach into your soul
And the sorrow that you know
Will melt away


And then a hero comes along
With the strength to carry on
And you cast your fears aside
And you know you can survive
So when you feel like hope is gone
Look inside you and be strong
And you'll finally see the truth
That a hero lies in you



It's a long road
When you face the world alone
No one reaches out a hand
For you to hold
You can find love
If you search within yourself
And the emptiness you felt
Will disappear



Lord knows
Dreams are hard to follow
But don't let anyone
Tear them away
Hold on
There will be tomorrow
In time
You'll find the way




या गाण्यातून शब्दांचं सामर्थ्य अनुभवता आलं, तसंच आपल्या जीवनात आनंद निर्माण करण्याचं सामर्थ्य आपल्याकडेच आहे…फक्त आपल्या आतल्या आवाजाला ऐकायला हवं, याची प्रचिती आली.

मित्रांनो, आपला आतला आवाजकधीतरी एकाकी वाटत असताना, कधी संकटांशी झगडताना आपण एकटे पडतो तेव्हातर कधी वाटतं आता सारं काही संपलंअशा वेळी खचून न जाता स्वतःशी, स्वतःच्या ह्रदयाशी संवाद साधायला हवा. आपण एकाकी असताना ह्रदयाशी साधलेल्या या संवादामुळे धैर्याने उभं राहण्याची प्रेरणा मिळते.



आपणच आपल्याला पुरतं ओळखलेलं नसतं, म्हणून अपयश आलं की आपण दुःखी होतो. मग अशावेळी आपला आतला आवाज आपल्याला काय सांगू पाहतोय ते ऐकायचं.
आपल्याला जेव्हा जेव्हा एकटं वाटतं, सकारात्मक दृष्टिकोनाची कमतरता जाणवते, तेव्हा आपल्या ह्रदयात डोकावून पहायला हवं.

दिवसभरातील कामाच्या पसा-यातून स्वतःशी संवाद साधायलाच हवा...त्या गाण्याच्या निमित्ताने माझ्या मनात सुंदर विचारांनी रुंजी घालायला सुरुवात केली. वा क्या बात है! खूपच मस्त वाटायला लागलं आहे.



Sunday, 8 June 2014

‘अलबेला’ समाज

  आपल्या भारतीय समाजात मानसशास्त्र या विषयाची गंभीर दखल घेतली जात नाही. धर्म, रूढी, परंपरा आणि अंधश्रद्धेच्या कोंदणात मानसशास्त्राच्या वैचारिक अधिष्ठानाला गाडून टाकलं जातं. समाजात वावरताना प्रत्येक व्यक्तीचं जगणं मनमोकळं हवं. समाजात प्रत्येक व्यक्तीने परस्परांच्या भावना, मत समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला योग्य तो आदर मिळायला हवा. समाजातील प्रत्येक व्यक्तीची निकोप आणि सुदृढ मानसिकता असायला हवी. यालाच तर संवेदनशील माणूस म्हणतात. माणुसकीच्या या तत्त्वांचा विसर पडला की माणसाचा सैतान व्हायला वेळ लागत नाही.
   
स्वप्न आणि वास्तव यातील अंतर वाढत जाऊ लागतं तेव्हा माणसाचं भाबडं मन स्वप्नातच जगू पाहतं. समाज अशा माणसाला वेडा म्हणतं. मग या सैतानांची व्याख्या कशी करावीत्यांना शिक्षा कशी आणि कोणी करावीॽॽ
  आपल्या मनातील राग, लोभ, चीड संस्कारशील विचारांनी काबूत ठेवायला हवेत. त्याचा इतरांना त्रास होऊ द्यायचा नाही. सृजनशील मार्गाने अभिव्यक्त व्हायला हवे. रस्त्यावरील राडा संस्कृती समाज विघातक आहे.
  
समाजाची आजवरची स्थिती पाहता ज्या विचारवंतांनी, कलावंतांनी, लेखकांनी आपल्या विचारांनी लढा देण्याचं ठरवलं, त्यांना समाजाने कायम एकटं पाडलं आहे. कारण विचारांचं सामर्थ्य समाजाला कळतं पण वळत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे प्रवाहाच्या विरुद्ध जाणा-या प्रत्येक व्यक्तीच्या नशिबी अलबेलापण येतं.
संकटांना सामोरे जाताना आपल्या कोवळ्या मनाला अनेक वादळं झेलण्यासाठी कणखर आपणच करायला हवे.

अलिकडे समाजात जे बरे-वाईट बदल घडत आहेत, ते पाहता या समाजाला दिशा देणा-या असंख्य सृजनशील करांची (बाबुराव बागुलांच्या शब्दांत) गरज आहे. त्यामुळे इथून पुढे अशी आशा करते की जे लेखक, कलावंत, विचारवंत आपापल्या विचारांनी समाजात नवनिर्मितीची आस धरतील तेव्हा ते समाजासाठी अलबेला असणार नाहीत. तर ते समाजासाठी प्रेरक आणि नेतृत्व करणारे असतीलअलबेला हा उर्दू शब्द सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही अर्थाने वापरला जातो. या दोन्ही अर्थाने हा समाज अलबेला आहे.
आता जीवनात प्रत्येक क्षणी मूल्यांची कसोटी लागणार आहे…तयार रहा!

आपली मूल्यं आपणच जपली पाहिजेत. एकमेका सहाय्य करू…या आपल्या संस्कृतीचा विसर आपल्याला कसा पडला? इथून पुढे अलबेला हा शब्द सकारात्मकपणेच वापरला गेला पाहिजे, याची जबाबदारी आपल्यावर आहे.
त्या अत्याचारग्रस्त महिलेच्या तोंडून पुढील उद्गार उगाच नाही आले…

त्या हैवानापेक्षा बघ्यांची भीती वाटते…

Thursday, 5 June 2014

अनुभवातून शिकणं

समोर घनदाट जंगलाने वेढलेला उत्तुंग सिद्धगड. आणि याच सिद्धगडाच्या पायथ्याशी लाल चि-यांनी बांधलेली, लांबच्या लांब घरासारखी कौलारू छप्पर असलेली आणि अंगणात फुलांची बाग असलेली आमची शाळा. आमच्या बालपणातील भावविश्वाचे केंद्रबिंदू म्हणजेच ही शाळा. समोर दिसणा-या उत्तुंग सिद्धगडाकडे पाहून आम्ही हा एका दमात चढून जाऊ अशी इच्छा मनात धरायचो. त्याची उंची आमच्या बालमनाला खुणावत होती. त्यानंतर पाच-सहा वेळा थकलेल्या- दमलेल्या अवस्थेत तिथे जाऊनही आलो होतोकिती लिहावे तेवढे थोडेचअसो

पहिल्या इयात्तेत शाळेत नाव घालतानाच शाळेच्या आसपास असलेल्या निसर्गरूपी शाळेतही नाव घालणे ओघाने आलेच. अतिशय वेड लावणारा निसर्ग होता. शाळेच्या पाठीमागे नजरेच्या टप्प्यात न मावणारे भले मोठे मैदान होते. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी तिथे खेळायला जाणे हा आमचा नित्यक्रम असायचा. शाळेत शिक्षकांनी नेहमी अभ्यासाबरोबरच कला, साहित्य, खेळ यांची गोडी लावल्यामुळे ती दहा वर्षे अनेकविध अनुभवांनी समृद्ध झाली. शाळेत गेल्यापासून ते संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर घरी परतेपर्यंत पूर्ण दिवस शाळामय असायचा. शाळेतील ते दिवस मजेचे आणि मोरपंखी होते. ते कधीच विसरता येणार नाहीत.

आता लिहायला बसले आहे तर शाळेतील अनेक आठवणींनी मनाच्या आभाळात विहार करायला सुरुवात केली आहे. शाळा आणि अनुभव या दोन शब्दांचा उल्लेख आलाच आहे तर एक प्रसंग आठवतो आहेआम्हाला शाळेची वेळ सुरू झाल्यावर फळा पुसून त्यावर सुविचार, तारीख, वार, विद्यार्थ्यांची संख्या असे सर्व फळ्यावर लिहावे लागायचे. प्रत्येक दिवस एकेका विद्यार्थ्याला नेमून दिलेला असायचा. त्या दिवशी आमच्या वर्गातील सुहासने कमालच केली. त्याला शैलाने जीवन हे एक फूल आहे आणि प्रेम हा त्यातील मध आहे. असा एक सुंदर सुविचार फळ्यावर लिहिण्यासाठी सुचवला. पण या वाचनवेड्या पठ्ठ्याने कुठल्यातरी पुस्तकात वाचलेली एक ओळ सुविचार म्हणून लिहून ठेवली. गुरुजी वर्गात आले आणि त्यांनी ती ओळ वाचलीमाणूस हा मरेपर्यंत विद्य़ार्थी असतो. या ओळीच्या संदर्भाने मग गुरुजींनी खूप काही विस्ताराने सांगितले. त्यांनी सुविचारातील वाक्याबरोबरच जोडीने अनुभव हा शब्द घेतला. मग त्यांनी जे काही सांगितले त्या ओळी अशा-   

‘‘माणसाने आपल्या आयुष्यात आलेल्या ब-या - वाईट अनुभवांतून सतत शिकत राहिले पाहिजे. आपल्या आयुष्यात घडणा-या गोष्टी, घटना, प्रसंग यातून गाठीशी येणा-या अनुभवांचे सखोल विश्लेषण करता आले पाहिजे. तरच आपल्याला त्या अनुभवांतून सकारात्मक दृष्टीकोन प्राप्त होतो. अशी दृष्टी लाभलेले लोक आयुष्यात खूप काही अलौकिक करण्याचे धाडस करू शकतात. असे अनुभवातून शिकणे या अर्थाने माणूस मरेपर्यंत विद्यार्थी असतो. पाश्चात्य सौंदर्यमीमांसा करणारे कविवर्य बा. सी. मर्ढेकर यांनीही त्यांच्या वाङ्मयीन महात्मता या पुस्तकात अनुभवाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यामुळेच अतिशय धीर-गंभीर आणि अभ्यासपूर्ण विवेचन करणा-या मर्ढेकरांच्या पुढील ओळी आपल्याला गावाकडच्या बालपणीच्या दिवसात घेऊन जातात
‘‘कितीतरी दिवसांत नाही चांदण्यात गेलो.
कितीतरी दिवसात नाही नदीत डुंबलो.’’

गुरुजींनी सांगितलेली अनुभवातून शिकणे ही संकल्पना आम्हा मुलांना खुपच आवडली. आणि या संकल्पनेला आमच्या आमच्या आकलनानुसार आम्ही स्मरणात साठवूनही ठेवलं.
म्हणूनच मला असं वाटतं अनुभवातून शिकणं याला फार महत्त्व आहे.
मीही आजवर अशा अनेक अनुभवातून खूप काही शिकले. शैक्षणिक पात्रतेपेक्षा अनुभवातून शिकण्यामुळे जीवनाकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन
व्यापक झाला आहे. त्यामुळे सकारात्मक विचारांचं सान्निध्य मला मिळालं.
यापुढील आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सकारात्मक विचारांच्या सोबतीने अनुभवातून शिकणं सुरुच राहणार आहे
अभ्यासापलिकडे जाऊन व्यावहारिक ज्ञानाने माझं आयुष्य अधिक सुखकर करणा-या माझ्या गावच्या शाळेची तुलना कुणाशी होऊच शकत नाही.
आचार्य अत्रेंच्या कवितेतील ओळी इथे गुणगुणाव्याशा वाटतात

ही आवडते मज मनापासुनी शाळा

लाविते लळा ही जशी माऊली बाळा

Tuesday, 3 June 2014

स्वप्नांच्या कॅनव्हासवर इच्छाशक्तीने रंग भरा...

स्वप्न हा शब्द किती मोहक आहे. सपना, ड्रीम, सपान अशा कितीतरी गोंडस नावांनी तो उच्चारला जातो, ओळखला जातो. आपलं स्वप्न, माझं स्वप्न असं म्हणत ही स्वप्नं आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनून जातात. स्वप्नांशिवाय आपण जगूच शकत नाही. स्वप्न आपल्या आयुष्यात सकारात्मक आशावाद निर्माण करतात

आपण पाहिलेली ही स्वप्न म्हणजे भविष्यकाळासाठी आपल्याला गवसलेली नवी दिशा असते. आणि त्याच दिशेने चालत चालत गेलो की आपली स्वप्न प्रत्यक्ष साकार झालेली आपल्याला दिसतात. तेव्हा मात्र आपल्या आनंदाला पारावार उरत नाही.

असं म्हणतात की, जेव्हा आपण आपलं एखादं स्वप्न सत्यात उतरवतो तेव्हा आपण परिवर्तन घडवून आणत असतो.

स्वप्नामध्ये प्रचंड ताकद असते. त्यांना इच्छाशक्तीचं बळ मिळालं तर अशक्य असं काहीच नाही. पण यात आणखी एक मुद्दा आहे की, फक्त स्वप्नं पाहून पुढील गोष्टी वार्‍यावर सोडून दिला असं होता कामा नये. आपल्या स्वप्नांचा कॅनव्हास खूप मोठा असावा जेणेकरून त्यात इच्छाशक्तीने रंग भरता भरता आपलं आयुष्य सहज सुंदर होईल. 



कारण आला दिवस भविष्याची चिंता करण्यात घालवला तर भविष्याकाळातील उज्ज्वल यशाला आपण पारखे होऊ. मग मात्र आपल्या हाती काहीच नसेल. म्हणूनच आपली स्वप्ने मुठीत पकडून ठेवा त्यांना भरकटू देऊ नका. आपली स्वप्न आपल्याजवळ नसतील तर आपल्या असण्याला अर्थ उरत नाही. 

आपलं आयुष्य आनंदाने भारून टाकणारी आपली स्वप्ने ध्येयाची जोड देऊन फुलवा आणि मग पहा तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. मग ठरलं तर! आजपासून स्वप्नांच्या गावी जाऊन मनसोक्त बागडायचे, हसायचे, खेळायचे, नाचायचे…आणि त्या स्वप्नांना वास्तवात आणण्यासाठी मनापासून हाती घेतलेले काम करायचे. हे फार सोपं आहे…सोडून द्या राग, लोभ, चिंता…ते पहा स्वप्नांचं फुलपाखरू येतंय…    

आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...