Thursday, 5 June 2014

अनुभवातून शिकणं

समोर घनदाट जंगलाने वेढलेला उत्तुंग सिद्धगड. आणि याच सिद्धगडाच्या पायथ्याशी लाल चि-यांनी बांधलेली, लांबच्या लांब घरासारखी कौलारू छप्पर असलेली आणि अंगणात फुलांची बाग असलेली आमची शाळा. आमच्या बालपणातील भावविश्वाचे केंद्रबिंदू म्हणजेच ही शाळा. समोर दिसणा-या उत्तुंग सिद्धगडाकडे पाहून आम्ही हा एका दमात चढून जाऊ अशी इच्छा मनात धरायचो. त्याची उंची आमच्या बालमनाला खुणावत होती. त्यानंतर पाच-सहा वेळा थकलेल्या- दमलेल्या अवस्थेत तिथे जाऊनही आलो होतोकिती लिहावे तेवढे थोडेचअसो

पहिल्या इयात्तेत शाळेत नाव घालतानाच शाळेच्या आसपास असलेल्या निसर्गरूपी शाळेतही नाव घालणे ओघाने आलेच. अतिशय वेड लावणारा निसर्ग होता. शाळेच्या पाठीमागे नजरेच्या टप्प्यात न मावणारे भले मोठे मैदान होते. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी तिथे खेळायला जाणे हा आमचा नित्यक्रम असायचा. शाळेत शिक्षकांनी नेहमी अभ्यासाबरोबरच कला, साहित्य, खेळ यांची गोडी लावल्यामुळे ती दहा वर्षे अनेकविध अनुभवांनी समृद्ध झाली. शाळेत गेल्यापासून ते संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर घरी परतेपर्यंत पूर्ण दिवस शाळामय असायचा. शाळेतील ते दिवस मजेचे आणि मोरपंखी होते. ते कधीच विसरता येणार नाहीत.

आता लिहायला बसले आहे तर शाळेतील अनेक आठवणींनी मनाच्या आभाळात विहार करायला सुरुवात केली आहे. शाळा आणि अनुभव या दोन शब्दांचा उल्लेख आलाच आहे तर एक प्रसंग आठवतो आहेआम्हाला शाळेची वेळ सुरू झाल्यावर फळा पुसून त्यावर सुविचार, तारीख, वार, विद्यार्थ्यांची संख्या असे सर्व फळ्यावर लिहावे लागायचे. प्रत्येक दिवस एकेका विद्यार्थ्याला नेमून दिलेला असायचा. त्या दिवशी आमच्या वर्गातील सुहासने कमालच केली. त्याला शैलाने जीवन हे एक फूल आहे आणि प्रेम हा त्यातील मध आहे. असा एक सुंदर सुविचार फळ्यावर लिहिण्यासाठी सुचवला. पण या वाचनवेड्या पठ्ठ्याने कुठल्यातरी पुस्तकात वाचलेली एक ओळ सुविचार म्हणून लिहून ठेवली. गुरुजी वर्गात आले आणि त्यांनी ती ओळ वाचलीमाणूस हा मरेपर्यंत विद्य़ार्थी असतो. या ओळीच्या संदर्भाने मग गुरुजींनी खूप काही विस्ताराने सांगितले. त्यांनी सुविचारातील वाक्याबरोबरच जोडीने अनुभव हा शब्द घेतला. मग त्यांनी जे काही सांगितले त्या ओळी अशा-   

‘‘माणसाने आपल्या आयुष्यात आलेल्या ब-या - वाईट अनुभवांतून सतत शिकत राहिले पाहिजे. आपल्या आयुष्यात घडणा-या गोष्टी, घटना, प्रसंग यातून गाठीशी येणा-या अनुभवांचे सखोल विश्लेषण करता आले पाहिजे. तरच आपल्याला त्या अनुभवांतून सकारात्मक दृष्टीकोन प्राप्त होतो. अशी दृष्टी लाभलेले लोक आयुष्यात खूप काही अलौकिक करण्याचे धाडस करू शकतात. असे अनुभवातून शिकणे या अर्थाने माणूस मरेपर्यंत विद्यार्थी असतो. पाश्चात्य सौंदर्यमीमांसा करणारे कविवर्य बा. सी. मर्ढेकर यांनीही त्यांच्या वाङ्मयीन महात्मता या पुस्तकात अनुभवाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यामुळेच अतिशय धीर-गंभीर आणि अभ्यासपूर्ण विवेचन करणा-या मर्ढेकरांच्या पुढील ओळी आपल्याला गावाकडच्या बालपणीच्या दिवसात घेऊन जातात
‘‘कितीतरी दिवसांत नाही चांदण्यात गेलो.
कितीतरी दिवसात नाही नदीत डुंबलो.’’

गुरुजींनी सांगितलेली अनुभवातून शिकणे ही संकल्पना आम्हा मुलांना खुपच आवडली. आणि या संकल्पनेला आमच्या आमच्या आकलनानुसार आम्ही स्मरणात साठवूनही ठेवलं.
म्हणूनच मला असं वाटतं अनुभवातून शिकणं याला फार महत्त्व आहे.
मीही आजवर अशा अनेक अनुभवातून खूप काही शिकले. शैक्षणिक पात्रतेपेक्षा अनुभवातून शिकण्यामुळे जीवनाकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन
व्यापक झाला आहे. त्यामुळे सकारात्मक विचारांचं सान्निध्य मला मिळालं.
यापुढील आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सकारात्मक विचारांच्या सोबतीने अनुभवातून शिकणं सुरुच राहणार आहे
अभ्यासापलिकडे जाऊन व्यावहारिक ज्ञानाने माझं आयुष्य अधिक सुखकर करणा-या माझ्या गावच्या शाळेची तुलना कुणाशी होऊच शकत नाही.
आचार्य अत्रेंच्या कवितेतील ओळी इथे गुणगुणाव्याशा वाटतात

ही आवडते मज मनापासुनी शाळा

लाविते लळा ही जशी माऊली बाळा

No comments:

Post a Comment

आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...