Sunday, 8 June 2014

‘अलबेला’ समाज

  आपल्या भारतीय समाजात मानसशास्त्र या विषयाची गंभीर दखल घेतली जात नाही. धर्म, रूढी, परंपरा आणि अंधश्रद्धेच्या कोंदणात मानसशास्त्राच्या वैचारिक अधिष्ठानाला गाडून टाकलं जातं. समाजात वावरताना प्रत्येक व्यक्तीचं जगणं मनमोकळं हवं. समाजात प्रत्येक व्यक्तीने परस्परांच्या भावना, मत समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला योग्य तो आदर मिळायला हवा. समाजातील प्रत्येक व्यक्तीची निकोप आणि सुदृढ मानसिकता असायला हवी. यालाच तर संवेदनशील माणूस म्हणतात. माणुसकीच्या या तत्त्वांचा विसर पडला की माणसाचा सैतान व्हायला वेळ लागत नाही.
   
स्वप्न आणि वास्तव यातील अंतर वाढत जाऊ लागतं तेव्हा माणसाचं भाबडं मन स्वप्नातच जगू पाहतं. समाज अशा माणसाला वेडा म्हणतं. मग या सैतानांची व्याख्या कशी करावीत्यांना शिक्षा कशी आणि कोणी करावीॽॽ
  आपल्या मनातील राग, लोभ, चीड संस्कारशील विचारांनी काबूत ठेवायला हवेत. त्याचा इतरांना त्रास होऊ द्यायचा नाही. सृजनशील मार्गाने अभिव्यक्त व्हायला हवे. रस्त्यावरील राडा संस्कृती समाज विघातक आहे.
  
समाजाची आजवरची स्थिती पाहता ज्या विचारवंतांनी, कलावंतांनी, लेखकांनी आपल्या विचारांनी लढा देण्याचं ठरवलं, त्यांना समाजाने कायम एकटं पाडलं आहे. कारण विचारांचं सामर्थ्य समाजाला कळतं पण वळत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे प्रवाहाच्या विरुद्ध जाणा-या प्रत्येक व्यक्तीच्या नशिबी अलबेलापण येतं.
संकटांना सामोरे जाताना आपल्या कोवळ्या मनाला अनेक वादळं झेलण्यासाठी कणखर आपणच करायला हवे.

अलिकडे समाजात जे बरे-वाईट बदल घडत आहेत, ते पाहता या समाजाला दिशा देणा-या असंख्य सृजनशील करांची (बाबुराव बागुलांच्या शब्दांत) गरज आहे. त्यामुळे इथून पुढे अशी आशा करते की जे लेखक, कलावंत, विचारवंत आपापल्या विचारांनी समाजात नवनिर्मितीची आस धरतील तेव्हा ते समाजासाठी अलबेला असणार नाहीत. तर ते समाजासाठी प्रेरक आणि नेतृत्व करणारे असतीलअलबेला हा उर्दू शब्द सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही अर्थाने वापरला जातो. या दोन्ही अर्थाने हा समाज अलबेला आहे.
आता जीवनात प्रत्येक क्षणी मूल्यांची कसोटी लागणार आहे…तयार रहा!

आपली मूल्यं आपणच जपली पाहिजेत. एकमेका सहाय्य करू…या आपल्या संस्कृतीचा विसर आपल्याला कसा पडला? इथून पुढे अलबेला हा शब्द सकारात्मकपणेच वापरला गेला पाहिजे, याची जबाबदारी आपल्यावर आहे.
त्या अत्याचारग्रस्त महिलेच्या तोंडून पुढील उद्गार उगाच नाही आले…

त्या हैवानापेक्षा बघ्यांची भीती वाटते…

No comments:

Post a Comment

आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...