‘पाऊस’ या तीन अक्षरी शब्दात आनंदच आनंद भरून राहिला आहे. पाऊस म्हणजे चैतन्याने भारलेले वातावरण…पण अलिकडे पाऊस म्हणजे मनाची मनसोक्त मुशाफिरी…कुठेॽ
तर निसर्गाचं नंदनवन असलेल्या कोकणात. कारण पाऊस येण्याची चाहूल
लागली की मला माझं बालपण आठवतं. कोकणासारख्या निसर्गसमृद्ध प्रांतात
बालपण साजरं झाल्यामुळे निसर्गाची विविध लोभसवाणी रुपं मी पाहिली
आहेत, अनुभवली आहेत. पावसाच्या मोसमात
कोकणातलं वातावरण कसं असतंॽ याचं वर्णन करायला शब्दच अपुरे पडतील म्हणूनच
त्या आठवणी जागवताना, ‘पावसाच्या वाहत्या पाण्यात कागदी होडी सोडावी’ तशी ही आठवण शब्दबद्ध करते आहे.
वैशाख वणवा असह्य होईस्तोवर पावसाची चाहूल
लागायची. ज्येष्ठ महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यात पेरणीला सुरुवात व्हायची. शेतावर
सगळ्यांची लगबग सुरू व्हायची. आणि आम्हा मुलांना कधी एकदा रेनकोट, छत्री घेतोय आणि
पावसाची मजा अनुभवत शाळेत जातोय, असे होऊन जायचे.
घराकडून शाळेत पोहोचायला अर्धा-पाऊण तास तरी
लागे. पण छत्री घेऊन, रेनकोट घालून शाळेत जाताना ती पावसाळी सहलच असायची. मला तर वाटे
पावसाच्या दिवसात पावसाने शाळेत जाताना आणि पुन्हा घरी येताना अशा दोन्ही वेळेला आपल्या
सोबत असावे. अगदी मनसोक्त चिंब भिजूनच घरी यावे…गावाकडच्या आठवणी आठवाव्या तेवढ्या
थोड्याच…
पाऊस आला की मनाला खूप शांत आणि टवटवीत वाटू
लागतं. झाडं जशी पावसात भिजून पावसाची मजा लुटतात, तशीच आपल्यालाही लुटता यावी असं
सारखं वाटत राहतं. आणि झाडांचा हेवा वाटू लागतो.
पावसाळी दिवसात मनाचे हे विविध खेळ मनातच खेळले
जात असतात. म्हणूनच
मला वाटतं पाऊस ही मानसशास्त्रीय
संज्ञा आहे. साहित्याबरोबर मानसशास्त्र
विषय विविध पुस्तकातून अभ्यासताना मला एक गोष्ट लक्षात आली की पावसाचं नातं मानसशास्त्राशी
आहे. कारण गंमत पहा ना! आपण जसा विचार
करतो तसे पावसाचे विविध विभ्रम आपल्याला पहायला मिळतात.
आपण आनंदात
असलो तर पाऊस आपल्याला आनंददायी वाटतो. आपण दुःखी असलो तर पाऊसही आपल्याला करूण, हुरहुर लावणारा,
दुःखी-कष्टी वाटतो.
काही महिन्यांपूर्वी
अ रेनी डे नावाचा चित्रपट पाहिला. त्या चित्रपटातील विषयाने तर माझ्या पावसाच्या
मानसशास्त्रीय संज्ञेला अधिकच बळकट केले.
दीड तास पावसात
भिजण्याची अनोखी किमया या चित्रपटाने केली.
तो चित्रपट पाहून
घरी पोहोचेपर्यंत मन आणि पाऊस…मन आणि पाऊस हे दोन शब्द माझ्या विचारांमध्ये सारखे येत
होते. त्यानंतर विज चमकावी तसा लख्ख प्रकाश पडला. मनातला विचार चमकून पुन्हा मनातच
तरंगू लागला. कारण पावसाचं मनाशी असलेलं नातं आता अधिक दृढ वाटू लागलं.
अभिनेत्री मृणाल
कुलकर्णी यांनी नायिकेच्या मनात बरसणा-या पावसाचे उत्कट भाव आपल्या सशक्त अभिनयातून
व्यक्त केले. पाऊस आणि मन यातील साधर्म्य चित्रित करताना दिग्दर्शक राजेंद्र तालक यांची
एकेक फ्रेम अक्षरशः पावसात भिजूनच नजरेसमोर साकार होत होती. अशी प्रतिकात्मकता मी कित्येक
वर्षानंतर चित्रपटात पाहत होते.
त्यामुळे तो
चित्रपट म्हणजे मन भारावून टाकणारी, पावसाचं मनाशी असलेलं नातं उलगडणारी अप्रतिम कलाकृती
होती.
रसूल पुकुट्टी
यांच्या कलात्मक ध्वनिमुद्रणातून चित्रपटात बरसलेल्या पावसाने माझ्या मनात अनेक प्रश्न
निर्माण केले. का बरं हा सबंध चित्रपटभर पाऊस पडतोयॽ असा सर्वसामान्य
प्रेक्षकासारखा पहिला प्रश्न उभा राहिला. नंतर एकामागोमाग प्रश्नांची माळच गुंफली गेली. पण मग हळुहळु त्या सा-या प्रश्नांची उत्तरं
माझी मलाच उलगडत गेली.
आपल्या प्रत्येकाच्याच मनामध्ये पाऊस असतो.
कधी तो आनंदाश्रुंनी सोबत करतो. तर कधी दुःखाश्रू होऊन मन हलकं करतो. पण कधी कधी आपणच
आपल्या मनात बरसणा-या पावसाकडे दुर्लक्ष करतो. आणि आतल्या आत अक्षरक्षः घुसमटत जगू
पाहतो.
पाऊस म्हणजे आपल्या संस्कृतीचा अतिशय महत्त्वाचा
घटक आहे. पावसामुळेच तर आपलं जीवन आहे.
आपल्या मनातल्या पावसाला ओळखा. त्याला बरसू
द्या. तो सुखाचा असेल तर तुम्ही आनंदी व्हाल आणि तुमच्यासोबत इतरांनाही आपल्या आनंदात
सहभागी करून घ्याल. आणि तो पाऊस दुःखाचा असेल तरीही त्याला अडवू नका. बरसू द्या. तुमचं
मन मोकळं होऊ द्या. त्यामुळे मनावरचं मळभ दूर होऊन मनाचं आभाळ स्वच्छ होऊन जाईल, त्याला
नवी उभारी मिळेल…पुन्हा आनंदाच्या पावसात भिजण्यासाठी…
पावसाच्या येण्याने चराचर सृष्टी तृप्त होऊन
जाते. मग आपलं मन तर इतकं नाजूक आहे…
त्याला कितीसा वेळ लागणार आहे, नवचैतन्याने भारून जाण्यासाठी… काय पटतंय नाॽ
त्याला कितीसा वेळ लागणार आहे, नवचैतन्याने भारून जाण्यासाठी… काय पटतंय नाॽ
पाऊस म्हणजे आपलं मन
चला आजपासून मनमोकळं जगू या…
आणि इतरांनाही मनमोकळं जगण्यासाठी ‘मी आहे तुझ्यासोबत’ असा विश्वास देऊ या.
No comments:
Post a Comment